काय आहेत कोरोना टेस्ट?

२०२०मधील अर्धेअधिक वर्षे कोरोना सावटातच संपले. हे सावट असेच राहिले तर आर्थिक मंदी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अलिकडे जाहीर झालेल्या जीडीपीने उणे २३ (-२३) एवढा निच्चांकी तळ गाठल्याने अर्थक्षेत्रातील तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोनामुळे सेवा क्षेत्र, हॉटेल व्यवसाय, पर्यटन, असंघटित क्षेत्रातील रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे. यापुढील काळ मानवजातीला आव्हानात्मक असणार आहे.

      कोरोना काळात आवश्यक काळजी घेऊनही आपल्याला किवा संपर्कातील कोणाला झालाच तर धीर सोडू नका. शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पचायला हलका आहार घ्या. ब-याच वेळा रॅपीड टेस्ट पॉझिटीव्ह आली तर जास्तीत जास्त सकारात्मक विचार करा, अधिकाधिक विश्रांतीसोबत प्राणायाम, चांगले वाचन, मनात येणा-या विचारांना लिखाणातून किवा ज्यांच्याशी संवाद साधणे शक्य आहे, त्यांच्याबरोबर व्यक्त होणंही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी कोरोनाकाळात घेतल्या जाणा-या टेस्टसमजून घेऊया.

         कोव्हिड-१९हा आजार आपल्याला झाला आहे की नाही हे कळण्यासाठी चार प्रकारच्या तपासण्या आहेत. १) रॅपिड अँटीजन टेस्ट, २) आरटी-पीसीआर टेस्ट, ३) ट्रू नॅट टेस्ट, ४)अँटी बॉडी टेस्ट. 

      तिसरी टेस्ट – ट्रू नॅट टेस्ट आपल्याकडे केली जात नाही आणि अँटी बॉडी टेस्ट ही तपासणी मुख्यतः पूर्वी होऊन गेलेल्या आजाराविषयी माहिती आपल्याला देते. याचा अर्थ शरीरात अँटीजन म्हणजेच कोव्हिड विषाणू गेला तर शरीर आपणच त्या विषाणू विरुद्ध लढण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढून अँटी बॉडीज तयार करतात. थोडक्यात, सर्वच व्यक्तींना कोव्हिडची लक्षण दिसतीलच असे नाही अशावेळी किती लोकांना हा आजार होऊन गेला असावा हे लक्षात येण्यासाठी या तपासणीचा अलिकडे वापर सुरु केला आहे.

      आता प्रामुख्याने ज्या दोन तपासण्या कोव्हिड संदर्भात सर्वत्र केल्या जातात व त्यामुळे व्यक्ती कोरोना पोझीटीव्ह आहे की निगेटिव्ह हे कळते त्या तपासण्यांविषयी समजून घेऊ.

      १) रॅपिड अँटीजन टेस्ट-या टेस्ट मध्ये नाक व घसा येथून स्वॅब घेतला जातो. या चाचणीचा रिपोर्ट अर्ध्या तासात आपल्याला समजू शकतो. यामध्ये विषाणूंच्या सरफेस स्पाईक (विषाणूच्या बाह्य आवरण) मधील अँटीजन(कोरोना विषाणू) प्रोटीन तपासले जातात. कोरोना सदृश्य लक्षणे असणा-या तापासारख्या आजारात या तपासणीची संवेदनशीलता ही केवळ ३४ ते ८० टक्केच असते. त्यामुळे अर्ध्याहून अधिक कोव्हिड पॉझिटिव्ह पेशंटमध्ये रॅपिड अँटीजन टेस्ट ही निगेटिव्ह येऊ शकते. अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचे झाले तर रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये विषाणू अति सूक्ष्म असल्याने रुग्णाला लक्षण दिसत असूनही रॅपिड टेस्ट निगेटिव्ह येते. अशांची मग लक्षणे दिसत असल्याने आरटी-पीसीआर टेस्ट केली जाते.

पण मग रॅपिड अँटीजन टेस्ट का केली जाते?

      एखाद्या वसाहतीमध्ये जेव्हा कोव्हिड-१९ चा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला असेल तर अशावेळी रुग्ण विलगीकरण करणे या टेस्टमुळे सोयीचे होते. ही तपासणी आरटी पीसीआर टेस्टपेक्षा स्वस्त आणि पटकन होणारी आहे. समूह संसर्ग होत असताना जास्तीत जास्त लोकांच्या तपासण्या करुन पॉझिटिव्ह पेशंटचे विलगीकरण केल्याने रोगाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी ही रॅपिड अँटीजन टेस्ट केली जाते.

      २) आरटी-पीसीआर – ही तपासणी कोव्हिड-१९ साठी अचूक आणि खात्रीशीर समजली जाते. यामध्ये जरी स्वॅबमध्ये कमी प्रमाणात विषाणू असले तरी ठराविक रासायनांद्वारे विषाणूंच्या थोड्या आरएनए पासूनही हजार पटीने डीएनए तयार केले जातात, जे तपासणीसाठी योग्य मात्रेत उपलब्ध होतात. थोडक्यात, ठराविक रसायनामुळे अतिसुक्ष्म कोव्हिड विषाणू दुपटीने किवा हजार पटीने वाढत असल्यामुळे तो स्पष्टपणे या तपासणीत दिसतो. पण ही तपासणी बरीच वेळखाऊ आहे. याचा रिपोर्ट यायला २४ ते ४८ तास इतका वेळ लागू शकतो. यात नाकातून व घशातून स्वॅब घेतला जातो किवा थुंकीही तपासायला घेतली जाऊ शकते.

      कोरोना विषाणू हा प्रामुख्याने पहिल्या आठवड्यात घशामध्ये वाढत असतो. त्यानंतर तो फुफ्फुसात वाढायला सुरु होतो. याचाच अर्थ घशातील स्वॅब हा जंतू संसर्ग झाल्यानंतर एक आठवडा एवढ्याच कालावधीसाठी पॉझिटिव्ह येतो. नंतर घशातील स्वॅब हा  निगेटिव्ह येण्याची शक्यता दाट असते. त्यासाठी जंतू संसर्गाच्या दुस-या आठवड्यात श्वसन नलिकेतील स्वॅब अथवा कफयुक्त थुंकी तपासणे गरजेचे असते. म्हणून पीसी-टीआरसी ही तपासणी कोव्हिड तपासणीसाठी खात्रीशीर मानली जाते.

    कोरोनाविषयी मनात भयगंड अधिक राहिले तसेच  टेस्ट पॉझिटीव्ह आली तर विलगीकरणात मानसिक खच्चीकरण अधिक होते आणि तेच आपल्याला टाळायचे आहे. म्हणून हा आजार समजून घेऊया. लक्षण जाणवत असल्यास सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्राधान्याने तपासणी करुन योग्य आहार, व्यायाम, प्राणायाम करणे, गरम पाण्याची वाफ घेणे, गर्दीची ठिकाणे टाळणे असे केल्यास कोरोनावर मात सहज शक्य आहे.                                      शब्दांकन -सीमा मराठे, ९६८९९०२३६७

Leave a Reply

Close Menu