वेंगुर्ला मच्छिमार्केट प्रश्नी काँग्रेस आक्रमक

DCIM/857MEDIA/DJI_2213.JPG

वेंगुर्ला नगरपरिषद कौन्सिलची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली १० ऑक्टोबर रोजी संपन्न झाली. यावेळी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, नगरसेवक सुहास गवंडळकर, प्रकाश डिचोलकर, विधाता सावंत, प्रशांत आपटे, तुषार सापळे, धर्मराज कांबळी, शैलेश गावडे, दादा सोकटे, पूनम जाधव, कृतिका कुबल, स्नेहल खोबरेकर, कृपा गिरप-मोंडकर, संदेश निकम, साक्षी पेडणेकर, मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे यांच्यासहीत सर्व खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

      वेंगुर्ला नगरपरिषदेच्या बाजरपेठेतील मच्छिमार्केट इमारतीचे काम पूर्ण न झाल्याने तात्पुरत्या स्वरुपात मानसी गार्डन जवळ मच्छिमार्केटबसवण्यात आले आहे. दरम्यान, मच्छिविक्रेत्यांना याठिकाणी उन्हाचा त्रास होऊ नये तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेली गर्दी लक्षात घेता सोशल डिस्टनसिंगचे पालन व्हावे यासाठी नेट शेड बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान या शेडचा अंदाजित खर्च १ लाख ते सव्वा लाख एवढा अपेक्षित असल्याचा विषय सभागृहात आल्यावर याला विरोध करण्यात आला.

      कृतिका कुबल यांनी आपला या शेडला विरोध नसून पुढील दोन महिन्यात जर मच्छिमार्केट सुरु होत असेल तर एवढा खर्च यावर करु नये अशी सूचना मांडली. तर याबाबत राष्ट्रीय काँग्रेसने एक महिन्यांपूर्वी निवेदन दिले होते. आता नियोजित वेळेत मच्छिमार्केट पूर्ण न झाल्यास टाळेबंद आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी विधाता सावंत व प्रकाश डिचोलकर यांनी दिला. ठेकेदाराला एवढे पैसे देण्यापेक्षा आपले कर्मचारी वापरुन साहित्य खरेदी करून शेड बांधण्यात यावी त्यासाठी ५० ते ६० हजार पर्यंतच जास्तीत जास्त खर्च येईल अशी सूचना सुहास गावंडळकर यांनी मांडली. तसेच तात्पुरती शेड बांधताना मच्छिविक्रेत्यांना केवढी जागा लागते हे बघून शेड बांधावी. नाही तर अर्ध विक्रेते आत आणि अर्धे विक्रेते बाहेर अशाप्रकारची स्थिती होऊ नये अशी सूचना स्नेहल खोबरेकर यांनी मांडली. मच्छिमार्केटबाबत संबंधित ठेकेदारला सूचना दिल्या आहेत. येत्या दोन महिन्यात काम पूर्ण होईल असे यावेळी मुख्याधिकारी यांनी सांगितले.

      नगरपरिषदच्या गाळेधारकांचे भाडे माफ करण्यासंदर्भात तसेच नागरिकांना नळ कनेक्शनद्वारे येत असलेल्या गढूळ पाण्याबाबत तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी अशी सूचना उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ यांनी मांडली. तसेच शहरातील अल्पसंख्यांकांसाठी असलेल्या निधीतून येथील मुस्लिम बांधव व ख्रिस्ती बांधव यांच्या श्रद्धा स्थानातील परिसराचा विकास करावा व याबाबत तात्काळ कार्यवाही करावी असे पत्र प्रकाश डिचोलकर यांनी नगराध्यक्ष यांना दिले. नगरपरिषद हद्दीतील प्रत्येक निवासी व वाणिज्य मालमत्तांना वेगवेगळे मालमत्ता क्रमांक दर्शविणारे एकापेक्षा जास्त बिल्ले असल्याने शहरातील नागरिकांना अडचणी येत आहेत. योग्य मालमत्ता क्रमांकाचा बिल्ला नसल्याने येणा-या अडचणी लक्षात घेऊन नगरपरिषद मार्फत प्रत्येक घरावर घरक्रमांक दर्शविणारा बिल्ला लावण्यात यावा असे पत्र यावेळी प्रशांत आपटे यांनी दिले.

         तसेच यावेळी स्वच्छ भारत पर्यटन स्थळ येथे मोकळ्या जागेत शेडचे बांधकाम करणे, हाय पॉवर क्रशर मशीन खरेदी करणे यासाहित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

Close Menu