आंब्याचा बाटा आणि शिक्षणाच्या पायवाटा…

    मे महिना संपत आलाय..एव्हाना शाळा सुरु व्हायचे वेध लागले असते. कोरोनामुळे या वर्षी शाळा सुरु होण्याची तारीख अजून निश्चित नाही झाली. शासनस्तरावर शाळा लवकरच सुरु करण्याचे प्रयत्न चालू आहेत. परंतु कोरोनारुपी राक्षस  अजूनही सर्व क्षेत्रात हाहाकार माजवून आहे. हा राक्षस काही अजिंक्य नाही काही काळातच मानव या राक्षसावर मात करुन आपल्या दैनंदिन कार्यात व्यस्त होईल.

          एक मेला शाळेत निकाल जाहिर झाल्यावर एक दोन दिवस प्रगती पुस्तकातील गुणाचे कौतुक. मग काही काळ शाळा आणि अभ्यास पार विसरुन जायचे. मे महिन्याच्या सुट्टीत आम्हाला कधी कंटाळा असा आलाच नाही. कोकणचा मेवा गोळा करण्यासाठी रानावनात फीरायचे. कधी संध्याकाळी सागरेश्वर वर पाण्याच्या लाटा अंगावर घ्यायला जायचे. हळूहळू लाटा अंगावर घेत घेत समुद्राच्या कुशीत शिरुन ओलेचिंब व्हायचे. कधी बंदरावर जाऊन न थकता एका दमात पाय-या चढून लाईटहाऊस सर करायचे. कॅम्पात फिरायला जाणे हा अजून एक उपक्रम. त्यावेळी कॅम्प मैदान खूपच विस्तीर्ण भासायचे. कॅम्पात वेंगुर्ल्याचे स्टेडीयम आणि अजून ब-याच इमारती उभारण्याच्या पूर्वीचा कालखंड होता हा. त्यामुळे फिरण्यासाठी खेळण्यासाठी भरपूर जागा असायची.

           मे महिन्याची सुट्टी सुरु झाली की गवसाकडे जाऊन सायकल भाड्याने घ्यायची. आणि सायकल शिकायची. सायकल शिकवण्यासाठी मला कुणी ट्रेनर नाही लागला. गवसाकडे छोट्या मोठ्या आकाराच्या अनेक सायकली भाड्याने मिळायच्या. सर्वात छोटी सायकल पहिल्यांदा भाड्याने घ्यायची आणि सायकल शिकायला सुरुवात करायची. एक दोनदा पडून ढोपर फोडून घ्यायची हाच मोठा गुरु. मग हळूहळू सायकलचा बॅलन्स जमायचा. त्यानंतर मोठ्या आकाराची सायकल भाड्याने घ्यायची, काही दिवसात सायकल चालवण्यात एक्सपर्ट होता येत असे. एकदा सायकलवर जम बसला की संध्याकाळी एक दोन तासासाठी सायकल भाड्याने घ्यायची आणि वेंगुर्ल्याची भ्रमंती करुन यायचे. हा मे महिन्यातील सुट्टीच्या कालावधीमधील अजून आमचा एक नेहमीचा ठरलेला उपक्रम.

          मळ्यात दुपारच्या वेळात क्रिकेट खळायचा पोरं जमायची. मी सुध्दा कधी कधी  मळ्यात क्रिकेट खेळायला (?) जायचो. बॉलची वर्गणी काढण्यात माझा सहभाग जवळजवळ नसायचाच, त्यामुळे आणि खेळण्यात मी अगदीच कच्चा लिंबू असल्याने असेल कदाचित पण प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची वेळ फारच कमी वेळा आली. बॅटींग करायला गेलो तर दुसरा बॉल खेळण्याची वेळ आलीच तर माझ्यासाठी ते शतक पूर्ण केल्याचे आनंद असायचा, बॉलींग करायला गेलो तर बॅटसमन आणि विकेट किपर कंटाळून मला सांगायचे “संजू /घोगळ्या स्टम्पस हे बघ हय आसत..” माझी फिल्डींग म्हणजे कुर्ले रापणे.. कॅच आलेच तर बॉल माझ्या हातात विसावयाच्या अगोदरच माझ्याशी ब्रेक अप करुन निघून जायचा.

                या शिवाय नगरवाचनालय मध्ये जाऊन वाचन करणे हा एक छंद. तसा मी पूर्ण वर्षभर वेंगुर्ल्याच्या नगरवाचनालयात जाऊन वाचन करत बसायचो. पण मे महिन्याच्या सुट्टीत अजून जास्तवेळ बसायला मिळायचे. हा छंद पुढे आयुष्यात खूपच उपयोगी पडला. कोणतेही क्लासेस जॉईन न करता MPSC परीक्षा एका झटक्यात पास झालो. माझ्याप्रमाणे अनेक मुले या वाचनालयात वाचन करायला यायचीत. वेंगुर्ले वाचनालय ही वेंगुर्ल्याला मिळालेली देणगी आहे. शिवाय संध्याकाळच्या वेळी मंदिरात जाऊन बसणे. यात भक्तीभाव असायचाच त्याचबरोबर मंदिरात असलेल्या वातावरणामुळे मनाला अनोखी शांती मिळवण्याचा स्वार्थ असायचा. मंत्रोपचाराचा स्वर, मध्येच भक्ताने वाजवलेल्या घंटेचा नाद, गुरवाचे गा-हाणे, नौबतीची आवाज, धुपाचा गंध असे कितीतरी मनाला प्रसन्न करणारे वातावरण रामेश्वराच्या मंदिरात अनुभवयला मिळायचे. त्यावेळी संत ज्ञानेश्वर मंदिरात रोज सायंकाळी भजन व्हायचे आणि आरतीने त्याची सांगता व्हायची. काका पडवळांच्या पश्चात मात्र संत ज्ञानेश्वर मंदिरातील भजनाचा हा उपक्रम हळूहळू बंद झाला. लहानपणी मी न चुकता संध्याकाळी  या मंदिरात भजनासाठी जायचो.

         मे महिना संपत आल्यावर हळूहळू शाळेचे वेध सुरु व्हायचे. पुढच्या शालेय वर्षाची नवीन पुस्तके विकत घेणे काही सर्वानाच जमायचे नाही. मग ज्यांनी मागच्या वर्षी नवीन पुस्तके विकत घेतली असतील तर ते अर्ध्या किंमतीत तर ज्यांनी जुनी पुस्तके अर्ध्या किंमतीत विकत घेतली होती ते पाव किंमतीत विकायचेत अशांकडून ही पुस्तके विकत घेतली जायची. काही मुले तर एक पैसा न घेता ही पुस्तके गरजवंत विद्यार्थ्याला द्यायचीत. अशाच दानशूर विद्यार्थ्यांमुळे मला शालेय पुस्तकांची कधी कमतरता भासली नाही. वर्षभर विद्यार्थी ही पुस्तके एवढी सांभाळून वापरायचीत की अजून दोन तीन वर्ष वेगवेगळे विद्यार्थी ही पुस्तके वापरु शकत. आणि ज्ञानाची गंगा पुढे वाहत रहायची. नवीन वह्या विकत घेण्यापूर्वी मागच्या वर्षात वह्यांमध्ये शिल्लक असलेली कोरी पाने काढून नवीन वह्या बनविल्या जायच्या. माणिक चौकात एक बायंडरचे दुकान होते. त्याच्याकडे ही पाने नेवून दिल्यावर पुठ्ठा लावून सुंदर नवीन वही तयार होऊन मिळायची. मग शाळा सुरु होण्यापूर्वी प्रत्येक विषयाचा किमान एक तरी धडा वाचून काढायचा. मराठीचे तर अख्खे पुस्तक वाचून व्हायचे. कोचींग क्लासेस वगैरे काही भानगडच नव्हती.

           तरीही अजून काही नवीन वह्या आणि शैक्षणिक साहित्य विकत घ्यावे लागायचेच. त्याच्यासाठी काही पैशाची तरतूद शक्यतो स्वत:च करायची. आंबा खावून टाकून दिलेली कोय त्याकाळी काही नर्सरीवाले शेकडा सात आठ रुपये दराने विकत घ्यायचे. मी अशा कोय/बाट्या गोळा करुन या खरेदीदारांना विकायचो. सकाळी दहा नंतर दररोज पाठीवर गोणपाट घेऊन बाहेर पडायचो. दुपारी दोन तीन वाजेपर्यंत शोध कार्य चालू असायचे. लोकांच्या परसात, अंगणात, बागेत, रस्त्यावर, कच-यात जीथे मिळेल तीथेून या बाट्या वेचायचो आणि पाठीवरच्या गोणीत टाकायचो. त्या बाट्यांच्या स्त्रावाने माझी गोणी आणि पाठ खराब व्हायची. अंगात फाटके कपडे. त्यामुळे लोकांचा गैरसमज व्हायचा, कुणाला भिकारी तर कुणाला मी चोर वाटायचो. कुणी हाकलवयाचे तर कुणी शिव्या द्यायचे. काहीजण दुर्लक्ष करायचे तर काही आवर्जुन बाट्या कुठे पडल्यात ते मला दाखवायचे. संमिश्र असा प्रतिसाद असायचा. माझ्या वर्गात एक मुलगा होता त्याचे वडील सरकारी नोकर होते. तो मुळचा कोकणातला नव्हता. वडीलांची बदली झाली म्हणून वेंगुर्ल्यात रहायला आला होता. त्याला माझी दया आली “संजू आमच्या परसात खूप बाट्या पडलेल्या असतात तू घेवून जात जा”. एक दिवस रविवार होता मी त्याच्या परसात पडलेल्या बाट्या गोळा करत होतो. रविवार असल्याने त्याचे वडील घरात होते त्यांना वाटले कुणीतरी भिकारी मुलगा असेल त्यांनी मला काठीने मारायला सुरुवात केली. माझे नशीब बलवत्तर म्हणून माझ्या मित्राचा लक्ष गेले त्याने धावत येऊन वडीलांना अडवले “बाबा, भिकारी नाही, माझा मित्र आहे तो… आणि वर्गात माझ्यापेक्षा जास्त मार्कस असतात त्याला.” तरीही त्या सभ्य गृहस्थाने एक सणसणीत शिवी मला हाणलीच जी त्या काठीच्या मारापेक्षा खूप खोलवर व्रण देऊन गेली. जे नर्सरीवाले या बाट्या खरेदी करायचे त्यांच्याकडून मात्र मायेची वागणूक मिळायची. मी शिक्षणासाठी हे सर्व करतोय हे पाहून मी आणलेल्या बाट्यांपैकी अनुपयोगी बाट्या ते बाजूला काढायचे नाहीत. त्यातून रोज भेटणारे पैसे आणि या खरेदीदाराने घातलेल्या मायेच्या फुंकरीमुळे मला एवढे अपमान सहन करुन सुध्दा परत दुस-या दिवशी बाट्या गोळा करायला जायची उमेद मिळायची.

        काही दिवसानी पावसाळा आणि शाळा जवळजवळ एकत्रच सुरु व्हायचे. नव्या ऋतूत नव्या वर्गात मागची आठवणीची आणि अनुभवाची शिदोरी घेऊन प्रवेश करायचा. आता राहिल्यात त्या फक्त आठवणी.

– संजय गोविंद घोगळे (8655178247)

Leave a Reply

Close Menu