सकारात्मकतेचा श्रीगणेशा

यावर्षी नेहमीसारखे काहीच करता येणार नाही…. अगदी गणेशोत्सव ही!! सगळ्यांच्या मनात हेच विचार पिंगा घालतायत! तरीही नियमावली आणि सुरक्षितता पाळून कायकाय करता येईल असा विचार केला तर बरंच काही सुचू शकेल. घरातल्या छोट्या आणि तरुण मंडळींचा उत्साह कायम राहील व ज्येष्ठांच्या तब्येती, मर्जीही राखता येईल. त्याचबरोबर सामाजिक भान व स्वच्छता याकडेही लक्ष द्यावेच लागेल. ही आपली परीक्षाच आहे असं समजुया आणि तयारीला लागूया… तरच बाप्पा आपल्या वरील संकट लवकरात लवकर दूर करेल. शेवटी आपण काळजी घेतली व प्रयत्न केला तरच देव मदतीला धावून येईल. 

        घरच्या घरी असलेल्या वस्तू वापरुन, फुलंपानं वापरुन सजावट करण्यातही मजा आहे. लहान मुलांना यात सामील करून घेतलं तर ती खूष होतील, नव्याने काहीतरी शिकतील आणि पर्यावरण ही मग अजून साथ देईल. प्रसादासाठी साधे पण नवनवीन पदार्थ केले तर गणपतीलाही आवडेल. घरातल्यांनी निवांत बसून एकमेकांना वेळ दिला, सुखदुःखाच्या गोष्टी केल्या तर खूप काही हरवलेलं गवसेल. नवीन स्तोत्रं, आरत्या शिकण्यासाठी ही वेळ उत्तम! देवधर्माच्या, पुराणातल्या काही गोष्टी सांगायला आजीआजोबा केव्हाही तयारच असतात. त्या गोष्टींची सायन्सशी सांगड घालता येते का शोधूया.

        गणपती हे केवळ एक पूज्य दैवत नसून तो कलेचा आणि विद्येचा अधिष्ठाता आहे. सकारात्मक उर्जेचा एक मोठा स्त्रोतच आहे. म्हणूनच तर गणपतीत सगळी काम करायला एवढा उत्साह येतो आपल्याला! आज वेळ आहे ती या सर्व परंपरांकडे, उत्सवाकडे नव्या पद्धतीने पहाण्याची, आपल्या सर्वच देवतांकडे नवसृजनाचे प्रतीक म्हणून पहाण्याची! याचा अर्थ पूर्वापार चालत आलेल्या परंपरेला झुगारून देणं असा नव्हे तर परिस्थिती नुसार त्यात थोडासा बदल करणं…. तेही फक्त या एका वर्षासाठी! अर्धा प्याला रिकामा पेक्षा अर्धा भरलेला आहे असाच विचार करायला बाप्पा उत्तेजन देतो.

      तुम्हा सर्वांबरोबरच मी ही गणपतीची प्रार्थना करते की या संकटातून बाहेर पडण्याचं बळ आम्हां सर्वांना दे आणि पुढच्यावर्षी नुसताच लवकर नाही तर थाटामाटात, धामधुमीत ये बाबा!                               -श्रुती संकोळी, ९८८१३०९९७५

 

This Post Has 3 Comments

  1. खरंच तसंच होऊदे बाबा👍

  2. अगदी खरंय ,तसंच होऊदे बाबा👍

Leave a Reply

Close Menu