होय, स्क्रिझोफ्रेनिया नियंत्रणात राहू शकतो

स्किझोफ्रेनिया ही मुख्यत्वे विचार विकृती आहे. यात एकतर विचारांचा विषय विकृत असतो किवा विचारातील सुसुत्रता नष्ट होते. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.भरत वाटवानी यांनी सुमारे सात हजार मनोरुग्णांना वैद्यकीय उपचार देऊन, बरे करुन, पुन्हा त्यांच्या कुटुंबासोबत जोडून दिले आहेत. त्यासाठी कर्जत येथे स्थापन करण्यात आलेल्या श्रद्धाया संस्थेचा प्रसारही दिवसेंदिवस वाढतो आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना जागतिक प्रतिष्ठेचा मॅगसेसेपुरस्कार मिळाला आहे.

         खरं तर मनोरुग्णहा शब्द उच्चारला की, प्रत्येकाच्या नजरेसमोर एक प्रतिमा उभी राहते. ती प्रतिमा फक्त चेहरा बदलून अधूनमधून वास्तवाचं भान न राहिलेल्या हातवारे करीत असंबंध बडबडत फिरणा-या एखाद्या मळकट व्यक्तीची असते. त्यामुळे आपोआपच आपल्याला मनातल्या मनात मानसिक आजारी व्यक्तीची अनुभव घेण्याआधीच अवास्तविक भिती वाटू लागते. ही भिती म्हणजे अक्षरशः दहशतीप्रमाणे टोकाचं वलय निर्माण करते. या भितीच्या वलया -प्रमाणे मानसिक आजार, त्यावरचे उपचार, मनोरुग्ण यांच्याबद्दल अनेक चुकीचे समज आपल्या सोबत वागवत असतो.

      प्रत्येक माणसाच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक क्षण येतो. त्या एका क्षणात सगळे बदलून जाते. आतला आवाज साद घालू लागतो. डॉ.भरत वाटवानी यांच्या आयुष्यातही असा क्षण आला. या क्षणांनी त्यांना स्वतःशी पुन्हा ओळख करून दिली. ते आणि त्यांची पत्नी स्मिता एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. तेथील परिसरात खायला मिळेल म्हणून अनेक मनोरुग्ण भटकताना दिसत होते. रस्त्याच्या दुस-या बाजूला फूटपाथवर तसाच एक मनोरुग्ण तरुण बसला होता. त्याच्या हातात नारळाची करवंटी होती, त्याने ती करवंटी उचलून बाजूलाच वाहत असलेल्या गटाराच्या पाण्यात बुडवली आणि तो ते पाणी प्यायला. आपण नेमके काय करतोय याचे भानही त्याला नव्हते. पण त्याच्या त्या कृतीमुळे डॉक्टर दांपत्य अस्वस्थ झाले. तो स्किझोफ्रेनिक होता. ते तडक त्याच्याकडे गेले, त्याला आपल्यासोबत घेऊन त्याच्यावर उपचार सुरु केल्यानंतर काही महिन्यांत त्याच्यात विलक्षण सुधारणा दिसू लागली. त्याने दिलेल्या माहितीवरून लक्षात आले की, हा तरुण बीएस्सीपर्यंत शिकलेला आहे. त्याचे वडील आंध्र प्रदेशमधल्या जिल्हा परिषदेमध्ये अधिकारी पदावर आहेत. तो पूर्ण बरा झाला आणि त्याच्या कुटुंबाशी तो पूर्णपणे जोडला गेला. तरीही त्याची स्क्रिझोफ्रेनिकची हिस्ट्री असल्याने त्याला औषध कायम घ्यावे लागते. अनेकदा स्वतः स्क्रिझोफ्रेनियाचा त्रास असलेल्या व्यक्ती आणि त्यांचे नातेवाईक आता आजार बरा झाला असं म्हणतात. त्यामुळे औषधांची गरज नाही, असं वाटून अनेकदा ती बंद केली जातात. खरं तर त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आजाराची लक्षणं नियंत्रणात आहे असा असतो. जशी मधुमेह, हृदयविकाराप्रमाणेच स्क्रिझोफ्रेनिया असलेल्या व्यक्तीला कायम गोळी घ्यावी लागते.                                    

   समाजाचा आजही या आजाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला नाही. कारण त्याबद्दल पुरेशी जनजागृती नाही. मानसिक आजार मेंदूंमधील रासायनिक बदलांमुळेही होतात. याची माहितीच अनेकांना नसते. त्यामुळे या आजारासाठी बाबा-बुवांकडे जाण्याचा, लिंबू-गंडेदोरे बांधण्याचा मार्ग स्वीकारला जातो. मानसिक आजाराबद्दलचे गैरसमज, अंधश्रद्धा या सगळ्याला खतपाणी घालत जातात. त्यामुळे आजार मान्य करुन मोकळेपणाने डॉक्टरांकडे जाण्याऐवजी हा आजार लपवण्याकडे कल अधिक असतो. दिल्लीमधल्या सधन घरातला डॉक्टर मुलगा, मुंबईतला सीए, भाऊ लष्करामध्ये असलेली व्यक्ती, जेजे आर्ट स्कुलमधले शिक्षक असे कित्येक मनोरुग्ण बरे होऊन पुन्हा त्याच्या  कुटुंबाकडे गेले आहेत. त्यांनी आयुष्याची नवीन सुरुवात केली. असे अनेक रुग्ण पाहिल्यानंतर लक्षात आले की, आपल्या कुटुंबात, माणसांना असा आजार होऊ शकतो, हे मान्य केले जाते नाही. त्यातून गुंता वाढत जातो.

      आपल्याला अशी विकृती निर्माण झाली आहे हे रोग्याच्या लक्षात येत नाही. अशी व्यक्ती मग भ्रम होणे, भास होणे, असंबंध वागणे, असंबंध बोलणे वगैरे लक्षण दाखवू लागतात. रोग्याच्या विविध लक्षणांवरुन स्क्रिझोफ्रेनियाचे चार प्रकारात वर्गीकरण करता येते. पहिला उपप्रकार म्हणजे, पॅरनॉईड स्क्रिझोफ्रेनिया. थोडक्यात, भ्रामक कल्पनांचा उदय. पराकोटीची संशय वृत्ती. ठाम अतार्किक समजुती वगैरे लक्षणे दिसतात. मानसीला हाच रोग झाला होता. अलिकडे तिच्या स्वभावात फार फरक पडला होता. दडपणाखाली असल्यासारखी ती वागे. तिची बहिण तिला डॉक्टरांकडे घेऊन गेली तेव्हा ती म्हणाली, डॉक्टर हल्लीची तरुण मुले फारच बिघडली आहेत आणि आता हे कॉम्प्युटरही त्यांच्या दुर्गुणांना खत-पाणी घालत आहेत. आमच्या वाड्यातील तरुण माझं वैयक्तिक जीवन कॉम्प्युटरवर पहातात आणि टीव्हीवर प्रोजेक्ट करुन आपल्या मित्रांना दाखवितात. मी पोलिसात तक्रार करायला सांगत होते, तर ताई मला इथे घेऊन आली. या भ्रमाशिवाय मानसीला घरबसल्या तिच्यावर करीत असलेले कॉमेंटस् ऐकायला येत होते. अर्थात तिला आवाजाचे भास होत होते. कारमेलिनची केस मानसी पेक्षा फारच वेगळी होती. ती शुन्यात पहात आहे असे वाटे. चेहरा निस्तेज, तोंडातून लाळ गळणे. अवघडलेल्या विचित्र अवस्थेत न हलता, न बोलता ती खूप वेळ बसून राही. स्वतःहून कोणतीच हालचाल करीत नसे. तिला कॅटॅटोनिकस्क्रिझोफ्रेनिया झाला होता. या प्रकारातले रोगी एकतर पुतळे बनतात किवा काही उत्तेजित होऊन अकारण विचित्र चाळे करतात. याशिवाय इकोलिलियाम्हणजे दुस-याने उच्चारलेली विधाने पुन्हा उच्चारणे व इकोप्रॅक्सिया म्हणजे दुस-याच्या हालचालीची नक्कल करणे, ही लक्षणे देखील या रोगात आढळतात. स्क्रिझोफ्रेनियाचा तिसरा उपप्रकार म्हणजे, ‘डिसऑर्गनाईज्डस्क्रिझोफ्रेनिया. या प्रकारात व्यक्ती एवढी असंबंध बनते की, आपल्या व्यक्तिमत्वावर ताबा राहत नाही. समोर एखादा विषय सुरु असताना तो आपल्याच विश्वात असतो आणि केवळ त्याच मुद्दयावर बोलत राहतो. कपडे, चप्पल, केस याकडे अशा व्यक्तीचे भान राहत नाही.

        वरील तीनपैकी एकाहून अधिक प्रकारची लक्षणे दाखविणारा अनडिफरनशिएटेडस्क्रिझोफ्रेनिया हा चौथा उपप्रकार. यामध्ये आपल्याच विचारांचा प्रतिध्वनी ऐकू येणे. आपल्या मनातील विचार बाहेरच्या अमानवी शक्तीने पेरल्यासारखे वाटणे, आपल्या डोक्यातील विचार कोणीतरी चोरुन नेल्यासारखे वाटणे, आपण न सांगताही इतरांना आपले विचार कळत असल्यासारखे वाटणे, आपल्या भावना आणि कृती बाहेरुन कोणीतरी लादल्यासारखे वाटणे, अतार्किक विचार करणे, विचारांचा प्रवाह अचानक थांबणे आदी लक्षणे अनेक रुग्ण दाखवितात. कधी कधी रुग्ण आपले विचित्र विचार प्रचलित शब्दांत व्यक्त न करता आल्याने स्वतःचे नविनच शब्द तयार करतात.

     या रोगाविषयीच्या अज्ञानामुळे हा आजार झाला म्हणजे माणूस कामातून गेला किवा अशी सौम्य स्वरुपाची लक्षणे असलेली विचित्र वागणूक दिसली की, काहीवेळेला शुभचितकांकडून डॉक्टरी सल्ल्या ऐवजी याचे एकदा लग्न केले की, तो सुधारेल असा पूर्णपणे चुकीचा सल्ला दिला जातो. त्यामुळे बदलेली जबाबदारी अचानक अनोळखी व्यक्तीशी आलेला सहवास ताण वाढवायला मदत करतो आणि बहुतेकवेळा फसविल्याच्या आरोप-प्रत्यारोपातून त्याची घटस्फोटात परिणीती होते. पण आज या विकृतीवर अनेक प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. प्रभावी उपचारांनी हा रोग आटोक्यात आणता येतो. फक्त गरज असते ती नातेवाईकांनी विकृती लक्षणे वेळेत ओळखून तज्ज्ञांकडे नेण्याची आणि चिकाटीने उपचार करवून घेण्याची. 

      लॉकडाऊनमुळे मानसिकदृष्ट्या कमकवूत असलेल्या स्क्रिझोफ्रेनियाग्रस्त रुग्णांवर त्याचे प्रमाण वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यासाठी  मुलांच्या निकोप संगोपनाने त्यांच्यातील हा आजार कदाचित टाळता येईल, यासाठी जीवनात येणा-या कठीण प्रसंगांना तोंड द्यायची हिमत त्यांच्यात निर्माण करायला हवी, त्यांच्यात निरोगी व्यक्तिमत्व निर्माण करायला हवं. उबदार माया, नैतिक मुल्ये आणि शिस्त यांच्या समतोलाचे वातावरण घरात निर्माण व्हायला हवे. संकटात सापडलेल्या आपल्या माणसाला केवळ टोचून बोलण्यापेक्षा त्याला धीर देऊन त्यांचा आत्मविश्वास जागवून संकटावर मात करायला त्याला मदत करायला हवी. माणसामाणसातील प्रेम आणि विश्वासाच्या धाग्याला दृढ करुन आपण एकलकोंडेपणावर आणि पयार्याने निर्माण स्क्रिझोफ्रेनियासारख्या आजारांवर मात करुया. 

 

Leave a Reply

Close Menu