लालपरीच्या दुनियेत

१ जून रोजी एसटीचा वाढदिवस. एसटीचा आणि आपलं प्रत्येकाचे नाते असते. एसटी म्हणजे आमच्यासाठी कधीच लाल डबा नसतो. मी अजूनही मुंबईहुन गावी जाताना कुर्ला नेहरुनगरला जातो. कणकवली, मालवण, सावंतवाडी एसटी पकडतो आणि गावी निघतो. मला एसटी आवडते कारण ती गावी जाताना गोल गोल फिरत नाही बसत. संध्याकाळी थेट चारला निघते आणि सकाळी चारला कणकवली पाचला मालवण. गावाला जाताना ते वाटेत थांबणे, गाडी रेंगाळत राहणे, ट्रेनला सिग्नल लागणे या गोष्टी त्रास देतात, म्हणून एसटी आवडते.

      बाकी एसटीत समोरच्या आडव्या सीटवर ढोपरावर उभं राहून समोर बघणे, खिडकीच्या दांडीला सारखे डोके आपटून मग त्याचीच सवय होणे, मागच्या सीटवर झोपेत दणकन उडणे, आंगणेवाडी जत्रा एसटीत उभे राहणे, मुंबई अधिवेशनसाठी स्पेशल एसटी, गावाकडच्या मुलांना पाससाठी अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळणे याबद्दल मनातली असूया सगळं तसेच आहे. पूर्वी गणपतीला मे महिन्यात त्या रिझर्वेशनच्या रांगात उभे राहणे, मग ते एक रुपयांचे तिकीट रिझर्वेशनचे दिवस. माझी आई कट्ट्याला शाळेला होती, ती ७ वाजता परत येताना पळत पळत तिला शाळेतून आणायला जाणे. घरातुन एसटीचे दार लावल्याचा आवाज ऐकणे आणि पळत सुटणे यात लहानपण ओवलय. या आठवणी एवढ्या आहेत की त्या एकदा आठवल्या की डबल बेल बसूच शकत नाही.

          या सगळ्या एसटी नावाच्या सार्वजनिक परिवहन अवस्थेला जर तुमच्या आयुष्यातून काढलं तर उरते काय म्हणा? मी मालवणचा आहे.. तुम्ही मुंबईला निघालात की एसटी स्टँडवरुन निघाली की भरड, बाजार असा वळसा घालून पुन्हा स्टँडवर यायची. आणखी कुठल्या शहरात असे होते का मला ठाऊक नाही, पण ती २० मिनिटे शहर सोडताना खूप महत्त्वाची असतात. एसटीच्या खिडकीतून पुन्हा एकदा शहर पाहण्याचे भाग्य मिळते आणि त्यात तुमचे घर नजरेआड होताना नेमके काय होते हे तुमचे तुम्हाला ठाऊक म्हणा!

      असो एक आठवण सांगतो, मालवणात पाटील नावाचा दाढीवाला ड्राइव्हर होता. मी जाम घाबरायचो त्याला, त्याची दाढी बघून. एका आंदोलन प्रकरणात एक बस जाळली गेली आणि सरकारी नियमाने त्याच्यावर ड्रायव्हर म्हणून गुन्हा नोंदवला. तेव्हा नुकतेच राजकारण सुरु झाले होते. तो कोर्टात रडला होता. बाहेरच्या बाकावर मी नेमका तिथे होतो. लहान होतो म्हणा. पण तो डोळ्यात पाणी आणून सांगत होता. सायेब एसटी जळताना नाय बघू शकत आम्ही. फुटताना नाय बघू शकत आम्ही. बाकी कसलेही आळ लावा. आईला जाळल्याचा आळ नको बस्स!त्या दिवशीपासून मला पाटील ड्रायव्हरची भीती वाटणे बंद झालं. पण एसटीबद्दल भीती वाटते. कारण तिच्या काचा फुटल्या की देशातील प्रश्न मिटतात असा एक वर्ग कायम जिवंत राहतोच ना?

      तो त्या प्रकरणात नव्हताच म्हणा.पण एसटी फक्त त्या कर्मचा-यांचीच नाही तर आपल्या प्रत्येकाची नात्यात लागते हे प्रत्येकाला कळायला हवे. एसटी जगली पाहिजे. कारण आपल्या श्वासात तो डिझेलचा उग्र वास ऑक्सिजन म्हणून कुठेतरी आत प्राणवायू म्हणून घट्ट रुतून बसलाय !

 – ऋषी देसाई, वृत्तिनवेदक ९८७०९०४१२९

(बस कंडक्टर सौ.प्रज्ञा प्रमोद देसाईचा पुतण्या)

 

Leave a Reply

Close Menu