आडेलीतील शेतक-याने केली ‘लाल भेंडीची‘ नविन जात विकसित

वेंगुर्ला तालुक्यातील आडेली येथील अनंत दिगंबर प्रभू आजगांवकर या प्रगतशील शेतक-याने लाल भेंडीही भेंडीची नवीन जात विकसित केली आहे. त्या जातीचे अखिल भारतीय पातळीवर चाचणी प्रयोग होवून त्याचे संपूर्ण अधिकार श्री. प्रभूआजगावकर यांना देण्यात आले आहेत. या जातीच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये त्यांना डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. त्यामुळेच शासनाने याची दखल घेत सदर भेडींच्या स्वामित्वाचे नोंदणी प्रमाणपत्र वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात समारंभपूर्वक अनंत प्रभुआजगावकर यांना सहयोगी संशोधन संचालक डॉ.बी.एन.सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

      डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली व वनस्पति जाती आणि शेतकरी अधिकार प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘‘कोकणातील शेतक-यांनी जतन केलेल्या गळीतधान्य, कडधान्य व भाजीपाला पीकातील जातीची नोंदणी करणे‘‘ हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. सदर प्रकल्पाचे कामकाज योजनेचे पकल्पपमुख डॉ. विजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. सदर प्रकल्पामध्ये शेतक-यांच्या शेतावर भेटी देऊन वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असलेल्या वाणांचे बियाणे गोळा केले जाते. विद्यापीठ स्तरावर २ वर्षे त्या बियाण्याचे शुध्दीकरण व बीजवृध्दी केली जाते. संबंधित शेतकरी किवा शेतकरी समूहाच्या नावाने नोंदणी अर्ज भरला जातो. अर्जामध्ये वाणांच्या गुणधर्माची सखोल माहिती दिलेली असते. शेतकरी किंवा शेतकरी समूह यांच्याकडून वाण नोंदणीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. वाणाची नोंदणी वनस्पती जाती आणि शेतकरी अधिकार प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडे झाल्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येते. झाडे व वेली यांना १८ वर्षासाठी व बियाणे कायद्यातील इतर वनस्पतींना १५ वर्षासाठी या कायद्याद्वारे संरक्षण पाप्त होते.

      दरम्यान, श्री. प्रभू आजगावकर यांनी लाल भेंडीची जात विकसित केली. त्या जातीचे चाचणी प्रयोग होऊन त्याचे अधिकार श्री. प्रभुआजगावकर यांना देण्यात आले आहेत. या पक्रियेमध्ये त्यांना कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, संशोधन संचालक डॉ.पी.एम.हळदणकर, सहयोगी संशोधन संचालक डॉ.बी.एन.सावंत, प्रकल्प प्रमुख डॉ.व्ही.व्ही.दळवी आणि सहपकल्प प्रमुख डॉ.आर.जी.खांडेकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे.

      लालभेंडीची जात शेतक-यांना फायदेशीर ठरेल असा विश्वास डॉ.सावंत यांनी व्यक्त केला. अनंत प्रभुआजगावकर यांनी विद्यापीठाच्या अविरत मार्गदर्शनामुळेच मी ही भेंडीची जात विकसीत करू शकलो व या पुढेही याच प्रकारचे काम चालू ठेवणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Close Menu