मी, कोरोना आणि माझी प्रॉपर्टी

आपण जन्माला आल्यापासून अनंतात विलीन होईपर्यंत या पृथ्वीतलावर वावरतो. आपल्या कर्मात रममाण होत आपण आपल्या दैनंदिन जीवनात आपली भूमिका रंगवण्यात मग्न असतो. भूमिकांना यथायोग्य न्याय देण्यासाठी धडपडत असतो. या भूमिका आई-वडिल, पाल्य, भाऊ बहिण मैत्री. अशी अनेक नात्यांच्या गुंतावळ्यात आपण स्वतःला गुंतवत असतो. या नात्यांच्या ऋणासोबत समाजऋणही फार महत्त्वाचे.

आज जीवनात प्रॉपर्टीला फार महत्त्वाचे स्थान दे. जमिन-जुमला, सोन-नाणं, पैसा-अडका शेअर्स जिथे शक्य असेल तिथे नियोजन पूर्ण गुंतवणूक करतो. अभिमानाने सांगतो. पोटाला चिमटा घेऊन काटकसरीने कसा संसार केला एवढं करुन कशी गुंतवणूक केली आणि तुम्ही असे नियोजन केले का? कुठे कसे कधी गुंतवणूक करावी….रिफंड किती? असेही इतरांना विचारुन तर यावर चर्चा करतो. माझं नियोजन किती परफेक्ट आणि नियोजन न करणारे आपल्या दृष्टीने बुद्धु समजताना आपणच स्वतःला मोठ समजतोय.

जीवनाच्या रंगमंचावर आपण जगण्याचा नाट्यप्रयोग यशस्वीपणे रंगवताना बक्षिसे पुरस्कार प्राप्त करतो. आशा निराशेची गणितं आपण सोडवताना काही सोडून देतो. काहीजण चिकाटीने सोडवतात. काहींना तर आपल्या उत्तरापेक्षा दुस-याच्या उत्तरातच स्वारस्य फार असतं. व्यक्ति तितक्याच प्रकृती. आपल्या महान संस्कृतीमध्ये अनेक दाखले देत जीवनात कस जगायचं सुंदररित्या मांडलय. संतमहंतानी साहित्य रचनांमधून जीवनाचं रहस्य सांगितले. ‘‘जन पळभर म्हणतील हाय हाय, तू जाता राहील कार्य काय..‘‘ हे वास्तव आपणं अनुभवत असताना ही आपलं सारं लक्ष त्या प्रॉपर्टीच्या चढत्या आकडेवारीत लागून राहिलेलं असतं. जन्माला येताना रिकाम्या हाती आलोय. घट्ट मुठीमध्ये भविष्य पकडून असतो. हळुहळु मुठ उघडत जीवनाचं एक एक पान उलगडत जातं. मुठ पूर्ण उघडलेल्या स्थितीत येते. कार्य आपलं सुरु होतंय म्हणेपर्यंत पण रंगमंचावर उत्तरोत्तर नाट्यरंगत जातानाच कधी कधी पडदा पडतो, पाडला जातो तर कधी पडताना सावरत वर उचलला जातो. मरणाच्या दारातून परत आला. म्हणून ही जातो आपण. जन्म आणि मृत्यू यामधील कालखंड आपलं सुंदर जीवन. रंगमंचावरील नाट्य अधिकाधिक रंगवत रंजक करण्यात खरा अर्थ आहे. विधात्याने दिलेल्या भूमिकेत रममाण होत इतरांना ही आपल्या भूमिकेतून आनंद प्राप्त झाला तरच जीवनाला अर्थ प्राप्त होईल.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाईन व्यवस्थापन अंतर्गत ८ ते २ शाळेत ड्युटी लागली. नियोजित वेळेतच सकाळी ८ वाजता मी हजर झाले. क्वारंटाईन जे ७ जण होते ते आमच्या शाळेच्या परिसरात रहाणारे. काळजी नव्हती. समोर बसून लक्ष ठेवायचं. हजर झाले. तेवढ्यात फोन… ‘मॅडम कुठे आहात?‘ फोन माझ्या एका विद्यार्थिनीचा होता. नोकरीच्या सुरुवातीच्या काळातली. लग्न झाले मुलं झाली. पण आपल्या मॅडमना अद्याप विसरली नाही. मी पण वर्षांतून २ वेळा आवर्जुन तिच्या घरी जातेच. नियमित तिचा फोन येतो. मी फोन करत नाही म्हणून जाम ओरडते. परत फोन करणार नाही सांगून विसरते आणि फोन करुन कशा आहात विचारते. आजही तसाच फोन आला. मी क्वारंटाईन व्यवस्थापन ड्युटी करतेय म्हटल्यावर भडकलीच. जसं सगळं माझ्याच हातात आहे. सूचनांवर सूचना देऊ लागली. ‘जवळ जाऊ नका, माजी विद्यार्थी म्हणून जाल चौकशी करायला, तुम्हाला सगळ्यांना जवळ करायची सवयच आहे. तुम्हाला काही समजत नाही.‘

एक माजी विद्यार्थिनी मला अक्कल शिकवत होती. मी फक्त ‘हो‘ म्हणून मनात हसत होते. त्याच नादात माझ्या काळजीत पेजेत उकडे तांदळाच्या ऐवजी सुरय तांदूळ घालून परत ओरडायला लागली, ‘तुमच्यामुळे नवरा मला ओरडणार.‘ ‘अगं! ते तांदूळ तसेच भिजत ठेव संध्याकाळी मस्त घावन कर…नवरा खुश होईल‘ आयडिया पण दिली. तिच्या चिडण्यामागच प्रेम याला तोड नाही. ३५ मिनिटाची तासिका तेवढाच सहवास पण आपल्या हृदयात घर करतात ही मुले.

कुवेतला असणारा माझा विद्यार्थी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका हिंदी शिक्षिकेच्या मृत्यूची फेसबुकवर बातमी वाचून मला फोन करुन रडला. सारखी त्याला माझी काळजी वाटत होती.कारण, मी त्याची हिंदीची टीचर होते. विज्ञान नाट्य स्पर्धेत राज्यस्तरीय निवड झाली. मॅडम साता-यात जाऊन आलो, नाहीतर कुठे पहाणार होतो? सांगणारी नाट्य चमु मंडळी हिच खरी प्रॉपर्टी वाटते. आई गेल्यानंतर माझ्यात आई शोधणा-या त्या चिमुकल्या पोरी आठवल्यावर उर अभिमानाने भरून येतो.

शाळेत ओरडा खाल्लेल्या विद्यार्थ्यांना तर विचारले.. ‘अरे! किती ओरडत होते तुला, उठाबशा काढायला लावल्या. बाहेर किती वेळा बसवलं, शाळेला फे-या मारायला लावल्या. आठवलं की मलाच वाईट वाटतं. राग नाही येतं तुम्हाला?‘ हसून म्हणतात, ‘ मॅडम प्रेम, माया, काळजी पण तेवढीच करत होता ना..!‘ सहजच एक कविता केली हिंदीमध्ये टाकली गृपवर… लगेचच एका पोरीचा रिप्लाय. मॅडम, ‘हिंदी तास सुरु झाला, तुम्ही समोर आहात असं वाटतं..‘ आवडत्या मॅडम म्हणून परिचय ऐकताना आभाळ ठेंगणे वाटत. सही गुंतवणूक वाटते.

‘मॅडम आता आठवत हो. फक्त आठवणी. परत वर्गात येऊन तुमच्या तासाला बसावसं वाटतं अस सांगणारी माझी गेल्या २५ वर्षातील पोरं माझी प्रॉपर्टी वाटते. अशी नियोजन न करता मी गुंतवणूक केलेली माझी प्रपर्टी कोणत्याही बुडीत बँकेत नाही हे केवढ तरी मानसिक समाधान. हो,…स्वार्थी मन कधी कधी हिशेब करत. मी एवढं केलं फुकट गेलं. मनावर ताण यायला लागतो. खूप चिड येते. त्यावेळी मात्र बुडीत खात्यात समजून विचार करणं सोडून दिलं. विचार करुन ताण वाढवला नाही. लग्न ठरवलंय, मंगळसुत्र बनवलय., मॅडमना फोटो. मॅडम कसं वाटलं? विचारतानाचा उत्साह हे व्याजच वाटत या गुंतवणूकीवरच.,…

माझी आई हल्लीच अनंतात विलिन झाली. दुखःद प्रसंगी भेटणं शिष्टाचार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बरेच फोन आले, मेसेज आले. ब-याच माझ्या विद्यार्थ्यांनी मला मेसेज करुन, ‘टीचर सावरा स्वतःला.‘, ‘मॅम प्लीज रडू नका.‘ सांत्वनपर आलेल्या या मेसेज ना माझ्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मी तर याला व्याज समजते.त्या दुःखद दिवसात जेवलात का हे विचारून वर आणि काय जेवला? असं खात्री करून घेणारी माणसंच मला माझी आपली संपत्ती वाटते. असे या विभागलेल्या प्रॉपर्टीचे वेगवेगळ्या रुपात मिळणार व्याज पाहूनच मला अशीच पुन्हा पुन्हा गुंतवणूक करावी असं सारखं वाटतंय. कधी कधी मला मी केलेल्या गुंतवणूकीचे व्याज मिळत तेव्हा आठवतही नाही कधी केलेली ही गुंतवणूक?

माझं रोजचं स्टेटस वाचून कामात व्यस्त असणारी तरी रिप्लाय आठवणीने देणारी सुप्रिया, गाण्याचा कार्यक्रम करतोय निवेदन तुम्हीच करायचय असे सांगणारा शुभम असे अनेकानेक अनुभव. ‘मॅडम नोकरी लागली, मॅडम लग्न ठरलंय. येणार ना?, मॅडम आई झाले मी बाळाला बघायला या. पालक भेटीला गेल्यावर पटापट आजुबाजुला असणारी माझी पोरं नमस्कार करतात. जवळ घेतल्यावर डोळे भरुन काढणारी प्रतिक्षा. कारण विचारले तर टीचर खूप दिवसांनी दिसलात ना?‘ असं किती तरी माझ्या विचार न करताच गुंतवणूक केलेल्या संपत्ती वरच व्याज.

फायनल परीक्षेसाठी भीती वाटते मॅडम म्हणून माझ्या पायाखालची वाळू सरकवणारी प्रणाली. अरे! आता मॅडम मॅडम करताय. मोठे झालात की विसरुन जाल. अशावेळी ‘नाही हो टीचर आम्ही तुम्हाला न्यायला येणार सांगणारा संयोग पालकर‘ अशी कितीतरी माझी पोर…ती माझ्या पोरांची २०१८ची १०० टक्के निकाल दिलेली १०वीची बॅच. समाजातही अशी खूप माणसं मिळाली. प्रवासात – नोकरीत आई, बहिण, मैत्री, शेजारी अशी अनेकानेक नाती निर्माण झाली न तुटणारी माझी खरी प्रॉपर्टी.

आईच्या जाण्यान दुःखी मनाला मी लिखाणात गुंतवल. बुक बँक साहित्यिक ग्रुपवर राजू बर्वेची ओळख झाली. वय वर्ष अवघं ४५. गेली १० वर्ष व्हीलचेअरवर बसून साहित्यिक सेवा करणारा राजू माझ्यातील ताईला जाग करून ४५ वर्षानी माझी ताई मी शोधली अस सांगून, ताई तुला माझं घर सदैव उघड आहे, कधी वाटलं की ये, फक्त राजू म्हणून हाक मार..सकारात्मक दृष्टिकोन शिकवणारा राजू. नविनच गुंतवणूक केली. खर सांगू जेव्हा समजायला लागले जग तेव्हापासूनच खरंतर गुंतवणूक करत गेले.. काहीही विचार न करता. व्याज ब-यापैकी मिळतंय हे समाधान आहेच. अशीच संपत्ती वाढवत जाण्याचा विचार करतेय. चक्रवाढ व्याजाने जाईल संपत्ती वाढत. आपसूकच व्याज मिळत जाईल आणि सगळ्यात समाधान म्हणजे, ना टॅक्सची चिंता, ना वाट्यासाठी भांडण. भविष्याची चिंता करण्याची गरजही पडणार नाही.

– संप्रवी कशाळीकर, सावंतवाडी

(९४२१२३६६७१)

Leave a Reply

Close Menu