केंद्र शासनाने जूनअखेर पाचवा लॉकडाऊन घोषित करताना काही सवलतीही दिल्या आहेत. महाराष्ट्राने लॉकडाऊन जाहीर करताना केंद्राने सांगितलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये थोडा बदल करून काही निर्बंध कायम ठेवले आहेत. लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यात झालेले परिणाम, त्याचा अभ्यास करून भविष्यकालीन वाटचाल करताना नेटक्या नियोजनातूनच जाण्याची गरज आहे. यातूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन आणि महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती याबाबत जनतेशी संवाद साधताना आपल्या एकूण नियोजनाचा नेमका गाभा सांगताना पुन:श्च हरि ओम् ही टॅगलाईन वापरली आणि ते खरेही आहे. कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे सर्वच क्षेत्रात नव्याने कामाला सुरूवात करण्याची गरज निर्माण झाली आहे. शून्यातून उभे रहावे, त्याच अवस्थेत आपण आलो आहोत.

           देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश उभारणीसाठी त्यावेळी केलेले नियोजन आणि आता कोरोना साथीने उद्ध्वस्त झालेले जीवन उभारण्यासाठी नव्याने प्रयत्न करण्यासाठी आणि त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती त्या जोडीला नेटके नियोजन आजची राज्याची गरज भविष्यकाळात करावयाचे प्रकल्प या सार्‍यांचा नेमका आराखडा करूनच प्रत्येक पाऊल सावधपणे टाकले पाहिजे. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी सूचकपणे सर्वांनाच पुन:श्च हरि ओम् या शब्दातून नेमका संदेश दिला आहे. राज्य शासनाचे धोरण, त्याला केंद्राची साथ असा समन्वय आवश्यक ठरतो. त्याचे कारण कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी तिजोरीत खडखडाट झालेला आहे. आर्थिक नियोजनाचा एक भाग म्हणून दारूविक्रीचा निर्णय घेतला. अबकारी खात्याकडून कोट्यवधीचा महसूल शासनाला मिळू लागला. शासनाने आता पेट्रोल, डिझेल यावर प्रतिलिटर दोन रूपयांप्रमाणे अधिभार लावला आहे. उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग शोधल्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. परंतू त्यासाठी काहीही हे सूत्र उपयोगाचे ठरणारे नाही. त्याच्या परिणामांची काळजी घेऊनच असे निर्णय घ्यावे लागतील. सामान्य माणसापासून उद्योगधंद्यापर्यंत सारेच उद्ध्वस्त झाले आहेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यानी नव्वदीत पदार्पण केल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत कोरोना साथीमुळे श्रमिक आणि कष्टकर्‍यांचे प्रश्न समोर आणण्याचे काम केले, अशी दिलेली प्रतिक्रिया खूपच महत्त्वाची आहे.

        आपल्या नियोजनात सामान्य माणूस केंद्रस्थानी राहिला पाहिजे. गोरगरीब कुटुंबांची संख्या लक्षात घेता या जनतेला स्वावलंबी केल्याशिवाय देशाची मजबूत बांधणी करता येणार नाही. कष्टकर्‍याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शेतकरी, शेतमजूर यांचे प्रश्न गेल्या 70 वर्षात आपण सोडवू शकलो नाही. त्यामुळे आजही जो शेतकरी संपूर्ण जगाचा पोशिंदा म्हटला जातो, त्याला आत्महत्त्येच्या वाटेवर जाण्याची वेळ आली आहे. या एकाच मुद्यावरून आपण प्रगतीचे चित्र कितीही रंगवत असलो तरी सुद्धा या एकाच प्रश्नातून प्रगतीचे ते चित्र काही खरे नाही असेच उत्तर समोर येते. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार यांना आपल्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करण्याची वेळ येते. आता कोरोना साथीने सर्वांनाच धक्का दिला आहे. यातूनच पुन:श्च हरि ओम् हे सूत्र नजरेसमोर ठेऊन आपल्याला वाटचाल करायची आहे.

        महाराष्ट्राची माती, वैचारिक परंपरा, संतांची भूमी म्हणून असलेली पार्श्वभूमी, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षि शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आदर्श महाराष्ट्रासमोर आहे. त्यामुळे इथल्या मातीत आणि प्रत्येक माणसात नवी झेप घेण्याची एक ऊर्जा लपलेली आहे. राखेतून उभारी घेणार्‍या फिनिक्स पक्षाप्रमाणे याही संकटावर मात करून नवी उभारी घेण्यास महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस सक्षम आहे. या सार्‍या गोष्टी लक्षात घेऊनच राज्यकर्त्यांनी आणि विविध क्षेत्रातील जाणकारांनी भविष्यासाठी आणि महाराष्ट्राला पूर्ववैभव आणण्यासाठी आपले योगदान प्रामाणिकपणे देण्याची तयारी ठेवली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेल्या सूत्रामध्ये या गोष्टी आहेत. त्याच वाटेने जाण्याचा प्रयत्न झाला तर या संकटावर मात करून सर्व गोष्टी पूर्वपदावर आणण्यासाठी वेळ लागणार नाही. काळाची गरज म्हणून आजच्या परिस्थितीचे गांभिर्य ओळखूनच आपली वाटचाल व्हायला हवी.

  • सुभाष धुमे, जेष्ठपत्रकार (02327) 226150

E-mail :subhashdhume2014@gmail.com

Leave a Reply

Close Menu