ताटी उघडा ज्ञानेश्वरा…

भर उन्हाळ्याचे दिवस. वरुन सूर्यदेव तापतोय अन् खालून तप्त झालेल्या मातीचे चटके. अशा अवघड स्थितीत एक १५-१६ वर्षांचा कोवळा पोरगा खांद्याला झोळी अडकवून बाहेर पडतो. चार घरं फिरावीत, कोणा मायबापानं या भिक्षेच्या झोळीत काही टाकलं, तर ते घेऊन घरी यावं आणि आपल्या भावंडांसोबत उदरभरण करावं, एवढाच त्याचा हेतू. पायांत वहाणा नाहीत, डोक्यावर छत्र नाही. तरीही हा चालतोय. कारण पोटाच्या आगीपुढे इथे सारं काही क्षम्य आहे. दूरपर्यंत घरं नाहीत. खरंतर, यांचंच घर गावाच्या बाहेर टाकलेलं. काही वेळ चालल्यानंतर एक घर आलं. तो पोरगा घराच्या द्वारापाशी आला आणि त्याने गृहलक्ष्मीला हाक मारली, ‘भिक्षाम् देई, माई भिक्षाम् देई…काही वेळानं एक माऊली सुपभर तांदूळ घेऊन बाहेर आली. त्या मुलाच्या डोळ्यांत पाणी तरळून आलं. त्यानं आपली झोळी पुढे केली. आता ती माऊली त्या झोळीत सूप रितं करायला पुढे होणार, इतक्यात… तिचा हात वरच्यावर कुणीतरी थांबवला. तिने आवाजाच्या दिशेनं पाहिलं, तर तिचे यजमान तिला थांबवत होते. , काय अभद्र करताय हे तुम्ही? कुणास भिक्षा वाढताय? हा कोण आहे माहितेय? धर्म बाटवलाय याच्या बापानं. संन्यास सोडून पुन्हा गृहस्थाश्रमात आलाय तो. नंतर त्याला पोरं झाली. ती हिच, संन्याशाची पोरं. आज आलास. पण पुन्हा कधी आलास, तर याद राख. चालता हो इथून.तो पोरगा मान खाली घालून तसाच झपाझप चालत निघाला. हृदय द्रवून गेलं होतं. आतील आग बाहेरील आगीत व्यापून उरली होती.

       दुसरं घर आलं. त्यानं हाक दिली, ‘माई भिक्षाम् देई..पण इथंही तोच प्रकार. त्या माऊलीच्या कडेवर बसलेल्या बाळाच्या हातातील चंद्रकोर पाहत हा पुन्हा निघाला. दोनचार घरं झाली. भिक्षा तर मिळाली नाहीच. अपमान आणि चारित्र्यावर उडालेल्या शिंतोडांनीच त्याची झोळी तुटून पडली. पोरं टिंगल करु लागली. वाळीत टाकलेली चार संन्याशाची पोरे. असे सगळीकडून वेडेवाकडे बोल ऐकावे लागले. त्याच्या बालमनाला खूप दुःख झाले. तो तसाच धावत आपल्या झोपडीत आला आणि झोपडीचे दार बंद करुन आत रडत बसला. इतक्यात तिथे त्याची लाडकी बहिण आली. तिचं नाव मुक्ता. तिला घडलेला सारा प्रकार समजला. मग गवताच्या ताटीवर टिचक्या मारत ती ज्ञानोबाला म्हणू लागली, ‘‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अहो, आपण दुःखीकष्टी होऊन कसे चालेल? जगाचे कल्याण कोण करील? जगोद्धारणासाठी आपला अवतार झालाय. मग असल्या शुल्लक कारणांसाठी आपलं पवित्र काम आपण कसे विसराल?‘‘ मुक्तेच्या या शब्दांनी ज्ञानोबांना एक वेगळाच हुरुप आला. सारे दुःख विसरुन ते कामालाही लागले. रंजल्या-गांजल्यांसाठी लिहू लागले. ख-या धर्माची, बंधुभावाची शिकवण दिली. मग हा ग्यानोबासंतपदापर्यंत जाऊन पोहोचला. स्वतः ज्ञानोबा माऊलीझाला. आज शेकडो वर्षे झाली, तरीही ज्ञानेश्वरीचा आवाज अजून या मराठी मातीत घुमतोय. पसायदान मागत अमृताशी पैज जिंकतोय.

       आज अचानक ज्ञानेश्वरआठवण्याचं कारण काय? असा प्रश्न खचितच मनात आला असेल. खरं सांगायचं, तर ज्ञानेश्वर कधीच आठवले जात नाहीत. कारण त्यांना कधी विसरताच येत नाही. ज्या वयात काय करावं, कोणतं क्षेत्र निवडावं, यासारखं काहीच सापडलेलं नसतं किवा मन भ्रमित झालेलं असतं, त्याच वयात ज्ञानू संतपदाला जावून पोहोचलेला असतो. स्वतःच्या कल्याणासाठी काय करावं, हेही जेव्हा कळत नसतं, तेव्हा ज्ञाना विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागत असतो. आपण शिकून कुठेतरी नोकरीत चिकटेपर्यंत, आपला ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सारखा एक अलौकिक दागिना घालून प्रकाशत असतो आणि आपण मोहपाशाच्या अंड्यातून बाहेर पडण्याआधीच आपली ज्ञानेश्वर माऊली अवतार कार्य संपवून आळंदीत समाधिस्थ झालेली असते. ज्ञाना असा प्रत्येक वळणावर एक मार्गदर्शक होऊन आपल्याला भेटत असतो. खरं सांगायचं, तर हा ज्ञानोबा प्रत्येकातच दडलेला आहे. पण ताटी लावून दडलेला आहे. ही ताटी उघडली गेली, तरच ज्ञानोबा बाहेर येईल.

      आज सात-आठ महिने होत आलेत. सगळं बंद. काम बंद, रोजगार बंद, शाळा बंद, अभ्यास बंद. एवढंच काय, देऊळही बंद. त्या बंदात होऊन बसलेले आपण सारे शेर लॉक होम्स. मारुतीच्या शेपटीसारख्या दिवसेंदिवस वाढत जाणा-या कोरोनाच्या केसेस, अर्धीअधिक संपलेली कित्तेक स्वप्ने, विस्कळीत झालेली जागतिक अर्थव्यवस्था, मंदीचं वातावरण, येणा-या भयंकर भविष्याची नांदीच वाजत असल्याचा हा भास. हे सारं पाहून, ऐकून, समजून घेऊन आपणही तसेच GDP सारखे महाभयंकर गर्तेत खोलखोल कोसळत चाललोत. येणारा काळ खूप वाईट आहे. वितभर पोटासाठी मारामार, खुन, दरोडेही पडू शकतात. शासनानं रेल्वेत भिक मागणं कायदेशीर केलंय, यावरुनच याचं वास्तव विस्तवासारखं समोर येतंय. सारं जगचं एका फारमोठ्या स्थित्यंतराच्या काळातून प्रवास करतय. हा प्रवास पूर्ण होईल, की अर्ध्यावरतीच डाव मोडेल, हेही निश्चित सांगता येत नाही. जगात पुन्हा दोन वर्ग पडू लागलेत. एक आहे रेवर्ग आणि दुसरा नाही रेवर्ग. ज्यांना लुटायला मिळतंय ते भयंकर लुटत चाललेत आणि दुसरा वर्ग लुटत चाललाय. आता डार्विनच्या नियमानुसार, जो या सा-या परिस्थितीत पाय रोवून उभा राहिल, तोच तरेल. बाकीचे नामशेष होतील किवा त्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष खूप भयंकर असेल.

          संपूर्ण जगाचा विचार केला, तर अवघ्या मानवजातीवर हे एक खूप मोठं संकट येऊन कोसळलंय. इकडे आड तिकडे विहिर, कुठं जावं, काय करावं हा प्रश्न. भिक मागितली, तरी भिक घालणार कोण? सगळ्यांचेच हात रिते. देशाचा विचार केला, तर अजून अस्वस्थ व्हायला होतं. अच्छे दिनयेणार असल्याचं भाकित साफ चुकल्याचं कळून येतं. मग पंचाईत होते. विश्वास ठेवायचा, तर नेमका कुणावर ठेवायचा? विकासाचा तर कधीच खून केला गेला. आकड्यांची मोडतोड करुन तारलेली नौका २४ टक्के पाण्याखालीच बुडून मेली. १५० मिलियन लोकं बेरोजगार झाले. पेट्रोल ८८ रुपयावर गेलं. चाळीस लाखांवर कोरोनाच्या केसेस गेल्यात. मृत्यूचा आकडा अजूनही वाढतोय. पण एका स्टारच्या मृत्यूभोवती अवघं राजकारण फिरतंय. चीन, पाक तिकडे युद्धाला तयार झालेत. इकडे पबजी बंद झालाय. त्यात आमच्या अंगणात मोरही नाचत नाहीत. मग काय करावं आता आम्ही?

      दिवे लावले, थाळ्या वाजवल्या. तरीही शाळा बंद. ऑनलाईन शिक्षणासाठी डिजिटल इंडियात नेटवर्क करत नाही. परीक्षांबाबत संभ्रमावस्था, भविष्याचा अंधःकार. अशा स्थितीत पुन्हा घरातून मानसिक प्रेशर. नैराश्य वाढत चाललंय. पावलांना रस्ता दिसत नाही. मनाला आशेचा किरण मिळत नाही. अशा अवस्थेत आमच्यातला ज्ञानोबा ताटी लावूननिपचित पडून राहिलाय आतल्याआत कुठेतरी. दुःखाने तळमळतोय. त्रासाने तिष्ठतोय. त्याला बाहेर पडायचं आहे या सगळ्यातून. पण कसं, ते समजत नाहीय. कारण, त्याला सवय झालीय सध्या दाराआड स्वस्थ बसण्याची. रुदन मांडले तरीही त्यापुरतेच. पुढचा अंधःकार त्याला छळतोय. अशावेळी कुठूनतरी पुन्हा मुक्ता यावी. अन् गंजलेल्या मनाच्या ताटीवर हातोड्याचे घाव घालत म्हणावं, ‘‘, weak up ज्ञानेश्वरा. असं  होऊन कसं चालेल? तुझं कल्याण तुलाच करायचंय? लोकं काय देवालाही नावं ठेवतील आणि तू तर माणूसच आहेस. टेन्शन नको घेऊस. हेही दिवस जातील. फक्त एकच ध्यानात ठेव, तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणून ताटी उघड ज्ञानेश्वरा…weak up…“”

        आता या काळात मुक्ताई कुठून येणार? हा आलाच ना सवाल. तर ऐका, ही मुक्ताई कुठे बाहेर नाहीय. ती देखिल आपल्यातच दडून आहे. खरंतर, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता ही आपल्या मानवी मनाचीच रुपं. वेगवेगळ्या काळात यांचा भास आपल्याला होतच असतो. तसाच भास आता मुक्तेचा व्हायला हवा. भावनांची झापडं ओढून आत रुसून बसलेल्या ज्ञानोबाला जागं करायला हवं. भविष्य तुझंच आहे. तू करशील ते प्रामाणिकपणे, कष्टाने कर. मग ते साध्य होईलच. लोककल्याणाचा मार्ग धर. या मोहपाशातून बाहेर येशील. तुझा मार्ग तुला सापडेल. असा विश्वास आपणच आपल्याला द्यायला हवा. एक रस्ता बंद झाला तर दुसरा उघडतो. तो उघडलेला रस्ता शोधून त्यावर चालायला हवं. तरच यशप्राप्तीपर्यंत घोडदौड करु शकू.

      सध्याचा काळ अतिशय घातक आहे. इथे जो काळासोबत (आणि कोरोनासोबत) चालेल, तोच टिकेल. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद म्हणवून घेतले असं म्हणतात. आता हा रेडा खरोखरचाच रेडा होता, की त्यावेळच्या समाजव्यवस्थेने परंपरेचं जोखड खांद्यावर टाकलेला एखादा समाजघटक? हे आपण सांगू शकत नाही. पण ज्ञानोबाची तिच जिद्द धरुन आपण चालू शकत नाही का? रेडा जावूदे, आपल्या स्वतःच्या तोंडातून आपण सध्याचं वास्तव मांडू शकत नाही का? सध्या अनेक मुद्दे आपल्या आजूबाजूला टाहो करतायत. त्यांचा आवाज आपण निश्चितच होऊ शकतो. ज्ञानेश्वरी लिहिण्याएवढी आपली ऐपत नाही. पण निदान जे अस्वस्थ करतंय, जे छळतंय त्याविषयी काहीतरी लिहू शकतोच की आपण. निर्जिव भिंत चालवता येणं अशक्यच आहे. पण जो समाज खरंच मृतावस्थेत पडलाय, त्याला चैतन्य देवून माणसात आणायचं काम तरी आपल्या हातून होऊच शकतं. आता लॉकडाऊन झालेलं मन, बुद्धी, शरीर आवाज लॉकडाऊन फोडून बाहेर काढायची वेळ आलीय. त्याशिवाय पर्याय नाही.

     त्यासाठीच लवकरात लवकर मुक्ताईने दार ठोठावले पाहिजे आणि तितक्याच लगबगीने ज्ञानोबानंही ते उघडले पाहिजे. नाहीतर माऊली आतल्याआतच झुरत राहिल हो. म्हणा, मुक्ताई बोला, ताटी उघडा ज्ञानेश्वरा…           

                                                             अतिथी-श्रेयस अरविद शिदे.९४०४९१७८१४

 

Leave a Reply

Close Menu