धयकालो…

नागपंचमी झाली की कोकणात अष्टमीचे वेध सुरु होतात. मुंबईमध्ये गोकुळाष्टमीचे मुख्य आकर्षण असते ते दहीहंडीचे. नाक्या नाक्यावर उंचच उच थर लाऊन दहीहंडी साजरी केली जाते. सर्व रस्ते त्या दिवशी गर्दीने फुलून जातात. मला आठवतय शासकीय सेवेत हजर झाल्यावर सुरुवातीला मुंबईत दहीहंडीची सुट्टी नसायची. त्यामुळे काही उत्साही गोविंदा त्यादिवशी ऑफिसला दांडी मारायचे. रस्त्यावर होणारे ट्रफिक आणि मुंबईकरांचे दहीकाल्याविषयीचे प्रेम पाहून त्यादिवशी मुंबईत सुट्टी जाहिर करण्याची मागणी वाढू लागली आणि मग शासनाने मुंबईत दरवर्षी दहिहंडीची विशेष सुट्टी सुरु केली. यावर्षीही दहीहंडीची सुट्टी जाहिर झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गोविंदांचा उत्साह मात्र पार मावळला आहे.
          मी 1996 मध्ये मुंबईत नोकरीनिमित्त स्थायीक झालो. 1997 साली मी पहिली गोकुळाष्टमी मुंबईत पाहिली. ट्रक भरभरुन गोविंदा उत्साहाने येत होते उंच उंच थर लावून ती हंडी फोडायचा प्रयत्न करायचे. काहीजण यशस्वी व्हायचे तर काहीजण फक्त सलामी देऊन पुढच्या हंडीकडे गोविंदा वाजतगाजत रवाना व्हायचे. काही मंडळे मोठमोठ्या सेलिब्रेटींना निमंत्रण असायचे पण गर्दीला आकर्षण असायचे ते फक्त गोविंदाचे. वर्षानुवर्षे हा उत्सव मी मुंबईत उत्साहाने साजरा होताना पहातोय.
   माझे बालपण तसेच महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतचा संपूर्ण कालावधी तळकोकणात वेंगुर्ले शहरात गेला. त्यामुळे असेल गोकुळाष्टमी आली की माझी नजर घराघरात कुठे श्रीकृष्ण च्या मूर्तीचे पूजन होते का याचा शोध घ्यायची. काही वर्षानंतर माझ्या लक्षात आले की श्रीकृष्ण जयंतीला घराघरात श्रीकृष्णाच्या शाडूच्या मूर्तीची पूजा करण्याची परंपरा जशी आमच्या जिल्ह्यात आहे तशी इतरत्र नाही.
        गोकुळाष्टमी जवळ आली की वेंगुर्ले बाजारात श्रीकृष्णाच्या विविध आकाराच्या मुर्त्या बाजारात विक्रीस उपलपब्ध होतात. लाडू हातात असलेला बालकृष्ण, गायीला टेकून उभा असलेला बासरीवाला श्रीकृष्ण अशा विविध आकर्षक मुर्त्या सर्वांचे लक्ष वेधून घेतात. काहीजण गणपतीसारखा श्रीकृष्णाच्या मूर्तीसाठी पाट मुर्तीकाराकडे देतात. गोकुळाष्टमीला संध्याकाळी ब्राम्हण येऊन यथासांग श्रीकृष्णाची पूजा करुन जातो. सर्व सणाप्रमाणे याही सणाला नैवद्य वैशिष्ठपूर्ण असतो. शेगल्याच्या पानाची भाजी, भाकरी/आंबोळ्या/घावणे, काळ्या वाटाण्याची ऊसळ आणि पोहे.
          दुस-या दिवशी वेंगुर्ल्यात काही ठिकाणी पारंपारीकरित्या दहीहंडी साजरी व्हायची. संध्याकाळी पारंपारीक रित्या विहिरीत श्रीकृष्णाच्या मुर्तीचे विसर्जन करण्यात येते. आम्ही लहान असताना आमचा बालगोपाळांचा या दोन दिवसांच्या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग असायाचा. जवळच उपलब्ध असणा-या साधनसामुग्रीमधून डेकोरेशन आम्ही बालगोपाळ मंडळीच करायचो. पाटावर करवंट्या ठेवून त्यावर शेवाळ पसरवून छोटे छोटे डोंगर तयार करायचो आणि त्यांचे मध्ये हातात लाडू घेतलेला बालकृष्ण फारच मनमोहक दिसायचा. दुस-या दिवशी विसर्जनाच्या वेळी मन भरुन यायचे. विर्सजनानंतरही कित्येक दिवस विहिरीच्या तळाशी दिसणा-या बालकृष्णाकडे  आम्ही विहीरीत डोकावून पहात बसायचो. आणि नकळत अश्रूंचे थेंब त्या पाण्यात कधी मिसळून जायचे कळायचेच नाही. मग काही दिवसांनी बाप्पांच्या आगमनाचे वेध लागायचे आणि आम्ही पुन्हा बाप्पाच्या तयारीत दंग होऊन जायचो.
          कामाच्या व्यापामुळे दरवर्षी गोकुळाष्टमीला वेंगुर्ल्याला जाणे शक्य होत नसे. आणि आपल्या भागात वैशिष्टपूर्ण असलेली श्रीकृष्ण जयंती  नवी मुंबईत राहत्या घरी साजरी करायचा मी प्रयत्न करायचो. वेंगुर्ल्या सारखी शाडू मातीची मूर्ती काही इथे उपलब्ध व्हायची नाही. यातून मार्ग काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या वापरुन मी राहत्या घरी दरवर्षी श्रीकृष्ण जयंती साजरी करायचो. एकेवर्षी ठरवलेच यावर्षी गोकुळाष्टमीला वेंगुल्यावरुन श्रीकृष्णाची मूर्ती आणायचीच.
         अष्टमीला अजून बराच  कालावधी होता. शनिवार रविवार सुट्टी बघून मी जनशताब्दीची तिकीट काढली. फोन करुन मुर्तीकाराला माझ्यासाठी एक श्रीकृष्णाची मूर्ती तयार ठेवायला सांगितली. सर्व जय्यत तयारी झाली होती. आणि मी नियोजित दिवशी जनशताब्दीने कुडाळला जायला निघालो. पावसाळा असल्याने गाडी थोडी उशीरानेच पोचली कुडाळला. तिथून वेंगुर्ल्याला पोहचेपर्यंत संध्याकाळ झाली होती. संध्याकाळी मूर्तीकाराकडे गेला असता अष्टमीला अजून सातआठ दिवस असल्याने मुर्त्यांचे रंगकाम झाले नव्हते. दुस-या दिवशी दुपारी मला मुंबईला परतायचे होते.
          पावसाळा असल्याने जनशताब्दीची वेळ ही लवकरची होती. मला अन्यकाही काम असल्याने सकाळी लवकर बाहेर पडून तीथूनच कुडाळला ट्रेन पकडाची होती. सकाळी लवकर मुर्ती तयार असणे शक्य नव्हते त्यामुळे मूर्तीकाराने दुपारी ट्रेनच्या वेळेत कुडाळ स्टेशनला मूर्ती पोहोच करायचे आश्वासन दिले. ट्रेन सुटायच्या अर्धा तास अगोदर माझ्या भाचीने श्रीकृष्णाची मूर्ती माझ्या हातात आणून दिली. नियोजित वेळेत ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली. आता लोकांच्या गर्दीतून मूर्ती सुरक्षित कशी न्यायची या विंवचनेत मी होतो. जनशताब्दी मध्ये सीटची रचना बससारखी त्यात अस्मादिकांची शरीरयष्टी स्थूलतेकडे झुकणारी (स्थूलतेकडे झुकणारी ही आपली मनाची समजूत, खरतर अत्यंत स्थूलच) कशीबशी बसायला सुध्दा ती सीट पुरत नाही. मग ही मूर्ती आता सांभाळून न्यायची कशी या काळजीत मी मूर्ती हातात सांभाळून धरत ट्रेनमध्ये चढलो आणि माझ्या सीटचा शोध घेऊ लागलो. माझी सीट पाहिल्यावर माझा आनंद गगनात मिळेनासा झाला. जनशताब्दीच्या डब्यात मध्यभागी डायनींग टेबलसारखी रचना असते आणि दोन्ही बाजूला सीट असते, ती वींडो सीट माझी होती. त्या टेबलवर छान पैकी बालकृष्ण विराजमान झाले आणि आम्ही व्यवस्थित घरी पोचलो.
       त्यानंतर दरवर्षी तळकोकणातील पारंपारीक गोकुळाष्टमी मी माझ्या नवी मुंबईमधील घरी साजरी करु लागलो.
– संजय गोविंद घोगळे (8655178247)

 

Leave a Reply

Close Menu