कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गणेशभक्तांना आपल्या गावी जाऊन प्रतिवर्षाप्रमाणे उत्सव करणे कठीण झाले आहे. त्यामुळे व्रतामध्ये खंड पडला तर एखादे अरिष्ट तर कोसळणार नाही ना, अशी वृथा भिती अनेकांच्या मनात डोकावते आहे. मुळात भाद्रपदातला हा उत्सव, श्री गणेशाचे पूजन आपण आहोत त्याच ठिकाणी राहून करण्यास कोणतीही हरकत नाही. आपण जर गणेशभक्त आहात तर श्रीमोरयाचे पूजन करणे याचेच महत्त्व अधिक आहे. ते आपण कोकणात येऊन गेले काय, अथवा आत्ताच्या अपरिहार्य परिस्थितीत आहात तिथेच राहून केले काय, श्री मोरया हे आपल्या भक्ताच्या सेवेने प्रसन्न हतात.

      मंदिरांमध्ये केल्या जाणा-या व्रतांमध्ये स्थान महात्म्याचा विषय येतो. खरे तर कोकणी माणूस गणेशोत्सव साजरा करतो तो पारंपरिक उत्सव म्हणून. सांप्रदायिक व्रत म्हणून गणेशोत्सवाकडे अगदी अपवादात्मक कुणी पाहत असेल तर! आता येथे पहावे लागेल की, व्रत हे काय आहे आणि उत्सवाचे स्वरुप म्हणजे काय? गावाला गेलेच पाहिजे हा अनेकांचा आग्रह जो दिसतो तो भक्तिपेक्षा भिती या भावनेकडे अधिक झुकणारा आहे.

      भाद्रपदातला गणेशोत्सवाची एक दैदिप्यमान परंपरा कोकणात आहे. त्याचा सर्वांनाच अभिमान आहे. पण सध्याच्या स्थितीत त्याचा फार आग्रह धरु नये, कारण सध्याची परिस्थिती फार विचित्र आहे. शिवाय, आपण आहोत तिथेच हा उत्सव साजरा केला तरी चालू शकेल, ही वस्तुस्थिती आहे हे नीट समजून घ्यावे.

      मुळात भाद्रपद गणेश पूजनाचे व्रत हे माता पार्वतीने मांडलेले व्रत होय. ग्रंथकार असे सांगतात की, त्रेतायुगात भगवान श्रीशंकरांच्या घरी भगवान श्रीगणनाथ प्रभूंचा श्री मयुरेश्वर नामक अवतार झाला. त्याचे हे मूळ व्रत होय. विशेष म्हणजे, श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी इतके मोठे व्रत आईसाहेब (देवी पार्वती) करतात. अलिकडच्या काळात महिन्याभराचे पूजन सर्वांना अगदी अशक्यच वाटावे, म्हणून ते भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी या काळात करण्याची पद्धत पडली. त्यातही प्रतिपदा ते तृतीया या तीन दिवसांत, तसेच चतुर्थीच्या संपूर्ण दिवशी उपवासच सांगितला आहे. याचा स्पष्टार्थ असा की, प्रथत तीन दिवशी आपल्या घराच्या देवांसमोर श्रीगणेशपूजन, आरत्या, स्तोत्र पठण करावे. त्यात व्यत्यय नको म्हणून उपवास अशी संकल्पना वा नियम. चतुर्थीला रितसर पार्थिव गणेशाचे पूजन सांगितले आहे. घरात जितके सदस्य असतील तेवढ्यांचा प्रत्येकाचा स्वतंत्र गणपती, प्रत्येकाने आपापल्या मोरयाचे पूजन करावे. त्यांची स्तुती करावी. प्रार्थना करावी. आर्वतेने आरती करावी. प्रभूगुणगान गावे. याच्या त्याच्या घरी जाण्याचा विषयच नाही. सायंकाळीही नाही. त्या दिवशी चंद्रदर्शन चुकूनही झाले तरी मनुष्यावर बालंट येते अशी साधार भितीही शास्त्रकारांनी दाखविली आहे.

      चतुर्थीचे हे व्रत यथासांग पार पडले की, पंचमीला पारणे फेडावे म्हणून उत्तमोत्तम नैवेद्य बनवून दुपारी १२ वाजता श्रींची आरती करावी. श्रींना नैवेद्य अर्पण करावा. तद्नंतर श्रींसाठी मूर्तीविसर्जनाचे मंत्र म्हणून अक्षता अर्पण कराव्यात. मूर्ती किचित हलवावी म्हणजे श्री पुन्हा आपल्या मार्गाने स्वस्थानी रवाना होण्याची प्रक्रिया सुरु! आधीच्या चतुर्थीचे पारणे, पंचमीला भक्तांनी महाप्रसाद सेवन करावा. सायंकाळी यथावकाश मूर्ती विसर्जनास न्यावी. त्यातही वाहते पाणी अगदीच अस्वच्छ असेल तर मूर्ती मोठ्या घंघाळात विसर्जन करावी.

      असे हे सांप्रदायिक श्रीगणेशाचे भाद्रपदी व्रत असून याच्या स्थापनेचा विधी किमान दोन तास चालतो. अनेक गणेश मंदिरांमध्ये हे प्रथेने चालतेच. श्रीगणेशांचे सर्वाद्य क्षेत्र मोरगांव हे असून तेथील श्रीगाणेशी पीठाद्वारे आपण या व्रत पद्धतीचा क्रम जाणून घेऊ शकता.

      याचा विचार करता आपल्या लक्षात येईल की, सध्या जो गणेशोत्सव सर्वत्र साजरा होतो तो एक आनंदोत्सव असून, लोकमान्य टिळकांनी सारा समाज एकवटण्यासाठी याचा पुरस्कार केला. परंतु जनमानसात त्याला हळुहळु हवे तसे बदलविण्यात आले. अगदी दहा-पंधरा मिनिटात मोरयाची स्थापना होते आणि २४ तासाच्या पार्थिव गणेश पूजनाऐवजी ५, , ११, २१ दिवसांपर्यंत हा उत्सव नेण्यात आला आहे. मुळात नसलेल्या गोष्टी परंपरा म्हणून वाढवून ठेवल्या, तर आजच्या महामारीच्या संकटावेळी तरी या सा-या परंपरांचा आपण साकल्याने विचार करण्याची वेळ अनायासे आली आहे हे लक्षात घेऊया.

      कोकणात आलेल्या माणसाने किमान याचा विचार करावा की, तुलनेने उत्तम वैद्यकीय यंत्रणा असणा-या मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, नागपूर या शहरांनी, इटली, अमेरिका, ब्रिटनसारख्या अद्ययावत देशांनी कोरोनासमोर हात टेकले आहेत. हा प्रादूर्भावाचा झंझावात चुकून थोडाजरी कोकणात शिरला तर कोकणातील अपुरी वैद्यकीय यंत्रणा तुम्हालाही वाचवू शकणार नाही व ग्रामस्थही हकनाक जीवाला मुकतील. ही भिती घालत नाही तर वस्तुस्थिती निदर्शन आहे.

      कोकणात साजरा होणा-या गणेशोत्सवात पहिल्याच दिवशी पाच भाज्या, वरण, तिखट आमटी, उकडीचे मोदक आदी पंचपक्वांन्ने हे काहीही गाणपत्य सांप्रदायाला अभिप्रेतच नाही. चतुर्थी असून श्रींसाठी मनोभावे उपवास केला पाहिजे, तो करतच नाही. म्हणजे मुळात आपण व्रतच बाजूला ठेवले आहे. तो गणपती बाप्पा भक्तांच्या या कृतीला पाहून प्रतिवर्षी निश्चितच हसत असेल. आपण व्रत न करता आनंदोत्सव करतो तो एखाद्यावर्षी आपण आहोत तिथेच जरी केला तरी, सर्वांचे मंगल करणारे मंगलमूर्ती मुळीच रागावणार नाहीत. उलट आपला गावीच उत्सव करण्याचा आग्रह अनेकांच्या घरी अंमगल तर करणार नाही ना, याचा चाकरमान्यांनी जरुर विचार करावा. शक्यतो व्रत पद्धतीने उत्सव करण्याचा शुभारंभ करावा. श्रीगणरायाला ते निश्चित आवडेल.                                    – संजय नारायण वेंगुर्लेकर, ९८६९१११८५०

Leave a Reply

Close Menu