आम्हाला घडविले शिक्षकांनी

आपण आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थी असतो. विद्यार्थी दशेत आपण भविष्याच्या उंबरठ्यावर उभे असतो आणि आपल्याला घडवत असतात आपले शिक्षक. शिक्षकआपले भवितव्य व्यापून टाकतात. प्रसिद्ध लेखक, शिक्षक, संशोधक इंजिनिअर्स, डॉक्टर्स, विद्यापीठ प्राध्यापक त्यांचे कुलगुरु, शासकीय अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक, राजकीय नेते, बस, रेल्वे, विमान कर्मचारी या समाजातील सर्व घटकांना घडविण्याचे काम शिक्षकांनी केलेले असते. आज आपण जे काही आहोत ते आपल्या शिक्षकांमुळेअसे सर्वजण मोठेपणी म्हणत असतात.

       गुरु-शिष्यांच्या नात्याबद्दल मला नेहमी नवल वाटत आले आहे. मी हे नाते दोन्ही बाजूंनी अनुभवले आहे. या अनुभवामध्ये पहिलीपासून एम.एड.पर्यंतचे अध्ययन आणि त्यानंतर पुढे बराच कालावधी पाचवीपासून पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणारे, स्पर्धात्मक परीक्षा देणारे आणि संशोधन करणा-या विद्यार्थ्यांपर्यंत मार्गदर्शन करत राहिलो. मी भारतीय परंपरेनुसार गुरु-शिष्याचे नाते आणि आधुनिक शिक्षण प्रणालीतील संकल्पनाचा मनसोक्त आनंद आणि अनुभव घेतला. विद्यार्थी दशा कुठलीही अडचण न येता पार पाडली. याचे श्रेय माझ्या सर्व शिक्षकांना जाते आणि पुढे मी जेव्हा शिक्षक झालो तेव्हा आपल्यातील जे उत्कृष्ट आहे ते विद्यार्थ्यांना द्यावे असे पवित्र ध्येय ठेवले व तसाच वागलो. भारतीय परंपरेत शिक्षक हे गुरुम्हणून ओळखले जातात. शिक्षणाच्या इतिहासात गुरुचे स्थान मोठे होते.

       आज मी माझ्या शिक्षकांची जेव्हा आठवण काढतो तेव्हा माझ्या स्मृती एखाद्या स्वप्नासारख्या माझ्या समोरुन तरळून जातात. प्रत्येक शिक्षकांनी मला काहीतरी मौल्यवान दिले आणि उत्तम शिकविले जे माझ्या शिक्षकी कारकिर्दित मी माझ्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला आणि आजही करीत आहे. जॉर्ज बर्नाड शॉने आपल्या कवितेत म्हटले आहे, ‘आयुष्य माझ्यासाठी सामान्य दिवा नाही ती एक असामान्य ज्योत आहे. जिला दुस-याला देण्याआधी जास्तीत जास्त प्रखर बनवण्याचा प्रयत्न असला पाहिजे.

       सर्वसामान्य व्यक्ती पासून ते राष्ट्रीय किवा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत प्रसिद्ध पावलेल्या व्यक्तींपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात विद्यार्थी दशेत किमान एक शिक्षक असे भेटलेले असतील की, त्यामुळे त्यांचे आजचे व्यक्तिमत्त्व विकसित झालेले आहे. त्यांच्या विद्यार्थी दशेत त्यांच्या शिक्षकांना कल्पना होती का की, आपण आपल्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात किती महत्त्वाची भूमिका बजावतोय? जे ज्ञानदान त्यांनी केले त्याचा परिणाम होऊन हा विद्यार्थी पुढे कोण बनणार हे त्यांना जाणवत असेल काय? प्रत्येक शिक्षकाकडे दुरदर्षित्त्व होते. त्या प्रत्येक शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर मनमुराद प्रेम केले. तसेच विद्येवर व ती ज्या जीवनातून व जीवनासाठी उमलते त्या जीवनावरही नितांत प्रेम केले. कर्तव्य कर्माबद्दलची निःसीम भक्ती व विद्यार्थ्यांबद्दलची आंतरीक ओढ यामुळे केवळ अध्यापन करुन तेवढ्यावरच न थांबता विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रत्येक पैलू उठून दिसावा म्हणून त्याच्यासाठी विविध उपक्रम शालेय स्तरावर राबविले. विविध कथा, प्रसंगातून विद्यार्थ्यांना नैतिकमुल्ये, जीवनमुल्ये शिकवली. शिक्षकांनी स्वतः कष्ट केले व विद्यार्थ्यांनाही कष्टाची सवय लावली.

       आजही प्रत्येक व्यक्ती आपण जे काही आहोत ते आमच्या शिक्षकांमुळे घडले आहोत असे सांगताना आढळतात. याचे कारण त्या बालवयात शिक्षकांच्या प्रामाणिक प्रयत्नाचा आस्वाद प्रत्येकाने घेतला आहे. आपल्या शिक्षकांबद्दल विचार मांडताना ते म्हणतात, कोणत्याही कामात स्वतःला पूर्णतः झोकून देण्याची वृत्ती तत्त्वांचा कणखरपणा, अंतःकरणाचा हळुवारपणा या शिक्षकांच्या गुणांचा प्रभाव आपल्या आपल्या आयुष्यावर झाला व आम्हीही तसे बनलो. विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन देऊन नवनवीन गोष्टी शिकवायला लावल्या व त्यातून आपण प्रगतीपथावर चालायचे कसे हे शिक्षकांनीच सांगितले. म्हणून आजही प्रत्येकजण आपल्या शिक्षकांप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त करीत असतात. शिक्षणाच्या मानसशास्त्रात व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने भुले तितकी मनेहे तत्त्व सांगितले आहे. वेगवेगळ्या बुद्धिनुसार, अभियोग्ये नुसार, आवडीनिवडीनुसार वैयक्तिक संस्कार, जीवनमुल्ये आणि उद्दिष्ट्ये यांचे अनुभव शिक्षकांनी आपल्या अध्यापनाद्वारे दिले त्यातून निरनिराळ्या क्षेत्रातील तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, संगीतकार गायक, चित्रकार, कुशल खेळाडू, कार्यशील नेतृत्व निर्माण केली याचा अर्थ आम्हाला घडविणारे शिक्षक हे अष्टपैलू होते असे महान व्यक्तीमत्त्वाचे म्हणणे आहे. आम्हास जबाबदार नागरिक बनविण्याची किमया आमच्याच शिक्षकांनी केले असे सर्वांचे मत असते.

       आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करुन स्वतःच्या उन्नत्तीसाठी प्रयत्न करायला लावणे यात शिक्षकाची खरी कसोटी असते. बहुतेक विद्यार्थी सांगत असतात की, शिक्षकांनी आमच्यात विश्वास निर्माण केला व त्यामुळे आम्ही चांगल्या स्थितीत आहोत. विविध व्यवसाय निर्मितीसाठी लागणारे तंत्रज्ञ निर्मिती करण्याचे कार्य शिक्षकांनी केलेले असते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तीगत पात्रतेचा शोध घेऊन विविध सुत्र गुणांना संधी देण्याचे प्रयत्न शिक्षकच करतात. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सर्जन शीलतेचा वापर नवनिर्माण क्षमतेचा विकास करुन उच्चस्तरीय प्रतिमेच्या निर्मितीचा पाया शिक्षक घालतो व त्यातून साहित्य कला, संगीत अभियांत्रिकी स्थापत्य वैद्यक शिल्प या विषयद्वारे राष्ट्रराष्ट्रांना कुशल कारागीर निर्माण करण्याचे कार्य शिक्षकच करतात.

       आपल्या विद्यार्थ्यांबद्दल कळकळ, आंतरीक ओढ, शिक्षक म्हणून त्यांच्याप्रती असलेली जबाबदारीची जाणिव, विद्यार्थ्यांचे मित्र, धुंद करणारी कलासक्ती, आईवडीलांप्रमाणे आपल्या गुरुंबद्दल नितांत आदर, प्रत्येक गोष्टीतील बारीक सारीक तपशील मिळविण्यासाठी चोखंदळ दृष्टी हे सर्वगुण शिक्षकास पुरेपुर भरलेले असावेत. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे एक गुरु आपल्या शिष्याशी कसा वागेल याचे मुर्तिमंत दर्शन शिक्षकाच्या रुपाने घडावे नेहमी हिच सदिच्छा.

श्री. रमण किनळेकर, ९४२३३०१३०७

————————————————————————————————————————————————————————

      आजच्या बदलत्या धकाधकीच्या जीवनात आमच्या पिढीतील सर्वांची शिक्षकांप्रती असलेली भावना आमच्या विद्यार्थ्यांमध्येही आहे हे पाहून मानसिक समाधान वाटते. त्या विद्यार्थ्यांच्या आमच्या विषयी असलेल्या काही भावना पुढीलप्रमाणे –  

० शिक्षकांनी शिस्तीचे महत्व शिकविले. आयुष्याच्या कुठल्याही वेळी तुम्ही स्वतःला शिस्त लावू शकता आणि नवीन आयुष्य सुरु करु शकता. जीवनाच्या कुठल्याही क्षणी तुम्ही ठरवून आपली जगण्याची दिशा बदलू शकता व यातून बोध घेऊनच मला माझ्या निराशाजन्य परिस्थितीतून योग्य दिशेने वाटचाल करता आली. सकारात्मक दृष्टीकोन गुरुंनी दिला.

० गुरुनी सांगितलेल्या दोन गोष्टी जीवनात महत्वाच्या ठरल्या.

१. सोप्या गोष्टी मागण्यापेक्षा स्वतः जास्त प्रगल्भ व्हायची इच्छा धरा.

२. थिटे आव्हान घेण्यापेक्षा स्वतःचे कौशल्य वाढवायची ईर्षा धरा.

०  प्रतिकुल परिस्थितीतूनही काही उद्दीष्टे समोर ठेवून ईश्वरदत्त बुद्धी व स्वाभाविक प्रवृत्ती यांना कठोर परिश्रमाची जोडी देवून अशक्य ते शक्य करु शकतो हे शिक्षकांनी उत्तमरित्या पटविल्यामुळे माझ्या जीवनातही अशक्य ते शक्य करण्याचा माझा प्रयत्न यशस्वी होत आहे. याच्या जोडीला सकारात्मक दृष्टीकोनही शिक्षकांकडून मिळालेली शिदोरी होती. आदर्श शिक्षकापाशी निष्ठा, शिस्त कणखरपणा आदी गुणाबरोबर सहृदयता असते. ही सहृदयता त्याला बालकाच्या हृदयापर्यंत नेते.

  माझ्या शिक्षकाच्या सहृदयतेमुळेच मी दुस-याला मदत करणे याचा अनुभव घेतला व आज मला त्या गोष्टीतून समाधान व आनंदीपण प्राप्त झाला. कर्तव्यप्राप्ती बांधलेली चे भान व संकटात असणा-यांना सातत्याने मदत करणे.

० माझ्या शालेय जीवनात मी पाटीवर काढलेले पिपळाचे पान गुरुजींना आवडले आणि सर्वांना ते दाखवले आणि म्हणाले तू एक दिवस नक्की मोठा चित्रकार होणार, असेच प्रयत्न सुरु ठेव. लक्षपुर्वक निरिक्षणातून मी सहज चित्र काढले. गुरुजींकडून अनपेक्षित प्रोत्साहन मिळाले, मी प्रेरीत झालो. चित्रकार बनण्याची स्वप्न पाहिली. पुढे एक चित्रकार झालो.

० अवांतर वाचनाची सवय आमच्या गुरुंनी लावली. आज या गोष्टींचा मला फायदा झाला. मी विविध सभांमध्ये सहजपणे बोलू लागलो. गुरु नेहमी म्हणतात, ‘‘चांगला वक्ता श्रोत्यांना आनंद देऊ शकतो. तसाच स्वतःसुद्धा आनंद घेऊ शकतो.‘‘ प्रत्येक गोष्ट निष्ठेने ते शिकवत राहीले त्यामुळे विविध अंगानी व्यक्तीमत्व विकसित झाले.

0 Health is Wealth हा आमच्या गुरुचा नेहमीचा सल्ला. माझ्या प्रकृतीस होणारा त्रास लक्षात येताच योग्य त्या सुचना फक्त केल्या नाहीत, तर सकारात्मक त्यादृष्टीने सल्ले दिले. आपले आरोग्य आपल्या कुटुंबियांसाठी महत्त्वाचे असल्याचे पटवून दिले. त्याचबरोबर अडीअडचणींना आवश्यक आहे ते म्हणजे सेव्हींग त्याचे महत्त्व पटविले. त्यामुळे आज कोणत्याही परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या स्थिर राहण्याचा प्रयत्न गुरुंच्या मार्गदर्शनामुळे यशस्वी झाला.

०   तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर त्याग करायला शिका. समाजातील दुबळ्या घटकांसाठी आपले कौशल्य आपला रिकामा वेळ व आपल्या सुखसुविधा पणाला लावा. प्रामाणिकपणा, आपल्या कामावर निष्ठा, दुस-या माणसाप्रती दया व प्रेम यातून तुम्ही सन्मार्गाने जगा असा बोध दिला.

      सहृदयता, सहिष्णुता, सकारात्मकताक हा त्रिवेणी संगम गुरुंनी शिकवला. त्यातून आम्ही चारित्र्यवान झालो.

० शाळेत होणा-या दर्जेदार वार्षिक संमेलनातून सांस्कृतिक कार्याचे दर्शन घडे. शाळेतील शिक्षकांनी आम्हास त्यावेळी दिलेले सांस्कृतिक अनुभव आव्हानात्मक असायचे. त्यासाठी आम्हा विद्यार्थ्यांमध्ये जबरदस्त आत्मविश्वास निर्माण केला जात असे.

      आव्हानाशिवाय जीवनात कार्यक्षमतेचा कस पारखुन घेता येत नाही अशी अनुभवांनी माझी ठाम धारणा झाली. आज प्रत्यक्ष जीवनात शिक्षकांनी दिलेल्या अनुभवातून ‘‘केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे.‘‘ हे सुत्र आज विविध नाट्यकृती रंगविताना नसा नसातून खेळत असते. नाट्य कलेमुळे जीवनाकडे पाहण्याची दृष्टी देखील रसास्वाद घेणारी ठरली. अभ्यासासोबत विद्यार्थ्यांच्या संगीत, नाट्यकला गुणांना प्रेरणा देणा-या शाळेने जीवनमार्ग बनविला.

० शाळेतील  खेळताना काही शिक्षक सहभागी होत त्यांच्या मार्गदर्शनातून अॅथेलेटिक्स, व्हॉलीबॉल, कबड्डी सारख्या खेळातील बारकावे समजले.

      आज ज्या कार्याला रोजगार मिळाते आहे. त्या कार्यालयाच्या नेमणुकीत या शिक्षकांचा मोठा वाटा आहे. त्या खेळामुळेच आम्हाला विविध कंपनीच्या नोकरीचे दरवाजे उघडे मिळाले.

Leave a Reply

Close Menu