विकासकामे न लवकर पूर्ण न झाल्यास आंदोलन

वेंगुर्ला शहराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या नगरपरिषदेच्या मच्छिमार्केट सहित इतर रखडलेली विकास कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात राष्ट्रीय काँग्रेसचे शहर अध्यक्ष तथा विरोधी पक्ष गटनेते महेश डिचोलकर यांनी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना निवेदन दिले. दरम्यान, पुढील २ महिन्यात याबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास वेंगुर्ला शहर राष्ट्रीय काँग्रेस तर्फे आंदोलनाचा इशाराही डिचोलकर यांनी दिला आहे.

      याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, वेंगुलर्ला शहराच्या व्यापाराच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असलेल्या नगरपरिषदेच्या मच्छिमार्केटचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. मच्छिमार्केटबांधकाम संदर्भात ठेकेदारास सक्त ताकीद देऊन मच्छिमार्केटच्या उद्घाटनाची तारीख जाहीर करावी. शहरात सध्या डासांचा प्रादुर्भाव वाढला असून त्यासाठी शहरात प्रत्येक गल्ली व घरोघरी डास निर्मूलन औषधांची तत्काळ फवारणी करावी. शहरातील पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाची असलेली घोडेबाव गार्डन, त्रिकोणी गार्डन व सी.पी.जी. गार्डन या तिन्ही गार्डनचे काम अतिशय संथगतीने सुरु आहे. संबंधित ठेकेदारास समज देऊन ते तात्काळ पूर्ण करून घेण्यात यावे. शहरातील पाणी पुरवठा पाईपलाईन बदलण्याचे कंत्राट देवून सुद्धा अजून कामास सुरुवात झाली नाही. त्यामुळे शहरातील काही भागात गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे यावर योग्य ती उपाययोजना करून नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा उपलब्ध करून घ्यावा. अशा मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. दरम्यान वरील समस्यांवर पुढील २ महिन्यात योग्य ती कार्यवाही न झाल्यास वेंगुर्ला शहर राष्ट्रीय काँग्रेस तर्फे नगरपरिषद विरोधात कडक आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिला आहे. यावेळ राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक विधाता सावंत, शहराध्यक्ष तथा नगरपरिषद विरोधी पक्ष गटनेते महेश डिचोलकर, राजीव पांगम, समीर नागवेकर, सागर नांदोसकर आदी उपस्थित होते.

      याबाबत दिलेल्या प्रतिक्रियेत नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी म्हटले आहे की, शहरातील रखडलेल्या कामांसंदर्भात सर्व नगरसेवक व प्रशासनाची बैठक संपन्न झाली. कोरोनामुळे मार्चपासून अद्यापपर्यंत युपी बिहार येथील कामगार घरी परतल्याने तसेच इतर वाहतूक, साधन सामग्री यासाठी अडथळा येत असल्याने शहरातील कामे झाली नाहीत. मात्र ही रखडलेली सर्व कामे गणेशोत्सव नंतर सुरू होतील असा शब्द संबंधित ठेकेदारांनी दिला आहे. तसेच सर्व ठेकेदारांना बोलवून घेऊन कामांचा बार चार्ट तयार करून या चार्ट प्रमाणे कामांचे नियोजन करून ती तातडीने सुरू करावीत अशा सक्त सूचना बैठकीत प्रशासनालाही करण्यात आल्या आहेत. दरम्यान नियोजित सर्व कामे पूर्ण करण्याचा आमचा संपूर्ण न.प.कार्यकारणी मानस आहे व याबाबत सक्त सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Close Menu