ह्या लेखाच्या माध्यमातून आम्ही मांडत असलेले नैसर्गिक निरीक्षण शास्त्रीयदृष्ट्या तंतोतंत बरोबर असेल की नाही हे माहिती नाही. परंतु तुफानी बारदानी वा-यांच्या दिवसांमध्ये जी परिस्थिती गेल्या काही वर्षात पहावयास मिळतेय त्याची नोंद कुठेतरी रहावी म्हणून हा आमचा प्रयत्न आहे. दर्यावर्दी मच्छीमारांकडे सागरी हवामानाविषयी प्रचंड पारंपरिक ज्ञान आहे. या ज्ञानाचा उपयोग आपणास होऊ शकतो का याचा विचार कुठेतरी शासनाने करायला हवा हे सांगण्याचा मात्र आमचा उद्देश आहे. मच्छीमारांकडे पारंपरिक ज्ञानाचा अमाप खजिना आहे. भविष्यात शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये या माहितीचा समावेश झाला तर त्यात अजिबात आश्चर्य वाटायला नको.