वेंगुर्ला शहरातील भटवाडी येथे भाड्याने राहणा-या एका ट्रक चालकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. ती व्यक्ती राहत असलेला संपूर्ण परिसर दगडी कंपाऊंडने बंदिस्त असल्याने (१५०न्४० मीटर) तेवढाच परिसर कटेंनमेंट झोन म्हणून घोषित केलेला असून या परिसराव्यतिरिक्त शहरातील इतर ठिकाणचे सर्व व्यवहार नियमांचे काटेकोरपणे पालन करुन सुरु राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिली आहे.

      या रुग्णाचा स्वॅब रिपोर्ट पोझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभागाने त्या परिसराचा सर्व्हे केलेला आहे. या परिसरात राहणा-या दोन कुटुंबातील सर्वांचे स्वॅब नमुने घेण्यात येणार असून या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या सर्व व्यक्तींची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. तसेच हा संपूर्ण परिसर नगरपरिषदेमार्फत निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे.

      नगराध्यक्ष दिलीप गिरप, तहसिलदार प्रवीण लोकरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर तसेच डॉ. वजराटकर, पोलिस निरिक्षक तानाजी मोरे, नगरपरिषद नोडल अधिकारी सचिन काकड यांनी त्या भागाची प्रत्यक्ष पाहाणी करुन कटेंनमेंट झोन घोषित केला. सध्या हा रुग्ण जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे उपचार घेत असून लोकांनी घाबरुन जावू नये. परंतु नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच शासनाने निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन नगराध्यक्ष गिरप यांनी केले आहे.

Leave a Reply

Close Menu