कोरोना व्हायरस डिसीजने (कोविड -19 शॉर्ट फॉर्म) जगाची कोंडी केली आहे.  पूर्वी तो किरकोळ  सर्दी खोकला (कॉमन कोल्ड) करायचा. आता या  विषाणूने स्वतःत बदल केले आहेत. त्याने स्फोटक, आक्रमक, अत्यंत संक्रामक (कनटॅजिअस) रूप धारण केले आहे. हा आता आपला कायमचा पाहुणा झाला  आहे. मान न मान, मैं तेरा मेहमान ! कोणीही त्याला शुक-शुक, हाड-हाड करू शकत नाही.  कोणीही त्याला नाहीसा करू शकत नाही.  ‘कोरोना विरुद्ध युद्ध’ जिंकण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही.  आपल्याला त्याच्यासह जगायला शिकावेच लागणार.  शेवटी एक ना एक दिवस, प्रत्येक मनुष्यप्राण्याला संसर्ग होणार.  काही असुरक्षित लोक (?३%) मरणार. बरेच तंदुरुस्त (?९७%) टिकणार. ‘कळपाची रोगप्रतिकारशक्ती’ विकसित होणार. आणि हे वादळ शमणार. एखाद-दुसरं वर्ष लागेल या प्रक्रियेला.

          जसे आपण गोवर, कांजिण्या, गालगुंड, टायफॉइड, टी बी, एच आय व्ही, हिपॅटायटीस ए आणि बी सोबत जगात आहोत, तसे यापुढे कोरोना सोबत जगावे लागणार. संसर्ग होणार नाही याची काळजी घेत.

              ही कोरोनाची साथ (महामारी) एक प्रतिबंधात्मक आरोग्य समस्या आहे. योग्य त्या वैज्ञानिक मार्गांनीच तिला सामोरे जावे लागेल. पुढे काय घडू शकते याचा अंदाज घेऊन, पूर्वानुमानाने पावले उचलावी लागतील. पर्यावरण, अनुवंशशास्त्र, रोगजंतू आणि जीवनशैली हे घटक प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा ही एक सतत बदलत राहणारी प्रक्रिया असते. ती एखाद्याला आजाराची लागण होण्याआधी सुरु होते. आणि रोग होण्याची शक्यता संपते, तेंव्हा पूर्ण होते.

           आपल्याला हुशारीने वागून कोरोनाच्या संक्रामकतेवर मात करावी लागेल. जीवनशैली बदलून लागण टाळावी लागेल. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला कार्यपद्धती बदलावी लागेल. वर्तनबदल हेच कोरोनाला वैज्ञानिक उत्तर आहे.  औषधे किंवा लस हे उत्तर नाही.  “कोरोना, शाळा आणि शिक्षण” ही समस्या सोडवण्यासाठी आपल्याला आपले शालेय वर्तन बदलण्याची गरज आहे.

आपली शालेय संस्कृती बदलण्याची गरज का आहे?

             मुले आजारी नसली तरी शाळा बंद आहेत.  संक्रमित मुलांमुळे ज्यांना आजार लागेल ते सिरिअस होऊ शकतात. शाळा बंद केल्याने समाजातील प्रत्येकाचे संरक्षण झाले. ते गरजेचे होते. जिवंत राहायचे किंवा जीवन जगायचे. आपल्याला दोन्हींपैकी एकच पर्याय उपलब्ध होता. इस पार या उस पार. आपण जिवंत राहण्याचा पर्याय निवडला.

           लॉकडाउन हा अनपेक्षित संकटाला सामोरे जाण्यासाठी दिलेला आपत्कालीन, अल्पमुदतीचा प्रतिसाद होता. ती एक प्रतिक्षिप्त क्रिया होती. (नी जर्क रिफ़्लेक्स). युद्ध, त्सुनामी, भूकंप, पूर किंवा दुष्काळ यांच्यासारखी आपत्ती. घाबरून जायची गरज नाही. कोणीही हे जग थांबवू शकत नाही. ते कायमचे ‘लॉक’ केले जाऊ शकत नाही. आपल्याला पुढे जावेच लागेल. व्यवसायधंदे पुन्हा सुरू करावे लागतील. आत्ताशी आपला जीव तर वाचला. आता टप्प्या टप्प्याने जीवन ‘रिसेट’ करता येईल. आपण आता त्याच स्टेजला आहोत. जीवन रिसेट करण्याच्या.

            शाळा बंद केल्यामुळे मुलांच्या शिक्षण आणि आरोग्यावरचे दुष्परिणाम दिसायला लागले आहेत. शाळा तर पुन्हा सुरू कराव्याच लागतील. सगल्यांच्या सुरक्षेची काळजी घेऊन शाळा सुरू करणे आपल्या हातात आहे. आपण सगळे कसे वागतो, कसा प्रतिसाद देतो यावर यश अवलंबून आहे. “पश्चात्तापापेक्षा शिस्तपालन परवडले.”

          शाळा हा एक ‘समूह मेळावाच’ असतो. रोज. गणेशोत्सव, यात्रा, जत्रा, इद नमाज किंवा रविवारच्या मास सारखा. वस्तुमान.  ‘कम्युनिटी ट्रान्समिशन’चा सर्वाधिक धोका अशा समूह मेलावांमध्ये असतो. शाळा ‘सुरू’, ‘नियंत्रित सुरु’ किंवा ‘बंद’ ठेवाण्याचा निर्णय स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असतो. तांत्रिकदृष्ट्या हा एक “जोखीम आधारित दृष्टीकोन” आहे.  शासन आणि प्रशासन ‘किमान हानिकारक’ आणि ‘सर्वात उपयुक्त’ निर्णय घेईल. त्यांच्यावर विश्वास ठेवावाच लागेल. सरकार देईल त्या आदेशांचे शाळा, पालक आणि मुलांनी पालन करावे.

शाळा कोरोना सुरक्षितकशी करावी.

           शाळा ‘कोरोना सुरक्षित’ करणे हे शाळा प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यांची रोगप्रसार, संप्रेषणाची जोखीम कमी करण्याची क्षमता महत्वाची आहे. शाळेतल्याच कुणाला तरी ‘कोरोना सुरक्षित शाळा’ करण्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल. हे कुणीही करू शकतो. प्रत्येकजण करू शकतो. पण अशा परिस्थितीत कुणीच करत नाही. जेंव्हा सगळेचजण जबाबदार असतात, तेंव्हा कुणीच ‘जबाबदारी’ घेत नाही. आपल्याला प्रत्येक शाळेत “कोरोना सेफ्टी ऑफिसर” किंवा “कोरोना सुरक्षा अधिकारी” म्हणून एखाद्या जेष्ठ शिक्षकाची नेमणूक करावी लागेल. ते शाळेचे मुख्याध्यापक आणि शासननियुक्त अधिकाय्राच्या मार्गदर्शनाखाली काम करतील. पुढे जाऊन तेच साथीचे आजार नियंत्रण अधिकारी म्हणूनही काम करू शकतील.

            कोरोना जोखीम कमी करण्याचे आणि आजारी व्यक्ती ओळखण्याचे शिक्षण, प्रशिक्षण आणि कौशल्य त्यांना द्यावे लागेल. इतक्या महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी त्यांना द्यावा लागेल.

शाळेने काय करायला हवे?

        “कोरोना सुरक्षा अधिकारी” नेमावा. आजारी कर्मचारी, विद्यार्थ्यांनी शाळेत येऊ नये. अ) शरीराचे तपमान 100*फॅ पेक्षा जास्त = आजारी ब) पल्स ऑक्स ने पल्स रेट, नाडीचा वेग, मुलांचा 130 / मिनिट पेक्षा जास्त = आजारी, कर्मचाय्रांचा 100 / मिनिट पेक्षा जास्त = आजारी.  क) रेस्पिरेटरी रेट, श्वसन दर, विद्यार्थी 40 / मिनिट पेक्षा जास्त = आजारी.  कर्मचारी 30 / मिनिट पेक्षा जास्त = आजारी.  त्यांना घरी पाठवा.

लसीकरण.

            नवीन शाळा प्रवेश आणि शाळा वर्षाच्या सुरूवातीला लसीकरण तपासणी करणे. कोरोना महामारी असली तरी नेहमीचे लसीकरण सुरू ठेवण्याचा सल्ला पालकाना द्यायला हवा. कोरोना असो वा नसो, लसींनी टाळता येण्याजोगे सर्व आजार टाळायलाच हवेत. मुले ‘असुरक्षित’ राहिल्यास गोवर, गालगुंड, इन्फ्लूएन्झा, चिकन पॉक्स / कांजिण्या, इन्फेक्टिव हिपाटायटिस / साठीची कावीळ, टायफॉइड त्यांना पकडू शकतात. आणीबाणीची नसली तरी, लसीकरण ही मुलांसाठी अत्यावश्यक सेवा आहे. दवाखान्यांमधे रोज  लसीकरण करावे. ‘मोहीम’ किंवा मासिक/साप्ताहिक लोक, समूह गोळा करून नको. सर्व विद्यार्थ्यांना आणि कर्मचार्‍यांना दरवर्षी इन्फ्लूएंझाची लस द्यावी. कोरोना सोबत इन्फ्लूएन्झा / पॅराइनफ्लुएन्झा / स्वाईन फ्ल्यू झाला तर गंभीर धोका होऊ शकतो. जीव देखील जाऊ शकतो. टाळण्याजोगा प्रत्येक आजार टाळायलाच हवा. टाळा. कोरोना साथीच्या दरम्यानही नवजात बाळांसाठी बीसीजी, ओपीव्ही, हिपॅटायटीस बी  ‘जन्माच्या वेळीच’ देणे आवश्यक आहे.  जास्ती जोखीम असलेल्या मुलांसाठी आणि प्रौढांसाठी, न्यूमोकोकल, इन्फ्लूएन्झा, डांग्या खोकला, यांच्या लसी आवश्यक  आहेत. कोरोनाने पकडले तरी आ लसी उपयुक्त ठरतील.  विशेषत: न्युमोनिआ सारखे कॉम्प्लिकेशन्स टाळता येतील.  दवाखान्यात खुली प्रतीक्षालये, संरक्षित आरोग्य कर्मचारी, एका वेळी एक मूल. वेळ ठरवून बोलावणे, सामाजिक अंतर, प्रत्येक रूग्णानंतर हात स्वच्छ करणे.   ते कोरोनासोबत जगण्याचे हे नियम आहेत.

फेस मास्क

       फेस मास्क वापरणे. त्याचे योग्य फिटिंग, योग्य आकार, योग्यरित्या बांधलेला असावा. सतत वापरावा. कोणत्याही कारणाने, कोणत्याही तो खाली किंवा सैल करू नये.

हात धुण्याचे प्रशिक्षण

     मुलाना व कर्मचार्यांना योग्य, वैज्ञानिक पद्धतीने हात धुण्याचे प्रशिक्षण द्यायला हवे. ते काटेकोरपणे अंमलात आणायला हवे. वारंवार हात धुणे.  हात धुण्याची सवय, संस्कृतीच निर्माण करायला हवी. साबण आणि पाण्याचा वापर, अल्कोहोलसह हात सॅनिटायझर. मुलाना वयानुरूप  आरोग्य शिक्षण द्यावे. त्यासाठी पोस्टर, प्रात्यक्षिके वापरावी. शाळेचे गेट, कार्यालय, वर्गखोली, प्रसाधनगृहे, जेवणाची खोली इथे सॅनिटायझर्स ठेवावे. स्वच्छता सुविधा, सामुग्रीची व्यवस्था करावी. कोपरावर किंवा बाहीवर खोकावे कसे, शिंकावे कसे, टिश्यू पेपरचा वापर; चेहरा, डोळे, तोंडाला स्पर्श न करणे; हे शिकवावे लागते

शाळेच्या इमारती स्वच्छ, निर्जंतुक करणे

        दररोज निर्जंतुकीकरण, सर्व पृष्ठभागांची साफसफाई. जिथे अनेकांचा स्पर्श होतो असे, रेलिंग, जेवणाचे टेबल, दारे, खिडक्यांचे हँडल्स, खेळ उपकरणे, शिक्षण साहित्य, खेळणी रोजच्या रोज स्वच्छ, निर्जंतुक करायला हवी. सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व कचरा व्यवस्थापन सुविधांची व्यवस्था करायाला हवी. खेळती स्वच्छ हवा हवी. पूर्वी या गोष्टींना फारसे महत्व दिले जात नसे. त्या गोष्टी ‘कागदोपत्री’ असायच्या. पण यापुढे असे चालणार नाही. त्या अनिवार्य असतील.

विषाणूंचा शाळासंसर्ग टाळा.

          प्रवास टाळा. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था टाळा. खाजगी वाहतुकीची व्यवस्था करा. चहुबाजूला कोरोना असल्याने जवळच्या शाळेत प्रवेश घेणे शहाणपणाचे आहे. गर्दी टाळा. वर्गातही आणि वर्गाबाहेरही. सामाजिक अंतर राखणे हा रोगप्रसार रोखण्याचा उत्तम मार्ग आहे. आजारी असल्यास घरीच रहा. आवश्यक नसल्यास बाहेर जाऊ नका. अन्नधान्य खरेदी, वैद्यकीय सेवा, पाय मोकळे करण्यासाठी जवळपास चालणे, सायकल ही बाहेर जाण्यासाठी आवश्यक कारणे आहेत. सामाजिक अंतर लोकांमध्ये  अंतर ठेवते.  जेव्हा विषाणूचा संसर्ग झालेले लोक इतरांपासून दूर राहतात. ते इतरांना आजार देऊ शकत नाहीत. त्यामुळे एका वेळी कमी लोक आजारी पडतात. डॉक्टर आणि रुग्णालये गंभीर रुग्णांकडे जास्त लक्ष देऊ शकतात.

           सामाजिक अंतर म्हणजे “दो गज दुरी”. 2 मीटर (6 फूट). सामाजिक अंतर म्हणजे ‘शारीरिक अंतर’. बोलणे, खोकला, शिंकेतून तुषार व व्हायरस पसरतात. हे तुषार जमिनीवर पडण्यापूर्वी सहसा 6 फुटांपेक्षा जास्त लांब जात नाहीत.

         शाळा भरण्याची आणि सुटण्याची वेळ प्रत्येक वर्गासाठी वेगळी असावी. याला ‘स्टॅगरिंग’ म्हणतात.  दोन बाकांमधे कमीतकमी 1 मीटर अंतर हवे. वर्गखोल्या आकाराने  पुरेशा मोठ्या असाव्यात. एकमेकांना अनावश्यक स्पर्श  टाळावा. शाळा भरण्यापूर्वी आणि सुटल्यानंतरचे उपक्रम, एकमेकात मिसळणे टाळा. शाळांचा  तात्पुरता निवारा केंद्र, उपचार केंद्र किंवा विलगीकरण सुविधा म्हणून वापर करू नये. शाळेच्या आवारातील सर्व समुदायिक कार्यक्रम, संमेलने रद्द करावी.

विकासात्मक शिक्षण

        विद्यार्थ्यांना व्हायरस विषयी ‘वैज्ञानिक सत्य’ सांगावे. भायानिकीकरण नको. क्षुल्लकिकरण नको. कुणाचा ‘कोरोना पॉझिटिव्ह’शी संपर्क असेल तर त्याचा  कलंक नको.  मुलांना रोग निवारण आणि स्वसंरक्षण शिकवायलाच हवे. मानसिक आरोग्यासाठी मदत करावी. मुलांना काही काळज्या किंवा प्रश्न असतील तर आस्थेने चौकशी करायला हवी. धोकादायक कौटुंबिक, सामजिक वातावरणात लॉकडाउन झालेल्या मुलांना विशेष सामाजिक आणि मानसिक आधाराची गरज आहे. जर कुटुंब आणि समाज प्रतिकूल असेल तर तो आधार देणे हे शाळांचे कर्तव्य आहे. अपंग मुले ‘विशेष शाळा’ लॉकडाउन झाल्याने  अधिकच अपंग होत आहेत.

         ‘कोरोना’ साथ असली तरी, मित्र-मित्र एकत्र येऊ शकतात.  सायडिंगला किंवा एकटं पडल्यासारखं वाटण्याची गरज नाही. मित्रांना बोलावून किंवा व्हिडिओ कॉलने संपर्कात रहा. विस्तारित कुटुंबातील सदस्यांशी बोला. जवळपास रहाणारे नवे मित्र बनवा. शारीरिक अंतर ठेवून त्यांच्याबरोबर खेळा.  त्याने एकत्रितपणाची भावना देते. मुले वेगवेगळ्या प्रकारे सामाजात मिसळू शकतात. एकमेकांना आधार देण्यासाठी सोशल मिडिया, व्हिडिओ कॉल वापरा. एकत्र गप्पा मारा, हसा, खिदळा.  व्हायरस नियंत्रित होईपर्यंत एकमेकांची काळजी घ्या. ‘जुने शालेय जीवन’ कधीच परत येऊ शकत नाही.  तो काळ कायमचा संपला. आजूबाजूला कोरोना लपून बसला असला तरी आपण सामाजात मिसळू शकतो. फक्त ‘कसे’ हे माहित असेल तर.

         खरं तर शाळांची गरज आहे ती सामाजिक, शारीरिक, मानसिक, भावनिक विकासासाठी. मित्रांबरोबर खेळ, अभ्यासेतर उपक्रम.  नृत्य, नाटक, गायन, संगीत, पठण, वक्तृत्व, कला, कलाकुसर, रेखांकन, रंगकाम, चित्रकला.  प्रयोग करून शिकणे. या गोष्टी घरात देऊ शकत नाही. शाळाच या विकासाच्या संधी देऊ शकतात. शाळेचा कालावधी ‘6 ते 8 तास’ ही संकल्पनाच मोडीत काढावी लागेल. ती भूतकाळातील संकल्पना आहे.  कोरोनानंतरच्या  शाळेच्या निकषांमध्ये सुधारणा करावी लागेल. जुने निकष कालबाह्य झाले आहेत.  ‘ब्रिटिश कालीन’ कायद्यांप्रमाणे ते रद्दबातल करावे लागतील. कालानुरूप नवे नियम करावे लागतील. सम-विषम, लवचिक उपस्थिती नियम,   वर्गाची 2 बॅचेसमधे विभागणी. प्रत्येक बॅचमधे अर्धी विद्यार्थीसंख्या. प्रत्येक बॅचला तीन तासाचा वेळ. प्रत्येक 3 तासाच्या बॅचला अर्धी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संख्या. शाळेनी गृहपाठ द्यावा. (15 मिनिटे) शिक्षणाचा अजेंडा सेट करावा. गृहपाठ तपासावा(15 मिनिटे). क्रमिक   शिक्षणाला 30% आणि विकासात्मक शिक्षणाला 70% वेळ द्यावा. शारीरिक, सामाजिक, भावनिक, आध्यात्मिक विकासासाठी आणि बहुविध बुद्धिमत्ता विकासाला प्राधान्य द्यावे.

क्रमिक शिक्षण

       शैक्षणिक सुविधांसाठी, सुधारणांसाठी आपत्कालीन योजना आखण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवले जाऊ शकते. अगदी भारतात, ग्रामीण भागात देखील. यापूर्वी असे केले नाही किंवा केल्याचे ऐकले नसले तरी.   त्याशिवाय गत्यंतर नाही. दूरशिक्षण, ऑन लाइन शिक्षण,  रेडिओ, टीव्हीने, व्हर्च्युअल क्लास रूम्स, होम लर्निंग हे काही मार्ग आहेत. काळानुरूप अजून अभिनव मार्ग येतील. ते स्वीकारावे लागतील. आपल्या सर्वांना ‘डिजिटल वर्कफ्लो’ज शिकावे लागतील. क्रमिक विषय दूरशिक्षणाकडे  जाऊ शकतात.

कोरोना रेंगाळला तर ?

         मुलांना कोरोनासोबत जगायला शिकवावे लागेल. चांगल्या आरोग्यदायी सवयी लावल्या तर हे जग जगण्या लायकीचे  चांगले बनू शकते.  1. हात धुणे, सॅनिटायझर.  2. शारीरिक अंतर.  3. गर्दी टाळा. सार्वजनिक वाहतूक टाळा.  5. बाहेर असाल तेंव्हा कुठेही स्पर्श करणे टाळा.  6. फेस मास्क वापरा.  7. बाहेर असताना सुती हातमोजे वापरा.  8. बाहेरचे खाणे टाळा.

         एकूण काय तर, ‘कोरोना सुरक्षित शाळा’ आणि ‘कोरोना सुरक्षित सवयी’ या माध्यमांतून मुलांचे जीवन ‘रीसेट’ करणे भाग आहे. वर्तनबदल हेच कोरोनाला एकमेव वैज्ञानिक उत्तर आहे.

-डॉ. अनिल मोकाशी

एमडी, डीसीएच, एफआयएपी, पीएचडी (बालरोगशास्त्र)

सामुदायिक बालरोग तज्ञ, उज्वल भवितव्य शाळा आरोग्य सेवा, बाल कल्याण केंद्र, बारामती, जि.  पुणे, महाराष्ट्र, पिन 413102. एम: 9822302131. ई: dranilmokashi@gmail.com

Leave a Reply

Close Menu