खूप गहन प्रश्न असतो हा. अनेकदा या अनुषंगाने तिचं शाळा कॉलेजातलं यश, तिने कधीकाळी मांडलेले मुक्त विचार आणि असं बरंच काही चर्चेत येतं. हे आत्ता आठवलं कारण काही विशेष गोष्ट घडली की साधारणत: विचारला जाणारा प्रश्न, कुठे गेल्या रे त्या दहावी बारावीत नव्वद पंच्चाण्णव टक्के मिळवणाऱ्या मुली वगैरे वगैरे. कोणीही यावं, टिचकी मारून जावं असे शब्द असतात हे.

      ती, पूर्वी बऱ्यापैकी हुशार, तरतरीत, मनमिळावू वगैरे. पण असं काहीतरी होतं आणि ती पडद्या आडच जाते. म्हणजे काय होतं लग्न……का? मी बारकाईने पाहिलंय की फक्त लग्न हे एकमेवच कारण नसतं. अनेकदा ती आपसूकच जबाबदारी घेते खांद्यावर. हे अगदी आजचंच नाहीय पूर्वापार आहे. पूर्वीचेही अनेक सिनेमे, कथा, कादंबऱ्या या सूत्रावर आधारित असलेल्या दिसतात. तिने कुटंबाची मुख्यत: घराची जबाबदारी घ्यायची हे आदिम काळापासून घडत असल्याने सगळ्यांचं तसंच मत तयार झालंय तिच्यासहीत. बघा नं, शिवधनुष्याशी खेळणारी सीता सोनेरी हरीण दिसल्यावर स्वत: नाही गेली, रामालाच हाक मारली तिनं. किती वर्षांचं कंडिशनिंग आहे तिचं घर सांभाळायचं.

     आदिम काळापासूनच जेव्हा मानव जेव्हा गुहेत किंवा राहुट्या उभारून वगैरे राहू लागला असेल तेव्हापासून हा विचार किंवा ही पद्धत रुजली असेल. यासाठी काही कारणं मला सहजच दिसतात. पहिलं म्हणजे मासिक पाळी आणि ती आल्यावर उद्भवणाऱ्या समस्या. दुसरी म्हणजे गरोदरपण आणि बाळंतपण यावेळी घ्यावी लागणारी खबरदारी आणि संरक्षण आणि तिसरं म्हणजे स्तनपान. बाळाचं पोट भरण्याची जबाबदारी पूर्णपणे स्त्रीवर असण्याच्या काळात तिला बाहेर जाणं शक्यच नाही असा विचार रुजणं अत्यंत नैसर्गिेक आहे. यातून सुरु झालेली ही पद्धत, हा विचार पुढे लैंगिक संबंधांमध्ये मोकळीक हरवल्यानंतरच्या काळात स्त्रीचं लैंगिक संरक्षण यासाठी तिने घरातच राहणं कसं बरोबर आहे वगैरेपर्यंत येऊन पोहोचला असेल आणि मग हळूहळू तिच्याभोवतीचं कुंपण ते विचारांचं असो वा तिच्या आचार आणि विहारांवर मर्यादा आणणारा असो आपोआपच रुजत गेला असेल. त्यातून तिने स्वत:ला दुय्यम मानण्याची सुरुवात होणं स्वाभाविक आहे.

     साधारणत: सत्तरच्या दशकांत संक्रमण काळ सुरु झाला. साहित्य आणि कलाकृतींमधून स्त्रियांच्या स्वातंत्र्याची कल्पना मांडली जाऊ लागली आणि स्त्रियांच्या मनातवरही फुंकर मारली गेली. तिने शिकायला हवं आणि ते शिक्षण चालू ठेवण्यासाठी तिने चांगले गुण मिळवले पाहिजेत, शाळेत सतत चमकत राहिलं पाहिजे ही तिची गरज बनली. श्री. प्रकाश नारायण संत यांच्या वनवास या कुमारवयीन मुलांसाठीच्या पुस्तकात लंपन हा कुमारवयीन नायक, त्याला गणितात, भूगोलात कमी गुण पडले तर तो ते कबूल करतो आणि इतर गोष्टी सांगू लागतो पण त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी त्याची मैत्रिण सुमी मात्र परीक्षेत चांगले गुण मिळावेत म्हणून सरस्वती…….सरस्वती असा हजारवेळा जप करते. यातूनच मुलींना वाटणारं गुणांचं महत्त्व आणखी ठळकपणे उठून दिसतं. मुलांना गुण कमावण्याबाबत काही गरज वाटत नसावी किंवा वयाच्या वाढीचे टप्पे मुलांना शाळेमध्ये तेवढं प्रगल्भ बनवत नाहीत त्यामुळेही असेल पण मुलं मुलींएवढं गुणांना नाही देत महत्त्व हे मात्र खरं

     मग आता काय होतं. हे असे तयार झालेले विचार आणि नवी विचारसरणी म्हणजे तिने बाहेर पडलं पाहिजे, तिला स्वत:ची ओळख असली पाहिजे, तिचा स्वआदर तेव्हाच वाढेल जेव्हा ती मिळवती असेल. या दोन्ही विचारांमध्ये ती सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न करते. ही सुवर्णमध्य काढण्याची वृत्ती ही पूर्वापार चालत आलेली. गांधारीची डोळ्यांवरची पट्टी किंवा कुंतीचं ‘वाटून घ्या’ हे सांगणं हे त्याचंच उदाहरण आहे नाही का? तर आत्ताही ती तसंच करते, आपलं घर सुरळीत चालतं राहावं, आपलं कुटुंब सुखी असावं आणि आपणही मिळवतं व्हावं, आपल्याला समाजात एक स्थान असावं, आपला स्व आदर अबाधित राहावा बरोबरच आपलं सामाजिक स्थानही उंचावलेलं राहावं म्हणून जवळपास जी काही तुटपुंज्या पगारातली नोकरी असते ती, ती स्वीकारते. खाजगी कंपन्यांनी, संस्थानी हे कमी मोबदल्यात हमखास उपलब्ध असणारं मनुष्यबळ अचूक हेरलं आहे. बरं, हिला मुळातच जबाबदारीची शिकवण वर्षांनुवर्षं मिळालेलं त्यामुळे कामात कुचराई करणं, काम टाळणं, वगैरे वृत्ती हिच्यामध्ये तुलनेने कमी असते त्यामुळे ती मग अशी अल्प वेतनाची चाकरी करत राहते. इथे मी चाकरी हा शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे. बरं, याचं स्पष्टीकरण देताना माझी एक मैत्रिण म्हणाली, अग, तुला माहीत आहे का एवढी मोठ्ठी फिल्म इंटस्ट्री त्यातही हिरॉईन्सचं मानधन हिरोपेक्षा कमीच असतं. हे कोणतं तर्कशास्त्र, मला काही समजलं नाही.

     असो म्हणून सोडून देण्याएवढी साधी गोष्ट ही नक्कीच नाहीय. कारण अशा या नोकऱ्यांमधील सत्य हे अगदी उघड सत्य असतं. पण आपणच घरी राहत संसार करणाऱ्या बाईला सहज म्हणतो, ती काही करत नाही किंवा ती जेव्हा म्हणते की मी काहीच करत नाही, घरीच असते तेव्हाही आपण तिला टोकत नाही. बारीकसारीक नोकरी करणाऱ्या तिच्यावर, तिला मिरवायची आवड आहे, घराबाहेर पडलं की नाव येतं बरं पेपरात, घराची कामं टाळण्याचा बहाणा आहे हो या नोकऱ्या म्हणजे असे काही कमेन्टस् सार्वत्रिक नाहीत तरी कूजबूज म्हणून जसे मी ऐकलेत तसे तुम्हीही ऐकले असतीलच. मग ही कुजबुज करायला आपल्याला आवडते तर आपण तिला तू घरीच राहिलीस तरी गृहस्वामिनी आहेस आणि चांगली सून होणं, आई होणं हे कोणत्याही नोकरीपेक्षा कमी नाही हे स्वीकारण्यासाठी मदत करणं हे करू शकत नाही का.

     अजून एक सांगावंसं वाटतं, ती काय करते याची चर्चा करण्यापेक्षा, ती काय करू शकते, तिला काय करायला आवडतं, तिच्यामध्ये काय करण्याची क्षमता आहे याबाबतची जाणीव तर तुम्ही तिला करून देऊ शकता नाही का आणि तिने ते करावं यासाठी शक्यतोवर तुम्ही तिला सहाय्य करू शकता. अगदी सहाय्य करता आलं नाही तर चेष्टा किंवा कुचेष्टा टाळू शकतोच ना आपण. उगाचच उत्तम घर सांभाळणाऱ्या स्त्रीला “हिची कसली हो नोकरी, पोळ्या करण्याची” असं म्हणून न हिणवण्याची खबरदारी आपण घेतली तरी खूप झालं.

     सगळेच असे निश्चितच नसतात, कारण परवाच आमच्या एका ग्रुपवर कोणीतरी कोणाला म्हटलं, सध्या काय करतेस, ती म्हणाली “काही नाही हाऊस वाईफ आहे. तर तो लगेच म्हणाला,”मग मीही मला हाऊस हजबंड म्हणायला हरकत नाही” म्हणूनच तर म्हणतात True life is such where tiny changes happen.

– मेघना जोशी, 9422967825

Leave a Reply

Close Menu