वेंगुर्ला नगर वाचनालयाचा १४८ वर्षांचा अविरत प्रवास

समाजभान – सातत्याने कार्यरत संस्थांची ओळख
वेंगुर्ला नगर वाचनालयाचा १४८ वर्षांचा अविरत प्रवास
उत्साही कार्यकर्त्यांचा उत्साहातून अनेक संस्था जन्म घेतात. परंतु दीर्घकाळापर्यंत अविरत काम करणा¬-या संस्था मात्र हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच आहेत.कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता निरपेक्ष सेवा देणारी एकमेव संस्था म्हणजे नगर वाचनालय, वेंगुर्ला ही होय. ‘वाचाल तर वाचाल‘ या उक्तीप्रमाणे गेली सलग १४८ वर्षे उपयुक्त अशा ग्रंथांच्या सहाय्याने ही संस्था वाचकांना ज्ञानामृत देत आहे.
ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्यामुळे ग्रंथांचा संग्रह करुन नागरिकांना वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिके, नियतकालिके व अन्य संग्रही पुस्तके नाममात्र वर्गणी देऊन उपलब्ध होता. तसेच या संस्थेतर्फे व्याख्याने, परिसंवाद, निबंध, सुजाण वाचक स्पर्धा या उपक्रमांचे आयोजन सातत्याने केले जाते. अशा अनेक सुस्पष्ट उद्देशाने सुरु झालेल्या या नगर वाचनालयाची स्थापना इ.स.१८७१ मध्ये झाली. ‘धी नेटिव्ह जनरल लायब्ररी वेंगुर्ल‘ या नावाने ही संस्था सुरु झाली.
बॅ. सावरकर वेंगुर्ला येथे आले असता त्यांनी खास वाचनालयास भेट दिली.या संस्थेचे ‘धी नेटिव्ह जनरल लायब्ररी‘ हे नाव वाचून त्यांनी नापसंती व्यक्त केली व त्याऐवजी नगर ग्रंथालय अगर जे संयुक्त असेल ते मराठी नाव ठेवावे असे सुचविले. त्यांच्या सुचनेचा आदर ठेवून या संस्थेचे ‘नगर वाचनालय, वेंगुर्ला‘ असे नामकरण करण्यात आले. वेंगुर्ला शहराच्या मध्यवर्ती श्री रामेश्वर मंदिराच्या शेजारी सुरु असलेल्या नगर वाचनालयाच्या या पवित्र वास्तूस स्वामी विवेकानंद, स्वा.सावरकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ.राजेंद्र प्रसाद, अप्पासाहेब पटवर्धन, साने गुरुजी, रेव्हरंट टिळक, वि.स. खंाडेकर, बाळशास्त्री हरदास, बॅ.नाथ पै, अनंत काणेकर, प्र.के.अत्रे, वसंतराव नाईक, रणजित देसाई, जयप्रकाश नारायण, वि.स.पागे, इंदिरा संत, मधु दंडवते, अरविंद पिळगांवकर, जयंत सावरकर, डॉ.विजय भटकर यांसारख्या अनेक थोर व्यक्तींनी भेटी दिल्या.
संस्थेत सुमारे ४४,८०० ग्रंथसंपदा आहे. दैनिके १८, साप्ताहिके व पाक्षिके १५ मासिके ४० व देणगी नियतकालीके मिळून एकूण १०० नियतकालीके दर महिन्याला ग्रंथालयात येतात. सुमारे १,२०० हून अधिक सभासद असलेली संस्था विविध उपक्रम राबविते. संपूर्ण जिल्ह्याचा विचार करता उपक्रमशील वाचनालय म्हणून वेंगुर्ला नगर वाचनालयाला गौरविले जाते. याचे श्रेय संस्थेच्या कार्यकारी मंडळाकडे जाते. अॅड.सूर्यकांत प्रभूखानोलकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री. अनिल सौदागर यांच्या कुशल कार्याध्यक्षतेखाली संस्था नवनवीन उपक्रम राबविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते. दैनंदिन कारभार कार्यवाह श्री.कैवल्य पवार तत्परतेने पाहतात.
अॅड.देवदत्त परुळेकर, श्री.अनिल सौदागर, श्री.राजेश शिरसाट, श्री.कैवल्य पवार, श्री.नंदन वेंगुर्लेकर, श्री.सदानंद बांदेकर, प्रा.महेश बोवलेकर, श्री.दीपराज बिजितकर, श्रीमती सुमन परब, श्रीमती सुशीला खानोलकर हे सर्व कार्यकारी मंडळ सदस्य स्वतःचा वेळ देतात. विविध देणगीदारांनी दिलेल्या देणगीतून गेली अनेक वर्षे संस्था नियमितपणे १ ते ७वी तसेच १०वी, १२वी व पदवी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी यांना पारितोषिके, आदर्श शिक्षक/शिक्षिका, आदर्श शाळा पुरस्कार, कै.सौ.सुशीला श्रीकृष्ण सौदागर स्मृती आदर्श शिक्षक/शिक्षिका पुरस्कार माध्यमिक विभाग, आदर्श कर्मचारी पुरस्कार, उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार, श्री.स.सौदागर पुरस्कृत सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा, शुभदा शेणई पुरस्कृत अंगणवाडी/बालवाडी स्पर्धा, अ.ना.शेणई पुरस्कृत वक्तृत्व स्पर्धा, पं.जनार्दनशास्त्री कशाळीकर पाठांतर स्पर्धा, स्व.भालचंद्र शंकरराव कर्पे सुगम संगीत स्पर्धा, ज.बा. आरोसकर वक्तृत्व स्पर्धा, म.शां.भांडारकर वक्तृत्व स्पर्धा, सहदेव वि.कुमठेकर निबंध लेखन स्पर्धा, सावित्रीबाई स.कुमठेकर वक्तृत्व स्पर्धा, सुदत्त कल्याण निधी पुरस्कृत स्वामी विवेकानंद व स्वा.सावरकर वक्तृत्व स्पर्धा, वाचक स्पर्धा या स्पर्धांचे आयोजन करुन रोख पारितोषिके, पुरस्कार दिले जातात. मागील वर्षापासून संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. अनिल सौदागर यांचे देणगीतून स्व.श्रीकृष्ण स. सौदागर पुरस्कृत आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात येतो. तसेच स्व.रमाकांत गुरुनाथ शेटये स्मृति साहित्यिक पुरस्कार तसेच यावर्षीपासून ग्रंथालय क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ‘आदर्श ग्रंथालय सेवक‘ पुरस्कार दिला जाणार आहे. यावर्षी ग्रंथालय सेवक पुरस्कारासाठी गुरुदास मळीक यांना प्रदान करण्यात येणार आहे.
संस्थेमध्ये स्वतंत्र असा स्पर्धा-परीक्षा पुस्तक विभाग आहे. तसेच स्वतंत्र बाल विभाग व महिला विभाग आहे. संस्थेची वार्षिक तपासणी मा.जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांजकडून करण्यात येते.व त्यांच्याकडून संस्थेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येते. हे संस्थेचे १४८ वे वर्ष असून लवकरच शतकोत्तर सुवर्णमहोत्सव जवळ येत आहे. सभासदांना जास्तीत जास्त तत्पर व विनम्र सेवा देण्याचा प्रयत्न येथील ग्रंथपाल गुरुदास मळीक, किशोर सावंत, पूजा धावडे, दिगंबर सातार्डेकर हे कर्मचारी करीत आहेत.
या वाचनालयाला सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचा आदर्श ग्रंथालय पुरस्कार तसेच ग्रंथपाल श्री.गुरुदास मळीक यांना आदर्श ग्रंथपाल, ग्रंथमित्र पुरस्कार मिळाला आहे. जिल्हा ग्रंथालयाच्या तांबळडेग ता. देवगड येथे झालेल्या अधिवेशनामध्ये जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सिंधुदुर्ग श्रीमती श्रेया गोखले यांनी उत्तम लेखे ठेवणे व आदर्शवत दप्तर ठेवल्याबद्दल वाचनालयाचा खास उल्लेख करुन विशेष कौतुकही केले होते. इतर ग्रंथालयांनी यांचा आदर्श ठेवून आपले लख अद्ययावत ठेवावेत असे आवाहन सर्व ग्रंथालयांना केले. जिल्हा ग्रंथालय संघ कार्यकारी मंडळावर अध्यक्ष म्हणून श्री. अनिल सौदागर तसेच श्री.गुरुदास मळीक, श्री.किशोर सावंत, सौ.पूजा धावडे यांनी सदस्य म्हणून काम पाहिले आहे. श्री. अनिल सौदागर यांनी राज्य ग्रंथालय संघाच्या कार्यकारिणीवर आपल्या अभ्यासू व्यक्तिमत्वाने स्वतःचा असा खास ठसा उमटविला आहे.

प्रतिक्रिया – आज आमच्या भूमिकेतून आम्ही नगरवाचनालयाशी जोडले गेलेलो असून हा डोलारा सांभाळत आहोत. असे असले तरी आजच्या पिढीनेही यामध्ये काही बदल सुचवले तर त्याही आमच्यासाठी स्वागर्ताहच आहेत. ऐतिहासिक वास्तू म्हणून नगरवाचनालयाची प्रतिकृती वेंगुर्ला नगरपरिषदेच्या म्युझियममध्ये जतन करण्यात आली आहे हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.
– कैवल्य पवार, कार्यवाह

Leave a Reply

Close Menu