वेंगुर्ल्याचा पाऊस…

‘वेंगुर्ल्याचा पाऊस‘ या कवी मंगेश पाडगावकर यांच्या प्रसिद्ध कवितेत वेंगुर्ल्याच्या पावसाचे यथार्थ वर्णन आहे. कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्म वेंगुर्ल्याचा. उभादांडा येथे समुद्र किना-यावर त्यांचे घर. कवी पाडगावंकरांचे वेंगुर्ल्यातील वास्तव्य १० वर्षे होते. वेंगुर्ल्यासारख्या निसर्गरम्य परिसरात त्यांचे बालपण गेल्यामुळे ‘वगुर्ल्याचा पाऊस‘ ही अतिशय सुंदर कविता त्यांना सुचली. १० मार्च २०१५ रोजी वयाच्या ८६व्या वर्षी कवी मंगेश पाडगावकर यांनी एका प्रसिद्ध वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात वेंगुर्ल्याच्या पावसाच्या आठवणी जागविल्या आहेत. ही कविता ऐकताना / वाचताना आपणाला पावसात चिंब भिजल्याचा प्रत्यय येतो.

          माझे भाग्य हेच की मी सुध्दा याच वेंगुर्ल्यात जन्मलो. वेंगुर्ल्याच्या निसर्गाचा अनुभव मला घेता आला. पावसाची विविधरुपे अनुभवता आली. माझ्या आठवणीप्रमाणे दूरदर्शनने सह्याद्री वाहिनी सुरु केली तेव्हा दूरदर्शनवर संध्याकाळी ७.३० वाजता मराठी बातम्या प्रदर्शित व्हायच्या. आजच्या सारख्या त्यावेळी चोवीस तास बातम्यांचा रतीब चालू नसायचा त्यामुळे काही मोजक्याच आणि दर्जेदार बातम्या दूरदर्शनवर असायच्या. बातम्यांच्या शेवटी हवामान विषयक बातम्या असायच्यात. पावसाळ्यात रोज कुठे सर्वाधिक पाऊस पडला ही बातमी सांगितली जायची आणि ब-याच वेळा त्यात वेंगुर्ल्याचे नाव असायचे. त्यामुळे आम्हाला कोण आनंद व्हायचा ‘वेंगुर्ल्याचा नाव टि.व्ही.वर इला.‘

      आमच्या घरासमोर एक छोटसा व्हाळ होता. वर्षभर त्याच्यात काही पाणी नसायचे. मुसळधार पाऊस पडला की, हा छोटासा व्हाळ दुधडी भरुन व्हायचा. सुरूवातीला हे पाणी लाल मातीच्या रंगामुळे लालसर असायचे. मग पावसाने विश्रांती घेतली की, पाणी शुद्ध होऊन खळखळ आवाज करत जायचे. पोहण्या इतपत खोल नसायचे, अगदी झरा वहात जातो तसा खळखळत जायचे हे पाणी. पण खूप विलोभनीय असायचे हे दृश्य. हा व्हाळ नंतर आमच्या घरामागे असलेल्या मोठ्या व्हाळाला मिळायचा. या व्हाळात सुद्धा फक्त पावसातच पाणी असायचे. जुन्या खारलँड ऑफिसच्या शेजारुन खर्डेकर रोडच्या खालून हा व्हाळ कुबलवाड्यात एका छोट्या नदीला जाऊन मिळायचा. अर्थात नदीला आम्ही नदी कधी म्हटलेच नाही. ‘व्हाळ‘ असेच म्हटले जायचे.

      पावसाचा रुद्रावतार संपला आणि नद्या संथ व्हाऊ लागल्या की बच्चेकंपनी वडीलधा-या मंडळीबरोबर नदीवर पोहायला जायचीत. नदीच्या दुतर्फा माडाची झाडे त्यांच्या सावलीत खळाळत जाणारे पाणी त्यात डुंबायला खूप मजा यायची. सराईत पोहणारे नदीच्या पात्रावर डोकावणा-या झाडावरुन उड्या मारायचेत तर ज्यांना पोहता येत नाही वा नवशीखे आहेत ते कंबरभर पाण्यात मस्त डुंबायचेत. एवढ्यात कुणीतर ओरडणार ‘आता वायच गरम पाणी येतला हां..‘ मग सर्वजण त्याला शिव्या घालत बाजूला पांगायचे.

      रामेश्वर तलाव वर्षभर पाण्याने भरलेला असतो. तरीही पावसाळ्यात पोहणा-यांची या तलावात खूप गर्दी असायची. यात पट्टीचे पोहणारे असायचेत. त्यासोबत काही नवशिखे सुध्दा असायचेत. नगर वाचनालयाच्या कट्टयावरुन तलावात सुर मारणारे जलतरणपटू आणि त्यांच्या विविध जलतरण कला बघायला सुद्धा तलावाकडे गर्दी व्हायची.

      पावसाळा सुरु झाला की, रात्रीच्या वेळी ‘कुर्ल्यो पकडूक जाणे‘ हा कोकणी माणसाचा उपक्रम. रात्रीच्या अंधारात मस्त भरलेले खेकडे पकडून आणायचे. त्याचे कालवण मटणापेक्षा भारी लागते. आजकाल हे खेकडे बाजारात सुद्धा विकत मिळतात परंतु स्वतः कुर्ले पकडायला जाण्याचा आनंद काही वेगळाच. पावसाळा सुरु झाल्यावर मासेमारी बंद झाल्याने गोलमो, सुके बांगडे यावर नॉनव्हेज जेवणावर भागवावे लागायचे. घराच्या शेजारी अंगणात उगवणारी टाकळ्याची (टायकाळो) ही फुकट उपलब्ध होणारी भाजी हीची चव अजूनही जीभेवर रेंगाळते.

      आधीच हिरवागार असलेल्या कोकणाला पावसानंतर अजूनच तजेला यायचा. श्रावण महिन्यात तर निसर्ग सौंदर्य अप्रतिम. जिथे नजर टाकावी तिथे हिरवीगार झाडी आणि फुलांनी बहरलेला निसर्ग नजरेस पडतो. अळूच्या पानावरील सूर्यप्रकाशात टिमटिमणारे दव बिंदूचे सौंदर्य करोडो रुपयांच्या हिरेमाणकात सुद्धा येणार नाही. बहरलेल्या निसर्ग सौंदर्यावर पावसाची एक छोटीसी लहर बरसून जाणार आणि त्यावर सूर्याची कोवळी किरणे पडल्यावर जी झळाळी येते मी अविश्वसनीय अशीच असते. कधी ऊन आणि पाऊस एकत्र मग या ‘कोल्ह्याचे लगीन‘ सोहळ्यात आम्ही सहभागी व्हायचो. नशीब लागते हे सर्व अनुभवयाला.

कोकणतला पाऊस म्हणजे कोकणातल्या प्रेयसीसारखाच. अविरत बरसणारा.. कधी रौद्ररुप धारण करुन फटकारणारा तर कधी संतत धारेने आपले अस्तित्व टिकवून ठेवणारा. कोकणी माणसाचे आणि पावसाचे प्रेम अजरामर. मिरगाला कोंब्याचे जेवण देऊन पावसाचे स्वागत होते आणि पावसाळा संपेपर्यंत कोकणी माणूस आणि पाऊस यांचे प्रेमप्रकरण रंगात येते. कधी चिब भिजवून रोमँटिक होणार तर कधी लटके भांडण करुन काही दिवसांसाठी अबोला धरणार. हा अबोला काही दिवसात संपणार आणि पुन्हा एकमेकांची संगतीने प्रवास चालू राहणार.

     एक दिवस गडगडाट करुन माहेरी निघून जाणार. कायमची नाही पण हा दुरावा पुढच्या वर्षापर्यंत लांबतो. जाताना आपल्या पुढच्या आगमना -पर्यंत पोटापाण्याची व्यवस्थित सोय करुन जाणार.

      माझा जन्म १९७२ चा तेव्हापासून १९९६ पर्यंत मी वेंगुर्ल्यात होतो. दरवर्षी मुसळधार पाऊस पडायचा. पण या पावसाची कधी भिती वाटली नाही. वेंगुर्ला शहरात त्याकाळी कधी पाणी तुंबले, कुणाच्या घरात पाणी शिरले अशा बातम्या कधी ऐकल्या नाही. पाऊस आणि वा-यामुळे काही घरांची पडझड होऊन नुकसान झालेले ऐकले होते. समुद्र किनारी समुद्राने रौद्ररुप धारण केल्याने नुकसान झाल्याचेही ऐकले होते. पण शहरात कुठे पाणी साचले हे कधी त्याकाळी ऐकीवात आले नव्हते. कितीही मोठा पाऊस आला तरी सर्व व्हाळ दुधडी भरुन व्हायचे आणि पाणी समुद्रात जाऊन मिळायचे. आता मात्र पावसाळ्यात विविध प्रसार माध्यमातून वेंगुर्ल्यात ब-याच ठिकाणी पाणी साचल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात. काही ठिकाणी घरात सुध्दा पाणी शिरल्याच्या बातम्या असतात. निसर्ग तोच आहे, वेंगुर्ला ही तेच आहे कदाचित वाढत्या काँक्रिटीकरणाचे हे दुष्परीणाम असतील हे.

– संजय गोविंद घोगळे, वेंगुर्ला (८६५५१७८२४७)

Leave a Reply

Close Menu