शिक्षक दिनाच्या निमित्ताने दि.३/९/२०२०च्या किरातमध्ये श्री. रमण किनळेकर यांनी लिहिलेला आम्हाला घडविले शिक्षकांनीहा विशेष लेख वाचला. त्यांचा  दृष्टीकोन त्यांच्या दृष्टीने रास्त आहे, पण माझा पूर्णतः वेगळा आहे. माझ्या मते शिक्षक हे विविध सामाजिक प्रभावांपैकी विद्यार्थ्यांवर परिणाम करणा-यांमधील एक आहेत.

     १९५४ पासून ते १९९० पर्यंत व आजपर्यंतही मी शिक्षक म्हणून वावरलो. अनेक विषय शिकविले. कार्यक्रम केले. श्रमदान, समाजसेवा, सहली, सांस्कृतिक कार्यक्रम, नाटके शिकविली. शौचालय साफ करणे, जमिन सारवणे, सिमेंट घालणे अशी कामेही केली आणि शिकविली सुद्धा.

      मला प्रश्न पडला आहे, मी किती हजार विद्यार्थी घडविले? की बिघडविले? कलावंत, कारखानदार, उद्योजक, प्राध्यापक, अधिकारी, डॉक्टर, शिक्षक, दुकानदार यांच्याप्रमाणेच लाच घेणारा नोकरदार, मटका घेणारा एजंट, दारु विकणारा दलाल, लफडेबाजएखादा खून करुन पचविणारा, धुंदीत गाडी चालवून लोकांना उडविणारा आणि भर सभेत स्टेजवर उभा राहून दारु प्यालेल्या स्थितीत-अवस्थेत हेंच्यानी आमका शिकयलाअसे अभिमानाने सगणारा, हे सगळे माझे विद्यार्थीच आहेत. ह्या सगळ्यांना मीच घडविलं असं म्हणावं लागेल. पण समाजदृष्ट्या जे बिघडलेले आहेत तेही मीच घडविले असा त्याचा अर्थ आहे.

      सुभाषतिकार म्हणतो, गुरु हुशार व मंदबुद्धी विद्यार्थ्यांना सारखीच विद्या-ज्ञान देतो. त्यांची ज्ञान मिळविण्याची शक्ती कमीही करीत नाही आणि निर्माणही करीत नाही. मग त्यांच्या परिणामात एवढे अंतर का? याचं उत्तर तोच देतो. प्रतिबिब ग्रहण करण्याचे सामर्थ्य मण्यामध्ये आहे, मातीच्या गोळ्यामध्ये नाही. ग्रहण, साठवण आणि त्याचं पुनर्निर्माण हे विद्यार्थ्यालाच करावयाचे आहे. ङड्ढडड्ढत्ध्ड्ढ, ङड्ढद्यठ्ठत्द, ङड्ढद्रद्धदृड्डद्वडड्ढ हे तीन ङ विद्यार्थ्यांचीच शक्ती, कुवत, सामर्थ्य यावरच अवलंबून आहे. वर मातीच्या गोळ्याचा उल्लेख आला आहे. ब-याचवेळा लहान मुल मातीच्या गोळ्यासारखचं असतं. त्याला घडवावं तसं ते घडत.असं बेधडक निखालस खोटं म्हटलं जातं. कुंभाराच्या चाकावर येणारा गोळा कोणत्या प्रकारच्या मातीचा आहे, त्याला किती प्रमाणात भिजविला आहे, त्याला कोणता आकार द्यायचा आहे, त्याचा उपयोग कशासाठी व कसा होणार आहे हे सर्व त्या कर्त्या-निर्मात्या-विधात्या-कुंभारावरच अवलंबून आहे.

      मुलांच्या बाबतीत जर विचार करावयाचा तर (?) मुलाची आनुवंशिकता-गर्भाधानाच्या वेळची आईवडीलांची मानसिकता, गर्भात असताना व जगात / डोळे उघडल्यानंतर त्याच्यावर होणारे किवा केले जाणारे वेगवेगळे संस्कार आई-वडिल-भावंड-नातेवाईक-शेजारीपाजारी दोस्त बाजूचा निसर्गप्राणी यांच्याकडून ते मुल सतत शिकतच असत. शिक्षक हा त्यातील एक. लॉजिकमधल्या विधानाप्रमाणे – विद्यार्थी जर इच्छित नसेल / विद्यार्थ्यांची जर इच्छा नसेल, तर कुणीही शिक्षक त्याला काहीही शिकवू शकणार नाही. घडविणे तर दूरच. विद्यार्थी जर लक्ष देऊन शिकत नसेल तर शिक्षकाचा उपयोग नाही व विद्यार्थी जर मनापासून प्रयत्न करुन शिकत असेल तर शिक्षकाची गरजच नाही. गुरु-शिष्य परंपरेची अनेक उदाहरणे आहेत. त्यातील एकलव्याचंउदाहरण हा आदर्श आहे. गुरुचा पुतळा उभारुन त्यांचं स्मरण करुन त्यांच्यावर पूर्ण निष्ठा ठेऊन तो सर्वोत्तम बनला.

      शास्त्रामध्ये गुरोस्तु मौनं व्याख्यानम्असचं म्हटले आहे. गुरुचं मौन विद्यार्थ्याला वाचता आल पाहिजे तर तो शिकतो. माझ्या अनुभवाने आणि माझ्या प्रामाणिक मताने मी कुणालाही शिकविलेले नाही. घडविले किवा बिघडविलेही नाही. विद्यार्थी शिकले, मोठे झाले, घडले ते अवश्य म्हणू शकतील मी आईवडीलांमुळे, परिस्थितीमुळे, दोस्तांमुळे, निसर्गामुळे किवा या या शिक्षकांमुळे घडलो आहे.

      श्रीदत्तात्रेयाने २४ गुरु केले असे म्हटले आहे. त्या सर्वांकडूनच त्यांनी काहीतरी गुण घेतला आहे. ती ग्राहकता ग्रहणशक्ती महत्त्वाची. शेणाचा गोळा मातीत पडता तर तो माती घेऊनच वर उचलेल. शाईने लिहिताना शाई टिपणारा टिप कागद आता कुणालाही माहित नाही. पक्षी दाणे टिपतात हे पाहणं आणि ते शिकणं हाच ज्ञान, विद्या मिळविण्याचा मार्ग आहे. गुरुची शुश्रुषा करुनच विद्या मिळतेअशी जुनी परंपरा होती; आता नव्हे.

      मी घडलो-बिघडलो ते माझे आईवडील, भावंड, नातेवाईक, शेजारी, दोस्त मंडळी, आजूबाजूचा निसर्ग, मी बाळगलेले व अन्यत्र फिरणारे प्राणी, माझा अनुभव आणि गुरुजनही, मानसीवरील कुबल गुरुजी (पागोटे घालणारे जुन्या काळातील प्राथमिक शिक्षक) यांच्यामुळे मी स्वयंपाक शिकलो. माझ्यावरील वेगवेगळ्या अपघातांमुळे माणसं वाचायला शिकलो. प्रयत्नाने झाडावर चढायला शिकलो. तो अनुभवातूनच, लहान मुलाला कंदिलाच्या गरम काचेला हात लावूनच भूकळतो. स्वानुभवाने. तोच खरा गुरु.                                                 श्री. रा. पां. जोशी, (०२३६६-२६२२६०)

 

Leave a Reply

Close Menu