गढूळ पाण्याबाबत निवेदनाद्वारे राष्ट्रवादीने वेधले लक्ष

वेंगुर्ला नगरपरिषदेकडून शहरातील नळपाणी योजनेच्या ग्राहकांना अनेक दिवस गढूळ पाण्याचा पुरवठा करण्यात येत असून या पाण्याची पाणीपट्टीही शासनाच्या नियमानुसार वसुल केली जात आहे. कोरोना महामारीच्या काळात देशात स्वच्छतेत अव्वल ठरलेल्या वेंगुर्ला नगरपरीषदेतील नागरिकांना शुध्द व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नाही हे दुर्दैव आहे. याबाबत झोपी गेलेल्या नगरपरिषद प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना जाग येण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने लेखी निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.

      त्यांन दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशात स्वच्छतेत अव्वल क्रमांक पटकावलेल्या वेंगुर्ला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी स्वच्छतेच्या बढाया मारत असतात. पण आपल्या शहरातील लोकांना आपण नळपाणी योजनेद्वारे पाणीपट्टी घेऊन पुरवत असलेले पाणी पिण्यायोग्य आहे का? हे बघत नाहीत. अशा पिण्याअयोग्य गढूळ पाण्याच्या वापराने शहरातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होतो याला जबाबदार कोण? शहरातील सांडपाण्याचा प्रश्न, शहरात वाढता मच्छरांचा प्रादुर्भाव, खराब रस्ते व मार्केटचा प्रश्न अशा विविध समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत नसतील तर असे लोकप्रतिनिधी वेंगुर्ला शहरवासीयांच्या काय कामाचे? त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत. तसेच मार्च २०२० ते आतापर्यंत आकारलेली पाणीपट्टी पूर्णपणे माफ करावी अशी मागणीही या लेखी निवेदनातून करण्यात आली आहे.

      हे निवेदन सादर करतेवेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश सचिव नम्रता कुबल, तालुका अध्यक्ष प्रसाद चमणकर, शहरअध्यक्ष सत्यवान साटेलकर, जिल्हा डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. संजीव लिगवत, जिल्हा सदस्य नितीन कुबल, माजी उपनगराध्यक्ष वामन कांबळे, संजय निराधार योजना समिती सदस्य मकरंद परब, प्रदिप पडवळ, सुहास मांजरेकर, स्वप्नील रावळ, हर्षद पारकर यांचा समावेश होता.  येत्या १० दिवसांत नागरिकांना शुध्द व स्वच्छ पाणी देण्यासाठी आपण प्रयत्न करुन असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळास दिले.

Leave a Reply

Close Menu