याचाही विचार व्हावा….

               १९८२मध्ये काजू उद्योग धंद्यात मी व माझा भाऊ उतरलो. १९८७ मध्ये संपूर्णतः लॉस झालो. तरीही मी हार न मानता आजपर्यंत या उद्योगात तग धरुन आहे. आज सर्वत्र लॉकडाऊनमुळे प्रत्येक उद्योगावर टांगती तलवारच आहे. एकंदरीतच उद्भवलेल्या परिस्थितीमुळे प्रत्येकाच्या डोळ्यासमोर अनिश्चितता आहे. त्यात काजू हे तसे श्रीमंत (लक्झरीर्यस) फळ. काजूचे झाड लावल्यानंतर विशेष काळजी न घेताही हमखास पैसा मिळवून देणारे असे उत्पन्न. असा या काजूचा बोलबाला असल्याने कोकणात बहुसंख्य कारखाने दिसून येतात. त्यात शासनाची सबसिडी मिळायला लागल्यापासून या उद्योगात येणा­­-यांचा ओघ वाढलेला दिसून येतो. पण एकदा गरम दूधाने तोंड पोळल्याने जो काही अनुभव मला या व्यवसायात आला आहे, तो मी मांडू इच्छितो.

    कुठल्याही उद्योगाची पार्श्वभूमी अभ्यासताना त्यातील खाचखळगे माहिती असतील तर त्याला सामोरे जाताना नैराश्य येणार नाही. काजू उद्योगात बी खरेदी, व्यवस्थापन, मार्केटींग, विक्री या टप्प्यामध्ये किचित जरी चूक झाली तरी त्याचा फटका पूर्ण उद्योगावर होतो. यावर्षी फेब्रुवारी महिन्याचा काजू बी दर पहाता १५० रुपये किलो होता. जो मे महिना अखेर ८० रुपये किलो झाला. ज्याने १५०ने खरेदी केली, त्याचा किती तोटा झाला हे लक्षात येते. काजूचा दर १९७८ मध्ये ५ रु. किलो होता. १९८२ मध्ये ७ ते ८ रु. किलो. १९८५ ते १९८६ मध्ये २२ रु. किलो. तर १९८७ मध्ये १० रु. किलोवर घसरला. तेव्हाही ६ महिन्याच्या मुदतीत शेतकरी उधार घेत-देत होते. लॉकडाऊनमुळे काजू बी दर २० रु. किलोनेच पडला. तो ९० ते १०० पर्यंत येणारच होता. प्रत्येक व्यवसायाला अर्थशास्त्राच्या नियमानुसार तेजी-मंदीच्या चढउताराला  सामोरे जावे लागते. पण झटपट ‘मनी‘च्या मागे लागणा-या आजच्या पिढीला यातील गांभीर्य समजून घ्यावे लागेल. १०० किलो न वाळवता काजू बी चांगला असला तर त्याचा उतारा एकूण सालासहीत आणि तुकडा काजू धरुन फक्त २६ किलोच येतो. तोच काजू पॉलिश केल्यास २२ ते २३ किलो भरतो.  काजू बी खरेदी करण्यासाठी लागणा-या अर्थसहाय्यासाठी आपल्याला बँकेचे सहकार्य घ्यावे लागते. त्यावेळी बँकेच्या नियमाप्रमाणे घेतलेल्या कर्जाच्या पाचपट उलाढाल होणे आवश्यक असते. पण काजू बी हे हंगामी फळ असल्याने खरेदी करुन, ती वाळवून त्याची साठवणूक करणे यासाठी तीन महिन्यांचाच कालावधी मिळतो. याच तीन महिन्यात वर्षभरासाठी लागणारी काजू बी रोखीने खरेदी करावी लागते. त्यामुळे बँकेला आवश्यक असणारी उलाढाल या उद्योजकांकडून होत नाही. परिणामी, उद्योजकांना मिळणारा नफा हा तुलनेने कमी असतो. यातून मिळणारे उत्पन्न आणि कामगार पगार, कच्चा माल, वीज बिल, जीएसटी यासाठी होणारा खर्च भागविताना उद्योजकाला तारेवरची कसरत करावी लागते.

     इतरांना श्रीमंत वाटणा-या या व्यवसायात प्रत्यक्ष मात्र बरेच बारकावे जाणून घेतल्याशिवाय यात ‘करिअर‘ करणे हे तसे धाडसाचेच आहे. तरीही हा उद्योग करायचा झाल्यास त्या उद्योगाच्या इमारत बांधणीसाठी तसेच मोठमोठ्या मशिनरी खरेदीसाठी अनावश्यक खर्च न करता कमी दरात जास्तीत जास्त काजू बी कशी खरेदी करता येईल याकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. काजू व्यवसायासाठी लागणा-या सर्व मशिनरी एकानेच न घेता त्या समन्वयाने जवळपासच्या या उद्योगात असलेल्यांकडे विभागल्या गेल्या पाहिजेत. अशाने सर्व काजू उद्योजकांना काम मिळू शकते. मशिनरीच्याबाबतीत उदाहरण द्यायचे झाल्यास काजूगर सोलण्याच्या मशिनरीसाठी दिवसाला ४०० किलो काजू बी असली पाहिजे. तिच बी चारजणांची १००-१०० किलो असल्यास या चारजणांकडून येणा-या उत्पन्नातून मशिन मालक कर्जाचा हप्ता भरु शकतो. यामुळे कोणाही एका उद्योजकावर बँकेचा बोजा रहात नाही.

     उत्पादन झाल्यानंतर मार्केटींगच्यावेळी बहुतांशी कारखानदार हे मुंबईतील एपीएमसी (वाशी) मार्केटमधील दलालांवर पूर्णतः अवलंबून असतात. कोणताही दर न ठरवता आपला माल वाशी मार्केटला पाठविला जातो. तो माल विक्री केल्यानंतर येणारी रक्कम कधीही एक रक्कमी न येता, ती टप्प्याटप्प्याने काही महिन्यांच्या कालावधीत पाठविली जाते. त्यामुळे त्यापासून मिळणारा नफा हा बँकेचे व्याज भरण्यातच जातो.

     कोकणात काजू प्रक्रिया उद्योग वाढलेले दिसून येत असल्यामुळे साहजिकच काजूगर उत्पादने जास्त झालेली आहे. पण त्या तुलनेत विक्रीत वाढ झालेली नाही. तसेच राज्य-परराज्यातून येणा-या काजूगराची आवक वाढलेली असल्याने पूर्वीपासून एका विशिष्ट मार्केटींग पद्धतीने जाणा-या व कर भरणा-या या उद्योगाला त्रास सहन करावा लागत आहे.

     थोडक्यात, या उद्योगासाठी आपला जनसंफ वाढविणे हिताचे आहे. आयात-निर्यातीची गणिते समजून घेऊनच त्यामध्ये उतरणे केव्हाही फायद्याचे आहे. आपल्या मालाची दर्जात्मक क्वॉलिटी थेट ग्राहकापर्यंत कशापद्धतीने जाता येईल, तसेच काजूगर निर्यातीकडे उद्योजक वळल्यास मुंबई मार्केटवरील दबाव कमी होऊन नविन मार्केटमिळेल या सर्वांचा अभ्यास करुनच भविष्यात या काजू व्यवसायात उतरले पाहिजे.                     – प्रकाश नाईक, वेंगुर्ला (९४२०२६६३५२, ९६०४९५२८६१)

Leave a Reply

Close Menu