निधी खर्च करताना राजकारण नको – पालकमंत्री उदय सामंत

सिधुदुर्ग दौ-यावर आलेले पालकमंत्री उदय सामंत यांनी १२ ऑक्टोंबर रोजी वेंगुर्ला नगरपरिषदेला भेट देत जिल्हा नियोजन मार्फत जो निधी दिला होता त्याबाबत आढावा घेतला. नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे यांनी न.प.च्यावतीने शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले व विकास कामांचा अहवाल सादर केला.

     माजी मंत्री अणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी वेंगुर्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. हा निधी योग्य पद्धतीने खर्च होणे गरजेचे आहे. वेंगुर्ला न.प.ला देण्यात आलेला सर्व निधी खर्च झालाच पाहिजे. निधी खर्च करताना त्यात राजकारण नको. राजकारणामुळे काम थांबणे हे चुकीचे आहे. येत्या ८ दिवसात दिलेल्या निधींबाबत तात्काळ कार्यवाही करा. ठेकेदारांनी कधी पर्यंत कामे पूर्ण करणार हे सांगावे, पारदर्शकपणे काम करावे. किमान निम्मा निधी खर्च झाल्याशिवाय जिल्हा नियोजनमधून पुढील निधी दिला जाणार नाही अशी माझी भूमिका आहे. त्यामुळे वेळेत कामे मार्गी लावावीत अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.

       आम्ही सुचविलेली कामे मंजूर होत नाहीत. आमच्या वॉर्डात केलेले काम निकृष्ट आहे. आमच्या अर्जाचे उत्तरही मिळत नाही अशी तक्रार वजा व्यथा नगरसेवक संदेश निकम यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडली. यावर निकम यांच्या कामांची स्वतंत्र यादी मला द्या आणि निकम यांनी मागणी केलेल्या त्यादोन कामांबाबत दोन स्वयंस्पष्ट अहवाल येत्या आठ दिवसात सादर करा अशा सूचना पालकमंत्री यांनी मुख्याधिकारी यांना दिल्या. नगरसेवक विधाता सावंत यांनी मच्छिमार्केटच्या कामाबाबत विलंब होत असल्याने मच्छिविक्रेत्यांना त्रास होत असल्याचे सांगितले. यावर १ जानेवारी २०२१ रोजी मच्छिमार्केटचे उद्घाटन करण्यात येईल त्या अनुषंगाने त्याचे काम पूर्ण करण्याचेही आदेश संबंधितांना दिले.

     यावेळी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसिलदार प्रविण लोकरे, नगरसेवक प्रशांत आपटे, सुहास गवंडळकर, प्रकाश डिचोलकर, श्रेया मयेकर, कृतिका कुबल, सुमन निकम, धर्मराज कांबळी, पं.स. सभापती अनुश्री कांबळी, शिवसेनेचे  यशवंत परब, आबा कोंडसकर, सुनिल डुबळे, अजित राऊळ, सचिन वालावलकर, सुकन्या नरसुले, मंजूषा आरोलकर, प्रकाश गडेकर, सचिन गडेकर यांच्यासह न.प.चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu