विघ्नहर्त्याच्या आगमनाची पूर्वतयारी

कोरोनासारख्या महामारीचे विघ्नसमोर असतानाही विघ्नहर्त्याच्या पूजनासाठी आकर्षक व सुबक गणेशमूर्ती बनविण्यात सर्व मूर्तीकार गुंतले आहेत. विघ्न कितीही मोठे असले तरी विघ्नहर्त्याचे पूजन हे होणारच अशा भावनेने गणेशभक्तांनीही घरोघरी गणपतीच्या स्वागताची तयारी सुरु केली आहे.

    गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण. यानिमित्ताने घराबाहेर असलेले सर्वजण एकत्र येऊन हा सण मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्याची रितच प्रत्येक घरात पहायला मिळते. यावर्षी कोरोनारुपी विघ्नया सणासमोर उभे ठाकले आहे. गणेश चतुर्थी सणाची पूर्वतयारी ही सर्व शाळांमध्ये गणेशमूर्ती घडविण्यापासून सुरु होते. तशी यावर्षीही ती सुरु झाली. परंपरेप्रमाणे भक्तमंडळींनी आपापल्या गणपतीचे पाट दिल्यानंतर त्यावर गणपतीही बनविण्यात आले आहेत. दरम्यान, अवघ्या काही दिवसांवर गणेश चतुर्थी येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला तालुक्यासह शहरांमधील मूर्ती शाळांमध्ये धावपळ दिसून येत आहे. काही शाळांमध्ये एकाबाजूला गणपतीचे मातीकाम सुरु आहे तर एका बाजूला गणपती रंगविण्यास सुरुवात झाली आहे. मोठमोठ्या शाळांमध्ये गणपतीची रेखणीही झाली आहे. काही दिवसांपूर्वी वादळी वा-यासह मुसळधार पाऊस पडला. यात विजेचाही खेळखंडोबा झाला. पण गणेशमूर्तीचे काम न थांबवता अशाही परिस्थितीत काम सुरु राहिले.

गणेशमूर्तीच्या उंचीत बदल

    गणेश चतुर्थी म्हटली की, स्वतःचा गणपती हा इतर गणपतींपेक्षा वेगळा हवाच, आकर्षक रंग, खडे, हिरे, दागदागिन्यांनी मढवलेला असो किवा गणपतीची उंची असो, असा हट्टच या भक्तांमध्ये दिसून येतो. यावर्षी मात्र, गणपतीच्या उंचीवर परिणाम झाला आहे. सुमारे ७ ते ८ फुट उंची असलेल्या गणपतीची उंची यावेळी ३ ते ४ फुटावर आली आहे. त्यामुळे उत्तरोत्तर गणपतीची उंची वाढविणा-या किवा त्यांच्या परंपरेनुसार दरवर्षी ठराविक मोठ्या उंचीच्या गणपतीचे पूजन करणा-या भक्तमंडळींतून नाराजी दिसून येत आहे.

ताळमेळ बसणे कठिण

         दिवसेंदिवस मातीचे, रंगाचे तर इतर साहित्याचे दर वाढत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी गणेश मूर्त्यांच्या किमती या ठरविल्या जात होत्या. परंतु यावर्षी कोरोनामुळे सर्वांचीच आर्थिक बाजू संकटात गेली आहे. अशा परिस्थितीत गणेशभक्तांना किती किमत सांगायची असा प्रश्न मूर्तीकारांसमोर निर्माण झाला आहे.

घरगुती साफसफाईला सुरुवात

    विशेषतः कोकणात गणेशोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण घराची झाडलोट केली जाते. अन्य सणांच्या तुलनेत जेवढी साफसफाई केली जात नाही तेवढी साफसफाई या सणात केली जाते. गणपतीच्या स्वागताला जणू सर्व चैतन्यमय होऊन घर उजळून निघण्यासाठी वेळ मिळेल तसा घराघरांमध्ये गृहरचना बदलण्याला प्राधान्य दिले जाते. त्यात कित्येक घरात तर कल्पकतेला वाव देत  घर सजविले जाते. पण यावर्षी संपूर्ण घर जरी रंगविणे शक्य नसले तरी निदान गणपती पूजनाची खोली तरी सुशोभित असावी या हेतूने काही ठिकाणी रंग काढण्याची कामे सुरु आहेत.

निर्जंतुकीकरण तर होतेच…

         पूजापाठ करताना सर्रासपणे कापूर किवा धूप जाळून वातारण निर्मिती केली जाते. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  परिसर निर्जंतुकीकरण करण्यासाठी कापूर आणि धूप यांचाच वापर होत आहे. इतर खबरदारींबरोबरच कापूर आणि धूपाचे महत्त्व समजल्याने त्याचा वापर प्राधान्याने होणार असल्याने कोरोना विषाणूची भिती कमी झाली आहे.

          एकंदरच कोरोनामुळे सर्वांचा उत्साहच मावळला आहे. कामगार कपात, बंद पडलेले व्यवसाय, पगारातील कपात यामुळे जनता मेटाकुटीस आली आहे. तरीही गणपतीचे पूजन करायचे, त्याच्या सेवेत काहीही कमी पडू द्यायचे नाही यासाठी भक्तमंडळींचे प्रयत्न सुरु आहेत.

-प्रथमेश गुरव, ९०२१०७०६२४

 

         – ऋण काढून गणेश चतुर्थीचा सण साजरा करणारा गणेशभक्त यावेळी मात्र, कोरोना रोगाच्या भितीखाली सण साजरा करीत आहे. दरवर्षी अमूकच गणपती हवा असा हट्ट धरणा-या भक्तांनी यावर्षी साधेच गणपती सांगितले आहेत. अशा परिस्थितीत आम्हीही आपल्यापरीने जास्तीत जास्त आकर्षक गणपती कसे दिसतील याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. कारण, शाळेतून गणपती घरी घेऊन जाताना भक्तांच्या चेह-यावर असणारे समाधानाचे चित्र आम्हाला पहायाचे आहे.                              

                                              -सुदर्शन कुडपकर, ज्येष्ठ गणेश मूर्तीकार (भटवाडी)

——————————————————————————————————————————————————————

        – जुन्या रितीरिवाजानुसार दरवर्षी आमच्याकडे साधारण ६ फुट उंची असलेली भव्यदिव्य अशा गणेशमूर्तीचे पूजन करतो. सालाबाद ११ दिवस असला तरी अंगारकी संकष्टी आल्यास किवा अन्य हेतुप्रित्यर्थ १७ किवा २१ दिवसांपर्यंत आम्ही त्याची भक्तिभावाने सेवा करतो. यावर्षी मात्र, कोरोनामुळे गणेश मूर्तीची उंची ४ फुटांवर आणली आहे. उंची कमी करणे हे आम्हाला जरी पसंद नसले तरी शासनाच्या नियमांचे व अटींचे पालन करणे हे आमचे कर्तव्य आहे.                                                                                                                                   – रेडकर बंधू (राऊळवाडा)

——————————————————————————————————————————————————————

    आपल्या संपूर्ण कोकण प्रांतामध्ये पुरोहितांबद्दल पूर्ण विश्वास व अतीव आदर आहे. कोरोना महामारीच्या या संकट काळात तर आपले पूर्वीपासून परंपरेने चालत आलेले पूजा अर्चा करण्याचे कार्य पुरोहितांनी एक आव्हान म्हणून स्वीकारावे. स्वतःची आणि यजमानांची काळजी घेताना शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करत ही जबाबदारी पार पडायची आहे.सर्व पुरोहित बांधवानी सॅनिटायझरचा वापर करणे, सतत मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, यजमानांच्या घरातील कोणत्याही वस्तूला हात न लावणे, या गोष्टींचे पालन करुन आपले कर्तव्य पार पाडावे. ही वेळ अतिशय कठीण परीक्षेची आहे. परंतु विघ्नहर्त्या गजाननाच्या कृपेने सर्वांच्या व प्रशासनाच्या परस्पर सहकार्याने आपण सर्वजण यात नक्कीच उत्तीर्ण होऊ अशी मला खात्री आहे. हे संपूर्ण जग कोरोनाच्या मगर मिठीतुन मुक्त होऊन मोकळा श्वास घेऊ दे हीच गणराया चरणी प्रार्थना.

अरुण गोगटे, अध्यक्ष-वेंगुर्ला तालुका ब्राह्मण मंडळ.

 

Leave a Reply

Close Menu