शाळा म्हणतेय…..

      तसंही मार्च महिना जवळ आला की मी पण जरा गंभीर होतेच. परिक्षांबद्दल मुख्याध्यापिका बाई सगळ्या शिक्षकांची मिटींग बोलवतात आणि मग धावपळ सुरू होते सगळ्या शिक्षकवर्गाची!! कुणी आपला राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या मागे लागतं तर कुणी अंतर्गत मूल्यमापनाच्या!! प्रत्येक वर्गात मग थोडी शांतता पसरते. तुम्ही सगळे आपापल्या परीने अभ्यासाच यावर्षीचं शेवटचं पर्व सुरू करता.
          यावर्षी 23 मार्च ला सोमवारी मी नेहमीसारखीच तुमची वाट बघत बसले होते. आज सकाळ पासून काहीतरी अघटीत मनात येत होतं. तसं दोन चार दिवसांपासून या कोरोनाच्या गोष्टी ऐकत होतेच. शनिवार तसा शांततेतच गेला होता .रविवारी कर्फ्युच होता ..सगळीकडे सामसुम..कुणी चिटपाखरूही नव्हतं रस्त्यावर!! आणि सोमवारपासून अचानकच सगळे यायचे बंद झालात….तुम्ही तर नाहीच पण हा शंकरही फिरकला नाही..सुमन मावशींचाही पत्ता नाही..माहित होतं की एप्रिल पासून तुम्ही कुणी येणारच नव्हता शाळेत. हे दोन महिने दरवर्षी मला एकट्यानेच काढावे लागतात.
          तसेही अगदीच एकट्याने नाही..कारण पाटील गुरूजींच्या कराटेंच्या क्लाससाठी तुमच्यातले काही लोक नंबर लावतातच. यंदा म्हणे राणे बाईंची मुग्धा भरतनाट्यम् चे क्लास पण सुरू करणार होती शाळेत..मला कसं माहित म्हणता?..अहो माझ्या सगळ्या भिंतीना मिळून 48 कान आहेत …सगळ्यांची बित्तंबातमी असते मला!! आणि सुट्टी मोठी असो की छोटी..राऊळ गुरूजी न चुकता दिवसातून एक तरी फेरी मारतातच शाळेत..त्यातून मे महिन्यात छोटी मोठी डागडुजीची कामंही तेच तर करून घेतात..
         पण यावर्षी तुम्ही सगळे एकदा गेलात ते पुन्हा कुणी फिरकलाच नाहीत..पहिले काही दिवस मी आशावादी होते..कधी खारूताई, कधी कौलावरची कबुतरं कोरोनाबद्दल काय काय सांगायची….खूप वाट पाह्यचे तुमची!!.एकटेपणासारखं दुःख नाही ..ते ही असं अचानक कोसळलेलं…मार्च, एप्रिल मे..तीन महिने सक्तीच्या एकांतवासात काढले…मे संपत आला आणि पुन्हा एकदा माझ्या आशा पल्लवित झाल्या….वर्षानुवर्षांची सवय..मृगाचे ढग आकाशात जमायला लागले..आणि सोसाट्याचा वारा आला..माझ्या अंगणातला पालापाचोळा सैरावैरा धावू लागला…आता मात्र मी सरसावून बसले…आता फक्त 15 जूनची वाट पहायचीय…पुन्हा एकदा सगळे वर्ग गजबजून जातील.. शिशुवर्गातल्या मुलांच्या बुटांचे पिकपिक आवाज..भेदरलेले तरी उत्सुक चेहरे….भिरभिरणारी नजर..फाटकाच्या बाहेर ऊभे असलेले तेवढेच घाबरलेले आईवडील…सग्गळं काही पुन्हा सुरू होणार होतं… शिक्षकांच्या कक्षातल्या बाईंच्या गप्पा…नव्या जबाबदा-या..कुणाचा विषय बदलेला तर कुणाचं वर्गशिक्षिक पद!…गडबड गडबड नुसती.
             पहिल्या पावसाच्या सरीबरोबरच तुम्ही सगळे पुन्हा धाव्वत येता….नवी पुस्तकं, नवे युनिफाॅर्म….सगळा नव्याचा वास… आणि पुन्हा माझं आवार फुलून जातं…काळे, सावळे  फळे पुन्हा विठूराया सारखे नव्या रंगात नटतात…वर्गावर्गांच्या भींती पुन्हा नव्या सुविचारांनी सजतात..तुम्हीच आणलेल्या फुलांच्या माळांनी दरवाजे सण असल्यासारखे नटतात आणि त्यांच्या गोड आणि मंद सुवासाने संपूर्ण इमारतीत मंगलमय वातावरण तयार होतं.
         पण काहीतरी चुकलं होतं..गेल्या 100 वर्षांच्या इतिहासात हे प्रथमच घडत होतं. काळानुरूप येणारे सगळे सगळे बदल मी हसत हसत स्विकारले होते. अभ्यासक्रम बदलले, शिकविण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला, पाठ्यपुस्तकं बदलली..मी सगळ्याला सामोरी गेले… पूर्वीचं छडी बसे छमछम, विद्या येई घमघम..हे काळाच्या पडद्याआड गेलं…शाळेची संकल्पनाच बदलली.आता तुम्हा मुलांच्या भावनिक, मानसिक, बौद्धिक विकासाच्या दृष्टीने मी माझ्यातही अनेक बदल करून घेतले…तंत्रज्ञान हा परवलीचा शब्द मीही आत्मसात केला…गेल्याच वर्षी माजी विद्यार्थ्यांनी संगणक शिक्षणासाठी हा मोठा हाॅल बांधून दिला…मी हे सगळं स्विकारते आहे…पण हे एकटेपण माझ्यावर लादू नका… मी असही ऐकते आहे की मुलांना यावर्षीचा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने शिकवायचाय…..खरं आहे का हे? नको नको..हा एवढा बदल मात्र कृपा करून नका आणू..सगळे इथेच या…अहो शाळा म्हणजे फक्त अभ्यासच नाही काही!! ती एक समाजाची छोटी प्रतिकृतीच असते. समाजाची भातुकलीच म्हणाना!! इथेच तर आपण शिकतो संघभावना, सहकार्य, सामाजिक बांधिलकी!!! तुमच्या संस्कारक्षम वयात तुम्ही हे सगळं या इथे माझ्या कुशीत आत्मसात करता आणि मग जगाच्या आकाशात भरारी घेता…तेव्हा मी ही पाखरा येशील का परतून? हे गाण गाते आणि ते गाताना माझ्याही पापण्या ओलावतात….मग तुमच्यातलाच कुणी तरी पुन्हा येतो.मला भेटतो..आपल्या मुलाबाळांना अभिमानानं सांगतो “ही माझी शाळा”..ते माझी शब्द ऐकून मला आपुलकीचा, प्रेमाचा पान्हा फुटतो. माझी नजर कुरवाळत रहाते त्याला..मला आठवतो त्याचा शाळेत येण्याचा पहिला अडखळता दिवस आणि शेवटच्या दिवसाचे खुललेले व्यक्तीमत्व!!.
          कृपा करून होम स्कूलिंग, ऑनलाईन या अश्या नविन पद्धतीना थारा नका देवू..मी वाट पहातेय.. आपण घेवूया विवीध उपक्रम , तुमच्यातले कलागुण, प्रतिभा, नृत्य नाट्य, संगीत , क्रीडा, चित्रकला, सगळ्या गुणांना प्रोत्साहन मिळावे म्हणून शालेय सहशालेय उपक्रम, शिबीरं सहली आयोजित करूया!!.राष्ट्रीय दिन साजरे करूया, स्काऊट गाईड, विज्ञान प्रदर्शन भरवूया देशप्रेम, राष्ट्रभावना चिकीत्सक दृष्टीकोन, निर्णयक्षमता..नेत्त्वृत्व यासारखे गुण अंगी बाणवूया..मी हे सगळं सगळं करणार आहे तुमच्यासाठी!!.राष्ट्र मोठं करायचं असेल तर समाज सुदृढ असावा लागतो आणि सुदृढ समाजाचं बाळकडू शाळा नावाची आई देते..हा बंधच खूप वेगळा असतो याचं बंधन होत नाही कधी….तुम्ही सगळे लवकर या ..मला हा एकटेपणा आता सहन नाही होत आहे..माझे कान आसुसलेत तुमची किलबील ऐकायला…कुठे घरी बसून शिकता!! एक गोष्ट सांगते रविद्रनाथ,टागोरांनाही घरी शिकवायला जायचे वेगवेगळ्या विषयांचे शिक्षक!! ..पण त्या शिक्षणमहर्षीलाही कळल्या होत्या त्यतल्या त्रृटी!!म्हणून 1901 मध्ये थोडं मोठं झाल्यावर त्यानी शाळा घराबाहेर आणली. ते म्हणायचे, “घराची शाळा नका करू शाळेचं घर करा. आपण शाळेला घर करूया आपलेपणा जपूया… आणि अत्रे  गुरूजींचं गाणं पुन्हा  गाऊया..
जी देशासाठी तयार करीते बाळा | लावीते लळा हि..जसा माउली बाळा 
मज आवडते मनापासुनी शाळा ||
लवकर पुन्हा या….मी वाट पहातेय.
  – सौ.प्राजक्ता सामंत, 9819757976

Leave a Reply

Close Menu