रामेश्वराचे सप्तो

           आषाढ महिना सुरु झाला. एव्हाना वेंगुर्लेकरांना रामेश्वर सप्ताहाचे वेध लागलेले असतात. ६ जुलै रोजी श्रीदेव रामेश्वर मंदिर भजनी सप्ताहास सुरुवात होणार होती. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी रामेश्वर मंदिरात भजनी सप्ताह साजरा होणार नाही असे रामेश्वर देवस्थान ट्रस्टने जाहिर केले आहे. अनेक वर्षाची परंपरा यावर्षी खंडित झाल्याने काहीसा हिरमोड झालाय खरा. पण या संकटातून रामेश्वरच मार्ग काढेल अशी भक्तगणांची श्रध्दा आहे. वेंगुर्लवासीयांना श्री देव रामेश्वर पूजनीय. वेंगुर्ल्यात असे एकही हिंदूचे घर सापडणार नाही ज्याने रामेश्वराला केळी ठेवली नाहीत आणि गा-हाणे घातले नाही. जगाच्या कोणत्याही कोप-यात तुमचे लग्न झाले असेल तरी रामेश्वराक पाया पडाक जावकच व्हया.

       वेंगुर्ल्यात मी जेव्हा जेव्हा जातो तेव्हा एक दिवस सवड काढून रामेश्वराच्या देवळात जातोच. हो… धावती भेट न देता पुरेसी सवड काढून जातो. देवाला केळी ठेवून झाली की बाहेर येवून बसायचे. इथे बसल्यावर तुम्हाला तुमचा एखादा मित्र हमखास भेटेल. तो सुध्दा आता कामा धंद्यानिमित्त मुंबईला किंवा जगाच्या कुठल्या तरी कानाकोप-यात स्थायीक झालेला असतो. तिथे गप्पा मारता मारता वेळ कसा जातो हे कळतच नाही. अगदी कुणीच नाही भेटले तर तोपर्यंत बायको पोरांना माझे या मंदिराशी विशेषतः सप्ताहाशी असलेले नाते रंगवून सांगायचे. माझे शिक्षण पूर्ण होण्यामागे गावातील अनेक लोकांबरोबरच रामेश्वराचा सप्ताहाचे सुद्धा योगदान महत्त्वपूर्ण आहे.

       रामेश्वराचा सप्ताह आला की, रानात जाऊन पिशवीभर बेलाची पाने खूडून आणायची, कुठून तरी फुले आणायची आणि एका पानात बेलाची पाने आणि एखादे फुल टाकून विकायचे. दहा पैशापासून विकायला सुरुवात केली होती दहावीपर्यंत याचा दर सव्वा रुपया पर्यंत गेलेला आठवतो. कधी सोबत अगरबत्तीचा पुडा विकून बिजनेस वाढवण्याचा प्रयत्न केला. राम मंदिरासमोरील चौथ-यावर एका गोणपटावर हे बेलाचे वाटे थाटायचे आणि एखादा भाविक देवळात जाताना दिसला की त्याच्या मागेमागे ‘बेल घ्या वो..बेल घ्या..‘ म्हणत रामेश्वराच्या देवळापर्यंत जायचे. तसा मी भीडस्तच होतो. त्यामुळे माझ्याकडून विक्री कमीच व्हायची. एखाद्याने बेल घेतलाच तर चेह-यावर आनंदाचे झुळूक उमटून जायची. नाहीच घेतला बेल तर पुन्हा जोमाने कामाला लागायचे. मध्ये मध्ये पाऊस आलाच तर भिजत भिजतच बेल विकायचा पण कामात खंड पडू द्यायचा नाही. या पैशातून शिक्षणासाठी वही, पाटी, पेन, पेन्सील घेऊन शिक्षणावरील खर्चाचा भार कमी करायचा. त्यावेळी दहा दहा पैशासाठी घेतलेली मेहनत आठवून का होईना आज शासनाचे हजारो कोटीचे व्यवहार करताना एक पैश्याचा गैरव्यवहार करायची दुर्बुध्दी नाही झाली.

       सप्त्यात आनंद घेण्यासारखे अनेक गोष्टी आहेत. हा भजनी सप्ताह असल्याने अखंड सात दिवस मंदिरात भजन चालू असायचे. रात्री सात आठ नंतर टाळ मृदूंगाच्या गजराने आसमंत नादमय व्हायचा. या सप्त्यात रामेश्वराच्या गाभा-यात व राम मंदिराच्या गाभा-यात दररोज दोन वेगवेगळे पौराणिक देखावे असायचे. अचंबित करणा-या

ट्रिकसीन असलेले देखावे बघण्यासाठी भाविकांची तुडूंब गर्दी असायची. त्याकाळच्या पौराणिक चित्रपटात किंवा नाटकात सुध्दा या तोडीचे ट्रिकसिन नसायचे. रांगोळी प्रदर्शन तर आवर्जुन पाहण्यासारखे. पंचक्रोशीत हौशी व व्यावसायिक रांगोळी कलाकारांना हक्काचे व्यासपीठ होते. या रांगोळी प्रदर्शनातूनच आपल्या देशाला नामवंत रांगोळी कलाकार दिले आहेत. आम्ही मुंबईत बसून या रांगोळी प्रदर्शनाचा सामाजिक माध्यमातून आस्वाद घेत असतो.

       चहा भजी, उसळपाव, वडापावच्या स्टॉलबरोबरच मुख्य आकर्षण होते ते खाज्याच्या दुकानांचे स्टॉल. खाज्याच्या विविध प्रकारांनी हे स्टॉल भरलेले असायचे. आल्याचा खाजा, साखरेचा खाजा, गुळाचा खाजा असे अनेक खाज्याचे प्रकार असायचे. त्याबरोबर गाठला..साखरेच्या विविध पक्षांच्या आकारातील मिठाई अनेक बरेच पदार्थ जे फक्त कोकणातच मिळतात. आम्हाला तर खरे आकर्षण असायचे ते काळ्या तीळाचे खडखडे लाडू आणि खटखटला. अगदी स्वस्त आणि मस्त..कुडूम कुडूम करुन चघळत बसायचे. बाकी फुगे, पिपाणी आणि खेळणी तर होतीच. पण ते पाण्याने भरलेले फुगे हा जो काय आयटम होता तो मात्र अल्टीमेटच होता.

       सप्त्यात चपला चोरीला जाण्याचा योग हा प्रत्येकाला कधीना कधी आलेला आहेच. त्यावरुन कधी कधी भांडणे व्हायचीत. संशयीतांनी दिलेली उत्तरे सुध्दा अफलातून असायची, ‘तुझा चप्पल बनवून झाल्यावर कंपनी बंद झाली काय रे..‘ कॉलेजात असताना आम्हाला सुध्दा चप्पल चोरीला गेल्याचा अनुभव आला होता. आम्ही ७ ते ८ मित्र सप्त्याला गेलो होतो. त्यापैकी ५-६ जण दर्शनाला गेले आणि आम्ही दोघेजण त्यांची चप्पले सांभाळत उभे राहिलो. अगदी डोळ्यात तेल घालून आम्ही प्रामाणिक पणे चपलांवर खडा पहारा देत होतो. एवढ्यात सप्त्याला आलेल्या ‘हिरवळी‘ने आमचे लक्ष विचलीत झाले आणि क्षणार्धात एक चपलांचा जोड गायब झाला. ज्या मित्राचे चप्पल चोरीला गेले त्याने आम्हाला तोंडावर कमी आणि मनातल्या मनात जास्त शिव्या दिल्या. पण असो या चप्पल चोरीला गेल्याच्या प्रकाराचे कुणी जास्त दुःख करत बसायचे नाहीत. बरा असता चप्पल चोरीक गेलेला, ‘घरातली पीडा जाता असा म्हणतत..‘ असे म्हणत तिथे उपलब्ध असलेले चप्पल पायात सरकवून घरचा रस्ता धरायचे. पण ‘हिरवळ‘ बघायला येणार शौकीन सुध्दा काही कमी नसायचे.

       रामेश्वर मंदिरातील पालखी, रथ ओढणेचा कार्यक्रम असो की महाशिवरात्री वा जत्रा असो वेंगुर्लेवासीय उत्साहाने सहभागी होतात. रामेश्वर मंदिरातील महाप्रसादाला तर तोडच नाही. डाळभात, बटाटा/रताळ्याची भाजी, पत्रावळीत स्वैर संचार करणारी उसळ असो वा मणगणा किंवा सोजी असो या जेवणाला अमृततुल्य चव असायची. मी आतापर्यंत भारतात, भारताबाहेर पंचतारांकित हॉटेलात तसेच अनेक देवस्थानमध्ये सरकारी पाहुणा म्हणून भोजनाचा आस्वाद घेतला असेन पण रामेश्वर मंदिरातील महाप्रसादाची सर कशालाच नाही. माझे समकालीन मित्रांना माझे म्हणणे खोडून दाखावावे.

       गेली चोवीस वर्ष रामेश्वराच्या सप्त्याला जाण्याचा योग नाही आला. अजूनही कुणी लहान मुले सप्त्यात बेल विकत असतील का? असू नयेतच.. रामेश्वराच्या कृपेने गावात आता बरीच समृध्दी आली आहे.

                                                                      – संजय गविद घोगळे, ८६५५१७८२४७

 

Leave a Reply

Close Menu