बळीराजा संकटात

कोरोना साथीने सर्वांनाच घेरले आहे. आपल्या अवतीभवतीही कोरोना फिरतो आहे, याचे भान ठेऊनच आपल्याला काळजीपूर्वक पावले टाकली पाहिजेत. शेती उद्योग आणि बळीराजा यांच्यासमोर कोरोना आहेच. त्याहीपेक्षा एक प्रश्नांची साखळीच त्याच्यासमोर उभी आहे. हवामान खात्याने यंदा समाधानकारक म्हणजे १०० टक्के पावसाचा अंदाज मे महिन्यात जाहीर केला. त्यामुळे खरीप हंगाम चांगला जाईल, असे स्वप्न रंगवून बळीराजाने आपले नियोजन केले. परंतु सुरुवातीपासूनच त्याच्यासमोर एकापाठोपाठ एक आव्हानांची मालिका उभी ठाकली. खरीप हंगामाचे नियोजन करताना बँकांकडून कर्ज उपलब्ध झाल्याशिवाय खते बियाणे आणि अन्य आवश्यक वस्तूंची खरेदी करणे अशक्य असते. दरवर्षी घेतलेल्या कर्जाची परतफेड करुन पुन्हा नवे कर्ज हे सूत्र ठरलेले आहे. परंतु कोरोना साथीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शासनाने केलेली कर्जमाफीची घोषणा प्रत्यक्षात येण्यात अडचण निर्माण झाली. कर्जमाफी झाली असे समजून नव्या कर्जासाठी ज्यावेळी शेतकरी बँकेत गेला, त्यावेळी कर्जमाफी न झाल्याने पूर्वीचे कर्ज भरल्याशिवाय नवीन कर्ज मिळणार नसल्याचे कळताच शेतकरी वर्ग हबकून गेला. उधार-उसनवारी, खासगी सावकारी अशा अनेक मार्गातून आर्थिक नियोजन केल्याशिवाय खरीप हंगामातील पेरण्या वेळेवर साधता येणार नाही. त्यामुळे कर्ज मिळवण्यासाठी धडपड, त्यानंतर खते बियाणे मिळविण्यासाठी धावपळ, कृषी केंद्राकडून झालेली अडचण या सा-या प्रश्नांना सामोरे जावे लागले.

    कृषी मंत्री दादा भुसे यांनीच शेतकरी वेषात जाऊन खताची मागणी केली असता, साठा असुनही त्यांना नकार मिळाला. मंत्र्यांना जिथे असा अनुभव आला, तिथे सामान्य शेतक-यांची अवस्था आणि अडवणूक कशी होत असेल, याची केवळ कल्पनाच केलेली बरी. शेतक-यांच्या बांधावर बियाणे, खते देण्याची घोषणा शासनाने केली. परंतु गावातील दुकानात सुद्धा अनेक ठिकाणी त्याला वेळेवर बियाणे व खते मिळत नसल्याचे चित्र समोर आले. याहीपेक्षा गंभीर गोष्ट विविध कंपन्यांकडून खरेदी केलेले बियाणे पेरणीनंतर उगवलेच नाही. विदर्भ-मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर असे प्रकार उघड झाले.

    वेंगुर्ला तालुक्यातील एका सोसायटीने २५ टन खत घेऊन आलेल्या गाडीतील १२.५० टन खत हे संस्थेकडे वाहन पोहोचण्यापूर्वीच संस्थेच्या मर्जीतल्या शेतक-याच्या बागेत उतरविले. खताची गाडी येणार म्हणून संस्थेच्या ठिकाणी १०० शेतकरी रांग लावून उभे होते. आलेल्या वाहनात अर्धेच खत असल्याने काहींनी खताचे व्हाऊचर दाखविण्याची मागणी केली. मात्र, ते दाखविण्यात आले नाही. ही बाब शेतक-यांनी संचालकांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी ते खत २५ टन आल्याचे व आपणाला विश्वासात न घेता परस्पर दिल्याचे समजल्याने संस्थेच्या २ संचालकांनी आपल्या पदाचे राजीनामेही दिले.

       एकंदरीतच या कारभारामुळे शेतकरी भरडला जात आहे. दुबार-तिबार पेरण्या करण्याची वेळ आली. आर्थिक भुर्दंड बसल्याने शासनाने गंभीर दखल घेतली. कृषीमंत्री एवढेच नव्हे तर खुद्द मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारात बियाणे उत्पादक कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची घोषणा केली. आतापर्यंत फक्त एकच तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झालेली आहे. त्याचे काय व्हायचे ते होईल, परंतु बळीराजाला जो फटका बसला, त्याची भरपाई मिळावी, अशी मागणी झाली असली तरी शासनाकडून त्याला किती प्रतिसाद मिळतो, हा प्रश्न आहे. विमा कंपन्यांचा अनुभवही शेतक-यांनी वेळोवेळी घेतला आहे. या सर्व संकटांच्या मालिकेतून बळीराजाचा प्रवास सुरु आहे. त्यात पुन्हा जोरदार पावसाने काही ठिकाणी पेरलेले बियाणे वाहून गेल्याने दुबार पेरणीची वेळ आली आहे. यापुढील काळात निसर्गाची साथ कशी मिळते, यावरच खरीप हंगामाचे भवितव्य अवलंबून आहे.

       बळीराजा या सर्व प्रश्नांचे ओझे घेऊन भर पावसात काबाडकष्ट करतो आहे. वर्षभर कष्ट करुन देशासाठी धान्य पिकवतो. परंतु ‘जगाचा पोशिंदा‘ एवढ्या शब्दात त्याचा गौरव करण्यापलिकडे त्याला संकटमुक्त करण्याबाबत गेल्या ७० वर्षात झालेले प्रयत्न अपुरे आहेत. कारण बळीराजाचे प्रश्न, त्याच्यावरील कर्जाचा बोजा दरवर्षी ऐन खरीप हंगामाच्या वेळी बँकांकडून होणारी अडवणूक, बियाणांबाबत येणारा अनुभव यातून त्याला आजवर दिलासा मिळालेला नाही.

       पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ८० कोटी गरीबांना मोफत धान्याची घोषणा केली. त्यावेळी आपल्या भाषणात बळीराजाच्या योगदानाचा गौरव केला, तो योग्यच आहे. परंतु प्रत्यक्षात त्याच्या जीवनात चांगले दिवस येण्यासाठी त्याला कर्जमुक्त करणे आणि त्याच्या उत्पादित मालाला हमीभाव देणे यासाठी केंद्र आणि राज्य शासनांनी कृतिशील कार्यक्रम राबवण्याची गरज आहे. मूळ दुखणे लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना केल्याशिवाय फक्त कर्जमाफीच्या घोषणा आणि त्यातून काही प्रमाणात होणारी मदत ही केवळ मलमपट्टी ठरलेली आहे. त्यामुळेच बळीराजासाठी खास आर्थिक नियोजन करुन त्याला संकटमुक्त करण्याचा अजेंडा राबविणे, ही देशासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचे भान आपल्याला कधी येणार? हा खरा प्रश्न आहे.

-सुभाष धुमे, फोन (०२३२७) २२६१५०

Leave a Reply

Close Menu