वेंगुर्ला बाजारपेठेच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या मच्छिमार्केटचे काम पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यामुळे मच्छिविक्रेत्यांना आपली हक्काची जागा आणि मत्स्य खवय्यांना एकाच ठिकाणी विविध प्रकारचे मासे मिळणे सुलभ होणार आहे. पूर्वीप्रमाणेच वेंगुर्ला शहराच्या मध्यवर्ती असलेल्या बाजारपेठेलगतच हे मच्छिमार्केटचे काम होत असल्याने येथील नागरिकांसह व्यापारी वर्गही सुखावला आहे. अर्थात, मच्छिमार्केट बांधकामाची वाटचाल नक्कीच सूकर नव्हती…..   

      वेंगुर्ला तालुक्याला मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारपट्टी लाभली आहे. यात शहराबरोबर ग्रामीण भागांचाही समावेश आहे. तालुक्याच्या व्यापार उदीमासाठी वेंगुर्ला शहरात असलेल्या बाजारपेठेकडे पाहिले जाते. नगरपरिषदेच्या मार्केटपरिसरात मच्छीमार्केटसाठी स्वतंत्र जागाही असल्याने शहरातील दाभोस, मांडवी भागासहीत मूठ, उभादांडा, नवाबाग, केळुस, दाभोली, वायंगणी, कोचरा, खवणे, निवती, मोचेमाड, शिरोडा या ग्रामीण भागातील मच्छिविक्री करणा-या महिला आणि पुरुष याठिकाणी मच्छिविक्री करीत असतात. यामध्ये सुमारे ८० महिला प्रत्यक्ष बाजारपेठेत येऊन मच्छिविक्री करतात. तर घाऊक व्यापा-यांकडून मासे घेऊन ते अन्य गावांमध्ये जाऊन विक्री करणा-यांमध्ये सुमारे ५० महिलांचा समावेश आहे.

      वेंगुर्ला येथील मच्छिमार्केट जीर्ण आणि धोकादायक झाल्याने १५ मार्च २०१३ रोजीच्या कौन्सिल सभेत ते पुन्हा नव्याने बांधण्याचे ठरविण्यात आले. यासाठी मत्स्योद्योग महामंडळाकडून वाढीव बांधकामासाठी वाढीव निधीही मंजूर झाला. पण, १३ जुलै २०१६ रोजी मत्स्यद्योग महामंडळाकडून वेंगुर्ला प्रशासनाला तात्काळ बाजारपेठ उभारण्याचे काम सुरु न केल्यास हा निधी केंद्र शासनाकडे परत जाण्याचे पत्र आल्यानंतर पुन्हा मच्छिमार्केट बांधकामाच्या हालचाली वाढल्या. जीर्ण वास्तूमुळे आपल्या जीवितास धोका निर्माण होऊ नये आणि नगरपरिषदेस बांधकाम करणे सोईचे जावे यासाठी येथील मच्छिविक्रेत्यांनी नगरपरिषदेने दिलेल्या पर्यायी जागेचा अवलंब केला. दरम्यान, व्यापारी गाळेधारक आणि प्रशासन यांच्यात वाद निर्माण झाला. याचे पर्यावसान पुढे

       कोर्ट-कचे-यांमध्ये झाले. वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत १६ ऑक्टोबर २०१६ रोजी तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते नूतन मच्छिमार्केटचे भूमीपूजन झाले. तरी मच्छिमार्केटच्या कामाला  वर्कऑर्डर मिळूनही व्यापारी गाळेधारकांच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे त्यांनी गाळे खाली करण्यास टाळाटाळ केली. व्यापा-यांच्या असहकार्यामुळे जुलै २०१७मध्ये प्रशासनाने मच्छिमार्केटच

          कॅम्प येथील आरक्षित जागेत नेण्याचा विचारही केला. तेव्हा मच्छिविक्रेत्यांनी कॅम्प येथे नेण्याऐवजी मांडवी येथे मच्छिमार्केट उभारावे अशीही मागणी केली होती. दरम्यान, गाळेधारक आणि नगरपरिषद यांच्यातील तिढा न्यायालयीन निर्णयानंतर सुटला आणि दि.३० ऑगस्ट २०१८ रोजी मच्छिमार्केट बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. सततचा पाठपुरावा आणि कामाचे नियोजन यामुळे प्रस्तावित मच्छिमार्केट अखेर वास्तवात येत आहे.

असे असेल मच्छिमार्केट – २ कोटी ९६ लाख खर्चाच्या मच्छिमार्केटमध्ये पार्किगची व्यवस्था, मुख्य रस्त्यालगत दुकानगाळे, गाळ्यांच्यावर एक हॉल, मुख्य मच्छिमार्केटमध्ये विक्रेत्या महिलांना सुसज्ज बसण्याची व पाण्याची व्यवस्था, सुकी मासळी विक्रीसाठी वेगळी जागा, दुस-या बाजूला मटण व चिकन यांची दुकाने, मच्छि घेऊन येणा-या गाड्या, टेम्पो थेट मच्छिमार्केटच्या हॉलला लावता येणारी अशी अत्याधुनिक सोयीसुविधा असणार आहे.

वेंगुर्ला बाजार आणि मच्छिविक्री- क्रॉफर्ड मार्केटची प्रतिकृती असलेल्या वेंगुर्ला बाजारपेठेत एकाच ठिकाणी भाजी, फळे, फुले, विड्याची पाने, किराणा माल, मासे यांसह इतर जीवनावश्यक वस्तूंबरोबरच सोनार, कासार, कपडे यांचीही दुकाने असल्याने वेंगुर्ला ही सर्वसमावेशक बाजारपेठ आहे. एकदा या बाजारात प्रवेश केलेली व्यक्ती सामानाच्या ब-याच पिशव्या सांभाळत बाहेर येताना दिसतात. वरील सर्व व्यवसाय हे एकमेकांवर अवलंबून आहेत. यात महत्त्वाचा वाटा आहे तो मासेविक्रीचा आणि खरेदीचा.

      मच्छिमार्केट बांधकामावेळी मच्छिविक्रीची जागा बदलण्यात आली. त्यामुळे या बाजारपेठेत येण्यासाठी असलेल्या अनेक मार्गांपैकी काही मार्ग सुनेसुने झाले. तेथील वर्दळ कमी झाली. सद्यस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गर्दी टाळण्यासाठी बरीच ठिकाणे बदलल्यानंतर आता श्रीमानसीश्वर जवळील मैदानात ही मच्छिविक्री स्थिरावली आहे. मुख्य बाजारपेठेपासून मच्छिविक्री दुरावल्याने इतरवेळी मच्छिखरेदी करताना सोबतच अन्य सामानही घेणा-या ग्राहकाला ठिकठिकाणी फिरावे लागत आहे. यात वेळेचाही अपव्यय होत आहे. तर प्रसंगी गाड्या असतील तर इंधनही वाया जात आहे.

मच्छिविक्रेते सुद्धा ग्राहकच – स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी मच्छिविक्री करणारे विक्रेते सुद्धा नेहमी स्वतः ग्राहकाची भूमिका बजावताना दिसतात. आपले मासे विकून झाल्यानंतर त्या मच्छिविक्रेत्या महिला आपल्या घरी जाताना मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. किराणा सामानापासून ते बेकरीतील खाद्यपदार्थ  इथपर्यंत त्यांची दैनंदिन खरेदी असते. या महिलांची दैनंदिन खरेदी असल्याने त्यांचा वेगळा असा पैसा याच बाजारपेठेतील काही दुकानदारांकडे पिग्मीच्या स्वरुपात तर काही सोन्या-चांदीच्या वस्तूंमध्येही गुंतवलेला असतो. सकाळीच घरातून निघताना नाश्ता करणे शक्य नसल्याने मासे विकता विकता पटकन इथल्या हॉटेल्समध्ये जाऊन न्याहारीबरोबरच कोल्ड्रींक्स घेणे त्या पसंद करतात. पेजेबरोबर भजीची पुडी आवर्जून त्या घरी घेऊन जातात. मासे विक्रीसाठी येणा-या ब-याच महिलांकडे वाहनांची सोय नसल्याने त्या रिक्शांना प्राधान्य देतात. जाताना-येताना रिक्षाने प्रवास केल्याने रिक्षा व्यवसायालाही त्यांचा हातभार लागतो. अशाप्रकारे मच्छि विक्री करणारी एक महिला आपण मिळविलेली रक्कम विविध दुकानदारांना खरेदीच्या मोबदल्यात देत असते. त्यामुळे मच्छिविक्री वेंगुर्ल्याच्या मुख्य बाजारपेठेसाठी किती महत्त्वाची आहे हे यावरुन लक्षात येते.

      अलिकडे मच्छिविक्रीच एका बाजूला गेल्याने मुख्य बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला आहे. याचा फटका प्रामुख्याने पालेभाजी, विड्याची पाने, बेकरी उत्पादने, रिक्षा व्यावसायीक, हॉटेल्स, कोल्ड्रींक्स दुकाने आणि सुवर्णकार यांना बसला आहे. एकमेकांवर अवलंबून असलेल्या या बाजारपेठा तेजीत चालण्यासाठी याठिकाणी मच्छिविक्री होणे आवश्यक बनले आहे.

विकासकामात आडकाठी का नको? – एखादी योजना जेव्हा सरकार आणते, त्याला निधी देते तेव्हा त्यासाठी लोकसहभाग अतिशय महत्त्वाचा असतो. विहित वेळेत नियोजित काम पूर्ण न झाल्यास किवा त्यामध्ये बराच खंड पडून त्याला स्थगिती आल्यास कच्च्या मालाची किमत, कामगारांची मजूरी वाढून ती योजना पूर्णतः कोलमडते. अशा पद्धतीने लांबत जाणा-या विकासकामांचा निधी परत जाण्याची भीतीही असते. असे झाल्यास विकासाच्यादृष्टीने ती नामुष्कीच असते. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रकल्पात येणारे नागरिक यांनी एकत्रित येत समन्वय दाखविल्यास बदल या सृष्टीच्या नियमानुसार येणारा काळ हा विकासकामांची उर्जितावस्था आणणारा ठरेल.

-सीमा मराठे (९६८९९०२३६७), प्रथमेश गुरव (९०२१०७०६२४)

———————————————————————————————————————————————————————-

      वेंगुर्ल्याचे नियोजित मच्छिमार्केट लवकरात लवकर होणे हे मच्छिविक्री महिलांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. आज रोजी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह यांची वानवा आम्हाला कायम जाणवते. अति ऊन तर कधी अति पाऊस यामुळे त्याचा परिणाम शारिरीक आरोग्यावरही होतो. प्रस्तावित मच्छिमार्केटची आम्ही पहाणी केली असून आम्हाला सुयोग्य अशी रचना तेथे होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर याचे उद्घाटन होऊन ते कार्यान्वित झाल्यास मच्छिविक्रीच्या निमित्ताने पूर्ण बाजारपेठेच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.                   – श्वेता हुले, मच्छीविक्रेती

———————————————————————————————————————————————————————-

      मच्छिमार्केट हे वेंगुर्ला बाजरपेठेचे वैभव आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमार्केटचे स्थलांतर आणि आठवडा बाजारही बंद, त्यामुळे फार मोठा आर्थिक फटका सर्वांच्याच व्यापारावर झाला आहे. मच्छिमार्केटचे काम जेवढ्या लवकर पूर्ण होईल तेवढ्या लवकर मच्छिविक्रेत्या महिला आणि अन्य व्यापारी यांना सुगीचे दिवस येतील.                                                 – राजन गावडे, सचिव – व्यापारी संघ

———————————————————————————————————————————————————————-

      – वेंगुर्ला मुख्य बाजारपेठेतील मच्छिविक्रीमुळे साहजिक आमचीही दैनंदिन खरेदी व्हायची. त्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागत नसे. एकाच प्रवासात विक्री आणि खरेदी होत असे. आता यात खंड पडला असून स्वतःच्या खरेदीसाठी आम्हाला वेगळा खर्च करावा लागत आहे. तरीही आम्ही हा त्रास घेत आहोत. कारण, आम्ही जर जुन्या मच्छिमार्केटमध्ये आता विक्री केली तर नविन मच्छिमार्केट बांधकामाला आमचा अडथळा निर्माण होऊन विलंब होईल. म्हणूनच ऊन, वारा, पाऊस, खर्च सहन करुन आमची प्रतिक्षा ही नविन मच्छिमार्केट बांधकामाच्या पूर्णत्वाकडे आहे.

 – अनुष्का आशिष खोबरेकर, मच्छिविक्रेती

———————————————————————————————————————————————————————-

      – मच्छिमार्केट ही वेंगुर्ल्याची एक शान आहे. गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता स्थानिक गरजांचा विचार करुन सर्वसोयींनीयुक्त असे मच्छिमार्केट व सुसज्ज दुकानगाळे यांचे अनेक मानवनिर्मित, निसर्गनिर्मित अडचणींवर मात करुन बांधकाम सुरु आहे. यामुळे शहरातील व्यापाराबरोबरच मच्छिविक्रेत्यांची गैरसोय, वाहतुक कोंडीचाही प्रश्न निकाली लागणार आहे.  तर वेंगुर्ला बाजाराच्या या बहुचर्चित मच्छिमार्केटचे काम लवकरच पूर्ण होऊन वेंगुर्लावासीयांची प्रतिक्षा संपुष्टात येणार आहे.                                                                        – दिलीप गिरप, नगराध्यक्ष

 

Leave a Reply

Close Menu