…नायतर माझ्या विठूक कोरोना जायत

कोरोना नसता तर येणा-या आठवड्यात पालखी सोहळे देहू आणि आळंदीहून पंढरपूराच्या दिशेने चालू लागले असते. पण यंदाची वारी पायी नसणार आहे. संतांच्या पादुका थेट ‘गरुडावर बैसोनि‘ पंढरीला जाण्याची शक्यता आहे. आपल्या परंपरेसाठी आग्रही असणा-या वारक-यांनी हे अगदी सहज कसं स्वीकारलं, असा प्रश्न अनेकांना पडलाय खरा.

      गोष्ट या ३० मेची आहे. यावर्षी पायी वारी नाही, असं साधारण पासष्टीच्या लताबाई खोबरेकरांच्या कानावर आलं. आपल्या दरवर्षीच्या पायी वारीचं काय होणार, याचा शोध घेत त्या परुळेकर बुवांना भेटायला सकाळीच त्यांच्या वाड्यावर आल्या. परुळेकर बुवा म्हणजे अॅड. देवदत्त परुळेकर. हे नाव ऐकल्यावर वेंगुर्ल्यातल्या मंडळींना आजही त्यांची तुफान चालणारी वकिलीची प्रॅक्टिस आठवते. पण ४०व्या वर्षी सगळ्या केस आपल्या असिस्टंटना सोपवून त्यांनी स्वतःला समाजकार्यासाठी वाहून घेतलं. वडिलांच्या निधनानंतर वै. मामासाहेब दांडेकर दिंडीची जबाबदारी अचानक त्यांच्यावर आली आणि त्यांच्या जगण्याची वाटच बदलली. आता कीर्तनकार, प्रवचनकार, संतसाहित्यावरच्या लोकप्रिय पुस्तकांचे लेखक म्हणून ते ओळखले जातात.

      या परुळेकर बुवांनी लताबाईंना समजावून सांगितलं, कोरोनाची लागण वाढेल म्हणून सरकारने पायी पालखी सोहळा न करण्याचा निर्णय घेतलाय. ते ऐकून लताबाईंचं समाधान झालं. त्यांनी बुवांना सांगितलं, बरा झाला. ‘नायतर माझ्या विठूक कोरोना जायत.‘

      वेंगुर्ल्याच्या बाजारात मासे विकणा-या लताबाईंचं हे शहाणपण ऐकून बुवा अवाक झाले. माळकरी लताबाई मासे विकतात याचं इतरांना आश्चर्य वाटतं. पण वारक-यांना त्यात काही नवीन नाही. साक्षात पांडुरंगच सजन कसाया सोबत मांस विकत होता, असा प्रसिद्ध दाखला जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगातच आहे.

     ह.भ.प.देवदत्त परुळेकर म्हणतात, हे शहाणपण आमच्या लताबाईला विठ्ठलाच्या भक्तीनेच दिलंय. देवाशी आपल्या नात्याच्या अनुसार भक्तीचे वेगवेगळे प्रकार असतात, सख्यभक्ती, दास्यभक्तीसारखे. तसा हा मातृभक्तीचा आविष्कार आहे. यशोदेच्या कृष्णावरच्या भक्तीसारखा. विठ्ठल कुणी लांबचा नाही. तर आपलं लेकरुच आहे, अशी ही भावना आहे. त्यामुळे गर्दीमुळे लाडक्या विठुरायाला कोरोना झाला असता, अशी काळजी या माऊलीला वाटली.

      बुद्धीवाद्यांना कदाचित हा वेडेपणा वाटेल, पण देवाच्या दोस्तीतली मजा वारक-यांशिवाय कुणाला कळणार? लताबाईंच्या बोलण्यातून आलेली माऊलीपणाची ही भावना वारकरी विचारांचा गाभा आहे. ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात, ‘जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत.‘ समोरचा प्रत्येकजण हा देवच आहे, असं मानायचं. मग सगळे अमंगळ भेदाभेद संपून जातात आपोआप. मग कुणी मोठा उरत नाही आणि कुणी लहान ठरत नाही. जात, धर्म, भाषा, प्रदेश, लिंग, वर्ण, वर्ग यातून येणारे सगळे भेद संपून जातात. इथेच समता येते. अध्यात्मिक लोकशाही येते. बंधुतेच्या पुढची माऊलीपणाची भावना दृढ होते. माऊली म्हणजे आईचं प्रेम देणारे संत. संत तर वारक-यासाठी देवापेक्षाही मोठे. त्यामुळे वारीला जाऊन आपल्यामुळे दुस-याला कोरोना होऊ न देण्याचं शहाणपण असणारच.

      माऊलीपणाची ही एकच भावना जगणं सोपं करते. देवाला भेटायला कुणी मध्यस्थ लागत नाही. योग, याग, विधी ही वायाची उपाधी बनून जाते. देवाशी आणि जगाशी प्रेमाचं नातं जुळलं की अहंकाराचा वारा लागून स्वतःबद्दल झालेल्या कल्पनेच्या बाधेवर तोडगा निघतो. द्वेष, ईर्ष्या, वखवख संपवून टाकते. अतिआत्मविश्वास, अतिमहत्त्वाकांक्षा, उद्याची काळजी यातून बाहेर पडण्याचा सोपा मार्ग दाखवते.

      माऊलीपणाची ही माया एकदा कमावली की जादू होऊ लागते. आमचे नामदेवराय दगडाला थंडी वाजेल म्हणून त्यांच्यावर पांघरुण घालतात. माऊलींनी सांगताच रेडाही वेद म्हणू लागतो. आमचे नाथबाबा म्हणजे संत एकनाथ काशीहून आणलेली गंगा तहानलेल्या गाढवाला पाजतात. वृक्षवल्ली तुकोबारायांचे सोयरे होतात. खेळणारी पाखरं आपण आल्यामुळे उडाल्याचं तुकोबांना वाईट वाटतं.

      संतांना साधलं ते आपल्यापैकी प्रत्येकाला जमू शकते, याचा विश्वास वारकरी परंपरेला आहे. अर्थातच हे प्रत्येकात देव बघणं सोपं नसतं. त्यासाठी साधना करावी लागते. म्हणजे ‘प्रॅक्टिस‘ करावी लागते. त्या प्रॅक्टिससाठी नेमून दिलेला वेळ म्हणजे वारी. त्यातला पायी पालखी सोहळा म्हणजे संसारातून सुटी घेऊन स्वतःला दिलेला ‘बेस्ट क्वालिटी टाइम‘. सगळे कलह, द्वेष, राग घरी ठेवायचे. २०-२२ दिवस सोबत चालणा-या प्रत्येकात देव शोधायचा. नामस्मरणातून मनावरची विचारांची मांड पक्की करायची. चित्तातली घाण धुवून टाकायची. कुठे याचा नेम चुकला, तर संतांची पालखी सोबत असतेच. साक्षात संतच आपल्यासोबत चालत आहेत, हा आधार पुरेसा असतो. त्यासाठी दिवसभरात काय करायचं हे प्रत्येक दिंडीचं आपापलं ठरलेलं असतं. कधी कोणते अभंग कसे गायचे हेही ठरलेलं असतं. त्यातून संतांच्या शिकवणुकीवर विचार करायला लावणं आहे. संतविचारांत एकदा डुंबलं की त्यातून होणारा देवाचा आणि पर्यायाने स्वतःचा शोध हा आनंदसोहळा बनतो. प्रेमसोहळा बनतो. त्यात नाचणं, गाणं आपोआप येतं. खेळ येतात. रिगण येतं. आनंदाचे डोही आनंद तरंग.

      म्हणून मग हे लाखो वारकरी पंढरपुरात पोचतात, तेव्हा ते विठ्ठलाच्या दर्शनालाही जात नाहीत. कळसाचं नावापुरतं दर्शन घेतलं की भरुन पावतात. कारण त्यांना विठ्ठल आधीच भेटलेला असतो. ध्येयासाठी चालणंच ध्येय बनलेलं असतं. प्रवासच पोचण्याचं ठिकाण बनलेला असतो. कारण इतके दिवस विठुराया सोबतच चालत असतो. नाचत असतो. हातात हात घालून फुगडी घालतो. तोच मृदुंग वाजवतो. तोच टाळ वाजवतो. तोच कीर्तन करतो. तोच सगळीकडे असतो. मग त्याच्या दर्शनाचं काय कौतुक राहणार? इतर जत्रा-यात्रांत भक्त देवासाठी आतुर होतात, पण आमच्या वारीत देवच भक्तांसाठी उतावळा होतो. त्यामुळे हा विटेवरचा जगावेगळा देव कुणाच्या नवसालाही पावत नाही आणि वारी केली नाही म्हणून कोपतही नाही.

      कोणत्याही वारक-याला विचारलं तर तो सांगेल पंढरपुरात विठ्ठल दर्शनापेक्षाही प्रदक्षिणेचं महत्त्व जास्त आहे. प्रदक्षिणा करताना पत्रिकेचे अभंग म्हणायचे असतात. त्याशिवाय प्रदक्षिणा पुरी होत नाही. एकदा काय झालं, तुकोबारायांना ताप आला. त्यांना वारीला येताच आलं नाही. मग त्यांनी विठुरायाला पत्र लिहिलं. ते पत्र म्हणजे हे ‘पत्रिकेचे अभंग‘. त्यामुळे तब्येत बरी नसल्यामुळे तुकोबारायांचीही वारी चुकल्याचं वारक-यांना माहीत आहेच. आता कोरोनामुळे अख्ख्या जगाची तब्येत बिघडलीय, त्यामुळे पंढरीला पायी जाता येणार नाही, हे शहाणपण वारक-यांमधे ‘अंगभूतच‘ आहे.

      आमचे आद्यसंत नामदेवराय तर भारतभर फिरत होते. त्यांनी पाचवेळा भारत पिंजून काढला असं अभ्यासक सांगतात. त्यांनी वीस-बावीस वर्षं पंजाबमधे तळ ठोकून वारकरी विचार तिथे रुजवले. त्यामुळे त्यांची वारी चुकली असणारच. पण त्यांचं जगणंच वारी झाली होती. म्हणून एखादी वारी चुकली तर काय बिघडतं? आपलं जगणंही त्यांच्यासारखंच वारी बनायला हवं, ही भावना प्रत्येक वारक-याची असते.

    परंपरा सांगते संत सावता माळी कधी वारीला आले नाहीत. ‘स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातोहात‘ इतकी साधी शिकवण त्यांनी दिली. त्यामुळे ते इतरांसाठी ‘नास्तिक‘ ठरले. पण देव त्यांना कळला होता. म्हणून श्री विठ्ठल पंढरपूर सोडून त्यांना भेटायला आला. आजही सावतोबांच्या ‘अरण‘ या गावाहून पालखी पंढरपूरला जात नाही. तर वारी झाल्यावर पंढरपूरहून विठ्ठलाची पालखी अरणला जाते. तोच वारसा वारीच्या काळात पंढरपुरात येऊनही कधी विठ्ठलाचं दर्शन न घेणा-या संत गाडगेबाबांनी चालवला. म्हणून नाथबाबा सांगतात तसं ‘नवल‘ इथे होतं. वळचणीचं पाणी उलट घराच्या आढ्यावर येतं.

      काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परंपरेचा कैवार घेत पायी पालखी सोहळा व्हायलाच हवा अशी भूमिका घेतली होती. तेव्हा त्यांची बाजू घेणा-या आणि विरोध करणा-या दोघांनाही वारक-यांना शहाणपणा शिकवण्याची खुमखुमी आली होती. पण वारक-यांच्या ‘शहाणीवेची परंपरा‘ त्या राजकारणाला पुरुन उरली. यंदाची वारी पायी नाही, हे वारक-यांनी अगदी सहज स्वीकारलं. वारकरी हा खुला संप्रदाय आहे. इथे कुणीही येऊ शकतो. इथे कुणी एक गुरू नाही. एक नेता नाही. त्यामुळे यात अद्भूत असा लवचिकपणा आहे. संतविचारांमुळे यात बदल पचवण्याची मोठी ताकद आहे. किंबहुना वारीने आजवर यापेक्षाही मोठमोठे बदल स्वीकारलेत.

    तुकोबा आणि माऊलींच्या पादुका गळ्यात घालून देहूहून पंढरपूरला पायी चालत जाण्याची परंपरा तुकोबारायांचे सुपुत्र नारायणबाबा यांनी सुरु केली. हे झालं सतराव्या शतकात. त्यात पालख्या, घोडे १८व्या, १९व्या शतकात आल्या. पण वारी तर त्याआधीही शेकडो वर्षं सुरू आहे. त्यामुळे फक्त पालखी सोहळा म्हणजे वारी नाही. फक्त पायी चालणं म्हणजे वारी नाही. १८८९च्या प्लेगमध्ये व १९१८च्या इन्फ्लुएंझाच्या साथीत कोरोना काळासारखीच पालखी पायी चालली नव्हती, असं सांगतात.

      वारक-यांना माहीत आहे, वारी या सगळ्याच्या खूप पुढची गोष्ट आहे. तो प्रत्येकाने आपल्या जगण्यावर करायचा प्रयोग आहे. आपल्या स्वतःचा शोध आहे. ती ‘वारी चुकू नेदी हरी‘ हे त्याला कळलेलं असतं. कोरोनाने सगळ्यांना खूप काही शिकवलंय. आता तो खरी वारीही शिकवतोय. वारीतली माऊलीपणाची साधना आपल्या घरीच बसून करायचं आव्हान वारक-यांनी स्वीकारलं आहे. ते फाटक्या वारक-यालाही माहीत आहे. फक्त त्याचे शब्द वेगळे असतात. तो सांगतो, ‘माझ्या विठूक कोरोना जायत.‘ (कोलाज डॉट इन वरुन साभार)

 – सचिन परब, ९९८७०३६८०५

Leave a Reply

Close Menu