पर्यटनाला चालना कधी मिळणार?

कोरोनाच्या जागतिक महामारीने अनेक उद्योगधंद्यांचे कंबरडे मोडून ठेवले आहे. जगाची आर्थिक घडी पूर्णतः विस्कटून गेली आहे. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उद्योगधंद्यांना पुन्हा एकदा उभारी कशी देता येईल यादृष्टीने सर्वांचे प्रयत्न सुरु आहेत. त्याकरीता नवनवीन पर्याय देखील चोखाळले जात आहेत. कोरोनामुळे पर्यटन व्यवसायातही प्रचंड आर्थिक मंदी अनुभवयास मिळत आहे. मालवण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाचे प्रमुख केंद्र आहे. मुंबई व पुणे यासारख्या मोठ्या शहरांसह गोवा राज्यातील पर्यटकांवर अवलंबून असलेला मालवणचा पर्यटन व्यवसाय कोरोनामुळे साफ कोसळला आहे. अशा अवस्थेत पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यातील स्थानिक पर्यटकांकडे लक्ष केंद्रित करता येता येईल का? असा एक विचार पुढे येतो आहे.

      कोरोना महामारीमुळे संपूर्ण मानवजात आज त्रस्त आहे. कोरोना संकटकाळात जीवाला तर जपायलाच हवे. पण केवळ जीवाला सांभाळताना जगणं सोडून देखील चालणार नाही. जगण्यासाठी धडपड ही करावीच लागणार. कारण कोरोनाचे संकट केव्हा दूर होईल आणि जगाचं रहाटगाडं पूर्ववत कसे होईल हे अजूनतरी कुणीही निश्चित सांगू शकत नाहीय. त्यामुळे जीवाला जपत अनेकांचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरुच आहे. तरी देखील कित्येकांचे अर्थचक्र रुळावर आलेले नाही. कोरोनामुळे सारे जीवनचक्रच बिघडलेले आहे. अनेक उद्योगधंदे आणि व्यवसायांना नेहमीचा वेग पकडता येत नाहीय. सिंधुदुर्गच्या पर्यटन व्यवसायाचेही असेच काहीसे झाले आहे. एप्रिल-मेचा हंगाम हातातून गेलाय. आता दिवाळीचा हंगाम समोर येऊन ठेपलाय. परंतु, या हंगामावरही कोरोनाचे संकट कायम आहे. मुंबई, पुणे या मोठ्या शहरांसह आणि गोव्यातील पर्यटकांवर सिंधुदुर्गचा पर्यटन व्यवसाय मुख्यत्वेकरुन अवलंबून आहे. पण कोरोनाने अनेकांना रोखून धरले आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या प्रचंड रोडावली आहे. किबहुना पर्यटन व्यवसाय ठप्पच आहे. मालवणात गेल्या काही दिवसात किरकोळ स्वरुपात पर्यटकांची ये-जा सुरु झाली आहे. मात्र खूप काळजी घेऊनच पर्यटकांना आणले जात आहे. तरीपण आलेल्या पर्यटकांची

         संख्या फार मोठी आहे असेही नाही. कोरोनामुळे भितीचे सावट कायम आहे. पुणे, मुंबई येथील बरेचसे पर्यटक मालवणातील आपल्या ओळखीच्या पर्यटन व्यावसायिकांच्या संपर्कात आहेत. तुमचे पर्यटन सुरु झाले तर आम्हाला कळवा. आम्ही मालवणला यायला इच्छुक आहोत‘, असा निरोप पर्यटकांनी देऊन ठेवला आहे. मात्र कोरोनाच्या भितीपोटी अनेक पर्यटन व्यावसायिक रिस्क घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे कोरोना संपणार तरी कधी आणि पर्यटनाला वेग येणार तरी कधी? हा प्रश्न आहेच. अशा बिकट परिस्थितीत जिल्ह्यातील स्थानिक पर्यटकांकडे लक्ष केंद्रित केले गेले तर त्याचा थोडाफार फायदा भविष्यात होऊ शकेल असा एक मतप्रवाह ऐकावयास मिळतो आहे. परंतु त्याकरीता आपला जिल्हा कोरोनामुक्त व्हायची वाट पहायची की, शासनाच्या नियमावलीनुसार कोरोनाबाबतची जास्तीत जास्त काळजी घेऊन पर्यटन सुरु करायचे याविषयीचा ठोस व ठाम निर्णय घ्यावा लागेल.

          आज कोरोनामुळे प्रत्येक अनोळखी माणसाकडे सर्वप्रथम संशयाच्या नजरेनेच पाहिले जाते. येणारा नविन माणूस कोरोना तर घेऊन येणार नाही ना? ही भिती कायम आहे. पण या भितीपोटी जिल्ह्यात सर्वच आर्थिक व्यवहार आणि व्यापार बंद आहेत असेही नाही. जास्तीतजास्त काळजी घेऊन माणूस कामानिमित्त जिल्ह्यात वावरताना दिसू लागला आहे.  जिल्ह्यात रुग्णसंख्या नियंत्रणाखाली यावी याकरीता खबरदारी घेण्यासाठी पावले उचलली जात आहेत. या प्रयत्नांना यश येवो हीच सर्वांची प्रार्थना आहे. जिल्हा लवकरात लवकर कोरोनामुक्त झाला तर त्यासारखी दुसरी आनंदाची बाब नाही. मात्र भविष्यात आपल्या जिल्ह्यातील कोरोनाचे संकट टळले तरी परजिल्हा किंवा राज्यातून येणा-या पर्यटकांचा म्हणावा तसा प्रतिसाद नाही मिळाला तर स्थानिक पर्यटक हा पर्याय आपल्याला चोखाळता येऊ शकतो. पण त्यादृष्टीने आपण तयार आहोत का याचा विचार व्हायला हवा. स्थानिक पर्यटनाच्या बाबतीत सांगायचं तर जिल्ह्यातील अनेकांनी अद्याप शिवलंका, किल्ले सिंधुदुर्ग पाहिलेला नाही. देवगड, मालवण व वेंगुर्लेतील कित्येक निसर्गरम्य समुद्रकिना-यांवरील रुपेरी वाळुतून कित्येक जिल्हावासीयांना चालायचे आहे. वेंगुर्ला खाडीतील कांदळवन सफर करायची मालवणतील निसर्गप्रेमींचीही इच्छा आहे. त्यांना जिल्ह्यातील खाड्यांमध्ये बॅकवॉटरचा आनंद घ्यायचा आहे. मालवणी जेवणावरही ताव मारायचा आहे. जिल्ह्यातील प्रमुख मंदिरांमध्ये एकाच दिवशी देवदर्शन करायची सुप्त इच्छा काहींच्या मनात आहे. अशा विविध पर्यायांद्वारे स्थानिक पर्यटकांना आपण पर्यटनाचा आनंद देऊ शकतो का? त्यासाठी सवलतीचे दर किवा विशेष योजना आपण आखू शकतो का? असे मुद्दे सध्या चर्चेत आहेत. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, खासदार, आमदार आणि प्रमुख राजकीय मंडळींनी पर्यटन व्यावसायिकांकडून केल्या जाणा-या सूचनांचा विचार करून सिंधुदुर्गच्या पर्यटनाला कोरोना काळात चालना कशी देता येईल याचा विचार करायला हवा.

रिक्षा व्यावसायिकांना दिलासा हवा

      कोरोनाचा मोठा आर्थिक फटका अनेक उद्योगधंद्यांना बसला आहे. रिक्षा व्यावसायिकही त्यास अपवाद नाहीत. कोरोना काळातील गेल्या ६ महिन्यात रिक्षा व्यावसायिकांच्या उत्पन्नात ९० टक्केपेक्षा जास्त घट झाली आहे. पर्यटन व्यवसायही ठप्प असल्याने कित्येक रिक्षा व्यावसायिक घरीच आहेत. त्यामुळे शासन दरबारी दरवर्षी विविध कागदपत्रांसाठी येणारा खर्च तरी भागेल का? या आर्थिक विवंचनेत रिक्षा व्यावसायिक आहेत. त्यांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने काही सोयी सवलती देता येतील काय? याचा सकारात्मक विचार शासनाने करायला हवा.

अतिथी-महेंद्र पराडकर, मालवण,९४२१२३६२०१

Leave a Reply

Close Menu