माझा बाप्पा

सकाळी सकाळीच भूपाळीचे मधूर सुर कानी पडतोय. अगरबत्तीचा दरवळ अवघं घर व्यापून पसरलाय. घरात लगबगीनं कामं चाललीत. ओटा आणि देवघर शेणानं सारवून झालंय. त्याचा निराळाच गंध घरभर पसरलाय. देवघरातून येत असणारा समईचा मंद प्रकाश देवत्त्वाची चाहूल देवून जातोय. मग मध्येच वाटतंय, की पांघरुण झटकून द्यावं आणि लागलीच त्या दिव्य गोष्टीला बघण्यासाठी देवाच्या खोलीत पळत जावं. पण छे! रात्रीची आरत्या भजनं एवढी अंगावर आलेली असतात, (त्याहीपेक्षा पावभाजीच जास्त अंगावर येते.) की पायच काय, डोळ्यांच्या पापण्याही वर उचलायला गेलं की टाहो फोडतात. मग आमची प्रातःकाळ व्हायला कधीकधी दुपारचे बाराही वाजतात. तोपर्यंत बाप्पाच्या आरत्या आणि आज काय बरे मिळणार भजनाला (नि भोजनाला), याचाच विचार चाललेला असतो. हो ना…? सर्वांची जवळजवळ अशीच अवस्था झालेली असते. म्हणजे माझी तर व्हायची. बाप्पाचे अकरा दिवस असेच मौजमजेत आणि गुण्यागोविंदात जायचे. बाप्पा कधी यायचा कधी जायचा, काहीच समजायचं नाही. दिवसभर धामधूम आणि अनंत चतुर्दशी झाली की सगळं सामसूम. बाप्पा असा आनंद घेऊन यायचा आणि जाताना मात्र आम्हा बच्चेकंपनीचं मन घेऊन जायचा. पण परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, असं म्हणतात. कालमानानुसार हे इथंही घडलं आणि बाप्पा वेगवेगळ्या रुपात माझ्यासमोर अवतरत गेला.

       असं म्हणतात, की देव चराचरात आहे. खरंय ते. देव सगळीकडे असतो. आपण त्याला ओळखलं, की तो आपल्याला दर्शन देतो. आमची आजी असंच म्हणायची. म्हणून मी लहानपणी सगळीकडे देव शोधत फिरत असायचो. कुठे पडका वाडा दिसला, कुठे भलंमोठं वडाचं झाड दिसलं, की त्याला हात जोडायचो. असं देवाचं आणि माझं नातं अगदी घट्ट झालेलं होतं तेव्हा. माझ्या बालपणात आमचं घर मातीचं होतं. त्याला एप्रिल- मे मध्ये बाहेरून गिलावा काढून झालेला असायचा. उरलेला गिलावा आणि आतल्या भिंती रंगवायला दोन दिवस लागायचे. मग बाप्पा यायच्या आदल्या दिवशी मंडपीचं, तोरणांचं डेकोरेशन करून व्हायचं. मग शेवटी बाप्पाच्या मागे कमळ मोडायला अगदी बारा-एक वाजायचे. (तिथूनच माझी चित्रकला काहीशी सुधारत गेली.) मग दुस-या दिवशी लवकर उठत आंघोळ करुन नवीन ड्रेस घालायचा आणि फटाक्यांचा बॉक्स घेऊन बाप्पाच्या शाळेत धूम ठोकायची. जाताना रिकाम्या असलेल्या पाटावर बाप्पा विराजमान होऊन यायचा आणि मग यथासांग पूजाअर्चा करून आपल्या सिंहासनावर डौलात जाऊन बसायचा. तो ११ दिवस तिथून हलायचाच नाही.

        आमची बच्चेकंपनी मग कमालीची सक्रीय व्हायची. कुठे काय बेत शिजतोय, याचा वास आम्हाला अचूक लागायचा. मग तिथं धाड पडणं साहजिकच. लाडू, मोदक, घावणे, वडे, खीर, पढ-या वाटाण्याची उसळ आम्हाला अतिशय प्रिय. म्हणजे ती बाप्पालाही होतीच हा. तसंही मोठी माणसं म्हणायची, ‘देव ह्या ल्हान पोरांतच असता रे.मग देवबाप्पाचा अवतार आमच्या टोळीतल्या कुठल्यातरी अवतारात घुसायचा आणि आम्ही मग त्याच्या ताटात घुसायचो. आरती, भजनं यांची चलती असायची. पण त्याकाळात एक भीतीही मनात घर करुन असायची. आपण जर खोटं बोललो, तर बाप्पा स्वप्नात येऊन आपला कान कापतो. एकदा तर खरोखरच बाप्पाने कान कापला होता माझा, स्वप्नात. मग खाड्कन उठून आईला सांगितलं, की बाप्पाच्या नैवेद्यातला एक मोदक मीच खाल्ला होता गं. असं असलं तरिही बाप्पा आमचा मित्र होता. त्याच्यामुळे का होईना, आम्हाला मौजमजा करायला सुट्ट्या तर मिळत होत्या ना…!

      जसजशी वर्षे वाढत गेली, तसतसं ज्ञान वाढत गेलं. बाप्पाची ढठ्ठथ्र्त्थ्न्र् समजली. त्याचे आई बाबा म्हणजे शंकर आणि पार्वती हे तिकडे कैलासावर असतात आणि कैलास हा तिकडे हिमालयातला एक पर्वत आहे. नंतर समजलं, की तिकडेच जगातला सर्वांत मोठा पर्वत माऊंटएव्हरेस्ट ही आहे. गणपती तिथून निघतो, तो थेट आमच्या कोकणात येऊन थांबतो. इथे अकरा दिवस मुक्काम करुन परत आपल्या घरी जायला निघतो. म्हणजे आपण जसे मामाच्या गावी जातो, तसाच आपला बाप्पाही इथे आपल्या मामाच्या घरी येत असेल का? म्हणजे कोकणातल्या कुठल्यातरी गावात आपल्या गणपती बाप्पाचं आजोळ असायला हवं. असा बालसुलभ प्रश्न आमच्या मनात यायचा. पण हळूहळू बाप्पा देव आहे, तो सगळीकडे येतो. मूर्तरुपातून गेला तरी सुक्ष्मरुपात तो आपल्या जवळच कुठेतरी असतो. त्याला प्रेमानं हाक मारली, की तो विनाविलंब आपणाला देतो, हे ज्ञान होत गेलं.

      आता बाप्पाची आणि माझी मैत्री अगदी घट्ट झाली होती. जे मी कोणाशीच बोलू शकत नसायचो. स्वतःतच गुरफटून गेल्यासारखं झालं होतं माझं. स्वमग्नतेत दिवस चालले होते. खुप एकटं एकटं वाटायचं. या काळात खुप काही गमावलंय मी. माझी स्वप्न बदलली. ध्येय तसं सापडलं नव्हतं अजून. त्यामुळे त्याचं काय झालं, सांगता येत नाही. पण या पडझडीच्या काळात माझा एकमेव जवळचा मित्र बनला, तो माझा लाडका बाप्पा. त्याच्याशीच मी सारं काही बोलायचो. या काळात आरती, मंत्र, गणपतीस्तोत्र, शिवलीलामृत यासारखी पुस्तकं, ग्रंथ हातात पडले आणि मीही ते अधाशासारखे वाचून काढले. देवांविषयी आकर्षण निर्माण झालं आणि खरंतर तेव्हापासूनच मला कवितेची आवड निर्माण झाली.

       वाचनाचा, लिखानाचा छंद जडला. आज त्याच आधारे मी हे लिहू शकतोय. विद्येचा देव असणारा गणेश असा माझ्या सहाय्यास धावून आला. वाचनाची लागलेली आवड मग मला स्वस्थ बसू देईना. जे हातात पडेल ते काहीही वाचून संपवायचं, एवढाच एक वेडा ध्यास घेऊन वाचन सुरु झालं. निरनिराळी पुस्तकं वाचनात आली. वेगवेगळे विचारवंत वाचून काढले आणि डोक्यात मग विचारांचं वादळ सुरु झालं. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, असं म्हणतात. एक बाजू माझ्या नजरेसमोर होतीच. आता नाणं पलटू लागलं होतं. नाण्याची दुसरी बाजूही तितकीच ठळकपणे नजरेसमोर येऊ लागली होती. जे दिसतं, ते नसतं, या उक्तीप्रमाणे आता मलाही काहीतरी निराळं दिसून येऊ लागलं. यात जशा अनेक गोष्टी होत्या. तशीच एक गोष्ट अगदी माझ्या जवळची होती आणि ती म्हणजे, माझा लाडका बाप्पा…गणेशा…

      वेगवेगळे संदर्भ आता जोडले जावू लागले. वैदिक, आर्य, द्रविड, यक्ष अशा संस्कृतीत बाप्पा निरनिराळ्या अवतारात दिसू लागला. तिकडे भारताबाहेरचेही याचे संदर्भ सापडू लागले. आता मोरयाचा संदर्भ थेट इतिहासातल्या चंद्रगुप्ताशी जोडू लागलो. गण-पतीम्हणजे गणराज्यांचा सम्राट. चंद्रगुप्ताने सा-या गणराज्यांवर विजय मिळवला होता. म्हणून त्यालाही गणपती म्हणायचे. अजून दुसरा एक धागा सापडला. गणपतीचं वाहन आहे मुषक म्हणजे उंदीर. त्यावर तो बसतो. म्हणजे त्या उंदरावर त्याने जय मिळवलाय. सापाला तो कंबरेला बांधून असतो. म्हणजे तोही त्याच्या अंकीत झालेला. शंकराचंही तसंच. त्या दोघांचंही एकंदर रुप पाहिलं, तर या दोन्ही कृषीदेवता. म्हणजे वेगवेगळी प्रतिकं योजून माणसानंच या देवांना तयार केलंय. अजून एक संदर्भ जोडताना असं आढळतं, की गणेशाचा शंकराने शिरच्छेद केला आणि त्याला जीवंत करण्यासाठी एका हत्तीला मारुन त्याचं शिर लावलं. आता प्रश्न पडला, की गणपती हा माणूस आहे, देव आहे की प्राणी…? विचारांचं काहूर माजलं आणि मनात एका वेगळ्याच बाप्पाने अवतार घेतला. हा बाप्पा देव नव्हता. तो एक निराळाच काहीतरी होता. ज्याला रुप नव्हतं, शरीर नव्हतं, आकारही नव्हता आणि हाच बाप्पा खरा होता. कारण तो ओंकार होता. चराचरात सूक्ष्म रुपात भरून उरलेला. श्वासागणिक आपल्या आत उतरत जाणारा आणि उच्छश्वासाद्वारे पुन्हा चराचरात पसरत जाणारा.

      आता बाप्पाचं देवपण माझ्यासाठी तरी संपून गेलंय. कारण तो माझा अगदी प्राणालिकडचा काहीतरी बनलाय. ज्याला नाव देता येणार नाही, ते अनामिक नातं जुळलंय आमचं. मी गल्लोगल्लीत चाललेल्या मूर्तीपुजेला मानत नाही. कोणाचा अंध भक्तही नाही. अंधश्रद्धाळूही नाही. पण ज्या ठिकाणी आपलं चित्त लीन होऊन जातं, जिथं आल्यावर मनाला आत्मिक समाधान प्राप्त होतं, जगायची नवी उमेद निर्माण होते, ती प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी देव आहे. मग ते आईबाबा असोत की माझा बाप्पा असो.

     आता ध्वनीप्रदूषण करणारे फटाके मी फोडत नाही. खोटं बोलल्यावर बाप्पा कान कापतो, ही अंधश्रद्धा असल्याने पाळत नाही. पण श्रद्धा म्हणून बाप्पा कुठूनतरी मला बघतोय आणि जर माझी पावलं चुकली, तर साम-दाम-दंड-भेद या चतुर्थीनुसार तो मला शिक्षा करेलच, हा विश्वास मला आहे. कारण आभाळातल्या एका ग्रहाकडे बोट दाखवून तो बघ, वर दिसतोय ना, त्याला चांदोमामा असं म्हणतात. असं म्हणत नकळत त्या अजैविकाशी नातं जोडणं, इतकं सोप्प असतं आपलं आयुष्य. म्हणूनच बाप्पा आहे. तो प्रत्येकातच असतो. आपण आपल्यात डोकावलं, की हा दिसतोच दिसतो. त्याचे अवतार अनेक असतील, नावं निराळी असतील. पण आपला जर त्याच्यावर दृढ विश्वास असेल, तर तो पावतोच. मग तो लालबागचाच हवा, असं नाही. आपल्या घरातलाही चालतो. शेवटी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातलं अंतर समजायला बाप्पाचीच मदत लागते. कारण तो बुद्धीचा देवता आहे ना…!

      असा माझा बाप्पा. तुमचा, त्यांचा सगळ्यांचा बाप्पा. आता पुन्हा आपल्या घरी येणारेय. त्याच्या किर्तीला जागून त्यानं सा-या विघ्नांचं हरण करावं, हिच आमची इच्छा. बोला, गणपती बाप्पा… मोरया….

श्रेयश शिंदे. कळसुली, ९४०४९१७८१४

Leave a Reply

Close Menu