ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा…

महाराष्ट्र शासनाद्वारे सर्व शाळांमध्ये कोरोना पार्श्वभूमीवर शाळा ऑफलाईन किवा ऑनलाईन सुरु करण्याबाबत एक परिपत्रक पाठविण्यात आले. त्यानुसार शाळा व्यवस्थापन  समिती, शिक्षक व एकंदरीतच त्या भागातील परिस्थिती यावर शाळा सुरु करण्यासाठी स्थानिकांनी तोडगा काढून त्याबाबतचा ठराव शासनाने मागविला आहे. यासाठी सर्वत्र बैठका होऊन ठराव पाठविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. इयत्ता ९वी, १०वी आणि १२वी जुलैपासून, इयत्ता ६वी, ७वी व ८वी ऑगस्टपासून, इयत्ता ३री, ४थी व ५वी सप्टेंबरपासून तर इयत्ता पहिली आणि दुसरी यांचे वर्ग शाळा व्यवस्थापन समितीच्या निर्णयानुसार सुरु कराव्यात असे शासनाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. परंतु सध्या सिधुदुर्गातील ब-याच शाळा संस्थात्मक विलगीकरणासाठी वापरल्या जात आहेत. शैक्षणिक वर्ष सुरु करण्यापूर्वी या शाळा संपूर्ण निर्जंतुकीकरण केल्या जातीलच. पण मुलांच्या आरोग्याच्यादृष्टीने सदर शाळा निर्जंतुकीकरण केल्यानंतर सुमारे १ महिना कालावधीनंतरच शैक्षणिक वर्षाला सुरुवात करावी अशी मागणी पालकांमधून होत आहे. असे केल्यास शासन परिपत्रकानुसार ९वी, १०वी व १२वीचे वर्ग जुलैपासून सुरु करण्याबाबत सध्यातरी प्रश्नचिन्ह आहे.

       शासनाने दिलेल्या वेळापत्रकानुसार काही शैक्षणिक वर्ग हे अगदी सणांच्या तोंडावर सुरु होणार असल्याने त्या सणांच्या सुट्टयाही मिळणार आहेत. लगेचच गणेश चतुर्थीची १० ते १५ दिवसांची सुट्टी मिळणार असल्याने यावर्षी शिक्षणाची त्रेधातिरिपीट उडणारच आहे.

       गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर ऑगस्टपर्यंत शाळांमध्ये विलगीकरणाचे चित्र दिसून येणार आहे असे सध्यातरी वातावरण आहे. आत्तापर्यंतची शिक्षण पद्धत ही फळा आणि खडू एवढीच मर्यादित होती. अलिकडच्या काही वर्षात शिक्षणामध्ये डिजिटलप्रणाली वापरली जाऊ लागली. या सर्व प्रक्रियेत शिक्षक आणि विद्यार्थी हे एकमेकांसमोर असायचे. त्यामुळे प्रश्नोत्तराने त्या विषयाची विस्तृत माहिती मुलांना मिळायची. याबरोबरीनेच मुलांचा कंटाळा गृहीत धरुन डिजिटलशिकविताना ते एकसुरी होऊ नये म्हणून शिक्षक अध्यापनात परिसरज्ञान, चालू घडामोडी यांच्याशी मुलांना जोडून घेत असत. अशाने मुलांना शिक्षणाची गोडी लागून तो विषय समजायला मदत होत असे.

       पण आता शासनाने ऑनलाईन शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, प्रत्येक पाल्याकडे अॅण्ड्राॅईड मोबाईल, लॅपटॉप आणि  हा अभ्यासक्रम शिकण्यासाठी आवश्यक असणारे पूर्ण क्षमतेचे इंटरनेट कनेक्शन मिळेलच असे नाही. तसेच काहीजणांसाठी जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोबाईलला नेटपॅक मारणे हे परिस्थितीमुळे शक्य नाही. शिक्षकांनाही द्राविडी प्राणायम करुनच या माध्यमातून मुलांना शिकवावे लागत आहे.

      ऑनलाईन शिकविताना व्हिडीओ करुन पाठविला तर त्या व्हिडीओची साईज कमी करावी लागते. त्यामुळे शिक्षकांना विषयाची मांडणी ही अगदी थोडक्यात करावी लागते. त्यात काही अडचणी आल्या तर शिक्षकांना पुन्हा व्हिडीओचे सोपस्कार पूर्ण करावे लागतात. झुम अॅपद्वारे ऑनलाईन शिक्षण द्यायचे म्हटल्यास, जी मुले सहभागी झालेली असतात त्यातील काहीजणांचा व्हिडीओ ऑफ केलेला असतो. समोर विद्यार्थी बसला आहे की, अन्य कुठे आहे? हे समजायला मार्ग नसतो. शिक्षण ही एक आंतरक्रिया आहे. ज्यात शिक्षक व विद्यार्थी या दोघांना संवादी असणे गरजेचे असते. विद्यार्थी हा अभ्यासापलिकडे जाऊन भावनिकरित्या शिक्षकांशी जोडला गेलेला असतो. खरे तर शिक्षणाचा खरा अर्थ विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास असा असतो. यातून त्यांचे व्यक्तिमत्व घडत असते. दुर्देवाने आपल्याकडे ज्ञानार्थी पेक्षा मुलांना परीक्षार्थी बनविण्याकडे पालकांचा कल दिसून येतो. कारण, गुणपत्रकावरील गुणांवर त्याचे भविष्य अवलंबून राहिल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे साहजिकच मुलांच्या अंगभूत कलाकौशल्यांकडे दुर्लक्ष केला जातो. 

       मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, मागील शिक्षणाचा पाठ सपाठ होऊ नये यासाठी एकूणच जर प्रत्येक इयत्तेमधील विस्तृत पाठांऐवजी नेमका अभ्यासक्रम निश्चित करुन शिकविला गेला तर एक सुवर्णमध्य साधता येईल आणि तेवढ्यावरच भर देणे शिक्षकांनाही सोईचे होईल. कारण ऑनलाईन कितीही शिकविले तरी शाळा सुरु झाल्यानंतर शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना पुनश्च हरिओमकरावेच लागणार आहे. आज रोजी केवळ मुलांचा मेंदू शिक्षणाच्या दिशेने कार्यरत रहाण्यासाठी ऑनलाईन हा एक पर्याय म्हणून ठिक आहे. पण शहरातील काही शाळांनी अक्षरशः पालकांवर शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये या लेबलखाली विशिष्ट मोबाईलची खरेदी, नेटसाठी डोंगल अशा पायाभूत सुविधांसाठी खर्चाची सक्ती केलेल्याचीही उदाहरणे आहेत.  लॉकडाऊनमुळे सर्वांची आर्थिकस्थिती ढासळली आहे. अशावेळी मुलांच्या भवितव्याच्यादृष्टीने ऑनलाईन शिक्षणप्रणाली मुलांना उपलब्ध करुन देण्यासाठी पालकवर्ग प्रयत्नशील आहेत. असे असले तरी एखादी गोष्टशिक्षकांनी शिकविल्याशिवाय ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. याचा अर्थ एखादे यंत्र मुलांच्या भावनिक विश्वात पोहचलेले नसते. एकवेळ तंत्रज्ञानाच्या मदतीने यांत्रिक पद्धतीने दिलेले शिक्षण मुलांना काहीकाळ गुंतवून ठेवेल. पण शिक्षणाचा सामाजिक, भावनिक विकास करण्याचा जो हेतू आहे तो या ऑनलाईन शिक्षण पद्धतीने यशस्वी होईल का

       राजकीय पटलावर सुरु असलेला शिक्षणाचा खेळखंडोबा यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक हैराण झाले आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी आजच्या परिस्थितीचे आकलन करुन शिक्षणाचे धोरण निश्चित केले नाही तर एका पिढीचे आपण नुकसान करणार आहोत, याचे भान जपण्याची गरज आहे.

Leave a Reply

Close Menu