अभिमान वेंगुर्लावासीयांचा – नंदा आजगांवकर

‘स्वाथ्यरक्षणाय विज्ञानानुसन्धानाय च समर्पित‘ या ब्रिदवाक्यानुसारच अनेक परिचारिका आपले प्राणपणाने लावून ‘कोविड १९‘ म्हणजेच कोरोना युद्धात उतरल्या आहेत. कोरोनामुळे संपूर्ण जग सध्या भितीच्या छायेखाली वावरत आहे. अशावेळी जनसेवा करण्यासाठी एखाद्या योद्ध्याप्रमाणेच जीवावरची लढाई असतानाही न घाबरता समाजसेवेचा वारसा घेतलेल्या वेंगुर्ल्याच्या सुकन्या सौ. प्राजक्ता प्रकाश शिरोडकर या प्राणाची बाजी लावून लढत आहेत. त्यांनी खास ‘किरात‘ वाचकांसाठी साधलेला संवाद.

         वेंगुर्ला-माणिकचौक येथे माहेर असलेली मी नंदा निळकंठ आजगांवकर लग्नानंतर सावंतवाडी-तळवड्याची सौ. प्राजक्ता प्रकाश शिरोडकर झाले. माझे शिक्षण वेंगुर्ला येथील गाडेकर कन्या शाळा व बॅ.खर्डेकर महाविद्यालयात झाले. सुरुवातीपासूनच रुग्ण सेवेचा ध्यास घेऊन मी जे.जे.रुग्णालय, भायखळा येथून नर्सिग्ंा शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई महापालिकेमध्ये स्टाफ नर्स म्हणून रुजू झाले. सुमारे ३० वर्षांच्या कालखंडात ब-याच आजारी रुग्णांची सेवासुश्रुषा केली. अर्थात ते माझे कर्तव्यच होते. आता सध्या मी बोरिवली-बोरसवाडा आरोग्य केंद्राच्या माध्यमातून कोरोना योद्धा म्हणून सेवा बजावत आहे. कोरोना रुग्णांची सेवा करुन ते लवकर कसे बरे होतील हेच माझे ध्येय आहे.

          कोविड रुग्णांची सेवा करण्याची जबाबदारी ज्यावेळी आली त्यावेळी माझ्यावर सुरुवातीला थोडे दडपण आले. पण रुग्णसेवेचे व्रत घेतल्याने अशा रुग्णांची सेवा करण्याचा मी निश्चय केला. कोरोनाविरुद्ध आपण लढलचं पाहिजे ही जाणिव माझ्यात निर्माण झाली. यासाठी आमच्या टीमला परिसर वाटून देण्यात आला. माझ्याकडे १५ हजार लोकसंख्या असलेला परिसर आणि त्यासाठी ४ स्वयंसेविका अशी टीम तयार झाली. बोरिवली सेंटर वॉर्डमधून आरोग्य केंद्रामध्ये कोविड रुग्णांची यादी आल्यावर त्या रुग्णांच्या घरी जाऊन त्यांचे टेंप्रेचर, ऑक्सिजन आम्ही घेऊ लागलो. यातील रुग्णांमध्ये उच्चरक्तदाब, मधुमेह व अस्थमा असे आजार आढळल्यास आणि त्यांचा ऑक्सिजन कमी असेल तर त्यांना रुग्णालयात दाखल करुन ऑक्सिजन थेरपी सुरु केली. परंतु ज्या घरामध्ये व्यवस्थित जागा आहे, तेथे त्या घरातील रुग्णांवर उपचार करतो.

      ही सर्व उपचार प्रक्रिया सुरु असताना साधारण ४ ते ५ तास परिचारिकांना पीपीई किटमध्ये काम करावे लागते. किट घातल्यानंतर प्रचंड उष्णता जाणवत असली तरी स्वसंरक्षणासाठी ते घालावेच लागते. एक दिवस आराम नाही की, घरी थांबणे नाही. ज्यावेळी रुग्णालयातून मी घरी येते तेव्हा संपूर्ण घराचे निर्जंतुकीकरण केले जाते. मला व माझ्या कुटुंबाला कोरोनाची लागण होऊ नये यासाठी जे काही प्रतिबंधात्मक उपाययोजना  आहेत, त्या सर्व केल्या जातात. या कार्यात मला माझ्या पतीचे व दोन्ही मुलांचे खूप सहकार्य मिळते. ते अशावेळी धीर देतात.

         माझ्यासह आमच्या टीमने केलेली सेवासुश्रुषा पाहून रुग्णांची भिती जातेच. उलट ते रुग्णच त्यांना स्वतःची काळजी घेण्यास सांगतात. तेव्हा आपण करीत असलेल्या कार्याबाबत समाधान मिळते. रुग्णांच्या व नातेवाईकांच्या सहकार्यामुळेच परिचारिकांनाही उपचार करणे सोईचे होते.

      कुठल्याही प्रसंगात मन खंबीर असणे महत्त्वाचे आहे. कोरोना रुग्णांची सेवासुश्रुषा करताना त्यांच्या आमच्यावर असलेला विश्वास, त्यांनी उपचाराला दिलेली साथ यामुळेच असे रुग्ण बरे होत आहेत.

      कोरोना महामारीच्या साथ रोगात सिधुदुर्गवासीयांनी बाळगलेला संयम असाच कायम ठेऊया. कोरोनाची ही साखळी तोडत या रोगापासून नियमांचे पालन करीत सावध राहूया, हे या निमित्ताने अधोरेखित करावेसे वाटते.

मुलाखत शब्दांकन – प्रथमेश गुरव ८८५६८००२६३

Leave a Reply

Close Menu