“मे” आय कम…

मे महिना संपत आला. एव्हाना मुंबईकरांची परतण्याची घाई सुरु झाली असती. मुंबईला परताणा-या ट्रेन्स, बस गर्दीने ओथूंबन गेल्या असत्या. परंतु करोनामुळे चाकरमानी यंदा कोकणात येवू शकले नाहीत. 1996 पासून मी मुंबई/नवीमुंबई मध्ये स्थायीक आहे. त्यांनतर मे महिन्यातली माझी वेंगुर्ला फेरी 1997 पासून आजपर्यंत कधी चुकली नाही. पर्यटनासाठी महाराष्ट्रात, भारतात किंवा विदेशात एखादी फेरी एप्रिल मे महिन्यात होते. पण तरीही त्यांनतर पुन्हा एकदा वेंगुर्ल्यात जाणे होतेच. यावर्षी नियोजित बाली ट्रीप कोरोनामुळे रद्द करावी लागली. त्याचे किंचीतमात्र दु:ख नाही पण यावर्षी इतर चाकरमान्यांप्रमापणेच माझेही मे महिन्यात वेंगुर्ल्यात जाणे होणार नाही याची खंत मात्र मनात कायम राहील. मी फार अगोदर पासून वेंगुर्ल्याला जाण्याचे प्लॅनींग करत नाही. इतरवेळी जाणेयेणे असतेच. एप्रिल मे महिन्यात ऑफिसात कामाची गरज बघून सुट्टी टाकायची. आणि मिळेल त्या वाहनाने वेंगुर्लेच्या दिशेने निघायचे. कधी स्वत: ड्राइव्ह करत तर कधी रेल्वेने जसे सोयीचे असेल त्याप्रमाणाने प्रवास करत वेंगुर्ला गाठायचे हा नित्यक्रम.
आमचे वेंगुर्ले हे खूप जुने शहर. शहरात मिळणा-या सगळ्या सुविधा आणि ग्रामीण भागातील सुख याचा सुरेख संगम आहे इथे. प्रदुषणाचा त्रास नाही, गाड्यांचा गोंगाट नाही पण कुठेही जायला कधीही तुमच्या ऐपतीप्रमाणे वाहन उपलब्ध हाईल. मुंबईहून नेलेल्या मिठाईचे इथल्या लोकांना काही अप्रूप नसायचे. मग त्यापेक्षा इथे गेल्यावर शिरसाठ, गांधी मिठाईवाला, चंदू मिठाईवाला यांच्याकडून मिठाई घ्यायची. मुंबईतल्या मिठाईतला भंपकपणा आणि वेंगुर्ल्यातील मिठाईतील अस्सलपणा यातला फरक लगेच कळून यायचा.
वेंगुर्ल्याला गेल्यावर सोमवार बघून आई आम्हाला होळकरात घेऊन जायची. जाताना इथे आमचे जुने घर होते त्याच्या काही अस्पष्ट खूणा होत्या त्या नेहमी दाखवायची. होळकरात जायला मनिष कोल्डड्रिंक आणि खर्डेकर कॉलेज यांच्या मध्ये एक पायवाट होती. वाटेत आमच्या त्याकाळच्या जुन्या शेजा-यांची भेट घ्यायची. आई “ही माझी सून, ह्यो माझो नातू” अशी सून नातवंडाची सगळ्यांना ओळख करुन द्यायची. डोंग-याच्या पायथ्याशी होळकराचे देऊळ आहे. अगदी निर्मनुष्य. देवळाच्या बाजूला एक तळे आणि मागे किर्द झाडी. तळ्यातून एक झरा खाली वस्तीत वाहत जायचा. त्याचा आसपासचा परीसर, पक्ष्यांचा किलबीलाट हे सर्व निसर्गसौंदर्य अव्दितीय होते. हा खळखळता झरा वाहत येऊन वस्तीजवळ एका छोट्याशा उंवचट्यावरुन खाली पडायचा. इथून पीण्यासाठी पाणी भरले जायचे, कपडे धूतले जायचे. हा सर्व परीसर लहाणपणी अनवाणी पायाने पालथा घातला होता. डोक्यावरुन सरपणाच्या लाकडाची मोळी घेऊन घरी जायचो. लहानपणी केलेली इथली सफर अजूनही आठवते.
एप्रिल मे मध्ये फेरी असेल तर कोकणच्या रानमेव्याची मेजवाणीच असायची. लाल पीवळ्या रंगाचे बोंडू चे फोडी करुन त्यात मीठ मसाला लावून हिराच्या काटीने टोचून खाण्यात मजा काही औरच आहे. कापे फणस खाताना तो फोडून खायला जरा त्रासच असायचा, पण गरे आयते काढून दिल्यावर मी भरपूर गरे खायचो, वर गरे खाल्ल्याने पोटाला त्रास होऊ नये म्हणून एक काप खोबरा खायचा. रसाळ फणस खायला एकदम सोपा. बोट खूपसून हातानेच तो फणस फोडायचा आणि गपागप गरे फस्त करायचे. काट्याकुट्यातून करवंद शोधून खायची मग चव अजूनच छान लागायची. फळे धूवुन खा असले नखरे कधी रानात गेल्यावर आम्ही केले नाहीत. हसोळी हे अफलातून फळ… कच्चे असताना आंबट आणि पीकल्यावर काळा रंग होतो आणि चव मात्र बदलते..थोडेसे आंबट गोड.
मे महिन्याच्या सुट्टीत वेंगुर्ल्याला आल्यावर प्रत्येक दिवस वेंगुर्ल्यातील सर्व पर्यटनासाठी योग्य स्थळांना भेट द्यायची. त्याकाळी पायीपायीच फिरायचो. मजा यायची. फिरताना वाटेत जुने सवंगडी भेटायचे मग जुन्या आठवणी जागृत करायच्या. कॅम्पात फिरायचा जाताना वाटेत लागणा-या साकवावर थोडा वेळ घालवायचा. कॅम्पात मागे टॉय ट्रेन सुरु झाली होती. मुलाबरोबर या ट्रेनमध्ये बसून आपणही लहान व्हायचे. सागरेश्वरला सुध्दा चालत जायचे आणि चालत यायचे. वाटेत गणपतीचे, मानसीश्वर मंदिराचे दर्शन घ्यायचे. थोडेसे वेगुर्ला डेपोकडे रेंगाळायचे. वेंगुर्ले बंदरावर गेल्यावर दिपस्तंभाकडे जाऊन यायचे. आता एवढ्या पाय-या चढताना दमछाक होते म्हणून दिपस्तंभाकढे जायचे टाळतो. सागर बंगल्याच्या बाजूला खडकावर लाटांच्या गर्जना ऐकताना कधी काळोख पडायचा काही कळायचे नाही. मग बंदरावरील ताजे फडफडीत मासे खरेदी करुन घरी येऊन मस्त फ्राय करायचे आणि जेवनावर आडवा हात मारायचा.
सात आठ दिवस मंजूर करुन घेतलेली सुट्टी हां हां म्हणता संपून जायची. मग डॉक्टरकढून मेडीकल सर्टीफिकेट घेऊन सिक लीव टाकायची. पण काही दिवसानी जड अंतकरणाने कर्मभूमीकडे परतावे लागायचेच. सोला(कोकम), आगळ, चिंच, तिरफळा, उकडे तांदूळ यांच्या मोटल्या बांधल्या जायच्या. मुंबईला परतायच्या दिवशी सकाळी ठरलेल्या वेळेच्या अगोदरच दारात रिक्षा हजर असायची. तसे रिक्षा स्टॅण्ड आमच्या घराजवळच होते पण सकाळी सकाळी घाई नको म्हणून आदल्या दिवशी रिक्षा सांगितलेली असायची. जाताना मन आणि बोजा दोन्हीही जड झालेले असायचे.
एप्रिल मे महिना म्हणजे कोकणातील लोकांचे चार पैशे कमावण्याचे दिवस. वर्षभराची मेहनतीचा मेहनताना या दोन महिन्यात मिळतो. नारळ सुपारीचे किरकोळ उत्पन्न वर्षभर सुरु असतेच. पण आंब्याचे उत्पन्नाचे स्त्रोत एप्रिल मे मध्ये असते. फळांचा राजा हापूस मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात एवढेच काय जगात महागड्या दरात विकला जातो. मात्र बागायतदाराना या दरातील फार कमी हिस्सा हाती लागतो. दलाल आणि विक्रेते यांची चांदी असते. एखाद्या बागायतदाराला लाख दोन लाख जरी हाती पडले तरी फवारणी, काढणी, प्रक्रिया, गवत, आंब्याच्या पेट्या (पूर्वी लाकडाचे खोके असायचे अजूनही आहेत परंतु पुठ्ठयाचे खोके जास्त प्रमाणात वापरले जातात) मजूरी वजा जाता उत्पन्नाचा फारच कमी भाग हाती राहतो. शिवाय काजू, कोकम, चिंच आहेच. रानात मिळणारी करवंदे, जांभूळ, जामून, जगमा इत्यादी रानमेवा बाजारात विकून चार पैसे गाठीला येतात. आता पर्यटक कोकणात येण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे त्यामुळे तेही नवीन उत्पन्नाचे साधन निर्माण झाले आहे. यासर्व बाबींमुळे मिळणारे उत्पन्न काही फारमोठ्या प्रमाणात नाही पण अंथरुण पाहुन पाय पसरण्याची वृत्ती, समाधानी राहण्याची दैवी देणगी यामुळे मनाच्या श्रीमंती बरोबर आर्थिक श्रीमंतीही आता थोडीफार येऊ लागली होती.
यावर्षी नेमके या कालावधीतच कोरानाचे संकट आल्याने कोकणचा माणूस फार संकटात आहे. चाकरमानी काही ना काही बहाणा करुन कोकणात परतत आहेत. जे मुंबईत अडकले आहेत त्यांनी योग्य ती खबरदारी घेऊन परतणै योग्यच. परंतु कोरोनामुळे या वर्षी आर्थिक संकटात सापडलेल्या कोकणी माणसांवर तसेच येथील आरोग्य व प्रशासकीय व्यवस्थेवन भार  टाकण्यापेक्षा आहे तीथेच थांबून सहकार्य केल्यास उत्तम. कोकण आपलेच आहे. आपण कोकणात जावूच पण कोरोना या संकटावर मात करुनच .
– संजय गोविंद घोगळे (8655178247)

Leave a Reply

Close Menu