श्रद्धा

      कल्पना करा.. एखाद्याच्या राहत्या घरावर रात्रीच्या वेळी भल्या मोठ्या वडाची फांदी पडली आहे. त्याच्या पूर्ण घराचे मंगलोर कौलाचे छप्पर जमीनदोस्त झालंय, सांध्यातून चि-याच्या सगळ्या भिंती निखळल्या आहेत, घरातल्या सगळ्या सामानाची मोडतोड झाली आहे, संसारोपयोगी किडूक-मिडूक सुद्धा पावसानं भिजून गेलं आहे. घरातले वाचलेले तीन जीव अजून त्या धक्क्यातून सावरायचे आहेत…

      सकाळी मदतीसाठी अख्खा गाव जमलाय. चारही बाजूनी त्या महाकाय वडाच्या फांद्या कापून घर मोकळं करण्यासाठी कटर सरसावले… इतक्यात त्या घरातल्या सुरेंद्रचे म्हातारे बाबा हातात नारळ कोयता घेऊन तिथून बाहेर जायला निघतात… वायच थांबा..वडाक हात लावच्या आधी देवळात जावन नारळ ठेवन येतंय‘.

      खरोखरंच आपला कोकणी माणूस खूप धीरोदात्त आहे आणि या धीराला श्रद्धेची मोठी जोड आहे. मला वाटतं या ताकदीवरच या लाल मातीतल्या कष्टकरी माणसावर कितीही वाईट प्रसंग आले तरी या माणसाने कधीही आत्महत्तेसारखा विचार केला नाही, त्याचं कारण ते हेच असावं, तो नेहमी सकारात्मक विचारातच असतो.

       ही गोष्ट आहे सावंतवाडी तालुक्यातील तळवणे गावच्या मेस्त्रीवाडीतली. निसर्गवादळाच्या रात्री तीनच्या सुमारास सुरेंद्राला बाहेर काहीतरी करकर होत असल्याचा भास झाला. त्याने झोपेतून उठून कानोसा घेतला तर तो भास नव्हता तर वास्तव होतं. घरासमोरच्या दीड दोनशे वर्ष जुनाट अशा महाकाय वडाची एक भलीमोठी फांदी मोडून घराच्या दिशेने झेपावत होती. पारंब्याच्या आधारामुळे तिला खाली यायला थोडा वेळ लागला, त्यामुळे सुरेंद्र आणि त्याचे आईबाबा या तिघांना घरातून बाहेर पडण्याची संधी मिळाली. अर्थात संधी मिळाली म्हणण्यापेक्षा देवाने ती दिली असं म्हणणं संयुक्तिक ठरेल.

       मी वर लिहिलेला किस्सा त्याच सुरेंद्रच्या बाबांचा.. ज्या वडाने अत्यंत निर्दयीपणाने होत्याचं नव्हतं केलं, त्याच्या तुटलेल्या फांदीला कापताना सुद्धा देवाकडे माफी मागावी, दिलगिरी व्यक्त करावी?..सगळा भरीभार पुन्हा एकदा त्याच्यावरच ठेवावा? देवाप्रती, निसर्गाप्रती आणि परंपरेप्रती असलेला किती मोठा हा विचार…

       या घटनेविषयी वर्तमानपत्रात बातमी वाचली आणि त्यांना काही मदतीच्या उद्देशाने आम्ही तिथे गेलो तर रिटर्न गिफ्ट हा प्रकार असतो ना तशी ही शिकवण आम्हाला मिळाली. मुंबईची सेवा सहयोगही संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणतेही सामाजिक, शैक्षणिक, आरोग्याबाबतचे विधायक काम असेल तर भगीरथसंस्थेकडे आपला आर्थिक सहयोग देते.

     ‘निसर्गवादळाच्या पार्श्वभूमीवर सेवा सहयोग ने ५० हजार रुपयांची मदत भगीरथकडे सुपूर्द केली होती. भगीरथ संस्थेने त्यात थोडा आपला सहयोग देत, सुरेंद्र मेस्त्री यांच्या या घरासाठी २० हजार रुपये, लगतच्या दोन घरांना प्रत्येकी ३ हजार, मालवण येथील शितल जामसंडेकर यांच्या नुकसानग्रस्त घरासाठी १० हजार आणि वेंगुर्ला येथील तीन नुकसानग्रस्त घरांना २० हजार असे आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले.

     आपण अशा अनेक घटना वर्तमानपत्रातून वाचतो. पण जेव्हा त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाण्याचा योग येतो तेव्हा जे गुगलवर सापडत नाही ते इथे सापडतं आणि आपलं जगणं सुसह्य करुन जातं.                                    – प्रभाकर सावंत, ९४२२३७३८५५

Leave a Reply

Close Menu