मी, कोरोना आणि स्वावलंबन

प्रिय कोरोना,

           होय, ‘तुला कोण रे प्रिय वगैरे म्हणेल? पण मला बुवा तू फार आवडलास.‘ ‘का?‘ ‘अरे, वेड बीड नाही लागलं मला, मला तू जगायला शिकवलंस! होय होय तूच तूच. शिकवलंस जगायला आणि मोदी सांगतात ना ती आत्मनिर्भरता माझ्यात मुरतेय तुझ्यामुळेच रे!

             बघ कसं आहे, इतके दिवस आम्ही उठसूठ कामावर पळायचो. एका रविवारची वाट पहात बसायचो. पण मागील पुढील आवराआवर करता करता हा रविवार मुठीतून वाळू सरकावी ना तसा गळून जायचा. तूच असे कितीतरी रविवार आणि आपली हक्काची माणसं एकत्र जोडून दिलीस. सुरक्षित अंतर इतर लोकांत जरुर ठेवत आलोय. पण तू ख-या अर्थाने माणसं जोडलीस रे!

 पैसा पैसा करत केवळ कागदी गांधीजी मिळवताना आम्ही आमचा बहुमूल्य वेळ कधीच नीटपणे कुटुंबातील लोकांना देऊ शकलो नव्हतो. फक्त दिवाळी आणि चतुर्थीत आमचं घरकुल स्वच्छ नटून बसायचे. ते या निमित्ताने साफ होऊन सावरून बसलं. एकेकाळी त्या ज्ञानेश्वर माऊलींना जसं वाळीत टाकलं होतं ना तसंच आम्ही एका अर्थी वाळीत टाकणे म्हणजे नक्की काय ते अनुभवलं. वरुन पाणी देणं, लांब राहणं, स्वतः चे कपडे-भांडी स्वतः धुणे असलं बरंच काही आम्ही मिळवलं आहे. आमची गृहिणी डालगोना कॉफी इंटरनेटवर पाहून सुंदर बनवायला शिकलीच. पण स्वतःला अजमावून पाहत विविध पाककला शिकली. हॉटेल मध्ये मिळणारा प्रत्येक पदार्थ घरी बनू लागले. चीन, अमेरिका देशात बायकांना कोरोना चिंता असेलही कदाचित आमची भारतीय बाई किती हौसेने आणि निगुतीने कुरड्या, सांडगे, पापड लोणची करायला शिकल्या ना भाऊ! आयुष्य खूप छोटं आहे तर ते आताच आनंदात जगुयात. येणारा दिवस आनंदात कसा घालवता येईल याचे हिशेब आम्ही शिकलो.

         स्वदेशीचा वापर करु लागलोय. घरात गरजेची असलेली रोजची भाजी आपापल्या बागेत, परड्यात उगवायला शिकलोय. इतके दिवस या लाल मातीत चप्पल घालून रपेट मारायचो त्या मातीचे आमच्या पावलांनी चुंबन घेतले. रोजच आता अनवाणी पायाने माय मातीत आम्ही आपलेपणाच्या ओढीनं जातो. चार वांगी, कढीपत्ता, केळी, पपई, नारळ आईच्या मायेनं जगवतोय. मी तर मुद्दाम माहेरहुन आणलेला मोगरा माझ्या सासरच्या दारात फुलवला आहे. यावेळी सुट्टीत आईबाबांच्याकडे माहेरी जाता आले नाही. पण हा दारातला मोगरा ‘‘मै हू ना‘‘ म्हणत साथ देत आहे.

         जनकल्याणच्या माध्यमातून आमच्या घरी किराणा दुकान असावं असं दुकानच भरायचं. कितीतरी छोट्या छोट्या वस्तीत जाऊन माझ्यासारख्याच दोन पायांच्या माणसांना जवळून अनुभवता आलं. हा पण त्यावेळी चेह-यावरचा मास्क वापरुन लांब अंतर पाळून माझ्या बांधवांना काही देता आलं. त्यावेळी मोबाईल क्लिक व फोटो यांना आम्ही फाटा दिला. अशी वेळ उद्या माझ्यावरही येऊ शकते. फक्त बंधुत्वाचा जमेल तेवढा छोटा पूल मनामनात उभा केलाय. डॉक्टर, पोलीस, सैनिक, शिक्षक सगळेच किती महत्त्वपूर्ण काम करतात हे लक्षात आलं. मी म्हणजे कोण? असं म्हणत असताना ना हा माझ्यातला मी गळून पडला रे तुझ्यामुळेच! हो हो तुझ्यामुळेच!

          शाळा बंद असल्याने मुलांच्याकडे व्यवस्थित लक्ष देता आले. ओम मित्राय नमःम्हणत रोजच्या सूर्यनमस्काराची आवश्यकता किती गरजेची आहे ना हे जाणवलं. मुलांबरोबर चित्रं काढणे, रामायण आणि महाभारत यातील गोष्टी पाहत पाहत ऐकवत आलो. माझा मुलगा किती सुंदर हार्मोनियम वाजवू शकतो आणि राग आळवू शकतोय निरंतन बागेश्री जपत आम्ही आयुष्याची सुरेल नांदी सुरु करत आहोत. आजीच्या गोष्टी लोण्याचा गोळा घातलेले आजीनेच बनवलेले थालीपीठ खाताना मस्त वाटलं रे. आजोबांचा सुरकुतल्या हातांचा आम्हांला किती आधार वाटतोय.

           देवासमोर आता हात जोडून उभी असते ना रामरक्षा म्हणताना स्वतःच किती बदलून गेलेय मी हे जाणवतं. कोरोना आता तू बिनधास्त तुझ्या आपल्या घरी जा. आमच्या प्रार्थना ऐकून देव्हा-यात बसलेला देव बदलणार नाही आम्ही आतून बदलून गेलोय पूर्णपणे!

तुला कधीच जवळ फिरकू न देणारी…

अंजली मुतालिक, कुडाळ. ९४२०३०६४०८

 

 

Leave a Reply

Close Menu