इथेही दुर्लक्ष नको !

हल्लीच्या कोरोना संकटामुळे इतर अनेक क्षेत्रातील कामे व पुढे येऊ शकणारी काही संकटे व त्रास दुर्लक्षित होत असताना दिसत आहेत. सफाई कर्मचारी व आरोग्यखात्यातील कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. पण इतर अनेक खात्यांची कामे सुद्धा तितकीच महत्वाची आहेत व तीसुद्धा सुरु राहिली पाहिजेत हे लक्षात घेतले पाहिजे. अशाच अनेक दुर्लक्षित कामातील एक काम म्हणजे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त, निर्बिजिकरण. आता २ महिन्यातच कुत्र्यांचा प्रजोत्पादनाचा हंगाम सुरु होईल. आणि पालिका, महापालिका कर्मचारी वर्ग कोविडच्या नावाखाली गाफील राहू नये.

      पुणे (व मुंबई) व इतर ठिकाणी मोकाट कुत्रे व त्यांची नुकतीच जन्माला आलेली पिलावळ रिकाम्या रस्त्यांवर आरामात फिरताना दिसत आहेत. रात्र सुरु झाली की ह्यांचा दिवस सुरु झाल्याने झोपेवर गंभीर परिणाम होऊ लागला आहे. चालत्या वाटसरुंच्या मागे किंवा धावत्या वाहनांच्या मागे धावून चावायची संधी शोधत असताना दिसत आहेत. कुत्र्यांचा सध्या एवढा उपद्रव होतो आहे की, तो एक खूपच चिंताजनक विषय होणार आहे. रात्रभर भयंकर आवाजात ओरडणे, रडणे सुरु असते, सकाळी थोडे अंतर जरी चालणार असू तरी कमीत कमी ४-५ कुत्री तरी दिसतातच.

      ‘पेटा‘ (PETA-People for Ethical Treatment for Animals)  वाले व तथाकथीत अॅनिमल लव्हर्स त्यांना त्यांच्यावरील प्रेमाने हात लावू देत नाहीत (पण ह्या लोकांना कोंबडी, डुक्कर, मासे, बोकड, इतर मटण असे सजीव मारलेले चालतात, मासे, पक्षी पकडून घरात ठेवलेले चालतात). एवढेच प्रेम असेल तर ह्यांनी त्यांना स्वतःच्या घरी घेऊन जाणेच योग्य, त्यांना रस्त्यावरील उन्हात भटकत सोडणे म्हणजे क्रूरताच नाही का? ह्यांना किंवा ह्यांच्या सगे-संबंधितांना जोवर श्वान दंश होऊन रेबिसची महाग इंजिक्शन घ्यावी लागत नाहीत तिथपर्यंतच ह्यांच्या अॅनिमल लव्हची मजल असणार असे वाटते. ह्या वाढत्या धोक्याचे गांभीर्य लक्षात घेतले नाही तर महामारीने नाही तर कुत्र्यांच्या चाव्यांनी सुद्धा माणसे मरु शकतील एवढी भयाण परिस्थिती होणार आहे.

      ही समस्या पुण्यात नाही तर संपूर्ण देशात महाभयानक रुप घेते आहे. एक आठवड्यापूर्वीच ई-पास घेऊन सिंधुदुर्ग ते पुणे असा प्रवास करण्याची वेळ आली. त्यावेळी जे भयानक श्वान दर्शन जवळ जवळ संपूर्ण रस्ताभर झाले त्याने अंगावर काटा उभा राहिला. कोल्हापूर पुढे कागल, गारगोटी ह्या प्रदेशातुन जाताना तर एका मोठ्या नाक्यावर २५ ते ३० कुत्रे (ह्यात अतिशयोक्ती अजिबात नाही) रात्री भयानक कर्कश ओरडत होते. गाड्यांच्या मागे लागत होते. तसेच संपूर्ण रस्त्यावर आणि महामार्गावर पण अनेक कुत्रे रस्त्यावर येऊन झोपलेले होते. गाडीच्या मागे जीव तोडून धावत यायचे. अनेक ठिकाणी कुत्रे गाडीखाली येऊन मारले गेले होते.

      पुण्यातील कोथरुड तसेच इतर अनेक ठिकाणी ही समस्या फारच अक्राळविक्राळ रुप लवकरच धारण करेल असे वाटते आहे. पदाधिका-यांच्या पर्यंत ही बाब कोणी खास निदर्शनास आणून द्यावी असे नाही कारण ते समोर दिसतच आहे. पण अहो असा कायदा आहे, कुत्रे पकडून, निर्बिजिकरण करुन त्याच ठिकाणी सोडावे लागतात बंदी आहेअशी कारणे सांगितली जातात व वेळ मारुन नेली जाते.

     गेल्या अनेक वर्षांपासून नगरसेवक, आमदार, पालिका खात्यातील अधिका-यांनी ह्या गोष्टीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. पालिकेकडे पुरेशा प्रमाणात गाड्या नाहीत, निर्बिजिकरण करण्यासाठी केंद्र नाहीत, (वाहतूक नियम तोडणा-या गाड्या उचलण्यासाठी पुरेसे क्रेन्स नाहीत) अशी कारणे सांगून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली जातात. मग प्रश्न पडतो की आहे काय ह्या महापालिकांकडे…??. करतात काय ह्या खात्यांत कर्मचारी…!!!. तक्रार आल्याशिवाय किंवा तक्रार आली तरीसुद्धा कामात चालढकल केली जात आहे, दुर्लक्ष केले जाते आहे का…?

       २ दिवसांपूर्वीच कोथरुड येथील एका नगरसेवकांनी मात्र खरोखरच विनंतीला मान देऊन कुत्रे पकडण्याची गाडी लगेचच आणण्याची व्यवस्था केली. एकदा दुपारी आणली. पण दुपारी कुत्रे मस्त एकांतात झोपलेले असतात, वाहनांच्या नाहीतर जिन्यांच्या खाली. ते काही मिळू शकले नाहीत. तर त्याच रात्री सुद्धा त्यांची कामाची वेळ नसताना गाडी आणली. अनेक कुत्रे मोकाट फिरत होते. ह्या कर्मचा-यांवर भुंकत होते. परंतु एकही कुत्र्याला पकडण्यात यश येऊ शकले नाही. इथे प्रशिक्षणाचा अभाव, उपकरणांची कमतरता की अपुरे प्रयत्न ह्यापैकी कोणते कारण असावे असा प्रश्न मनात येतो.

     दुसरा प्रश्न म्हणजे हल्ली मुले परदेशी गेल्याने, एकटेपणा वाढल्याने, घरोघरी कुत्रे-मांजरी पाळण्याची सवय बोकाळली आहे. त्यांना फिरवून आणण्यासाठी माणसे नेमली आहेत. त्यांनी व भटक्या कुत्र्यांनी सगळ्या गल्ल्यांची अक्षरशः हागणदरीकेली आहे. बरं, ह्यांना बोललं की ते आईबाबांचा उद्धार करायला मागे पूढे पहात नाहीत. परत रागाने बघणार तुमच्या बापाचा रस्ता आहे का?‘ असे विचारायला सुद्धा कमी करणार नाहीत. ह्यात उच्च पदवीधर डॉक्टर, सीईओ, वकील, हॉटेल मालक अशा पदांवरील लोकसुद्धा आहेत.

     म्हणजे आता मोदींच्या घोषणे नुसार माणसांना शौचालये असतील पण रस्त्यावर कुत्रे, मांजराच्या विष्टेने घाण होते त्याकडे दुर्लक्ष होतच रहाणार आणि त्यातून बिमारीपसरणारच, ‘कुत्ता बंद तो बिमारी बंदअशी जाहिरात करावी लागतील आता. काय म्हणावे ह्या विरोधाभासाला….!

     एवढ्या सविस्तर लेखनाचा उद्देश एवढाच की, ह्या समस्येची गंभीरता लक्षात घेणे आणि तालुका, जिल्हा आणि देश पातळीवर उपाय होणे आवश्यक आहे.

    कुत्र्यांच्या व इतर प्राण्यांच्या जगण्याच्या अधिकारावर आक्रमण करणे हा उद्देश इथे नाही तर मानवजातीला – वृद्धांना, स्त्रियांना, लहान मुलांना सुद्धा सुरक्षित रहाण्याचा, रस्त्यावरुन सुरक्षित चालण्याचा अधिकार आहे, रात्री सुखाने झोप मिळण्याचा अधिकार आहे हे विसरुन चालणार नाही.

      आम्ही सामान्य नागरिक विनंती आर्जव शिवाय काहीच करु शकत नसल्याने तेच करणे हाती आहे.

  –  अरुण मराठे, पुणे (९९२२५२१७९९) 

 

Leave a Reply

Close Menu