आपण नेते मंडळींना निवडून देतो. कोणत्या निकषावर आपण उमेदवाराला मत देतो ? आपल्या गावाच्या, तालुकाच्या, जिल्ह्याच्या भौगोलिक आणि पर्यावरण विषयक माहिती असते का या मंडळींना ? नसली तरी या पैकी किती मंडळी हे समजण्यासाठी, हा अभ्यास कारण्यासाठी प्रयत्नशील असतात ?
        मुळात सामान्य नागरिकांनी एक लक्षात घेतले पाहिजे की निसर्गाची हानी करूनच बरेच  राजकारणी (आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, आणि स्थानिक) पुढे येत असतात. अशांना ओरबाडून केलेल्या विकास-तंत्रा शिवाय कोणत्याही शाश्वत तंत्राचा अभ्यासही नसतो आणि त्यात त्यांना रसही नसतो. मग ते सत्ताधारी असो किंवा विरोधक असो या बाबतीत सर्व आतून एकच. त्यात भर म्हणजे जिल्ह्यात येणारे अधिकारी. ते कशाला करतील सिंधुदुर्गच्या भविष्याची चिंता. त्यांना आत्ता आकड्यात विकास मांडायचा आहे. नोकरीत बढती आणि पैसे कमवून परत जायचे आहे. अर्थात यात काही अपवादात्मक मंडळी असू शकतील. असो पण आपण सामान्य जनता किती म्हणून राजकारण्यांवर, त्यांच्या ठेकेदारांवर अवलंबून राहणार आहोत. आपली पण तर काही जबाबदारी आहे की नाही. इतिहास साक्षी आहे की, सर्व सामान्यांच्या पुढाकारानेच देश अनेक समस्यांपासून संरक्षित झाला आहे. अनेक कायदे हे सामान्य लोकांच्या लढ्यानेच अस्तित्वात आले आहेत. पाणथळ जागांचे नियम यापैकी एक…..
           म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सामान्य लोकांना या विषयावर जागृत करण्यासाठी व लोकसहभाग अधिक अधिक वाढवण्यासाठी सिंधुदुर्ग वेटलँड ब्रिफ डॉक्युमेंटेंशन या कमिटीतर्फे ‘सिंधुदुर्ग वेटलँड’ या  फेसबुक पेजची सुरवात करण्यात आली आहे. यावर  प्रत्येक तालुक्यावर जिल्यातील पाणथळ जागांची माहिती सादर करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त सिंधुदुर्गवासियांनी या कृतिशील लोकआंदोलनात सहभागी होण्यासाठी कमिटीतर्फ आवाहन  करण्यात येत आहे. या विषयावरील संशोधनात सहभागी होण्यासाठी सुद्धा काही स्वयंसेवकांची गरज आहे.
कोकणची समस्या : कोकणात भेडसावणाऱ्या अनेक समस्यां आहेत. त्या पैकी काही प्रमुख समस्या म्हणजे इथे होणारी मातीची धूप, पावसाळ्यात येणारे पूर आणि उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा..माणसाच्या आक्रमणामुळे निसर्गाची अन्नसाखळी सुद्धा बिघडत चालली आहे.
         आपल्याला सर्वांना माहीतच असेल भारतात पहिल्यांदाच लोकसहभागातून पाणथळ जागांचे सर्वेक्षण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले आहे. पाणथळ जागांमध्ये काय काय येते तर आपल्या जिल्ह्यात असलेले तलाव, धरणं, व इतर उथळ पाण्याचे स्रोत (पूर्वी कांदळवन सुद्धा पाणथळ मध्येच वर्गीकरण केले जात होते पण केंद्र सरकारने कांदळवनला वन क्षेत्रात वर्गीकरण केले आहे)
        सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या पहिल्या टप्प्याच्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील ५७ पाणथळ जागांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे आणि हे सर्वक्षण तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी सत्यापित करून मुंबई उच्च न्यायालयात दाखल केले आहे. आपण आता हे सर्वक्षण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सजग आणि संवेदनशील नागरिकांसमोर सादर करत आहोत. आपला गाव, आपला परिसर लोकांनी जाणून घेण्याची फार गरज आहे.
पाणथळ जागा संरक्षण आणि संवर्धन संबंधी पाश्वभूमी- गोड्या पाण्याचे स्रोतांमध्ये होत असलेली घट आणि नष्ट होणारी जल स्रोत लक्षात घेता 1971 साली इराण देशातील “रामसार ” शहरात पाणथळ जागा संवर्धन करण्यासाठी जागतीक परिषद आयोजित करण्यात आली होती. भारत सरकारने 1985 साली या आंतरराष्टीय करारावर स्वाक्षरी केली आहे. भारतात झपाट्याने नष्ट होत असलेल्या पाणथळ जागांवर मा. सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी काळजी व्यक्त करत शासनाला आदेश दिले आहेत. (Writ Petition No. (230/2001) M.K.Balkrishnan & Ors Vs UOI& Ors.). भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इस्रो) तर्फे भारतातील सर्व राज्यातील (पाणथळ) वेटलँड ऍटलास २०१० साली प्रकाशित झाले आहेत. भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इस्रो)च्या ऍटलास मध्ये नमूद सर्व पाणथळ जागा सर्वोच्च न्यायालयायच्या वरील आदेशानुसार संरक्षित आहेत. तसेच मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या PIL No. 87/2013 च्या आदेशानुसार कोकण वेटलँड तक्रार निवारण मंच ची स्थापना करण्यात आली आहे. या आदेशात कोकण विभागातील तहसीलदार, मा. जिल्हाधिकारी यांना पाणथळ जागा उल्लंघन संदर्भात लेखी तसेच फोन, ईमेल द्वारे तक्रार आल्यास 48 तासाच्या आत त्या ठिकाणी त्वरित स्थळ पाहणी करून उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई तसेच झालेले उल्लंघन पूर्वस्थतीत आणण्यासाठी कारवाई करणायचे आदेश दिले आहेत.
         मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग मा. जिल्हाधिकारी यांनी सन 2018 मध्ये जिह्यातील ५७ पाणथळ जागेचे सर्वेक्षण सत्यापित करून पर्यावरण विभागाने तयार केलेल्या वेटलँड ऍपच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात सादर केले आहे .
        सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खालील नमूद पाणथळ जागांचे पहिल्या टप्प्यातील ब्रिफ-डॉक्युमेंटेशन मा. उच्च न्यायालयात दाखल केले आहेत.
१) मालवण : ०५           २) कुडाळ : १७             ३) सावंतवाडी : ०८      ४) वेंगुर्ला : ०८
५) दोडामार्ग : ०२          ६) कणकवली : ११       ७) देवगड : ०१         ८) वैभववाडी : ०४
    या व्यतिरिक्त सुद्धा काही पाणथळ जागा आहेत ज्या नॅशनल वेटलँड ऍटलास वर काही तांत्रिक कारणांमुळे नमूद नाही आहेत. या पाणथळ जागांची नोंद करून सजग आणि संवेदनशील नागरिकांनी करायची आहे आणि प्रशासनाला दाखल घ्यायला लावायची आहे.
        संबंधित ग्रामपंचायतना मा. सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाची माहीती करून देणे तसेच वेटलँड चे महत्व सांगणे देखील आवश्यक आहे. वेटलँड मोठ्या प्रमाणात नष्ट होण्यामागे कायद्याचे अज्ञान तसेच जागृती नसणे हे महत्वाचे कारण आहे. ताज्या पाण्याच्या तुटवड्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पाणथळ सारख्या स्त्रोतांचे संवर्धन करणे नागरिकांचे मूलभूत कर्तव्यच आहे.पाणथळ जागा या जैवविविधतेच्या दृष्टिने अत्यंत महत्वाच्या आहेत. भूगर्भातील पाणी ठराविक पातळीपर्यंत राखणे, पूर रोखणे, पाणी जमिनीत मुरवण्याचे हे महत्वपूर्ण माध्यम आहे. या संरक्षित आणि संवर्धन करणे गरजेचे आहे. आपण जेथे राहतो तेथील पर्यावरणशास्त्राचा, भूगर्भाचा विचार करता काही नियम आपल्याला पाळायचे आहेत. शहरात सुद्धा नियम आहेत. विमानतळजवळ आपले घर असल्यास काही निर्बंध आहेत, समुद्र अथवा नदी जवळ आपली जमीन असल्यास काही निर्बंध आहेत . त्याच पद्धतीने तलाव जे गोड्या पाण्याचे स्रोत आहेत तेथे पण नियम कायदे आपल्या भविष्याच्या दृष्टीने केले गेले आहेत. त्याचे पालन सर्वांनी केलेच पाहिजे. यातच आपल्या पुढच्या पिढीचे भवितव्य आहे.
       संबंधित सर्व ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय यांनी याची दखल घ्यायची आहे. संबंधित ग्रामपंचायतीने त्यांच्या हद्दीत असलेल्या तलाव-पाणथळ जागांच्या उच्चतम भरती रेषेमध्ये आणि त्यापासुन 50 मीटर दुर कोणत्याही कायमस्वरूपी बांधकाम, भराव, उत्खनन, सारख्या गोष्टीं होऊ नये यासाठी योग्य ती कारवाई करायची आहे. अश्या कोणत्याही अनधिकृत बाबी होत असल्यास याची तक्रार ताहसिललदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय अथवा http://konkanwetland.com/ या संकेत स्थळावर करू शकता.
(२०१० सालच्या आधीपासून उच्चतम भरती रेषेपासून 50 मीटर दुर असलेल्या वास्तूचे बांधकाम हे या नियमांपासून वगळले आहे. परंतु त्यांच्या वास्तू मधून कोणत्याही प्रकारे कचरा अथवा सांडपाणी जलस्रोतां मध्ये जाता कामा नये याची काळजी त्यांनी घ्यायची आहे.
       वेंगुर्ले तालुक्यातील पाणथळ जागा: 1 निशाण तलाव, 2.म्हारतळे, 3.माऊली मंदिर तलाव, 4.बामडोजीचीवाडी तलाव, 5.हुडा, 6.हुडा तलाव, 7.आरवली पाणथळ जागा , 8.रेडी तलाव
          आपल्या परिसरातील पाणथळ जागांचे संरक्षण, संवर्धन त्याची नोंद करायची असल्यास सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने स्थापन झालेल्या वेटलँड ब्रिफ डॉक्युमेंटेशन कमिटीच्या माध्यमातून काम करू शकता.
    पाणथळ जागेचे मित्र म्हणजेच वेटलँड मित्र होण्यासाठी खाली दिलेल्या फेकबुक पेजशी संपर्क करा.अधिक माहितीसाठी संपर्क
श्री.सचिन देसाई , धामापूर (02365)256620 ,9405632848

Leave a Reply

Close Menu