सीआरझेड बाबत दुसरी जनसुनावणीही रद्द

सीआरझेड जिल्हास्तरीय जनजागृती व समन्वय समिती, सिंधुदुर्ग यांच्या पाठपुराव्यामुळे २८ सप्टेंबर रोजी शासनाने व्हीसीद्वारे ऑनलाइन जनसुनावणी आयोजित केली होती. मात्र त्या जनसुनावणी वेळी कोणाचाच कोणाला मेळ नसल्याने जिल्हाभरातून सहभागी झालेल्या लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करुन निषेध करीत ती जनसुनावणी रद्द करण्यास भाग पाडले आणि तालुकानिहाय जनसुनावणी घ्या अशी मागणी केली होती. प्रशासनाने मात्र तत्परतेने दुस-या दिवशीच म्हणजे २९ सप्टेंबर रोजी वेंगुर्ला सावंतवाडी आणि कुडाळ या तीन तालुक्यातील नागरिकांसाठी वेंगुर्ला पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात ऑफलाईन जनसुनावणी आयोजित केली होती. मात्र ज्या अधिका-यांनी हा आराखडा बनविला ते अधिकारी या वेळी उपस्थित राहिले नाहीत. तसेच जनतेच्या हरकती ऐकून त्यांच्या समर्पक उत्तरे देण्यासाठी ही कुणी नव्हते. तसेच वास्तविक तिन्ही तालुक्यांना एकत्र बोलावणे हे आजच्या कोरोना महामारीच्या काळात धोकादायक आहे. तरीही तसा निर्णय प्रशासनाने घेऊन जनसुनावणीचे सोपस्कार पूर्ण करण्याची दुसरी तयारी केली होती, ती ही फोल ठरली.

       वेंगुर्ला येथील या जनसुनावणी वेळी ज्यांनी आराखडा तयार केला ते चेन्नई येथील अधिकारीच उपस्थित नव्हते. याबाबत प्रथम सीआरझेड जिल्हास्तरीय जनजागृती व समन्वय समितीने उपस्थित अधिकारी यांच्याशी चर्चा केली. या विषयावरुन चर्चा रंगली पण ठोस उत्तरे मिळत नसल्याने संबंधित अधिकारी नसल्याने ही जनसुनावणी रद्द करावी अशी मागणी सर्वांनी लावून धरल्याने निवासी उपजिल्हाधिकारी  शुभांगी साठे यांनी उपरोक्त निर्णय घेत तालुकानिहाय कार्यशाळा घेतल्यानंतरच पुढील जन सुनावणी घेण्यात येईल असे जाहीर केले. यावेळी तहसिलदार प्रविण लोकरे, सभापती अनुश्री कांबळी, नगराध्यक्ष दिलीप गिरप, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चव्हाण आदी उपस्थित होते.

      या जनसुनावणीसाठी समिती जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, वसंत तांडेल, भूषण नाबर, जगन्नाथ डोंगरे, जि.प.सदस्य दादा कुबल, सुनील डुबळे, सरपंच पप्पू परब, मनोज उगवेकर, गणेश तारी, सुमन कामत, रुपेश मुंडये, तुलसीदास ठाकूर, देवेंद्र डिचोलकर, वंदना किनळेकर यांच्यासह तिन्ही तालुक्यातील सरपंच, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.

      वेंगुर्ला पंचायत समिती कार्यालय बाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यालयाच्या दोन्ही बाजूने बेरीगेट्स लावून रस्ता अर्धा सुरु ठेवला होता. तसेच दंगल नियंत्रण पथकही तैनात ठेवले होते.

 

Leave a Reply

Close Menu