कोकणातील नारळाचे अच्छे दिन कधी?

             कोकण किनारपट्टी भागातील रहिवाशांच्या जेवणात नारळहा मुख्य घटक. दैनंदिन जीवनात वापरल्या जाणा-या या नारळावर प्रक्रिया करीत इंडोनेशियाने उद्योगात रुपांतर केले. जगातला पहिला नारळ दिवस२ सप्टेंबरला जकार्ता (इंडोनेशिया) येथे २००९ मध्ये साजरा झाला. या घटनेला आज ११ वर्षे पूर्ण होत आली. कल्पवृक्षांचा प्रदेश म्हणून ओळख असलेले कोकण या क्षेत्रात १ तपानंतर कुठे आहे, याचे सिहावलोकन होणे गरजेचे आहे. लॉकडाऊन दरम्यान, कोकणातील गावाकडे झालेले स्थलांतर आणि नैसर्गिक साधनसंपत्तीतून रोजगार निर्मितीच्या दृष्टीने नारळ हा कल्पवृक्ष ठरु शकेल.

     महाराष्ट्रातही नारळ प्रक्रिया उद्योग भरारी घेत आहे. वेंगुर्ला-आडेली येथे निधी व्हर्जिन ऑईल फॅक्टरी२०१७ पासून अभिजित व नेहा महाजन यांनी सुरु केली आहे. ही कोकोनट व्हर्जिन ऑईलआणि डेसिकेटेड कोकोनट पावडरयावर प्रक्रिया करणारी फॅक्टरी सिधुदुर्गातील एकमेव असल्याने ही वेंगुर्ल्यासाठी निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.

      कोकण बोर्डाच्या आकडेवारीनुसार कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र या राज्यांमध्ये नारळ प्रक्रिया करुन होणा-या उद्योगांचे प्रमाण अधिक आहे. पण कोकण पट्टयात मुबलक प्रमाणात नारळाची उपलब्धता असून नारळ उद्योगात रोजगाराची दृष्टी अजूनही आपण आजमावली नाही. कल्पवृक्ष असणा-या नारळाचा उपयोग आपण शालेय अभ्यासक्रमातही अभ्यासला आहे. असे असूनही जगात नारळांवर होणारे उद्योग प्रक्रिया पहाता आपल्याकडे दुर्लक्षीत गेलेले फळ म्हणजे नारळ असेच म्हणावे लागेल.

       कोकणात काथ्या उद्योग हा काही नविन नाही. कारण, फार पूर्वीपासूनच याचे महत्त्व कोकणवासीयांनी जाणले आहे. परंतु, नारळ सोलून त्याची सोडणे जळावू म्हणूनच आजही वापरली जाते. एवढी उदासिनता या सोडणांकडे पहाण्याची आहे. पण या सोडणांपासून काथ्याबरोबरच कोकोपिट हे अतिशय महत्त्वपूर्ण उत्पादन घेतले जाते. या कोकोपिटाची उपयोगीता लक्षात घेतली तर पाणी टिकवून ठेवण्याचा गुणधर्म प्रचंड प्रमाणात यामध्ये आहे. त्यामुळे याची मागणी ब-याचशा नर्सरी, बागायतींमध्ये अलिकडे ब-याच प्रमाणात वाढलेली दिसून येते. याशिवाय माडांची अळी काढल्यानंतर त्या अळीवर विशिष्ट पद्धतीने सोडणं रचवून ठेवली जातात. त्यामुळे जमिनीची धूप तर थांबतेच, पाणीही टिकून राहते शिवाय कंपोस्ट खत निर्मितीसाठीही याचा वापर केला जातो. या कोकोपिटाचा गांडुळ खत निर्मितीसाठीही उपयोग होतो. सेंद्रिय खताकडे वळलेला शेतकरी, बागायतदार कोकोपिट आवर्जून वापरुन त्याचे फायदे अनुभवत आहेत.

       आपल्याकडे काथ्या कारखान्यात काथ्या, पायपुसणी, दोरी, सुंभ, शोभेच्या वस्तू आणि कोकोपिटासारखे उत्पादन घेतले जाते. तर पारंपरिक पद्धतीने आजही झावळ्यांचे हिर काढून त्यापासून केरसुणी आणि मंडप किवा घराची पडवी शाकारण्यासाठी चुडत विणून झापांचा उपयोग केला जातो. नारळाच्या झाडाचे (माडाचे) वासे घर बांधणीसाठीही वापरतात. लाकडी तेल घाणा तसेच अलिकडच्या आधुनिक पद्धतीनुसार सुक्या नारळापासून काढले जाणारे तेल हे सर्वांच्या परिचयाचे आहे. परंतु ज्या प्रमाणात खोबरेल तेलाची मागणी आहे, त्याप्रमाणात त्याचे उत्पादन कोकणात अजूनही होत नाही. ब-याच राज्यांमध्ये खोबरेल तेलाचाच वापर करुन अन्नपदार्थ शिजविले जातात. परंतु कोकणात मात्र, हे खाद्यतेल फणसाच्या चिप्ससाठी प्राधान्याने वापरले जाते.

      करवंटीपासून मालवणसारख्या समुद्रकिनारी विविध शोभेच्या वस्तू  पर्यटकांचे स्वागत करीत आहेत. तर सावंतवाडीतील लाकडी खेळण्यांमध्येही वैविध्य आणण्यासाठी कोकोपिटपासून खेळणी तयार केली जात आहेत. या करवंटीपासूनच मिळणारा अॅक्टीवेटेड कार्बनहा ब-याच यंत्रसामुग्रीमध्ये, मोठमोठ्या इंडस्ट्रीजमध्ये शुद्धीकरणाचे महत्त्वाचे काम बजावते.

       अलिकडे सोशल मिडियावर ब-याचवेळा परदेशातील खोबरेल तेल, व्हर्जिन कोकोनट ऑईल, डेसिकेटेड कोकोनट पावडर यांचे महत्त्व कळल्यामुळे त्याचे मॅसेजेस व्हायरल होताना दिसतात. खरेतर आपल्याकडच्या या पिकाला परदेशात मागणी वाढलेली आहे. कोकणात लहान बाळ घरी पहिल्यांदा आल्यानंतर त्याची टाळू भरण्यासाठी जुनी माणसे आजही बाळाच्या टाळूवर तेल घालतात. दक्षिणेकडच्या भागातील राज्यातही हिच पद्धत असली तरी बाहेरची बाधा लागू नये म्हणून तेल घालावे असे सांगितले जाते. तर गुजरात-राजस्थानमध्ये बाळाच्या टाळूवर तेल लावल्यास उंदीर चावत नाही असे सगितले जाते.

अभिजित महाजन, 9623347412

       एकंदरीतच श्रद्धेत गुंतवलेल्या या तेलामध्ये वैज्ञानिक कारण पाहिले असता, खोबरेल तेल किवा व्हर्जिन कोकोनट ऑईल हे मुख्य करुन मुड चेंजर्सचे महत्त्वपूर्ण काम करते. एखाद्या चिडलेल्या माणसालाही डोकीवर तेल घाल म्हणजे शांत होशील असे म्हटले जायचे आणि ते खरेही आहे, असे संशोधनात समोर आले आहे. डॉ.ब्रुस पिफ यांचे व्हर्जिन कोकोनटऑईल यावर आधारलेले मिरॅकल मेडिसिन हे पुस्तक वेंगुर्ल्यातील अभिजित महाजन यांच्या वाचनात आले आणि त्यांनी व त्यांच्या पत्नी सौ. नेहा महाजन यांनी व्हर्जिन कोकोनट ऑईलच्या मुळाशी जाण्याचे ठरविले. यासाठी कर्नाटक / केरळ राज्यांत वारंवार भेटी देऊन माहिती घेतली. आपल्या गावातही आपण हे उत्पादन घेऊ शकतो, याचा विश्वास निर्माण झाल्यावर त्यांनी २०१७ मध्ये आडेली गावात निधी व्हर्जिन कोकोनट ऑईलची निर्मिती करण्यास सुरुवात केली.

       कोकणात नारळ हा नगावर तर इतर राज्यांत हा किलोवर विकत घेतला जातो व विकला जातो. महाजन यांनी ही फॅक्टरी सुरु करताना किलोवरच नारळ विकत घ्यायला सुरुवात केली. त्यात अट एकच नारळ, पक्व झालेला पण पाणी असलेला सोलून द्यायचा.  वेंगुर्ला जवळील ब-याच गावांबरोबरच अगदी गोवा, राजापूरपासून त्यांना नारळ उपलब्ध होतो आहे. नारळाच्या दुधापासून तयार होणा-या या व्हर्जिन कोकोनट ऑईलहे खोबरेल तेला इतके जरी प्रचलित नसले तरी त्यांचे गुणधर्म लक्षात घेतले तर आपल्या सर्वांनाही त्याचे महत्त्व पटेल.

         शरीरातील कॉलेस्ट्राॅलचे प्रमाण कमी करण्यासाठी, त्वचा मुलायम राखण्यासाठी, बॉडी मसाज, मजबूत केसांसाठी, कोंड्यापासून बचाव करण्यासाठी, शरीराला आवश्यक असणा-या लॉरिक अॅसीड आणि व्हिटॅमिन साठी, स्नायू दुखीसाठी या सामान्य उपयोगीतांबरोबरच वैज्ञानिकदृष्ट्या वाढत्या वयोमनाप्रमाणे होणा-या व्याधींमधील विसराळूपणावरही व्हर्जिन कोकोनट ऑईल प्रभावी काम करीत असल्याचे संशोधनाअंती समोर येत आहे. या उत्पादनाबरोबरच मोठ-मोठ्या शहरांमध्ये ब-याच गृहिणींना, हॉटेल्स व्यावसायीकांची पसंती असलेल्या डेसिकेटेड कोकोनटपावडरची निर्मितीदेखील महाजन आपल्या फॅक्टरीमध्ये घेत आहेत.

       खोबरेल तेल हे खवट होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्याची साठवणूक करण्याकडे कोकणात तशी नाराजी दिसते. परंतु व्हर्जिन कोकोनट ऑईलमध्ये अत्यंत अल्प प्रमाणात म्हणजे ०.१५ टक्के ओलसरपणा शिल्लक राहत असल्यामुळे हे तेल टिकण्याचा कालावधी वर्षभरापर्यंत लांबतो. डेसिकेटेड कोकोनट पावडरही हवाबंद डब्यात ठेवल्यास तिही वर्षभर टिकते. त्यामुळे हॉटेल्समध्ये, मिठाई प्रॉडक्टस्मध्ये तसेच घरगुती वापरामध्ये देखील डेसिकेटेड कोकोनट पावडरचा वापर अलिकडे वाढला आहे. नारळ फोडून खोवल्यानंतर फ्रिज नसेल तर त्याचा टिकाऊपणा फार फार तर एक दिवसच. पण फ्रिजशिवाय ही पावडर हवाबंद डब्यात राहत असल्याने शिवाय पाण्याचा संफ आल्यानंतर या पावडरचं रुपांतर ओल्या खोब-यातच होत असल्याने गृहिणींना वेळेच्या बचतीबरोबरच खोब-याची अस्सल चवही राखता येणार आहे.  

       या व्यवसायातून श्री.महाजन यांनी १७ स्थानिक कामगारांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. यापूर्वी त्यांनी या उद्योगाचा केरळ आणि कर्नाटक या ठिकाणी जाऊन अभ्यास केला. अखंड नारळ मिळण्यासाठी ते कसे फोडतात याचे प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांनी आपल्या तीन कामगारांना कर्नाटकातील – टिपटूर येथे नेले. तेथे त्यांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले आणि २०१७ साली श्री. महाजन यांनी या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.  अवघ्या तिन वर्षांत त्यांचे हे दोन्ही उत्पादन लोकांच्या पसंतीस पडले. त्यामुळे त्यांच्या या उत्पादनाला बाजारपेठेत वाढती मागणी आहे.

      नारळ आणि नारळावर प्रक्रिया करणारे उद्योग शोधल्यास खूप मिळतीलही परंतु नारळ काढणे हे मोठे जिकरीचे काम करण्यास माणूस मिळत नसल्याची ओरड आज जिकडे तिकडे दिसते. यासाठी मशिनद्वारेही झाडावर चढून नारळ काढण्याचे प्रशिक्षण दिले जाते. निरा-माडी तयार करणे, शहाळी हे खरंतर आजारी व्यक्तीसाठी पूर्ण अन्नच म्हटले जाते. परंतु शहाळी काढल्यास झाड घाबरते अशी नाहक भिती आपल्याकडे भरपूर असल्याचे चित्र आहे. या सर्वांवर मात करुन आपण महाजन दांपत्यांप्रमाणे नव्या दृष्टीने नारळाकडे पाहिल्यास रोजगाराच्या भरपूर संधी आपल्याला उपलब्ध होतील.

       कल्पिलेले देणारा म्हणले कल्पवृक्ष‘. हा कल्पवृक्ष कोकणाला संपन्नता, समृद्धी, स्थानिक रोजगार निश्चितच देईल, ही नवी दृष्टी घेऊन जागतिक नारळ दिनाच्या निमित्ताने सजग होऊया.                                            सीमा मराठे, ९६८९९०२३६७

प्रथमेश गुरव, ८८५६८००२६३ 

       नारळा पासून विविध प्रकारच्या रोजगार निर्मिती आणि उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून केंद्रीय स्तरावर नारळ बोर्ड कार्यरत आहे. तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी कोकण क्षेत्रातील रोजगाराच्या संधींचा विचार करुन या बोर्डाचे प्रतिनिधित्व प्रथमच रत्नागिरी जि.प.माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ लिमये यांना दिले होते. त्यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणात नारळ उत्पादन व रोजगार वाढीसाठी जनजागृती कार्यक्रम, अभ्यास दौरे, नारळ क्लस्टरसारखे उपक्रम, सहकारी संस्था प्रशिक्षणे यांना नारळ बोर्डाच्या माध्यमातून चालना दिली होती. अलिकडच्या काळात मात्र नारळ बोर्डाचे तेवढेसे सक्रिय प्रतिनिधित्व होताना दिसत नाही. केंद्रीय नारळ बोर्डा सारख्या संस्थांच्या संलग्नतेतून कोकण विभागात पुन्हा असे उपक्रम राबवले गेल्यास कोकणातल्या तरुणाला स्थानिक स्तरावर रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकेल.

 

Leave a Reply

Close Menu