निमित्त कांदळवन संवर्धनाचे……..

कांदळवन ही एक वैशिष्ट्यपूर्ण परिसंस्था आहे. कोकणातील नद्या लहान त्या समुद्राला मिळताना तयार होणा-या खाड्या वैशिष्ट्यपूर्ण असतात. मॅन्ग्रुव्हज फॉरेस्ट म्हणजेच कांदळवने यांच्या काठाशी वसतात. कांदळवनांमुळे असंख्य समुद्रीजीवांचे संगोपन होते, त्सुनामीसारख्या आपत्तींना रोखण्याची ताकद त्यांच्यामधे असते. स्थलांतरित पक्षांचा तो सुरक्षित अधिवास असतो. २६ जुलै जागतिक कांदळवन म्हणून साजरा झाला.

     बॅ. खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला आयोजित वेबिनारमध्ये डॉ.महेश गोखले, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, इस्लामपूर यांनी कोकण किनारपट्टीवरील मंगलवनया विषयाद्वारे कांदळवने ही किनारपट्टीच्या पोषक विकासासाठी किती महत्त्वाची आहेत व त्यांचे संवर्धनामध्ये समाजाचे असलेले हित यावर माहिती दिली. उपजिविका संवर्धन विभागाच्या दुर्गा ठिगळे (मालवण) यांनी कांदळवन वाचविण्यासाठी मॅन्ग्रुव्ह सेल या वनविभागाच्या मंडळाद्वारे चालू असलेल्या प्रकल्पांची माहिती या वेबिनारद्वारे दिली.

     या कार्यक्रमामधे इंडीयन वुमन सायंटिस्ट असोसिएशन मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, नागपूरच्या महिला वैज्ञानिक सहभागी झाल्या. तसेच शिवाजी विद्यापिठ, सोलापूर विद्यापिठ, पुणे विद्यापिठाचे प्रतिनीधी व स्थानिक बचत गट सहभागी झाले. अध्यक्षा डॉ.निरंजना चव्हाण यांनी कांदळवने ख-या अर्थाने मंगलवने करण्यासाठी उपयुक्त कौशल्यांची गरज शैक्षणिक व संशोधन उपक्रमातून कशी परिपूर्ण करता येईल याचे नियोजन सांगितले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. धनश्री पाटील यांनी, संयोजक डॉ.सीमा गायकवाड यांनी आभार मानले.

     प्रा.डॉ.व्ही.ए.देऊळकर यांच्या प्रोत्साहनाने महाविद्यालयाचे एनएसएस व वनस्पतीशास्त्र विभागाने सहसंयोजन केले. एन.एस.एस. विभाग प्रमुख विवेक चव्हाण सहभागी होते. सातत्याने सागरी स्वच्छतेमधे सहभागी असतात.  वेंगुर्ला स्वामिनी बचत गट, सागरीका कांदळवन सफारी, निवती येथे चालवल्या जाणा-या किनारपट्टीवरील महिलांच्या कामाला आयडब्यूएसए  सारख्या संस्थामार्फत आयोजित करता येण्यासारख्या प्रकल्पांचा मानस व्यक्त केला. संशोधन संस्था, समाज, शैक्षणिक संस्था, वनविभाग एकत्र येऊन कांदळवनांची मंगलवने संवर्धित करणे शक्य आहे यावर विश्वास व्यक्त करण्यात आला.

     या निमित्ताने स्वामिनी महिला बचत गट वेंगुर्ला, तारामुंबरी बचत गट देवगड, सागरिका बचत गट आचरा, ओमसाई बचत गट निवती यांनी प्रत्यक्ष कांदळवन संवर्धनात उतरल्यानंतर त्यांना आलेले अनुभव सांगितले. सर्वांचीच अवस्था कांदळवन म्हणजे, नेमक्या काय? ह्या आमका कायच माहित नव्हता. पण त्याचा महत्त्व पटला आणि आतातर आमका अभिमान आसा की, आम्ही निसर्ग संवर्धनात हातभार लावतो. वेंगुर्ल्यातील स्वामिनी महिला बचत गटाने तर कांदळवन संवर्धनाची मुहूर्तमेढ रोवली. दुर्गा ठिगळे या युएनडिपीच्या प्रोजेक्टमध्ये काम करीत असताना ४ वर्षांपूर्वी मांडवी खाडी नजिकच्या या मच्छिमार महिलांना भेटल्या. या महिलांनी त्यांना बोटीतून खाडीची सफर घडवली. या सफरीत दुर्गा ठिगळे यांनी या महिलांना त्यांच्या आजूबाजूला असलेल्या जैवविविधतेची माहिती सांगितली. खरेतर त्यावेळी ती इंग्लिश नावे डोक्यावरुनच गेली. समोर दिसणारे सर्वच बगळे अशी समजूत झालेल्या महिलांना या खाडीत पक्षांचं माहेरच असल्याची जाणिव त्यांना करुन दिली. कितीतरी स्थलांतरीत पक्षी, समुद्रीजीव येथे असल्याचे नव्याने उमगले.

     मांडवी खाडीतील या मच्छिमारी महिलांनी एक नविनच आदर्श समाजासमोर ठेवला. स्वतः या महिलांनी हातात सुकाणू, वल्हे धरले. पक्षांची, झाडांची, बारिकसारिक जीवजंतूंची अगदी मराठीसोबत इंग्लिशमधूनही माहिती करुन घेतली. त्यासाठी विशेष करुन इंग्लिश स्पिकींगचा कोर्स घेतला आणि या सर्व मेहनतीचे फलित युएनडीपी, कांदळवन कक्ष, वनविभाग यांच्याकडून स्वामिनी महिला बचत गटाला ५ लाख ९८ हजार रुपयांचे अनुदान मिळाले. त्यातून २ फायबरच्या होड्या, २० लाईफ जॅकेट, गझिबो खरेदी करीत मॅन्ग्रुव्ह इको टुरिझमची संकल्पना उदयास आली. एकावेळी १० लोकांची क्षमता असलेल्या या होडीतून कांदळवन सफर घडवत या महिला स्थानिक खाद्यसंस्कृतींची मेजवानी येणा-या पर्यटकांना देतात.

     कोकणचो मेवो म्हटल्यातर तो खावक जीव कासाविस होता. वरसलिका होणारे कार्यक्रम, दशावतार नाटक, कापड खेळे, गोफ डान्स ह्या म्हणजे गावक-यांच्या दसरा-दिवाळीची पर्वणी. ह्या सगळा अनुभवचा असात, डोळ्यात साठवचा म्हटलात तरी ता साठवक येना नाय, इतकी विशालता या कोकणात नक्कीच आसा. तरी येवा कोकण आपलोच आसाअसा आपुलकीने लक्ष्मण तारी भैरवनाथ बचत गट, तारामुंबरी पर्यटकांना आमंत्रित करतात. देवगड तालुक्यातील मिठमुंबरी खाडीकिनारी हे गाव वसलेले आहे. ३ किलोमिटरवर संपूर्ण कोकणची दक्षिण काशी म्हणजे श्री क्षेत्र कुणकेश्वर. पश्चिमेकडे शितबांवच्या कड्यावर महाराष्ट्रातील पहिली पवनचक्की म्हणजे जणू गावच्या शिरपेचातील मानाचा तूरा.

     इकडच्या खाडीत बोयटा (शेंडी), सुळे, शेतुक, बानवशी, काळुंद्री, भुरटे, पेडवे, तांबवशे, पातूग्रोबे, काणेय, शेंगटी, तारली आदी चवदार माशांसोबतच मुळे (शिपले), करमाळे मुळे, लाळये मुळे, रावण मुळे, घुगरे, कालवे, शिनाने म्हणजे काकई ही सुद्धा या ठिकाणी सहज उपलब्ध होतात. कांदळवनांच्या संरक्षणासाठी शासनस्तरावर वनविभाग व कांदळवन कक्ष व कांळदवन प्रतिष्ठान मोठ्या प्रमाणावर येथील महिला बचत गटांना प्रामुख्याने मदत करीत आहेत. त्यांच्यामार्फत कांदळवन खेकडा पालन‘, कालवं व शिनाने पालन, पिजरा मत्स्यशेतील, शोभिवंत मत्स्यपालन, कांदळवन सफारी, निसर्ग पर्यटन आदी विविध प्रकल्प येथील बचतगटांना प्रोत्साहीत करीत आहेत. कांदळवनाचे संरक्षण करीत असतानाच भैरवनाथ बचतगट, जलकन्या बचतगट व दिर्बानारायण बचत गटांना उपजिविकेचे साधन उपलब्ध केले आहेत. त्यांच्यात आर्थिक सबलता निर्माण करण्यासाठी शासनस्तरावर फार मोठे प्रयत्न सुरु आहेत.

     आजपर्यंत या बचत गटांनी सृष्टीज्ञान संस्था परळ, बीएनएचएस, आयसीआयसीआय बँक मुंबई, वनविभाग, कांदळवन कक्ष यांच्या सहकार्यातून गेली तीन वर्षांहून अधिक काळ कांदळवन रोपवाटिका तयार केली आहे. यातून दरवर्षी १२ ते १५ हजार रोपवाटिकांची निर्मिती केली जाते. त्यामुळे महिला बचत गटाला चांगले आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण झाला आहे.

     मालवण तालुक्यातील आचरा हे गाव पूर्वीच्या काळी कोल्हापूर संस्थांकडून श्रीदेव रामेश्वराला इनाम म्हणून मिळाले आहे. याच रामेश्वराच्या भूमित नागोचीवाडी ते जामडुल (जंबूद्विप), पिरावाडी, हिर्लेवाडी या वाड्यांमध्ये खाजणाच्या जमिनी म्हणजेच कांदळवने आहेत. कांदळवनाचे महाराष्ट्रात जवळपास २० प्रजाती आहेत. आचरा गावात झायलोकारपसग्रॅनाटम आणि सोनारशिया अॅपेटेला या दुर्मिळ प्रजाती आहेत. झायलोकारपस या वनस्पतीला समुद्रफळ – भेलांडा असेही म्हणतात. ताप आल्यास भेलांडाचे फळ उगाळून त्याचा लेप डोक्याला लावल्यास आराम मिळतो. तर सर्पदंश झाल्यास अकेंथस या काटेरी झाडाचा रस काढून जखमेवर लावल्यास विष कमी होऊन धोका टळतो. सागरिका बचत गट या कांदळवन संवर्धनाच्या कामी महत्त्वाची भूमिका बजावतात.

     निवती या गावातील स्त्रीपुरुषांनी एकत्र येत कांदळवन संरक्षण आणि उपजिविका योजनेंतर्गत ओमसाई या बचतगटाची स्थापना केली आहे. या गटा अंतर्गत जिताडा मत्स्यपालन, कालवे पालन, शोभिवंत मासे, कांदळवन सफारी या प्रकल्पांचा समावेश आहे. निवती या भागात तिवर, कांदल, चिपी, भेलांडा, हुरा, मिरची अशाप्रकारच्या कांदळवनाच्या विविध प्रजाती आढळतात. तसेच परिसंस्थेत समृद्ध असलेल्या या गावात समुद्री गरुड, वेडा राघू, धिवर, खंड्या, वटवाघुळ, माळढोक अशा पक्षांसोबत मुंगूस, पाणमांजर या प्रजाती सुद्धा आढळतात.

     कांदळवनामुळे आपल्याला सर्वाधिक ऑक्सिजन मिळतो व सर्वाधिक कार्बनडायऑक्साईड सोशुन घेतला जातो. त्यामुळे अतिशय पोषक आणि आल्हाददायक वातावरण निर्माण होते. कांदळवनाच्या प्रजातींची मुळे पाण्यातील विद्राव्य विषारी घटक शोषून घेतात. त्यामुळे पाणी स्वच्छ होते. या झाडांच्या मूळांमुळे जमिनीची धूप होत नाही व वादळात, पुरात किनारपट्टी भागाचे संरक्षण होते. समुद्री जीव कांदळवन जंगलात प्रजनानासाठी येतात. त्यामुळे मत्स्यसाठा देखील वाढतो. औषधे, टॅनिन, फर्निचरकरीता लाकूड, कागद, टुथपेस्ट आदींची निर्मिती या कांदळवनाच्या प्रजातींमधून होते.

     एकंदरीतच कांदळवनाचे पर्यावरणीय महत्त्व विचारात घेता त्यांचे पुरेसे संरक्षण व्हावे यासाठी उच्च न्यायालयातूनही वेळोवेळी आदेश मिळाले आहेत. शासकीय कांदळवनाचे संरक्षण होणे, त्यावर अवलंबून असलेल्या लोकांची उपजिविका यांचा मेळ घालणे, तसेच खाजगी मालकीच्या कांदळवनापासून उपजिविकेची साधने उपलब्ध करुन देणे, कांदळवनाचा दर्जा उंचावणे यासाठी शासनाने कांदळवन संरक्षण व उपजिविका निर्माण योजना राबविण्याचा निर्णय घेतला. राज्याच्या सागरी व खाडी क्षेत्रालगत असलेल्या गावांमध्ये जर कांदळवन क्षेत्रावर अवलंबून असलेली व्यक्ती असतील तर अशा ठिकाणी कांदळवन सहव्यवस्थापन समिती गठीत करुन सदर प्रकल्प राबविण्यात येत आहे. अशा या समित्यांचे सचिव म्हणून संबंधित कांदळवन क्षेत्रांचे वनपाल / वनरक्षक कार्यरत असतात. कांदळवन संरक्षण व उपजिविका निर्माण योजनेंतर्गत खेकडा पालन, पिज-यातील मत्स्यशेती, कावले पालन, शिपले पालन, मधुमक्षिका पालन, शोभिवंत मत्स्यशेतील, कांदळवन सफरी, एसआरआय भात शेती असे प्रकल्प राबविण्यात येतात. सदर भागातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करुन अशा प्रकारच्या प्रकल्पांची निवड तज्ज्ञांकडून केली जाते. तसेच कांदळवन संरक्षणाबाबत जनजागृती करणे, त्याची लागवड अशाही उपक्रमांना सदर योजना पाठींबा देते.

मृणाली डांगे, श्वेता हुले, अंकिता आरोलकर,

लक्ष्मण तारी, डॉ.धनश्री पाटील,

दुर्गा ठिगळे – ९५९५१९५६५५

This Post Has One Comment

Leave a Reply

Close Menu