अंगणात हिरव्यागार उगवलेल्या टायकाळ्यावर भिरभिरणा-या पिवळ्या फुलपाखरांच्या मागे पळत असताना नजर मात्र आईच्या वाटेकडे लागली होती. एवढ्यात चार घरची भांडीकुंडी करुन दुपारच्या वेळी आई लगबगीने घरी येताना दिसली. भिंगरीला दो-याने बांधून तीचे हॅलीकॉप्टर घेऊन ती तसाच आईच्या दिशेन झेपावलो. आईला बिलगून बोललो “आये आपण पण यंदा गणपती आणूया..”  आईने हळूवारपणे माझ्या हाततल्या भिंगरीला दो-यातून मुक्त केले आणि बोलली “संजू गणपती आणूच्या साठी आधी नागोबा आणूचो लागतलो, यंदा तर आपण नागोबाच आणूक नाय होतो..पुढच्या वर्षी बघूया हां..”

         इथे एकवेळच्या अन्नाची भ्रांत असताना ती माऊली माझे सण साजरे करण्याचे बालहट्ट कसे पुरे करणार होती. तीने ती वेळ मारुन नेली होती. मी थोडावेळ हिरमुसला झालो पण थोड्यावेळाने फुलपाखरांच्या मागे पळता पळता सगळे विसरुन गेलो. पण त्यावेळी माझ्या मनान पक्के राहीले की गणपतीबाप्पा घरात आणायचा असेल तर अगोदर नागोबा आणावा लागतो. पुढच्यावषी श्रावण सुरु झाल्यावर बाजारात नागोबाच्या मूर्त्या विकायला येऊ लागल्या आणि आता मला नागोबाचे वेध लागले होते.

            “चंपू.. संजू गाल फुगवण सो बसलो हा…” घरमालकीणीने आईच्या पुढे चहाचा कप सरकवता सरकवता विचारले. लहाणपणी मी आईच्या मागे सतत शेपटी सारखा फिरायचो. आई कामाला गेली की, मी तीच्या मागे मागे जायचो. ती काम करायची आणि तीथे शांतपणे कोप-यात बसून सगळे न्याहाळत बसायचो. “संजू अरे बिस्कीट तरी खा…” घरमालकीण मला आग्रह करत होती. आधीच माझे गाल खूपच मोठे होते त्यात रुसल्यामुळे मी अजूनच गंमतीदार दिसत होते. “अगो, चंपू झाला तरी काय ह्येका. कित्याक रुसलो हां”. तसा मी लहानपणापासून खूपच समजूतदार की काय म्हणतात त्या पठडीतला होतो. हट्ट करणे हो प्रकार मला माहित नव्हता. पण का कोण जाणे गणपती, नागोबा, श्रीकृष्ण, सरस्वती यांच्या मूर्त्यांचे मला फार आकर्षण होते. लहाणपणी मी फार धार्मिक सुध्दा होतो आणि गणपती आणायचा असेल तर नागोबा आणावाच लागतो हे आईने सांगितलेले माझ्या बालमनात पक्के बसले होते. त्यामुळे यंदा नागोबा आणायचा हट्ट धरला होता.

        “बरा बाबा आणूया हां नागोबा… चल आपण पत्री गोळा करुया”. नागपंचमीच्या दिवशी झाडाची पाने, फुले तोडू नये असा रिवाज तळकोकणात आहे. आपल्या घरी नागेाबा येणार याचा कोण आनंद मला झाला होता. मी आईला पत्री गोळा करायला मदत करु लागलो. माझे दोन नंबरचे वरीष्ठ बंधू यांनी मला मग नागोबाचे डेकोरेशन करायचे शिकवले. त्यावेळी जसे जमेल तसे खडूने भिंतीवर नागोबाचे चित्र रंगविले. विहिरीवर जाऊन शेवाळ खरडवून आणला आणि पाटावर दोन करवंट्या ठेवून त्यावर शेवूळ पसरवून छानपैकी डेकोरेशन तयार केले. पुढे मी वेंगुर्ल्यात असे पर्यंत म्हणजेच 1996 पर्यंत हेच डेकोरेशन करायचो.

         नागपंचमीच्या दिवशी सकाळी आता नागोबाची मूर्ती घरी आणायचे वेध लागले होते. सकाळी आंघोळ आटपून मी आईच्या मागे लागलो “आये नागोबा आणूक जावचा आसा मा…” “अरे थांब रे बाजार तरी उघडाने”. माझी चाललेली लगबग आई कौतुकाने बघत होती. तीलासुध्दा कामावर जायची घाई होती. शेवटी आम्ही निघालो बाजारात. बाजारात विविध आकराच्या मूर्त्या विक्रीसाठी आल्या होत्या. संपूर्ण बाजारा नागोबाच्या मूर्त्यानी भरुन गेला होता. आज वेंगुर्ला बाजराला पिवळ्या रंगाची मोहक छटा आली होती. चाराणे, आठाणे, पाऊण रुपया अशा विविध दराच्या नागोबाच्या मूर्त्या विक्रीस आल्या होत्या. आम्ही चाराण्याची मूर्ती, नाडापूडा अगरबत्ती आणि लाह्या घेऊन घराच्या दिशेने निघालो.

      आईच्या मागे पळताना तीच्या हातातली नागेाबाची मूर्ती मी कौतुकाने न्याहाळत होतो. अंमळ छाती पुढे काढून रस्त्यात येणा-या जाणा-यां परिचितांच्या डोळ्याला डोळा भिडवत होतो. आज आम्ही सुध्दा नागोबा आणलाय.. हे कौतुक त्यांना सांगायचे होते पण ते नजरेतच राहिले होते. “काय रे संजू, नागोबा हाडलय…” कुणीतरी कौतुकाने विचारत होते. मी ही नजरेनेच “हो…” म्हणून आईचा पदर धरुन मागे मागे पळत होतो.

      त्या वर्षी केवळ माझ्या बालहट्टामुळे आमच्या घरी नागोबा आला. यथासांग कि काय ते माहिती नाही पण नागोबाची जशी जमेल तशी पूजा केली. दुपारी पंगा-याच्या पानातले पातोळे हा नैवद्य. पंगा-याची पाने, गुळचूण आणि तांदळाचे पीठ एवढेच काय ते जीन्नस लागतात हे पदार्थ बनवायला. पण तेही घरात उपलब्ध असतीलच याची शाश्वती नसायची. कधी जमलेच तर हळदीच्या पानातले पातोळे बनायचे. आपल्याकडे एक बरे आहे प्रत्येक सणाला वेगवेगळी ठरलेली स्वीट डिश असते तीही सहज उपलब्ध होणा-या पदार्थापासून बनणारी.

     आपल्याकडे नागपंचमीला जशा मेाठ्या आकाराच्या नागोबाच्या मूर्त्या उपलब्ध होतात तशा कधी मला मुंबई/पनवेल मध्ये दिसल्या नाहीत. कोकणात गणपती प्रमाणे नागोबाच्या मूर्त्यांचे मोठ्या प्रमाणात पूजन होते. घरात जीथे गणपतीची प्रतिष्ठापणा होते त्या जागेवर नागोबाचे पूजन न करता दुस-या ठिकाणी नागोबाचे पूजन केले जाते. त्यावर्षी आम्हाला काही गणपती आणता आला नाही पण माझ्या हट्टासाठी नागोबाचे आगमन आमच्या घरी होऊ लागले आणि प्रतिवर्षी ही परंपरा पुढे चालू राहीली.

            त्या दिवशी संध्याकाळी घरासमोरील विहीरीजवळ अळवात नागोबाचे विसर्जण झाले. हिरव्याकंच अळवात ती पिवळीशार नागोबाची मूर्ती पुढे कित्येक दिवस तशीच होती. फारच विलोभनीय दिसत होती. त्याकाळी मोबाईल फोटो काढायची सोय नव्हती पण अजूनही नजरेच्या कॅम-यात ते दृष्य कोरले गेलेय. वेंगुर्ला तेथील निसर्ग, तेथील मूर्तीपूजा आणि चालीरीती फारच मोहक, विसरता येणे केवळ अशक्यच.

– संजय गोविंद घोगळे (8655178247)

Leave a Reply

Close Menu