जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने कोरोनाचा पर्यटनावर झालेला परिणाम, कोकणात निर्माण झालेले आव्हान याविषयावर लिहायला घेतलं खरं आणि लक्षात आलं की, या विषयाची व्याप्ती फार मोठी आहे. नाटकात रंगमंचावरील कलाकार नाटकाला वाहवा मिळवून देतात. पण त्यासाठी पडद्यावरील कलाकारांसोबत त्यांच्या पाठीमागे राबणारे हात म्हणजेच नाटकाची सर्व अंगे सांभाळणारे पडद्यामागचे कलाकारयांचीही तेवढीच मेहनत असते. पर्यटन म्हटले की, पर्यटकाला लागणा-या सोयीसुविधांची नुसती यादी समोर आणली तरी या पर्यटनाच्या माध्यमातून कित्येकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगाराची संधी उपलब्ध होत असते हे समजून येईल. पर्यटकांची निवास व्यवस्था, त्यांच्या जेवणासाठी लागणारा भाजीपाला-मासे-चिकन-मटण-अंडी, दूध व दुधाचे पदार्थ तसेच किराणा माल, बेकरी उत्पादने पुरविणारे, रुम सर्व्हीस देणारे, स्वच्छता कर्मचारी या आणि अशा अनेक घटकांवर अचानकपणे आलेल्या कोरोना संकटामुळे सारेच कोलमडून गेले आहे.

      पर्यटकांच्या सोयी-सुविधांसाठी केलेली गुंतवणूक ही सद्यस्थितीत लॉकडाऊनच्या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांच्या काळजीचा विषय ठरत आहे. सध्या कोकणात येणारा चाकरमानी अगदी घरातील सदस्य असला तरी शासन नियमानुसार आज त्याला विलगीकरणात रहावे लागत आहे. उद्या जेव्हा कधी पर्यटन व्यवसाय सुरु होईल, तेव्हा येणा-या पर्यटकांची तसेच पर्यटन विषयक सेवा पुरविणा-यांची मानसिकता ही काही काळ भीतीच्या छायेखाली असेल असे आजचे चित्र दर्शविते.

      स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, पॅरासेलिंग, स्पिडबोट असे समुद्रकिना-यावरील साहसी जलक्रीडा पर्यटनाचे उदाहरण घेतले तर प्रत्येक वेळी वापरण्यात येणारा मास्क, चेंजिंग रुम आणि पर्यायाने येणा-या वस्तू दर वेळेस सॅनिटाईज करणे मोठे कष्टप्रद होणार आहे. येणा-या पर्यटकांच्या नानाविध शंकांना सामोरे जाताना प्रत्येकाला तारेवरची कसरतच करावी लागणार आहे. या लेखाच्या निमित्ताने या सेवा उपलब्ध करुन देणारे आणि आपल्या घरात पर्यटकांसाठी निवास न्याहारी योजना राबविणारे मालवण-दांडी येथील महेंद्र पराडकर यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी तूर्त तरी या भागातील अशी सेवा उपलब्ध करुन देणा-या सर्वांनी किमान एक वर्षभर पर्यटन हा विषय बाजूलाच ठेवला आहे आणि पुन्हा एकदा आपल्या पारंपरिक व्यवसाय म्हणजेच मासेमारीकडे लक्ष केंद्रित केले असल्याचे सांगितले.

     तारकर्ली गावातील लॉज व्यावसायिक आणि बागायतदार श्रीमती अनुजा प्रभूतेंडोलकर यांच्या मते, कोकणातील पर्यटन व्यवसाय हा हंगामी स्वरुपाचा म्हणजे ६ ते ८ महिन्यांचा असतो. अतिथी देवो भवया उक्तीनुसार पर्यटकांच्या मागण्यांचा विचार करुन आणि वेटलिफ्टींग स्पर्धेच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशांमधील पर्यटनाच्यादृष्टीने सुविधांचा अभ्यास करुन आम्ही काही कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करीत चांगल्या सुविधा निर्माण केल्या. पण आजच्या या संकटामुळे पर्यटनाचा मुख्य हंगामाच वाया गेला आहे आणि येणा-या दिवाळी हंगामावरही अनिश्चिततेचे सावट आहे.

      तरी आमची आंबा-काजू बागायती असल्याने चिंतामणी रिसॉर्टमधील कामगार बागायतीच्या हंगामात बागेत काम करतात. पर्यटन व्यवसाय ठप्प झाल्याने कामगारांना पूर्ण वेतन जरी देता येत नसले तरी या कठीण काळात आम्ही त्यांना संभाळून ठेवले आहे त्याप्रमाणे त्यांनीही आम्हाला समजून घेतले आहे.

      कोकणातील थंड हवेचे ठिकाण आणि वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीत गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे जवळजवळ अडीच महिने मुख्य वर्षा पर्यटनाच्या हंगामावर मोठा परिणाम झाला. त्यानंतर जेमतेम एक ते दीड महिना दिवाळी आणि ख्रिसमसपर्यंत पर्यटन व्यवसाय चांगला झाला. जानेवारी-फेब्रुवारी आंबोलीत विशेष पर्यटन होत नाही ते तसे ऑफ सिझनच असतात. यंदाचे मार्च ते जून हे महिने लॉकडाऊनमध्ये गेले आणि वर्षा पर्यटन हा आंबोलीच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो तोही कोरोनाच्या सावटामुळे झालाच नाही. म्हणजे एकूण गेल्या वर्षीपासून तसा हिशोब घालता सुमारे १४ महिने आंबोली परिसरात पर्यटन व्यवसाय ठप्प झाल्यात जमा असल्याचे मलबार नेचर कन्झर्वेशन क्लबच्या माध्यमातून आंबोलीत कार्यरत असणारे जंगल अभ्यासक काका भिसे यांचे म्हणणे आहे. तसेच वाईल्डलाईफ पर्यटनाच्या माध्यमातून मुंबई, पुणे येथून येणारे निसर्गप्रेमी व अभ्यासक हाच आमचा पर्यटक असतो. पण जिल्हा बंदीमुळे आमच्या पर्यटन व्यवसायावर गंभीर परिणाम झाला. वर्षभरापूर्वी गुंतवणूक करुन कर्ज घेऊन छोटे रिसॉर्ट, खानावळी असे व्यवसाय ज्या तरुणांनी सुरु केले आहेत अशांसमोर कोरोनामुळे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. या युवकांची कर्जमाफीची मागणी नाही तर किमान एक वर्ष तरी कर्जावरील व्याज माफ करावे तसेच या काळातील व्यावसायिक वीज, पाणी बिलात काही सवलत मिळावी अशी त्यांची मागणी आहे. आंबोलीतील पर्यटन पुन्हा सुरु होण्यासाठी निश्चितच काहीकाळ जावा लागेल अशी मानसिकता सर्वांची झालेली आहे. परंतु तोपर्यंत उपजिविकेसाठी नजिकच्या शहरांमध्ये अगर गोवा राज्यांमध्ये तात्पुरत्या नोकरींसाठी येथील स्थानिकांचा शोध चालू आहे. खरेतर नजिकचे गोवा राज्य, ताडोबा येथील पर्यटन व्यवसायाला नियम व अटींचे पालन करुन परवानगी देण्यात आली सुद्धा, त्याचप्रमाणे आंबोलीत ही तशी परवानगी मिळाली तर येथील व्यावसायिक शासनाच्या सर्व नियम व अटींचे पालन करुन आपला पर्यटन व्यवसाय करतील. किमान येत्या काही महिन्यांपासून पर्यटन व्यवसाय सुरु झाल्यास आमच्याबरोबरच वडापाव, चहा विक्रेते, मक्याचे कणीस विकणा-यांसारख्या छोट्या व्यावसायिकांनाही दिलासा मिळेल.

      सिंधुसागर पर्यटन सेवा सहकारी संस्था वेंगुर्ल्याचे अध्यक्ष दीनानाथ बाळकृष्ण वेर्णेकर यांच्याशी संफ साधला असता कोरोनावर हमखास औषध अगर लस जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत योग्य ती काळजी घेऊन आपल्याला कोरोना सोबतच जगावे लागणार आहे. विशेष करुन किनारपट्टी लगतच्या हॉटेल्स, रिसॉर्टना विशेष देखभालीची गरज असते. किना-यावर असणारा सोसाट्याचा वारा, दमट हवामान आणि अती पावसामध्ये पाणी भरण्याची ही भीती असते. या परिस्थितीशी जसे पर्यटन व्यावसायीकांना जुळवून घ्यावे लागते तसेच कोरोनासोबत आपल्याला भविष्यात जुळवून घ्यावे लागणार आहे. कर्जबाजारी किंवा उपासमारीने मरण्यापेक्षा कोरोनासोबत जगायची तयारी प्रत्येकाने ठेवायला हवी. पर्यटन व्यवसाय सुरु केल्यानंतर मास्क वापरणे, संफ येणा-या वस्तूंचे सॅनिटायझेशन, ठराविक तासांनी हात धुणे या सवयी कायम ठेवाव्या लागणार आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सीआरझेड संदर्भातही शासनाने स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांना दिलासा देणारे धोरण राबवायला हवे.

      कोकणातील गणपतीपुळे हे असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्र आणि देशभरातील भाविक या ठिकाणी भेटी देतात. गेल्या २५ ते ३० वर्षांत या प्रकारच्या धार्मिक पर्यटनामुळे गणपतीपुळे गावातील चित्रच बदलले आहे. गावातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा तर झाल्याच त्याबरोबरच गावातील प्रत्येक घरात पर्यटनावर आधारित रोजगार निर्मिती झाली. गेल्यावर्षी १७ लाख ६८ हजार पर्यटकांनी श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे भेट दिल्याची नोंद आहे. सरासरी अंदाजे १५ लाख पर्यटक दरवर्षी या क्षेत्राला भेट देत असतील हे गृहीत धरले तरी येथे होणा-या पर्यटनाचा आपल्याला अंदाज घेता येईल.

      जवळजवळ सहा महिने श्रींचे मंदिर बंद असल्याने गावाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. लॉजिंग व्यवसायाबरोबरच घरगुती खानावळी, हॉटेल, मंदिराजवळ असलेले नारळ, फुल विक्रेते, शहाळी विक्रेते, किना-यावर चालणा-या उंट, घोड्यांच्या सफरी अशा हातावर पोट असणा-या अनेक व्यावसायीकांवर तर उपासमारीची वेळ आली आहे. परंतु परिस्थिती कठीण असली तरी आम्ही व्यवसायिक त्याला संयमाने तोंड देत आहोत. फिजिकल डिस्टंसिंगचे नियम पाळत, स्वच्छतेच्या सवयींचे पालन करुन पर्यटन व्यवसाय सुरु करायला शासनाने परवानगी दिल्यास इथले जीवनमान हळूहळू नक्कीच पूर्वपदावर येईल असा आशावाद कोकण पर्यटन महासंघाचे संस्थापक सदस्य आणि गणपतीपुळे येथील केळकर लॉजचे संचालक श्री. प्रमोद श्रीकृष्ण केळकर यांनी व्यक्त केला आहे.

      सुमारे २३ वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाला. परंतु ठराविक गावे वगळता जिल्ह्याचा बराचसा भाग हा पर्यटनदृष्ट्या विकासाच्या प्रतिक्षेत आहे. पर्यटन जिल्हा म्हणून निवास न्याहारी योजना राबवणा-यांना काही विशेष सवलती, काही पर्यटन प्रकल्पांसाठी गतिमान धोरण आखणे या बाबींची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने स्थानिकांच्या कल्पना, स्थानिक स्तरावर भरवले जाणारे पतंग महोत्सव, कासव जत्रा, पर्यटन महोत्सव, इथली सांस्कृतिक ओळख असणारे शिमगोत्सव यांसारख्या इव्हेंट्सना पर्यटन महामंडळाने शासनाचे पाठबळ आणि राष्ट्रीय पातळीवर व्यापक प्रसिद्धी दिल्यास सिंधुदुर्ग आणि कोकणची ओळख अधिक ठळकपणे जगाच्या पर्यटन नकाशावर होईल. याकरिता लाल फितीतला कारभार दूर करून पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक तज्ज्ञांची मदत पर्यटन महामंडळाने घ्यायला हवी.

     कोकणात ज्यांची जागा आहे त्यांनी पर्यटनाबरोबरच काहीसे दुर्लक्षित होत असलेल्या कृषी आणि कृषिपूरक व्यवसायाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. कोरोना काळात मुंबई अगर मोठ्या शहरात नोकरीची हमी नाही. असा बराच वर्ग गावांकडे स्थलांतरित झाला आहे. जसे गावातून महानगरात स्थिर होणे अवघड असते तसेच शहरातून पुन्हा गावात येऊन स्थिरावणे कठीणच असते. परंतु हे अवघड असले तरी अशक्य नक्कीच नाही. स्वतःमधील क्षमता आपली आवड, जमीन जागा नसल्यास स्वतः मधील कौशल्याची जाण आणि कष्ट करण्याची तयारी असल्यास कोकणात पर्यटनाबरोबरच रोजगाराच्या अन्य देखील संधी आहेत. त्याकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे. उद्योग-व्यवसायात नव्याने उभारी घेणा-यांना मार्गदर्शनाची गरज असेल तर शासनाच्यावतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारे जिल्हा उद्योग केंद्र तर आहेच, परंतु व्यवसायातील खाचखळगे शासकीय नियम – अटींमुळे अपात्र ठरणा-या युवक-युवतींना जर काही करण्याची जिद्द आणि मेहनतीची तयारी असेल अशांसाठी झाराप येथील भगिरथ प्रतिष्ठानही संस्था मार्गदर्शन करण्याबरोबरच आवश्यक असल्यास आर्थिक पाठबळही देते. कौशल्य क्रांतीच्या माध्यमातून त्यांचे उपक्रम सुरु झाले आहेत. पोटासाठी शेतीहा पारंपरिक विचार बदलून खिशासाठी शेतीअसा व्यवसायाभिमुख विचार, त्यासाठी कृषी पूरक व्यवसायाची जोड दिल्यास कोकणातील गावे स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करतील.

      कोरोना काळानंतर नियम आणि अटींच्या अधिन राहून पर्यटन व्यवसायास शासनाने परवानगी दिल्यास काही ठोस धोरण पर्यटन व्यवसायासाठी खास करुन कोकणासाठी राबविण्याची गरज आहे. त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे-

१. किनारपट्टीलगतची गावे, सह्याद्रीचा परिसर अशा पर्यटन बहरण्याच्या क्षमता असलेल्या गावांमध्ये महाराष्ट्र महामंडळ पर्यटनाच्या निवास न्याहारी योजनेला अधिक प्रोत्साहन मिळायला हवे. तसेच किनारपट्टी भागात सी.आर.झेड. कायद्यातील जाचक तरतुदींबाबत स्थानिकांना विश्वासात घेऊन सर्वमान्य धोरण निश्चित करायला हवे आहे.

२. कोकणातील बरीच घरे आणि जमिनी या कुळ कायद्यामध्ये किंवा सामायिक स्वरुपाची घरे असल्याने त्यांना घरगुती निवास न्याहारी व्यवसाय परवाना अगर कर्ज घेताना अडचणी येतात. अशा प्रकारच्या अडचणींवर मात करण्यासाठी केवळ घोषणा न करता सहहिस्सेदारांचे संमतीपत्र दाखल करून परवानगी देता येणे शक्य होईल का? अशा पर्यायांचा विचार शासनस्तरावर होऊन तसे आदेश निघाल्यास ब-याच ठिकाणी असे व्यवसाय सुरु होऊ शकतील.

३. पर्यटकांना आकर्षित करणारे समुद्र किनारे, गडकिल्ले, मंदिरे , सह्याद्रीच्या डोंगर रांगा याबरोबरच कोकणातील कृषी पर्यटन प्रत्यक्ष शेती करण्याचा अनुभव, झाडावरुन आंबे काढण्याचा आनंद पर्यटकांना घेता येईल. या कृषी पर्यटनाचेही ब्रँडिंग व मार्केटिंग चांगल्या प्रकारे झाल्यास वेगळ्या दर्जाचे पर्यटन गावात बहरू शकेल.

४. कर्ज घेऊन गुंतवणूक केलेल्या पर्यटन व्यवसायिकांची कर्जमाफी ही मागणीच नाही, तर कर्जावरील व्याजात वर्षभराची सूट आणि वीज-पाणी बिलात सवलत मिळाल्यास इथल्या भूमीपुत्राला थोडा दिलासा मिळेल. त्यांची ही मागणी पूर्ण होण्यासाठी इथल्या आमदार-खासदारांनी आस्थेने लक्ष देऊन विधिमंडळात ही मागणी लावून धरल्यास नक्कीच यावर सकारात्मक निर्णय होऊ शकेल.

     स्थानिकांच्या सहभागातून फिजिकल डिस्टनसिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझेशन या नव्या नियम व अटींचे पालन करीत पर्यटन व्यवसाय सुरु करायला शासनाने परवानगी दिल्यास कोकणच्या अर्थकारणाला नक्कीच गती मिळेल.

-सीमा मराठे, ९६८९९०३३६७

 

 

 

Leave a Reply

Close Menu