२०२० च्या मार्च ते मे महिन्यात पाण्यासाठी होणारी वणवण, प्रसंगी मैलोनमैल होणारी पायपीट थांबली, विहिरीने तळ गाठल्यानंतर वाड्यावाड्यांमध्ये दिसणारे पाणी पुरवठ्याचे टँकर दिसून आले नाहीत. एकीकडे कोरोनाच्या भीतीने पूर्ण जगच थांबले असताना दैनंदिन जीवनात झालेला हा बदल आश्चर्यकारक मानला जाऊ लागला आहे. काहींच्या मते मोठमोठे कारखाने, उद्योगधंदे, हॉस्पिटल, बांधकाम व अन्य विकास कामे या कालावधीत ठप्प राहिल्याने पाण्याचा पुरवठा संचित राहिला. त्यामुळे पाण्यासाठीची वणवण थांबली. हे एका बाजूने जरी खरे असले तरी या लॉकडाऊनच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात जनता घरातच राहिली होती. १० बाय १०च्या रुममध्ये सुद्धा दाटीवाटीने लोक रहात होती. अशावेळेला दैनंदिन गरजांव्यतिरीक्त वारंवार हात धुवा, मार्केट, आरग्य केंद्र, शाळा पाण्याने स्वच्छ करत सॅनिटाईझ करा. तसेच अन्य स्वच्छतेसाठी पाण्याचा ब-याच प्रमाणात वापर हा झालाच. एकंदरीत महाराष्ट्राच्या इतर प्रादेशिक भागाच्या तुलनेने पावसाचे पाणी आणि समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणात असलेला कोकण हा भाग पाण्याच्या बाबतीत श्रीमंत प्रदेश. पण या पाण्याच्या श्रीमंतीला उन्हाळ्यात मात्र, घरघर लागते.

      कोकणातील मंडळी म्हणतात, आपल्याकडे दुष्काळ कुठे आहे? मराठवाडा-विदर्भात आहे, आम्हाला काय त्याचे? पण दुष्काळाचे चटके कोकणवासीयांना देखील अप्रत्यक्षरीत्या भोगावे लागतात. आपल्या जीवनात येणा-या भाज्या, कांदे, टोमॅटो, बटाटे यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती अवास्तव वाढलेल्या आहेत. दुष्काळामुळे भाज्यांच्या उत्पादनात प्रचंड तूट निर्माण झाली. अपुरा पुरवठा होणा-या भाज्यांच्या किमती गगनाला भिडू लागल्या.

      शेतीमालाची उत्पादन पावसाच्या पाण्याच्या अभावी प्रचंड घटले. त्यामुळे सर्व बाजारपेठांमध्ये आवश्यक अन्नधान्यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसून येतात. महागाई हा जसा काही दलालांच्या स्वार्थाचा परिणाम आहे तसा तो उत्पादन घट होणे याचाही परिणाम आहे. याची जाणीव ठेवून पाण्याचा थेंब थेंब आपल्यासाठी महत्त्वाचा आहे.

     आपल्याकडे वेंगुर्ला शहराचा विचार करता, पाणी प्रश्नामुळे ब-याचदा वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरले गेले आहेत. असा वेंगुर्ला शहराचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पाणी. मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून निशाण तलावासारखे धरण असूनही मार्च-एप्रिल-मे महिन्यात शहरवासीयांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. अर्थातच नगरपरिषदेकडून पाणी प्रश्न सोडवला जाईल अशी अपेक्षा नागरिकांकडून असते. किबहूना नगरपरिषदेचे ते मुलभूत काम आहे. मात्र यावर्षी शहरात पाण्याचा टँकर फिरविण्याची वेळ नगरपरिषदेवर आली नाही. याचे कारण नगरपरिषदेने पाणीप्रश्नी प्राधान्याने लक्ष घालून गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने केलेल्या उपाययोजना.

      वेंगुर्ला शहराला पाणीपुरवठा करणारा एक महत्त्वाचा स्रोत म्हणजे निशाण तलाव. या धरणात पावसाचे पाणी साठवले जाते व पाण्याचा पुरवठा संपूर्ण शहराला केला जातो. आतापर्यंत नगरपरिषदेकडे सुमारे १३५० नळधारकांची नोंदणी आहे. त्याशिवाय सार्वजनिक शौचालये यांनाही नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. ऐन एप्रिल-मे महिन्यात शहरातील पर्यटन, हॉटेल्स, घराघरात येणारे चाकरमानी यामुळे भरपूर प्रमाणात पाणी उपलब्ध करुन देणे नगरपरिषदेला अनिवार्य असते. दरवर्षी मार्चपासूनच निशाण तलावातील पाणी साठा कमी होतो आणि शहराला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ येते. त्यावेळी अग्निशमन केंद्राजवळील जूनी विहिर, कंपोस्ट डेपोमधील बोअरवेल तसेच इतर खाजगी विहिरींमधून पाणी घेऊन ते टँकरद्वारे शहराला पुरविले जात असे.

कारणे शोधून केली उपाययोजना

      अगदी दिवाळीपर्यंत परतीचा पाऊस पडून सुद्धा पाणीपुरवठा का होत नाही किवा पाणीटंचाई का होते? यासाठी साप्ताहिक किरातची टीम, नगराध्यक्ष दिलीप गिरप, नगरसेवक प्रशांत आपटे यांनी एप्रिल २०१७ मध्ये वेंगुर्ल्यातील ‘पाणी टंचाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट‘ करुन तो किरातमधून प्रसिद्ध केला. त्यावेळी पाणी साठवणूक क्षमता आणि पाणी वितरण व्यवस्था यामध्ये निदर्शनास आलेल्या समस्यांना नगरपरिषदेने सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याने यावर्षी टँकरमुक्त वेंगुर्ल्याचे चित्र दिसले.

      पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जीर्ण आणि कमकुवत झाली असल्याने फार मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होऊन पाणी वाया जात होते. यासाठी पाईपलाईन दुरुस्ती हाच एकमेव उपाय होता. पण अन्य तात्पुरता उपाय करण्यापेक्षा भविष्यातही नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागू नये म्हणून पाईपलाईन बदलण्याचे काम ऐरणीवर घेतले. पण हेही सहज शक्य नव्हते. पाईपलाईन बदलण्याचे काम होईपर्यंत तरी शहरवासीयांना थोडी असुविधा सहन करावी लागणार होती. नगरपरिषदेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पाईपलाईन बदलण्याच्या कामाला नगरविकास महासंचालनालय विभाग मुंबई, जिल्हाधिकारी सिधुदुर्ग यांची मान्यता मिळाली आणि हे काम सुरु झाले. पाईपलाईन बदलण्याच्या पहिल्या टप्प्यात वेशी भटवाडी, गावठाण येथील ४० वर्षांपूर्वीच्या जुन्या पाईपलाईन बदण्यात आल्या. त्यामुळे जीर्ण झालेल्या पाईपलाईनमधून वाया जाणारे पाणी बंद झाले. तसेच जुन्या पाईपलाईनवरचे वॉल्व्ह बदलण्यात आल्यामुळे विविध भागात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुरळीत झाले.

      या व्यतिरिक्त शहरातील अन्य काही ठिकाणच्या पाईपलाईन बदलण्याच्या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले असून ती पावसाळ्यानंतर मार्गी लावण्यात येणार आहेत. वेशी भटवाडी येथील उंच भागात कमी दाबाने नळ पाणी पुरवठा होतो. यावर उपाय म्हणून १ लाख लिटर पाण्याची टाकी व विहिर आदी कामे मंजूर असून ती पावसाळ्यानंतर मार्गी लागणार आहेत. त्यामुळे हे काम पूर्ण झाल्यानंतर वेशीभटवाडी परिसरातील रहिवाशांना पाण्याची सोय होणार आहे.

      निशाण तलावामध्ये मोठ्या प्रमाणात चिकणमाती सदृश्य गाळ माती साचली होती. गेल्यावर्षी सदरची साचलेली माती काढल्याने पाणीसाठा वाढला. सप्टेंबर २०१९मध्ये गोडबोले गेटच्या तांत्रिक बिघाडामुळे वेगाने पाणी वाया जाऊन पाणीसाठा झपाट्याने कमी झाला. तिथल्या स्थानिक नागरिक आणि वृत्तपत्रांनी ही बाब लक्षात आणून देताच नगरपरिषदेने तातडीने उपाययोजना करुन वाया जाणारे पाणी थांबविले. तसेच शहरातील मुख्य ओहोळांवर भक्कमपणे घातलेल्या बंधा-यांमुळे आजूबाजूच्या परिसरातील विहिरींमधील पाण्याची पातळी कमी झाली नाही.

      कॅम्प येथील अग्निशामक केंद्राजवळील २ लाख लिटर पाण्याची टाकी व विहिरी यांचे काम दरम्यान पूर्ण झाले. नारायण तलावाच्या जवळील असलेल्या विहिरीची खोली वाढविल्याने निमुसगा येथे असणा-या १ लाख लिटर पाण्याची टाकी रोज भरण्यात येऊ लागली. गाडीअड्डा येथील ५० हजार लिटर पाण्याच्या टाकीजवळ नविन विधन विहिर (बोअरवेल) खोदून या बोअरवेलचे पाणी त्या टाकीत भरण्यात येऊ लागले. जलशुद्धीकरण केंद्राजवळील पाण्याच्या टाकीची क्षमता ७ लाख लिटर एवढी आहे. मागील तीन वर्षातील नगरपरिषदेच्या वरील प्रयत्नांनी इतर तीन टाक्यांचे बांधकाम पूर्ण झाल्याने पाणी साठवणूक क्षमता १०.५ लाख लिटर एवढी वाढल्यामुळे किमान २ दिवस का होईना योग्य दाबाने नळपाणी पुरवठा योजनेद्वारे सुरळीत पाणी पुरवठा यावर्षी सुरु राहिला. मार्च ते मे या पाणी टंचाईच्या कालावधीत उपलब्ध पाणी साठ्याचे नियोजन करुन ते सर्वांना समान पाणीपुरवठा करत असतानाही नगरपरिषदेला थकबाकीदार आणि चोरुन पाणी वापरणा-यांपासून बराच त्रास होत होता. याचा सर्व्हे करुन संबंधितांना याची कल्पना देऊन नाईलाजास्तव नगरपरिषदेने काही कनेक्शने कायमची बंद केली आहेत.

      या सर्व उपयायोजनांमुळे यावर्षी शहरात पाण्याचा टँकर फिरविण्याची वेळ नगरपरिषदेवर आली नाही. शहर कायमचे पाणी टंचाई मुक्त करण्यासाठी या सर्व प्रयत्नांबरोबरच भविष्यात निशाण तलावाची वाढलेली उंची आणि त्यात राहणारा पाणीसाठा हा महत्त्वाचा ठरणार आहे.

संस्थात्मक विलगीकरणासाठी केला पाणी पुरवठा 

      एप्रिल-मे महिना हा सुट्टीचा आणि पर्यटनाचा हंगाम. त्यामुळे शहरात घरोघरी चाकरमानी आणि येथील हॉटेलांमध्ये पर्यटकांची रिघ असते. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे शहरात ना चाकरमानी आले, ना पर्यटक आले. परंतु मे महिन्याच्या दुस-या पंधरवड्यात शहरांतील संस्थात्मक विलगीकरणात बहुसंख्य चाकरमान्यांची आणि कामानिमित्त बाहेर अडकलेल्या नागरिकांची वाढ झाली. यांच्या सोयीसुविधांची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेवर असल्याने शहरातील ५ शाळा, संगीत रिसॉर्ट, आंबेडकर वसतीगृह, उभादांडा येथील २ शाळा याठिकाणी दररोज प्रत्येकी १००० लिटर पाणी नगरपरिषदेने पुरविले.

तलावाची क्षमता वाढविण्याच्या कामाला प्रारंभ

      शहरातील स्थिर लोकसंख्या आणि एका विशिष्ट हंगामात वाढणारी लोकसंख्या याचा विचार करता दररोज आवश्यक पाणी पुरवठा होणे एकूण शहराच्या अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक आहे. निशाण तलावाची पाणी साठवण्याची क्षमता नसल्याने पावसाचे बरेचसे पाणी वाहून जात होते. पावसाचे पाणी साठवले तर पाणी टंचाई कायमची मिटेल आणि यासाठी धरणाची पाणीसाठा करण्याची क्षमता वाढविणे गरजेचे होते. त्यासाठी धरणाची उंची वाढविणे आवश्यक असल्याने सप्टेंबर २०१९ मध्ये धरणाची उंची अडीच मिटरनी वाढवण्याचा कार्यारंभ आदेश मिळवण्यात नगरपरिषदेला यश मिळाले. भविष्यात वेंगुर्ला शहर हे पाणी टंचाई मुक्त व्हावे यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेने या निशाण तलावाची उंची अडीच मिटरने वाढविण्याचा निर्णय घेतला होता. हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सिंधुदुर्गनगरी यांच्यावतीने सुरु आहे. धरणाची उंची वाढविण्याचे काम यावर्षी पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु लॉकडाऊनमुळे काम खोळंबल्याने अपेक्षित काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होऊ शकले नाही. पावसाळ्याचे दिवस संपताच उर्वरित काम लगेच सुरु करुन मे महिन्यापर्यंत सर्व नियोजित काम पूर्ण करण्याचा मानस नगरपरिषदेचा आहे.

      निशाण तलावाची उंची अडीच मिटरने वाढविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर धरणाची पाणी साठवणूक क्षमता वाढणार आहे. परिणामी जुन-जुलैमधील वाहून जाणारे पाणी साठविणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रति माणशी किमान ७० लिटर पाणी देणे बंधनकारक असलेल्या नगरपरिषदेला भविष्यात १३५ लिटर प्रति माणशी पाणी देणे शक्य होऊ शकेल.                            – सीमा शशांक मराठे, (९६८९९०२३६७)

————————————————————————————

२०१६ सालचे उन्हाळ्यातील भीषण पाणी टंचाईचे दिवस आजही माझ्यासमोर जसेच्या तसे आहेत. संपूर्ण शहरातील विविध भागात फिरणारे पाण्याचे टँकर, रस्त्यावर पाणी घेण्यासाठी लागलेल्या रांगा, काही ठिकाणी पाणी भरुन घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची होणारी वणवण. हे चित्र पहात असताना मी राजकारणात सक्रीय नव्हतो. तरीसुद्धा सामान्य नागरिक म्हणून आलेल्या या अनुभवाने सातत्याने हा प्रश्न मला पोखरत होता की, आपल्याकडे एवढा पाऊस पडूनही उन्हाळ्यात पाणी टंचाई का? नेमके चुकते कुठे? योगायोगाने नोव्हेंबर २०१६च्या निवडणूकीत नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर हा प्रश्न तडीस नेण्याचा मी निश्चय केला आणि लगेजच पाणी पुरवठा विभागाची बैठक घेऊन नेमक्या समस्या जाणून घेतल्या. एप्रिल २०१७ मध्ये या कर्मचा-यांसोबत स्वतः फिरुन समस्यांचे मूळ शोधून काढले. मागील तीन वर्षातील सततचा पाठपुरावा आणि सुयोग्य नियोजन तसेच सर्व सहकारी नगरसेवक, मुख्याधिकारी आणि सर्व कर्मचा-यांच्या सहकार्यामुळे वेंगुर्ला शहर टँकरमुक्त ठेवण्यात यश मिळाले. तरीही जेव्हा धरणाचे काम पूर्णत्वाला जाऊन पूर्ण क्षमतेने नळपाणी पुरवठा संपूर्ण शहराला होईल तेव्हाच ख-या अर्थाने आमचे उद्दिष्ट सफल झाल्यासारखे होईल.                                                                                                                      – दिलीप गिरप, नगराध्यक्ष

This Post Has One Comment

  1. नमस्कार,
    आपल्यासारखाच विचार गाव पातळीवर विशेषतः तळकोकणातील वाड्यावर वाड्यावर पाण्याचा स्रोत जेथे आहे तेथेही केला पाहिजे.याबाबत कसं काय विचार करायचा यासंबंधी तेथील स्थानिक लोकानी आपल्या प्रमाणे ,याचा विचार करून जलसाठा समृद्ध करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे .आपले अनुकरण करून पाण्याची समस्या मे महिन्याच्या अखेरीस कशी संपुष्टात येईल येईल याचा विचार करणे गरजेचे आहे हे आपल्या उपक्रमाबद्दल उपक्रमातून समाजाला दाखवलेले आहे. त्यामुळे यावर्षी लोकांच्या तोंडचे पाणी पळाले नाही हीच एक आनंदाची बातमी आपल्या लेखाने सांगून जाते. धन्यवाद!! अभिनंदन!!!

Leave a Reply

Close Menu