अरबी समुद्रात चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वेंगुर्ला तालुक्यात २ जूनपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. ३ जून रोजी समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली असून मोठमोठ्या लाटाही किना-याला येऊन धडकत होत्या. सागरेश्वर किनारी धोक्याचा लाल बावटा लावण्यात आला आहे. २ जूनच्या मध्यरात्री पाऊस आणि सोसाट्याचा वार गेल्याने तालुक्यात ठिकठिकाणी झाडे पडण्याचे प्रकार घडले आहेत. तसेच पडलेल्या झाडांच्या पालापाचोळ्याने रस्त्यावर कचरा दिसून येत होता.

भेंडमळा येथील कमलाकर शांताराम नवार यांची केळीची झाडे वा-याने पडून नुकसान झाले. वेंगुर्ला बंदर नजिक पुष्कराज कोले यांच्या मालकीच्या सागर सरीता या हॉटेलचे पत्रे वादळी वा-याने उडून गेले. मातोंड येथील नारायण मेस्त्री यांच्या घरावर झाड पडून १५ हजारांचे नुकसान, वजराठ येथील गोपाळकृष्ण गावडे यांच्या घरावर झाडाची फांदी पडल्याने ४ हजारांचे नुकसान, आरवली येथील सुरेश बापू शेरटे यांच्या घरावर माडाचे झाड पडून सुमारे २३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आडेली येथील धोंडू धर्णे यांच्या घरावर झाड पडून ४० हजारांचे नुकसान झाले. तर पहाटे ४ वाजता दाभोली गावातील मांजरेकरवाडी व मोबारवाडी याठिकाणी जाणा-या रस्त्यावर मोठे झाड पडल्याने विद्युत ताराही तुटून पडल्या आहेत. १ ते ३ जून या कालावधीत १३३.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे.

दरम्यान, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर २ जून रोजी एनडीआरएफ च्या टीमने वेंगुर्ला तालुक्यातील किनारपट्टीवरील गावांना भेट देऊन वादळात घाबरुन न जाता घ्यावयाची काळजी या बाबत सूचना दिल्या. एनडीआरएफच्या टीमसोबत उपमुख्यकार्यकरी अधिकारी दीपाली पाटील, तहसिलदार प्रवीण लोकरे, गटविकास अधिकारी उमा पाटील पोलीस निरीक्षक तानाजी मोरे तसेच संबंधित गावचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Close Menu