*लॉकडाऊन – याला जीवन ऐसे नाव*

           करोना आणि त्याच्या अनुषंगाने आलेला लॉकडाऊन यानी जीवनात आमुलाग्र बदल केलाय असं म्हंटलं तर वावग ठरणार नाही. पण निसर्गाकडे पाहिल्यावर आपल्याला समजतं की सुर्यास्तानंतर सुर्योदय नक्की! अशा संकटकाळी जर आपण आपल्या विचारांची दिशा बदलली, जास्तीत जास्त सकारात्मक विचार केला तरच आपण या समस्येला योग्य रितीने तोंड देऊ शकू. सध्याच्या असाधारण किंवा abnormal जीवनामुळे आपण सगळेच डिस्टर्ब झालो आहोत, तक्रार किंवा दुःख करण्यासारखी अनेक कारणं आपल्याकडे आहेत. पण या सगळ्यात आपल्याकडे काय आहे, काय चांगलं आहे, काय टिकून आहे किंवा या काळात काय चांगले बदल झाले आहेत,  या परिस्थितीने आपल्याला काय शिकवलं – हे पहायला आपण विसरतोय. कितीतरी गोष्टी आपण गृहित धरल्या होत्या, अजूनही धरतो आहोत … कितीतरी गोष्टी आपल्या जवळ होत्या पण त्याचा आनंद, आस्वाद आपण घ्यायलाच विसरलो होतो. माझंच बघा ना … लॉकडाऊनमुळे मी पस्तीस वर्षांनी परत चित्र काढायला घेतली आणि इतका आनंद मिळतोय मला त्यातून! मी हे आधीच का नाही करु शकले?
             आता आपण आपल्याजवळ काय आहे ते बघुया, ते मोजुया आणि त्यातच आज समाधान मानुया. डोक्यावर छत आहे, पायाखाली जमीन आहे, हृदयात धडधड आहे ना, मग अजूनही काही बिघडलेलं नाही. माणसानी कित्येकदा शून्यातून विश्व उभं केलंय. आपल्या समोर अशी अनेक ज्वलंत उदाहरणं आहेत. आताची वेळ ही शांत रहाण्याची आहे…. घाई/धावपळ करण्याची नाही आणि  निराश होण्याचीही नाही. आपल्याला लहानपणापासून आपल्या जडणघडणीतून असेल किंवा शिक्षणातून, नोकरीच्या अनुभवातून असेल, काय उणं/कमी आहे हेच बघण्याची सवय लागलीय. 80% मार्क पडले तर आजकाल आईबाप, मुलं नाराज होतात. न मिळालेल्या 20 टक्क्याचं दुःख मिळालेल्या 80 टक्क्यावर मात करतं. तीच गत आपली सर्वांची! ही विचारसरणी आतातरी बदलायला हवी. मधे मी एका साधुबाबाची गोष्ट ऐकली … तो आपल्या एका शिष्याला विचारतो कि जर तुझ्याकडे 86,400/- रुपये असले आणि त्यातले दहावीस रुपये एका चोराने चोरले तर तू काय करशील? त्याचा पाठलाग करुन आपले दहावीस रुपये परत मिळवायचा प्रयत्न करशील? की उरलेली रक्कम जपून ठेवून चोरी झालेल्या रकमेचा विचार सोडून देशील? शिष्य पटकन उत्तरला ‘अर्थातच कुठलाही माणूस उरलेली रक्कम जपून, गेलेल्या क्षुल्लक रकमेचा विचार सोडून देईल आणि मीही तेच करीन!’ साधुबाबा म्हणाले ” तू चुकतोयस! मी जगं पाहिलय, जास्तीत जास्त लोकं त्या चोराच्या मागे धावून ती क्षुल्लक रक्कम हासिल करण्याच्या नादात हातात असलेल्या रकमेचाही आनंद घेत नाहीत किंवा कधीकधी हातातली रक्कमही गमावून बसतात.” शिष्य म्हणाला, ” छे, असं कोण करेल? हे अशक्यच आहे. ” साधुबाबांनी सांगितलं ” हे 86,400 खरंतर आपल्या जीवनातील एका दिवसाचे सेकंद आहेत. दिवसभरातल्या एखाददुस-या नाराज होण्याच्या, राग येण्याच्या क्षणासाठी आपण अख्खा दिवस त्याचाच विचार करण्यात, जळण्यात, नाराजीत, कुढण्यात खर्च करतो. तो दहावीस सेकंदाचा प्रसंग अशाप्रकारे आपला पूर्ण दिवस व आपली पूर्ण ताकद गिळंकृत करतो.”  या गोष्टीतून आपल्याला एवढा बोध घेणं आवश्यक आहे की या काही महिन्यांच्या समस्येमुळे आख्ख्या जीवनावर, दुनियेवर नाराज होऊन पराभव पत्करण्याचं कारण नाही. आज ना उद्या या समस्येचं निराकरण होणार आहे. जीवनाची गाडी परत व्यवस्थित चालणार आहे. विश्वास ठेवा कुठलीही समस्या कायमस्वरुपी नसते. हा परीक्षेचा काळ आहे. यातूनही आपण सगळे तावूनसुलाखून ताजेतवाने होऊन बाहेर पडू. सध्या आपल्याजवळ जे आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगुया.
                                                                            – श्रुती संकोळी, 9881309975

Leave a Reply

Close Menu