सिंधुदुर्गातील पहिल्या वॉटर एटीएम मशीनचा वेंगुर्ल्यात शुभारंभ

वेंगुर्ल्यात येणा-या पर्यटक, शहरातील नागारिकांना तसेच ग्रामिण भागातून येणा-या नागारिकांना पिण्याचे पाणी विनासायास उपलब्ध व्हावे यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेने नाविण्यपूर्ण योजनेतून ३० लाख रुपये खर्च करुन शहरात पाच ठिकाणी वॉटर एटीएम मशिन बसविली आहेत. वॉटर एटीएम सुविधा उपलब्ध करुन देणारी वेंगुर्ला नगरपरिषद ही सिंधुदुर्गातील पहिलीच नगरपरिषद आहे. या वॉटर एटीएम सुविधेचा शुभारंभ मंगळवारी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते करण्यात आला.

      वेंगुर्ला शहरात ग्रामिण भागातून येणा-या लोकांना, शहरातील नागरिकांना तसेच विशेषतः पर्यटकांना स्वच्छ पिण्याचे पाणी विनासायास व अल्प किमतीत उपलब्ध व्हावे यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेने कौन्सिल सभेत वेंगुर्ला बंदर, दाभोली नाका, रामेश्वर मंदिर, हॉस्पिटल नाका व नगरपरिषद इमारत अशा पाच ठिकाणी वॉटर एटीएम मशिन सुविधा उभारण्या संदर्भात ठराव करुन सदरचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला होता. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तत्कालीन पालकमंत्री दिपक केसरकर यांनी त्यासाठी नाविण्यपूर्ण योजनेतून ३० लाख रुपये निधी मंजूर केला होता. सदर ३० लाख रुपये निधीतून शहरात पाच ठिकाणी ही वॉटर एटीएम मशिन बसविण्यात आली आहेत.

      आज बाजारात वीस रुपये लिटर पिण्याच्या पाण्याच्या बाटलीचा दर आहे. मात्र, वेंगुर्ला नगरपरिषदेने साधं पाणी एक रुपया लिटर व थंड पाणी एक रुपया अर्धा लिटर असे माफक दर ठेवले आहेत. या मशिनचे उद्घाटन मंगळवारी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उप नगराध्यक्षा अस्मिता राऊळ, नगरसेवक सुहास गवंडळकर, विधाता सावंत, प्रशांत आपटे, प्रकाश डिचोलकर, धर्मराज कांबळी, कृतिका कुबल, स्नेहल खोबरेकर, अधिक्षक संगिता कुबल, पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

      या वॉटर एटीएम मशिनसाठी दिपक केसरकर यांनी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल नगराध्यक्ष गिरप यांनी केसरकर यांचे आभार व्यक्त केले. वेंगुर्ला नगरपरिषदमध्ये सर्वच पक्षाचे नगरसेवक एक असून विकास कामासाठी संघटीतपणे प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Close Menu