सिधुदुर्गात घडतेय ‘कौशल्य क्रांती‘

९ ऑगस्ट या क्रांतीदिनीसिधुदुर्ग जिल्ह्यात नव्या क्रांतीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. नोकरीच्या निमित्ताने शहराकडे जावून जगण्यासाठीचा संघर्ष करणारा तरुणांचा लोंढा जिल्ह्यातच रोखला पाहिजे अशा चर्चेचे गु-हाळ गेली अनेक वर्ष सुरु आहे. अनेक संस्थांचे त्या अनुषंगाने प्रयत्नही सुरु होते, पण या चर्चेला किवा प्रयत्नांना ख-या अर्थाने दिशा मिळाली ती या कोविड आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सुरु झालेल्या रिव्हर्स मायग्रेशनमुळे.

      घरवापसीच्या अनुषंगाने जिल्ह्यात परतलेल्या युवकांना स्थानिक पातळीवर शाश्वत अशा रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत असा विचार अनेक व्यक्ती आणि संस्था करु लागल्या. जिल्ह्यात औद्योगिकरण नसल्याने यासाठी दोनच मोठे पर्याय समोर आहेत. त्यातला पहिला आहे तो म्हणजे शेती आणि शेतीपूरक व्यवसाय सुरु करणे आणि दुसरा म्हणजे जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रासारख्या उद्योगासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करणे. या दोन्ही पर्यायात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या शाश्वत संधी उपलब्ध आहेत.

      यातल्या दुस-या पर्यायावर तातडीने काम करणे गरजेचे होते. कारण जिल्ह्याच्या बांधकाम क्षेत्राचा विचार केला तर त्यात ७० टक्क्याहून अधिक मनुष्यबळ हे परप्रांतीय आहे. लॉकडाऊनमुळे ही परप्रांतीय मंडळी आपापल्या प्रदेशात निघून गेलेली आहेत आणि त्यांच्या परतीच्या शक्यता या निम्म्याहून कमी संख्येच्या आहेत. अशावेळी त्यांची जागा आपल्या स्थानिक युवकांनी घेण्याचा प्रयत्न केला तर या क्षेत्रात मोठ्या संख्येने स्थानिक कारागीर सामावला जाईल. सध्या या व्यवसायातील कामगार वर्गात, अधिक श्रमाच्या अशा मजूर, बांधकाम, प्लास्टर, सेंटरींग, फरशी फिटिंग, वॉटर प्रुफिग, फर्निचर या विषयात परप्रांतीयांची मक्तेदारी आहे आणि तुलनेने कमी श्रमाच्या अशा पेंटींग, इलेक्ट्रिकल, स्लाईडिंग या कामात स्थानिक कारागीर मंडळी आहेत.

         या अधिक श्रमाच्या परंतु अधिक कमाईच्या क्षेत्रात काम करण्यासाठी आपल्या युवकांना प्रशिक्षित करणे, या उद्योगातील संधीची ओळख करुन देणे फार महत्त्वाचे होते. कौशल्य क्रांतीच्या निमित्ताने नेमका हाच प्रयोग जिल्ह्यात सुरु झालेला आहे.

      हा स्थानिक कारागिरांचा विषय भगीरथपरिवारात चर्चेत असतानाच जिल्ह्यातील एक संवेदनशील पत्रकार विजय शेट्टी यांनी दै.तरुण भारतया वर्तमानपत्रात गरुडावर बैसोनी माझा कैवारी आलाअसे होत नसते अशा आशयाचा एक लेख लिहिला आणि या विषयाला चालना मिळाली. त्यानंतर बांधकाम क्षेत्रातल्या क्रेडाईया संस्थेने यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली. तरुण भारत, भगीरथ, क्रेडाई आणि आमच्यासारखी काही समविचारी मंडळी एकत्र आली, त्यातून स्थानिक युवकांना बांधकाम विषयक कौशल्य प्रशिक्षण देण्याचा विचार सुरु झाला. खरंतर कौशल्य भारत घडविण्यासाठी केंद्र सरकारने यापूर्वीच स्वतंत्र मंत्रालय निर्मिती केलेली आहे. या प्रवासात या सरकारी यंत्रणेचा काही उपयोग होतो का हे सुद्धा अजमावण्यात आलं. पण दुर्दैवाने त्याचा उपयोग झाला नाही.

      विचार तर झाला पण अशा प्रकारचे प्रशिक्षण केंद्र उभे करण्यासाठी एखाद्या तांत्रिक शिक्षण देणा-या संस्थेची गरज होती, यासाठी साहजिकच नाव समोर आलं ते अच्युत सावंत भोसले सरांचं. चराठा इथल्या भोसले नॉलेज सिटीचं. सरांचा ११० टक्क्यांचा होकार या अभिनव प्रयोगाची यशस्विता निश्चित करुन गेला. बैठकीचा दिवस ठरला. भोसले नॉलेज सिटीचे अच्युत सावंत, ‘तरुण भारतचे विजय शेट्टी, ‘भगीरथचे डॉ.प्रसाद देवधर, मार्गदर्शक दिनेश नागवेकर, क्रेडाईचे नीरज देसाई, गोविंद खोर्जुवेकर, गजानन कांदळगावकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, रविंद्र प्रभूदेसाई, परुळेकर, सुकी, उदय पारळे, अजित बांदेकर या मंडळींची केवळ तासाभराची चर्चा झाली आणि त्यातून तीन दिवसाचा बांधकाम आणि प्लास्टरींग प्रशिक्षण कार्यक्रम निश्चित झाला. प्रत्येकाच्या कामाची वाटणी झाली. नियोजन इतकं लाईन लेव्हलमध्ये होतं की, त्यानंतरची एकत्र भेट ही थेट या प्रशिक्षणाच्या शुभारंभ कार्यक्रमाच्या वेळीच झाली.

      ‘टीम वर्ककाय असते याची प्रचिती या निमित्ताने आली. ८ ऑगस्ट रोजी १२ प्रशिक्षणार्थी घेऊन पहिली बॅच सुरु झाली. प्रशिक्षण जरी तीन दिवसाचं असलं तरी त्याआधीचे पंधरा दिवस मोठ्या तयारीचे होते. त्यासाठी अच्युत सावंत भोसले आणि त्यांच्या आस्थापनेने घेतलेली मेहनत ही खूपच मोलाची होती. सामान्य बुद्धीच्या प्रशिक्षणार्थीला समजू शकेल असा अभ्यासक्रम खोबरेकर सरांनी चक्क मालवणीतून तयार करुन तो त्यांनी स्वतः शिकवला. नीरज देसाई यांच्या नेतृत्वाखालील क्रेडाई सदस्यांनी प्रॅक्टिकलसाठी आपल्या साईट उपलब्ध करुन दिल्या. डॉ.प्रसाद देवधर, गजानन कांदळगावकर, रविद्र प्रभूदेसाई यांनी या सर्वांचा समन्वय राखला.

      १० ऑगस्ट रोजी या पहिल्या प्रशिक्षणाचा समारोप झाला. भविष्यात या कारागिरांना गरजेच्या वेळी अर्थसहाय्य मिळणं सुलभ व्हावं यासाठी जिल्हा बँक सुद्धा या उपक्रमाचा एक भाग झाली आहे. एक प्रशिक्षण वर्ग पार पडला. शुभारंभाचा प्रयोग अपेक्षेपेक्षा चांगला झाला, पण अजून खूप मोठा पल्ला गाठायचा असल्याने लगेचच पुढील नियोजनानुसार पुढचं नियोजन सुरु झालं, त्यानुसार कोरोनाचे सावटसंपल्यानंतर २५ प्रशिक्षणार्थी घेऊन पेव्हिंग ब्लॉक फिटिंग प्रशिक्षण घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

    शेती करणारे शिकत नाहीत आणि शिकलेले शेतीकडे वळत नाहीत, असंच काहीसं बांधकाम क्षेत्राचं आहे. कौशल्य असेल तर मरण नाही. उलट मरणाचे काम आहे. त्यामुळे ज्यांना यात अभिरुची आहे त्यांना किमान तांत्रिक आणि व्यवहारज्ञान देऊन प्रशिक्षित करणं, त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव देणं आणि पुढे जाऊन त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणं, या गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न या अभियानातून होणार आहे.

      तू आणि मी मिळून अशक्य असे काहीच नाही याचा केवळ अध्यात्मिक नाही तर प्रत्यक्ष प्रत्यय या अभियानाच्या निमित्ताने आला. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणा-या मंडळींनी एकत्र येऊन अशा पद्धतीने एका सामाजिक विषयावर निस्वार्थ काम करणे म्हणजे ग्रेट आहे, असे मला वाटते.

      बांधकाम क्षेत्रातील आवश्यक त्या सर्व कौशल्य विकासासाठी अशी प्रशिक्षणे नियमित आयोजित करणे हा आम्हां समूह सदस्यांचा विचार आहे. पण भोसले नॉलेज सिटीचे अच्युत भोसले हे या विचाराच्याही एक पाऊल पुढे आहेत. या प्रशिक्षणासाठी थेअरी आणि प्रॅक्टिकल एकत्र घेता येईल असे एक कायम स्वरुपी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा त्यांचा मानस आहे, जिल्हावासीयांना माहीतच आहे की, भोसले सर एकदा ठरवतात ते नक्की पूर्णत्वास नेतात. सर्वांच्या सहकार्यातून त्यांचा संकल्प लवकरच पूर्णत्वास जावा आणि स्वप्नातला कौशल्य सिंधुदुर्गघडावा हीच सदिच्छा!

प्रभाकर सावंत, ९४२२३७३८५५

 

Leave a Reply

Close Menu