►आसोली येथे आढळला कोरोना बाधित रुग्ण : ३०० मीटरचा परिसर कंटेंनमेंट झोन

वेंगुर्ला तालुक्यातील आसोली-फणसखोल येथे मुंबई वरुन आलेला व होमक्वारंटाईन असलेला व्यक्ती कोरोना बाधित आढळल्यामुळे पुन्हा एकदा शासकीय यंत्रणेची धावपळ उडाली आहे. फणसखोल येथील कोरोना बाधित आढळलेला हा व्यक्ती २ जून रोजी १७ सीटर वाहनाने मुंबई वरून आला होता. त्याच्यासोबत मळेवाड येथील ९ तर बांदा येथील ३ जणही याच गाडीने प्रवास करून आले होते. फणसखोल येथील या व्यक्तीला घराच्या मागील पडवीत क्वारंटाईन करण्यात आले होते. तर मुख्य घरात त्याचे आई वडील वास्तव्यास आहेत. ६ जून रोजी ताप आल्याने त्या व्यक्तीला ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान आज त्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती वेंगुर्ला तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विनी माईणकर- सामंत यांनी दिली आहे.

      दरम्यान, या घटनेचे वृत्त समजताच वेंगुर्ला तहसिलदार प्रविण लोकरे, पोलिस निरीक्षक तानाजी मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विनी माईणकर-सामंत, विस्तार अधिकारी यांनी भेट देऊन पहाणी करत सुमारे ३०० मीटरचा परिसर कंटेंनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. तसेच गणेश मंदिरच्या रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकेटस् लावला आहे. यावेळी आसोली सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व मंडल अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu